Saturday, November 11, 2017

गुगलची गुहा आणि मी

अलिबाबा आणि चाळीस चोर ही कथा सर्वांना माहीत आहे. गरीब आणि म्हातारा अलिबाबा  आपल्या गाढवाला घेऊन जंगलात जळणाची लाकडे गोळा करायला गेला असताना त्याला चोरांची टोळी दिसते. चोर ‘खुल जा सिम सिम’ म्हणताच एका गुहेचे दार उघडते हे तो पहातो. चोर निघून गेल्यावर तेच शब्द उच्चारून तो गुहेत जातो. तेथे दागिन्यांचे व मोहोरांचे ढीग पाहून तो आनंदतो आणि आपल्या गाढवाच्या पाठीवर मावतील एवढ्या मोहोरा घेऊन घरी येतो. ….




गुहेतील संपत्ती पाहून अलिबाबाची जी स्थिती झाली अगदी तशीच अवस्था गुगलच्या गुहेत असलेले ज्ञानभांडार पाहून माझी झाली. संस्कृतदीपिका या आमच्या वेबसाईटवर संस्कृतविषयी नवी माहिती कोठे मिळेल याचा शोध मी घेत होतो. बहुतेक वेळा आपण करीत असलेला शोध काही पानांपुरताच मर्यादित राहतो आणि नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेऊन गुगल आपल्या जाहिरातदारांचीच माहिती आपल्याला दाखविते. त्यामुळे शोध अर्धवट न सोडता प्रयत्न चालू ठेवला तेव्हा  खोलवर कोठेतरी दडून बसलेली अनेक संस्कृत पुस्तकांची ग्रंथालये माझ्या हाती गवसली, कोणालाही मोफत डाऊनलोड करता येईल असे हे संस्कृत साहित्याचे रत्नभांडार पाहून माझे डोळे दिपून गेले.

गोष्टीतल्या अलिबाबाप्रमाणेच मी यातली अनेक पुस्तके गुगलच्याच डाॅक(डाॅंकी)वर लोड केली व मी संस्कृतच्या मोठ्या ग्रंथालयाचा मालक बनलो.
हा शोध घेत असतानाच मला संस्कृत साहित्याचे महत्व कळले.अगदी प्राचीन काळी कोणतीही साधने हाताशी नसताना आपल्या ऋषींनी, जीवनाचे तत्वज्ञान , विश्वाची रचना, गणित आणि तंत्रज्ञानात जे संशोधन केले, सर्वसुंदर संस्कृत व्याकरण अनमोल साहित्य निर्माण केले व योग्य समाजरचनेसाठी हिंदू धर्माची स्थापना केली हे समजल्यावर मन त्यांच्याविषयी आदराने भरून आले आणि आपण असे काहीच करीत नाही याचे वैषम्य वाटले.

सा-या जगातील लोकांनी भारतात येऊन भारतातील संपत्ती तसेच हे ज्ञानभांडार लुटून नेले व आपल्या देशाची प्रगती केली. कोहिनूर परदेशी गेला. अनेक संस्कृत ग्रंथांचे ग्रीक व अरब आणि मुस्लिमांनी व त्यानंतर अगदी अलिकडच्या काळात इंग्रजांनी आपापल्या भाषांत भाषांतर केले. आपण मात्र निष्क्रीय राहिलो.

मात्र अजून वेळ गेली नाही. पुन्हा चांगले दिवस येतील. आपला कोहिनूर गेला तरी केरळमध्ये रामानुजनच्या रुपाने गणितातला नवा कोहिनूर निर्माण झाला.




अपार संपत्ती गेली असली तरी केरळच्या पद्मनाभ मंदिरात अजून अपार संपत्तीचा साठा गवसला आहे व आणखीही अनेक ठिकाणी दडवून ठेवलेला परत मिळविण्याची प्रक्रिया शासनाने सुरू केली आहे.

गरज आहे ती गुगलच्या गुहेतून आपली हरवलेली रत्ने शोधण्याची आणि नवे रामानुजन तयार करण्याची.माझी रेखागणित, लीलावती, अंकपाश आणि भद्रगणित यावर माहिती लिहिण्याची धडपड यासाठीच आहे.

No comments:

Post a Comment