Saturday, June 30, 2018

वालचंद निवॄत्त प्राध्यापकांच्या स्नेहमेळाव्याचा रॊप्य महोत्सव

वालचंद कॉलेजच्या निवॄत्त प्राध्यापकांच्या स्नेहमेळाव्याचा रॊप्य महोत्सव दिनांक २९ जून २०१८ रोजी श्री. गणपतीमंदिरानजिकच्या हेरंब मंगल कार्यालयात संपन्न झाला. सांगलीचे राजेसाहेब श्री. विजयसिंह पटवर्धन यांना काही महत्वाच्या कामामुळे परगावी जावे लागले यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी शुभेच्छा संदेश, त्यांच्या संगीतमय प्रवासाविषयीची सीडी व आपले प्रतिनिधी यांना पाठविले होते.

 वालचंद महाविद्यालयाचे  संचालक डॉ. परिष्वाड, सहसंचालक डॉ. सोनावणे तसेच विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हनकर हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते.

सर्वप्रथम वालचंद निवॄत्त प्राध्यापक मंडळात सहभागी असणार्‍या सर्व दिवंगत मान्यवरांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. ज्ञानदीप फॊंडेशनचे डॉ. सु. वि. रानडे यांनी प्रास्तविक करून उपस्थितांचे स्वागत केले.

डॉ. श्रीधर करंदीकर यांनी पाहुण्यांचा परिचय तसेच स्वागत केले आणि शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.


स्नेहमेळाव्याचे संस्थापक प्रा. एच. यु. कुलकर्णी यांनी स्नेहमेळाव्याची जन्मकथा व कालानुसार त्यातील बदल यांची माहिती दिली. भविष्यातही हा मेळावा उपक्रम असाच  चालू राहील असा विश्वास व्यक्त केला.

प्रा. भालबा केळकर यांनी वालचंद महाविद्यालयातील १९७० ते २००० या काळातील नवनिर्मिती व व्यवस्थापन क्षेत्रात प्राध्यापकांनी केलेल्या अभिनव प्रयोगांची, त्याकाळातील विद्यार्थी-शिक्षक संबंधांची माहिती दिली व नोकरीऎवजी स्वयंउद्योग करण्यास प्रोत्साहन देणार्‍या त्या शिक्षणपद्धतीचे प्रारूप विकसित करून सध्याच्या शिक्षणसंस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी नवनिर्मिती व व्यवस्थापन केंद्राची आवश्यकता स्पष्ट केली.

डॉ. शियेकर यांनी वालचंद महाविद्यालयात संगणक क्षेत्रात केलेल्या मूलभूत प्रगतीचा आढावा घेतला. शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल वेळेत लागण्यासाठी उपयुक्त सॉफ्टवेअर, सांगलीतील इतर क्षेत्रातील व्यावसायिकांना संगणक प्रशिक्षण या कार्याविषयी माहिती दिली.

डॉ. सु. वि. रानडे यांनी प्रा. भालबा केळकरांच्या भाशणाचा धागा पकडून वालचंद परंपरा आणि नवनिर्मिती केंद्र यांचा मिलाफ घडवून ज्ञानदीप फॊंडेशनतर्फे ’वालचंद हेरिटेज इनोव्हेशन सेंटर’ सुरू करत असल्याचे  व त्यासाठी बीज भांडवल म्हणून स्वत:चे एक लाख रुपये देण्याचे जाहीर केले. वालचंदमधील पर्यावरण क्षेत्रात केलेले कार्य व संगणक प्रशिक्षणासाठी सुयश कॉंम्प्युटरमध्ये पत्नी शुभांगीने संगणक प्रशिक्षणाचे केलेल्या कार्याचा उल्लेख केला. ज्ञानदीप फॊंडेशनने विकसित केलेली संकेतस्थळे, वालचंदसंबंधित केलेले कार्य, पुस्तक प्रकाशन व मोबाईल  ऍपविषयी सचित्र सादरीकरण केले. पुढील आठवड्यात अमेरिकेत गेल्यावर सिलिकॉन व्हॅलीविषयी संकेतस्थळ तसेच तेथील विद्यार्थी व सांगलीकर यात दुवा म्हणून कार्य करण्याचा त्यांनी  मनोदय व्यक्त केला.

प्रा. एच. यु. कुलकर्णी यांनी वालचंदमधील आपले अनुभव तसेच त्यांनी विकसित केलेल्या भारतातील  रस्ते महामार्ग, रेल्वे व नद्यांची माहिती कळण्यासाठी मनोरंजक खेळ विकसित करताना आलेल्या अडचणींची व त्याला मिळालेल्या यशाची माहिती दिली.

डॉ. श्रीधर  करंदीकर यांनी कॄष्णा कारखान्याच्या लिफ्ट इरिगेशन स्कीम साठी केलेले कार्य व कॉलेज आणि सहकारी यांनी केलेली मदत याचा उल्लेख करून कॉलेज, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांत त्या काळी घनिष्ठ, कॊटुंबिक पातळीचे संबंध  असल्याचे नमूद केले.

प्रा. भालबा केळकर यांनी एआर ई या त्यांच्या सहकारी तत्वावरील उद्योगविषयक आपले अनुभव तसेच वालचंद कॉलेजच्या प्रॉडक्शन व संशोधन केंद्राने भाभा ऍटोमिक केंद्रासाठी केलेल्या उपकरणाविषयी व किर्लोस्कर कारखान्यात केलेल्या उद्योग व्यवस्थापना विषयी माहिती दिली.

प्रा. अराणके यांनी आपल्या उद्योगाविषयी माहिती देऊन उद्योग सुरू करण्यासाठी तंत्रज्ञानातील पदवी आवश्यक नसून तशी मानसिकता, कष्ट करण्याची व जोखीम पत्करण्याची तयारी असावी लागते हे स्पष्ट केले.

विलिंग्डन  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हनकर यांनी राजेसाहेबांचे याविषयावरील विचार तसेच सध्याच्या प्राध्यापक वर्गाच्या मानसिकतेत व शिक्षणपद्धतीत सकारात्मक  बदल घडवून आणण्यासाठी अशा प्रयत्नांची गरज असल्याचे सांगून नवनिर्मिती केंद्रास शुभेच्छा दिल्या.

 वालचंद महाविद्यालयाचे संचालक डॉ. परिष्वाड यांनी वालचंद कॉलेजने २०१७ ते २०१८ या काळात केलेल्या प्रगतीचे तसेच विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सचित्र सादरीकरण केले व वालचंद कॉलेज अशा उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन दिले. सहसंचालक डॉ. सोनावणे यांनी पुढील स्नेहमेळावा कॉलेजमध्ये घेण्याचे आमंत्रण दिले.

ज्ञानदीप इन्फोटेकच्या व्यवस्थापक सॊ. मधुरा रानडे यांनी कार्यक्रमाच्या यशाबद्दल सर्वांना धन्यवाद देऊन आभारप्रदर्शन केले.

डॉ. अंजली टिकेकर यांनी आपल्या सुरेल आवाजात पसायदान गायले. त्यानंतर परस्पर संवाद व  स्नेहभोजन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
---------
वालचंद हेरिटेज इनोव्हेशन सेंटर

वालचंद कॉलेजमधील माजी विद्यार्थ्यांनी  नवनिर्मिती आणि उद्योग व्यवस्थापनात आपला वेगळा ठसा उमटविला असून विविध क्षेत्रात त्यांनी मानाचे स्थान मिळविले आहे.  कॉलेजमधील प्राध्यापकांची वॆशिष्ठ्यपूर्ण शिक्षणपद्धती,  मार्गदर्शन व प्रयत्न यास कारणीभूत आहेत हे विसरून चालणार नाही’

वालचंद कॉलेजच्या या यशस्वी प्रवासाचा मागोवा घेऊन तसेच वालचंदचे निवॄत्त प्राध्यापक व माजी विद्यार्थी यांच्या सहयोगातून तंत्रवॆज्ञानिक संशोधन व स्वयंउद्योगास प्रेरक असे केंद्र सुरू करण्याचे ज्ञानदीप फॊंडेशनने ठरविले आहे.  कारण  ज्ञानदीप इन्फोटेक तसेच ज्ञानदीप फॊंडेशन या दोन्ही संस्थांची निर्मिती वालचंदच्या ज्ञानवटवॄक्षाच्या छायेतच झाली आहे.

नवनिर्मिती व स्वयंउद्योग यात  प्रदीर्घ अनुभव व आस्था असणारे वालचंदचे प्रा. भालबा केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ’वालचंद हेरिटेज इनोव्हेशन सेंटर’ या नावाने हा प्रकल्प आकारास येणार आहे. शालेय स्तरावर मराठीतून विज्ञान प्रसार करणार्‍या सांगलीतील 'मराठी विज्ञान प्रबोधिनी’ या संस्थेने या उपक्रमात सहभागी होण्याचे मान्य केले आहे.


Monday, June 25, 2018

अरविंद देशपांडे - हळव्या कवीमनाचे उद्योजक व समाजसुधारक

वालचंद कॉलेजच्या असोसिएशन ऑफ पास्ट स्टुडंट्स्चे माजी अध्यक्ष व कोल्हापूरमधील प्रथितयश उद्योजक श्री. अरविंद उर्फ आबा देशपांडे  यांचेशी ज्ञानदीप फॊंडेशनच्या फॊंडेशनच्या संशोधन प्रकल्पासंदर्भात यांचेशी दिलखुलास गप्पा करण्याचा काल योग आला, प्रा, भालबा केळकर, अरविंद यादव आणि शिवाजी विद्यापिठाचे श्री. गिरीश कुलकर्णी  असे आम्ही सर्व शिरोलीतील त्यांच्या कारखान्यात जमलो होतो.

सांगली परिसरात तंत्रज्ञान संशोधन व नवनिर्मिती याचे केंद्र स्थापन करण्याबाबत त्यांची मते जाणून घेण्यासाठी ही बॆठक आयोजित करण्यात आली होती.

सुरुवातीला मी त्यांना पूर्वी त्यांच्या बंगल्यावर भेटल्याची आठवण करून दिली व वालचंद माजी विद्यार्थी संघटनेमधील त्यांच्या कार्याबद्दल आभार व्यक्त केले. प्रत्येक माजी विद्यार्थ्याने ५००० रु. या संघटनेला द्यावेत तसेच प्रत्येक विभागात माजी विद्यार्थ्यांनी महिन्यातून एक तरी व्याख्यान देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे अशी योजना मांडली होती मात्र फारच थोड्या लोकांनी यास प्रतिसाद दिला. त्यांनी ’मला काय मिळणार? ’ यासारखी  लोकांची मानसिकता  यात कशी आडवी आली याची खंत व्यक्त केली. आपले कॉलेज हे आपल्या आईसारखे आहे व त्यापासून काही मिळण्याची अपेक्षा करणे कसे चूक आहे ते त्यानी दाखवून दिले.

त्यांनी स्वत: त्यांच्या जन्मगाव मांगले या खेडेगावातील शाळेत  डिजिटल स्कूलसाठी त्यांनी आपल्या गजेंद्र ट्रस्टमधून कसे साहाय्य केले ते सांगितले.

सहज बोलता बोलता त्यांनी झाडाचे उदाहरण दिले व झाड होणे किती अवघड असते हे काव्यातून सांगितले.

 प्रा. भालबा केळकरांच्या नवनिर्मिती केंद्र कल्पने विषयी ते म्हणाले यासाठी फार मोठे भांडवल व व्यवस्थापन यंत्रणा उभारावी लागेल व एकट्या दुकट्याला हे शक्य नाही.  शिवाजी विद्यापिठाकडे अशी यंत्रणा आहे व सध्याचे कुलगुरू अशा प्रकल्पाला त्यांच्या विकास योजनेत स्थान देऊ शकतील तरी आपण त्यांच्याशी याविषयी चर्चा करावी. ते स्वत: या संदर्भातील अभ्यासगटात एक प्रतिनिधी असल्याने त्याविषयी कुलगुरूंशी बोलण्याचे आश्वासन दिले.

शिवाजी विद्यापिठाचे श्री. गिरीश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात अडचणी येतात व त्या दॄष्टीने शिक्षणसंस्था व उद्योग यात संपर्क व संवाद साधण्यासाठी व्यवस्थापन केंद्र निर्माण केल्यास शिवाजी विद्यापीठ त्यास संलग्न करून घेऊ शकेल असे मत व्यक्त केले.

प्रा. केळकर यांनी सीमेवर लढणारे सॆनिक आणि विद्यार्थी यात दुवा निर्माण करण्यासाठी प्रत्येक गावातील सॆनिकांच्या घरी विद्यार्थ्यानी भेटी देऊन सॆनिकांना त्यांच्या घराची खुशाली कळवावी. यातून विद्यार्थ्यांना सॆनिकांच्या कार्याची व त्यांच्या कुटुंबांना सहन कराव्या समस्यांची जाणीव होईल. सॆनिक शहीद झाल्यावर एकत्र जमणार्‍या लोकांपेक्षा हे कार्य निश्चितच अधिक उपयुक्त व संरक्षण दलाविषयी विद्यार्थ्यात आदर व आपुलकी निर्माण करण्यात यशस्वी होईल असे मत व्यक्त केले. श्री. देशपांडे यांना ही कल्पना आवडली व विद्यापिठातर्फे यास चालना मिळू शकेल या दॄष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

ज्या उद्देशाने आम्ही श्री. देशपांडे  यांचेकडे आम्ही गेलो होतो त्यापेक्षा वेगळ्या पण मॊलिक सूचना व कल्पना आमच्या गाठी जमा झाल्या. 

Saturday, June 23, 2018

स्वप्नातून सत्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे

माझ्या स्वप्नातील सातारा, पुणे, नाशिक याठिकाणच्या संकेतस्थळांच्या कल्पनेत मी रंगून गेलो होतो. सोलापूरविषयीही असलेले माझे स्वप्न उलगडून सांगण्याची मला इच्छा झाली होती. पण मग लक्षात आले की ही स्वप्ने माझी असली तरी ती पूर्ण करण्यासाठी स्थानिक लोकांचे सहकार्य मला लागणार आहे. खरे म्हणजे त्यांनीच ते पूर्ण करावयास हवे. कारण ते त्यांना सहज शक्य आहे व उपयोगीही ठरणार आहे. अर्थात मला तेथील अशा उपक्रमशील व्यक्तींचा शोधून त्यांच्या मनात माझे स्वप्न रुजवावे लागेल. पण स्वप्नांच्या मागे न धावता मला स्वत:ला सत्य व सद्य परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. कारण मला व्यक्तिश: अशा ठिकाणी जाऊन त्यांना प्रोत्साहित करणे व मदत करणे शक्य होणार नाही.

स्वप्नातून सत्याकडे व रात्रीच्या अंधारातून उद्याच्या प्रकाशाकडे वाटचाल करण्याची वेळ माझ्यावर आली आहे.

मी आणखी पंधरा दिवसात अमेरिकेत कायमच्या वास्तव्यास जाणार आहे. सुदॆवाने माझा मुलगा, मुलगी व पुतण्या यांची कुटुंबे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील बे एरिया नावाच्या पण सिलिकॉन व्हॅली या नावाने ओळखल्या जाणार्‍या छोट्या भागात स्थायिक झाली आहेत. लिंब खिंण्डीतून दिसणारे सातारा शहर, कात्रजच्या  बोगद्यातून बाहेर पडल्यावर दिसणारे पुणे शहर किंवा सिन्नरच्या पठारावरून दिसणारे नाशिक शहर यासारखेच सिलिकॊन व्हॅलीचे दर्शन  विकिपिडियातील फोटोत पहावयास मिळते.




या सिलिकॉन व्हॅलीत माझे उरलेले पुढचे छोटे आयुष्य जाणार असल्याने सिलिकॉन  व्हॅलीचे  संकेतस्थळ निर्माण करण्याचे माझे स्वप्न सत्त्यात आणणे माझे पहिले काम आहे.


माझ्या पूर्वीच्या लेखात मी मायसिलिकॉन व्हॅली या प्रस्तावित संकेतस्थळाविषयी सूतोवाच के्ले होते. इंग्रजीमध्ये या विषयावर काही लेख मी गेल्या वर्षी लिहिले होते त्याचेच मराठी रूपांतर करण्याचे काम मी प्रथम हाती घेणार आहे.

बंगलोरला भारताची सिलिकॉन व्हॅली असे म्हटले जाते कारण अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली हे जसे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुतेक सर्व कंपन्यांचे वसतीस्थान आहे त्याप्रमाणे बंगलोरमध्येही या कंपन्यांनी आपल्या शाखा उघडल्या असून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस, विप्रो सारख्या अनेक भारतीय  कंपन्या  उदयास आल्या आहेत. ’सिलिकॉन व्हॅली ग्रेट्’ या क्षत्रिय यांच्या पुस्तकात सिलिकॉन व्हॅली व बंगलोर येथील  माहिती तंत्रज्ञानातील प्रथितयश संशोधक आणि उद्योजकांच्या मुलाखती घेऊन या दोन्ही ठिकाणांतील साम्यस्थळे दर्शविली आहेत.
२००९ मध्ये यावर लिहिलेला माझा लेख खाली देत आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------
सिलिकॉन व्हॅली ग्रेटस्‌ - पुस्तक परिचय
लेखक - एस. एस. क्षत्रिय
विकास पब्लिशिंग हाउस प्रा. लि.

आय. टी. क्षेत्रात नाव मिळविलेल्या यशस्वी उद्योजकांचे फोटो व माहिती असणारे ‘सिलिकॉन व्हॅली ग्रेटस्‌’ हे पुस्तक बंगलोरला फोरममध्ये पाहिले. कुतुहलाने पुस्तक चाळले तेव्हा त्यात बंगलोर व सिलिकॉन व्हॅली यांची तुलना केलेली व दोन्ही ठिकाणच्या आय. टी. उद्योजकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन माहिती लिहिलेली आढळली.

मी सिलिकॉन व्हॅलीमध्ये नुकताच जाऊन आलो होतो. तेथील वैभव पाहून माझे डॊळे दिपून गेले होते. सिलिकॉन व्हॅलीला हे वैभव मिळवून दॆण्यात भारतीयांचा महत्वाचा वाटा आहे हे ऎकल्याने मी मनोमन सुखावलो होतो. टेक म्युझियममध्ये ‘सुहास पाटील’ हे नाव कोरलेले पाहिल्यावर माझी छाती अभिमानाने भरून आली होती. आय. टी. उद्योगाची पंढरी असणार्‍या स्टॅन्फोर्ड युनिव्हर्सिटीला भेट दिल्यावर तर मी भक्तीभावाने तेथील दगडगोटे सिलिकॉन चिप मानून घरी घेऊन आलो होतो. भारतात परतल्यानंतर आमच्या ज्ञानदीपच्या भावी संगणक तज्ञांना त्यातील एक एक दगड देऊन तो देवात ठेवण्यास सांगितले होते व तुम्ही सर्वांनी सिलिकॉन व्हॅलीत जाऊन यश मिळवायची खूणगाठ बांधा असे सुचविले होते. साहजिकच ‘सिलिकॉन व्हॅली’ हे नाव वाचताच मी ते पुस्तक विकत घेतले.

अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर असणार्‍या कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रॅन्सिस्को ते सॅन ओसे पर्यंतच्या दहा मैल रुंदीच्या व ३० मैल लांबीचा प्रदेशास ‘सिलिकॉन व्हॅली’ असे म्हणतात.


तेथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ज्या गतीने प्रगती झाली व नव्या कंपन्या उदयास आल्या, त्याचीच पुनरावृत्ती भारतात बंगलोरमध्ये पहावयास मिळाली. त्यामुळे लेखकाने बंगलोरला भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हटले आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत सिलिकॉन व्हॅली व बंगलोरविषयी माहिती व भारतीयांच्या सिलिकॉन व्हॅलीमधील वास्तव्य व टेक्नॉलॉजीमधील प्रगतीचा आढावा घेण्यात आला आहे व मुख्य भागात नऊ उद्योजकांची माहिती देण्यात आली आहे. त्याचा थोडक्यात सारांश.

१. चंद्रशेखर - चैन्नईजवळच्या कुंभकोरम या गावी मध्यमवर्गीय कुटुंबात १९६० मध्ये कि. बा. चंद्रशेखर यांचा जन्म झाला. इंजिनिअरिंगच्या प्रवेशपरिक्षेत यश न मिळाल्याने त्यांनी बीएससीत प्रवेश घेतला. विद्यापिठात तिसरा क्रमांक मिळवून त्यांनी आपल्या बुद्धीची चमक दाखवली व मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा मिळविला. सात वर्षे विप्रोत नोकरी केल्यानंतर त्यांनी १९९० मध्ये अमेरिकेतील रोल्टा कंपनी जॉईन केली. १९९२ मध्ये आपल्या घरातच स्वतःची फोरेस नावाची कंपनी काढली. त्यांची पत्नी सुकन्या हिने त्यात मदत केली. पुढे याच कंपनीचे एक्झोडस हे नामांतर झाले. अमेरिकेतील प्रोजेक्ट मिळवून भारतातील त्यांच्या मित्रांनी बंगलोरमध्ये स्थापन केलेल्या कंपनीमार्फत काम करुन घेऊन त्यांनी आपल्या व्यवसायाचा व्याप वाढवला. ऎक्झोडस ही कंपनी १९९८ मध्ये पब्लिक लिमिटेड झाली. टीआयई या भारतातील आय टी उद्योजकांना मदत करणार्‍या संस्थेचे कंवल रेखी यांनी २००,००० डॉलरची मदत केली. यातूनच जॅमक्रॅकर या सॉफ्टवेअर कंपनीची इ. स. २००० मध्ये स्थापना केली व त्यासाठी १०० दशलक्ष डॉलरचे भांडवल मिळविले. नंतर त्यांनी e4e नावाची नव्या उद्योगांना भांडवल पुरविणारी कंपनी स्थापन केली.

२. बी. व्ही जगदीश - जगदीश यांनी १९७८ मध्य् बी. ई. इलेक्ट्रिकल व १९८० मध्ये व्हीजेटीआयमधून एमटेक केले व महिना १२०० रु. ची नोकरी पत्करली. दोन मुलांसह आठ बाय आठ फुटांच्या एका खोलीत त्यांनी दोन वर्षे संसार केला. टाटा एलेक्सी व नंतर सिंगापूर मध्ये नोव्हेल कंपनीत त्यांनी नोकरी केली. अमेरिकेतील कंपन्यांशी संपर्क वाढवून व चंद्रशेखरांच्या एक्झोडसमध्ये जॉईन होऊन त्यांनी आपल्या उद्योगाचा जम बसविला. नेटमॅजिक, नेट स्केलर या डाटा सेंटर कंपन्या तसेच आयस्टेशन नावाची मेल सर्व्हीस देणारी कंपनी काढली.

३. कंवल रेखी - स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी रावळपिंडी येथे जन्म झालेले कंवल रेखी कानपुरात विस्थापित म्हणून रहायला आले. १९६३ मध्ये बीएससी व आय. आय टी, मुंबईला १९६८ मध्ये बी टेक. करून मिशिगन युनिव्हर्सिटीत एमएस केले. १९७० मध्ये आर.सी.ए कंपनीत नोकरी सुरू केली. १९७१ मध्ये त्यांना ले ऑफ मिळाला. ४-५ वर्षे स्वयंशिक्षण व व्यवसाय केल्यानंतर झीलॉग कंपनीत ३० टक्के पगार कपात असणारी नोकरी मिळाली. इंदरनील व सुभाष बाल यांच्या मदतीने एक्सेलॉन या कंपनीची १९८२ मध्ये स्थापना. १९८९ मध्ये ही कंपनी नोव्हेलने २१० दशलक्ष डॉलरला विकत घेतली व नोव्हेल कंपनीत ते अधिकारी बनले. १९९४ मध्ये त्यांनी टीआयईची स्थापना केली. एक्झोडसमध्ये पैसे गुंतवले व नव्या उद्योजकांना प्रोत्साहन दिले.

४. नरेन बक्षी - १९६३ मध्ये बिटसमध्ये बी ई व अमेरिकेत एमएस व एमबीए केले. हिंदुथान मोटर्स व स्टॅन्डर्ड ऑईल कंपनीत नोकरी केल्यानंतर अमेरी ट्रस्ट बॅंकेत उपाध्यक्ष झाले. १९७९ मध्ये टीआरडब्ल्यू कंपनीत संचालक. व्हर्साटा व व्हिजन सॉफ्टवेअर कंपन्यांची स्थापना. इ. स १९९८ मध्ये केवळ एक दशलक्ष भांडवल असणार्‍या व्हर्साटा कंपनीला इ. स. २००० मध्ये १०० दशलक्ष भांडवल शेअरमधून मिळाले. राजस्थान आयटी उद्योजकांसाठी RITEG संस्थेची स्थापना. त्यांची पत्नी कुसुम हिने अमेरिकेत RANA राजस्थानी असोसिएशन स्थापन केली. जैन मंदिरे व असोसिएशनच्या कामात आता व्यस्त.

५. प्रदीप कार - १९८१ मध्ये नागपूरमधून बीई. १९८३ मध्ये एमबीए. विप्रोत एक वर्ष नोकरी. १९८४ मध्ये कॉम्प्युटर पॉईंट, मुंबई, बंगलोर व दिल्ली येथे. शिवा कॉंप्युटर्सची स्थापना. नंतर सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीत अधिकारी म्हणून अमेरिकेत नोकरी. १९८८ मध्ये परत भारतात. १९८९ मध्ये मायक्रोलॅंड कंपनीची स्थापना. नोव्हेलचे भारतातील एज्युकेशन सेंटर म्हणून मायक्रोलॅंडचे काम. १९९२ मध्ये कॉंम्पॅक कॉंप्युटर्सची स्थापना. सिनॉप्टिक व सिस्कोशी संबंध. इंडिया डॉट कॉम, ITspace.com व media2india.net वेबसाईटची निर्मिती.

६. राज सिंह - १९६८ मध्ये बीई, १९७० मध्ये आय आय टी दिल्लीत पीजी डिप्लोमा, १९८१ मध्ये मिनेसोटा युनिव्हर्सिटीत एमएस. नौदलात आयएनएस विक्रांतवर नोकरी. डिजिटल डिझाईन व व्हेरीलॉग वर पुस्तक प्रसिद्ध. InterHDL, Fiberlane Communications, Cerrent, Siara कंपन्यांची स्थापना. भांडवल पुरवठा करणार्‍या संस्थात भागीदारी.

७. सबीर भाटीया - बीएस व एमएस. अँपल कॉंप्युटर्स व नंतर फायर पॉवर सिस्टीम मध्ये नोकरी. फायर पॉवर सिस्टीममध्ये नव्या RISC प्रोसेसर असणार्‍या पॉवरपीसी चिपवर आधारित कॉंप्युटरची निर्मिती. १९९५ मध्ये जावासॉफ्ट कंपनीची स्थापना. DFJ कंपनीकडून १५ टक्के भागीदारीच्या मोबदल्यात ३ लाख डॉलरचे भांडवल मिळविले. १९९६ मध्ये HOTMAIL ची निर्मिती. एका वर्षात ५ दशलक्ष सभासद व दररोज ३०००० सभासदांची भर. मायक्रोसॉफ्ट ने हॉटमेल ४०० दशलक्ष डॉलरला विकत घेतले. आरजू वेबसाईटची निर्मिती परंतु पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने साईट बंद केली. टेलेव्हॉईस कंपनीत सध्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत.

८. उमंग गुप्ता - आय.आय.टी. कानपूर मधून १९७१ मध्ये बी. टेक., १९७२ मध्ये अमेरिकेत एमबीए. व कॉपर फील्ड, ओहिओ येथे नोकरी. १९७३ मध्ये आयबीएममध्ये रुजू. भारतात आयबीएम मार्केटींग मॅनेजर म्हणून सहा महिने काम. मॅग्नसन कॉंप्युटर्समध्ये नोकरी. सिस्टीम आर विकसित केले. १९८४ मध्ये एसक्यूएल डाटाबेसवर आधारित प्रणालीसाठी गुप्ता टेक्नॉलॉजीजची स्थापना. गुप्ता टेक्नॉलॉजीजचे सेंचुरा सॉफ्टवेअर म्हणून नामांतर. कीनॊट सिस्टीम्समध्ये गुंतवणूक. नेटलॉक कंपनीचे अध्यक्ष.

९. एन. आर. नारायण मूर्ती - १९६७ मध्ये म्हैसूर् येथे बीई. १९६९ मध्ये आय.आय.टी. कानपूर मधून एम. टेक., सेसा या फ़्रेंच कंपनीत नोकरी. सिस्टीम रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे येथे दोन वर्षे नोकरी. १९७७ मध्ये पटनी कॉंप्युटर्समध्ये रुजू. केवळ २५० डॉलर भांडवलावर १९८१ मध्ये इन्फोसिसची स्थापना. अमेरिका व फ़्रॉन्समधील कंपन्यांशी करार. १९८७ मध्ये बोस्टन येथे इन्फोसिसची शाखा. १९९३ मध्ये पब्लिक कंपनी म्हणून नोंदणी. १९९६ मध्ये ब्रिटन व १९९७ मध्ये जपानमध्ये शाखा. इ. स. १९९९ मध्ये नॅसडॉक स्टॉक एक्स्चेंजवर नोंदणी.

वरील सर्व उद्योजकांची चरित्रे वाचल्यावर मला पहिल्याप्रथम हे जाणवले की ही सर्व माणसे मध्यम वर्गातून पुढे आली आहेत. सर्वसामान्य मुलांप्रमाणे त्यांच्याही आयुष्यात अपयश, निराशा व नोकरीतील अशाश्वतता व हाल अपेष्टा आल्या होत्या. पण या सर्वांवर मात करून केवळ चिकाटी, दुर्दम्य आत्मविश्वास व उच्च ध्येय गाठण्यासाठी लागणारी कष्ट करण्याची तयारी या गुणांवर त्यांनी दैदीप्यमान यश मिळविले आहे. आपल्याकडे बर्‍याच वेळा एकदा अपयश आले की मुले निराश होऊन प्रयत्न सोडतात. त्यांच्यासाठी चिकाटी व धाडस असले की कशी प्रगती साधता येते हे या उद्योजकांनी दाखवून दिले आहे.

आजच्या मंदीच्या व बेरोजगारीच्या काळात वरील उद्योजकांची चरित्रे निश्चितच विद्यार्थ्यांना मार्गदर्शक व नवी प्रेरणा देणारी ठरतील. आय. टी. उद्योजकांच्या प्रत्यक्ष मुलाखतीवर पुस्तक लिहून लेखकाने नव्या पिढीसाठी अनमोल खजिना खुला केला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
---
’ वर्ल्ड इज फ्लॅट’ या पुस्तकात तर बंगलोर भविष्यात सिलिकॉन व्हॅलीशी बरोबरी करेल आणि सार्‍या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात समानता येईल असे लिहिले आहे. २०१० मध्ये या पुस्तकावर मी  ’वर्ल्ड इज नॉट फ्लॅट’ असे मत व्यक्त करून आंतरराष्ट्रीय कंपन्यांची आपमतलबी वॄत्ती व आर्थिक, सामाजिक विषमता यामुळे हे शक्य होणार नाही असे लिहिले होते.

वरील दोन्ही पुस्तकांच्या पार्श्वभूमीवर मला आता नव्या सिलिकॉन व्हॅलीविषयी लिहायचे आहे. मात्र ते बाहेरचा म्हणून नव्हे तर तेथील एक नागरिक म्हणून.

सांगलीतील आणि विशेषकरून वालचंद कॉलेजमधील अनेक माजी विद्यार्थी तेथे असल्यामुळे मला फार परके वाटणार नाही. सांगली व सिलिकॉन व्हॅली मध्ये गोल्डन गेट ब्रिजसारखा सिलिकॉन गेटवे ब्रिज करण्याचे काम मायसिलिकॉन व्हॅली हे संकेतस्थळ करेल असा माझा विश्वास वाटतो.

ज्ञानदीपचे आणखी एक अधुरे स्वप्न - विज्ञान छंदगॄह


(१९८४ साली मराठी विज्ञान प्रबोधिनीच्या म्हैसाळ येथील संमेलनाच्या निमित्ताने काढलेल्या स्मरणिकेतील लेख - विज्ञान छंदगृहाचे माझे त्यावेळचे स्वप्न आजही अपूर्णच राहिले आहे.)
आज या स्वप्नाची आठवण होण्याचे कारण म्हणजे वालचंद कॉलेजमधील माझे गुरू आणि संशोधन आणि नवोद्योग यात अनुभव व रुची असणार्‍या प्रा. भालबा केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदीप फॊंडेशनने असाच एक मोठा प्रकल्प हाती घेण्याचे ठरविले आहे.


साधे कागदाचे विमान. ते पण आता खर्‍या विमानासारखे आकाशात झेपावणार होते. सारी मुले डोळे विस्फारुन विमानाकडे पाहात होती. प्रत्येकाच्या हातात विमान करण्याचे साहित्य होते. आपणही तसेच विमान करावे अशी तीव्र इच्छा सर्वांच्या मनात निर्माण झाली होती. त्यांच्या अनेक शंकांना मोठ्या आत्मविश्वासाने उत्तरे देत एक विद्यार्थी विमानाचा तोल आणि पंखांचा बाक तपासून पाहात. होता.दुसर्‍या बाजूला एका टेबलाभोवती बरीच मुले कोंडाळे करून उभी होतॊ. इलेक्ट्रिकल उपकरणातून चित्रविचित्र आवाज येत होते. त्याचे सर्कीट समजावून सांगण्यात एक कॉलेज विद्यार्थी गर्क झाला होता. प्रभावी विज्ञान शिक्षणाचा एक अभिनव प्रयोग सुरू झाला होता.

ज्या कल्पनेने मराठी विज्ञान प्रबोधिनीने हा विज्ञान छंदवर्ग सुरू केला त्यात केवळ करमणूक वा पूरक अभ्यासाची सोय एवढाच उद्देश नाही तर आजच्या विज्ञानयुगातील ते महत्वाचे राष्ट्रीय कार्य आहे ही भावना त्यामागे आहे.

विकसित राष्ट्रांत आज विज्ञान व तंत्रज्ञान यांची इतक्या झपाट्याने प्रगती होत आहे की भारतासारख्या विकसनसशील राष्ट्राला तो वेग गाठणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. त्यातच गरीबी, अज्ञान, अंधश्रद्धा व वाढती लोकसंख्या असे अनेक प्रश्न या विज्ञानप्रगतीत , खीळ घालत आहेत. परदेशात विकसित झालेले तंत्रज्ञान व आधुनिक साधने यांचा देशात येणारा ओघ एवढा वाढला आहे की, स्वदेशी उद्योग त्यामुळे धोक्यात आले आहेत. यावर जर वेळीच उपाययोजना केली नाही तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या या आक्रमणामुळे आपण पुन्हा एका वेगळ्या अर्थाने परतंत्र आणि परावलंबी होण्याची भीती आहे.
उदाहरणच द्यायचे झाले तर परदेशी घड्याळे, गणकयंत्रे, टेप व व्हिडिओ कॅसेट्स अत्यंत स्वस्त किंमतीत आपल्या देशात मिळू लागल्या आहेत.या वस्तूंच्या स्वदेशी उत्पादनाचा खर्च परदेशी मालापेक्षा बराच जास्त आहे. शिवाय तांत्रिक गुणवत्ताही तेवढी सरस नाही. साहजिकच स्वदेशी वस्तूंची विक्री पूर्णपणे परदेशी वस्तूंच्या आयातीवर अवलंबून राहणार आहे. सध्याच्या काळात स्वदेशी मालाबद्दल आग्रह कोठेच दिसत नसल्याने हा धोका अधिकच संभवतो.

यासाठी परदेशी वस्तूंच्या एवढी तांत्रिक गुणवत्ता व किंमत असणार्‍या वस्तूंची निर्मिती हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. अर्थात त्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान यांचा जलद गतीने विकास करणे व त्यासाठी बुद्धीमान विद्यार्थ्याम्मधून तंत्रकुशल सण्शोधक निर्माण होण्यासाठी लहानपणापासून संशोधनाच्या सोयी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

शाळा, कॉलेजात विज्ञान शिक्षण मिळत असले तरी परीक्षा पद्धतीस अवास्तव महत्व दिले गेल्याने जिज्ञासू व धडपड्या मुलांची फार कुचंबणा होते. यावर उपाय म्हणजे केवळ मुलांसाठी विज्ञान छंदगृहांची उभारणी. या विज्ञान छंदगृहातून महत्वाचे संशोधन वा नवीन तंत्रज्ञानाचा विकास होणे असंभवनीय असले तरी उद्य़ाचे संशोधक तयार करण्यासाठी मुलांवर योग्य ते संस्कार करण्याचे कार्य या छंदगृहांमुळे निश्चितच साध्य होईल.

या विज्ञान छंदगृहामध्ये मुलांना त्यांच्या कल्पनेनुसार प्रयोग करण्याचे व उपकरणे बनविण्याचे स्वातंत्र्य दिले जाईल. तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन पक्त आवश्यक भासेल त्यावेळीच दिले जाईल. अन्यथा सर्व मार्गदर्शन मोथि मुले छोट्या मुलांना करतील. संदर्भ ग्रंथालय, कार्यशाळा व इतर साधनसामुग्री यांची सोय येथे करावी लागेल. विज्ञानाच्या विविध शाखा लक्षात घेता सर्व साधनसामुग्री या छंदगृहात सुरुवातीपासून उपलब्ध करून देणे अवघड आहे यात शंका नाही. परंतु टप्प्याटप्प्याने जागा व साधनांचि तरतूद करत गेल्यास मुलांच्या आवाक्यात असणार्‍या बहुतेक सर्व प्रयोगांसाठी सोय करणे शक्य आहे. अर्थात हे सर्व जनतेकडून आणि विशेषकरून मुलांच्याकडून किती प्रतिसाद मिळतो यावर अवलंबून आहे.

मुलांच्या मनांत अशा छंदगृहाबद्दल कुतुहल व आकर्षण निर्मान होण्यासाठी सर्वप्रथम काही मोजक्या पण अत्याधुनिक अशा तयार उपकरणांचा वापर करावयास हवा. उदाहरण द्यायचे झाले तर प्रकाश, रंग व आवाज यांची आतषबाजी करणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे दूर राहून नियंत्रित करता येणार्‍या ( रिमोट कंट्रोल्ड) मोटारी, आकाश दर्शनासाठी मोठी दुर्बीण शिक्षणाच्या दृष्टीने याचा उपयोग थोडा असला तरी मुलांना आकर्षित करण्याचे सामर्थ्य या उपकरणात निश्चितच आहे. प्रथम केवळ करमणूक म्हणून मुले आली तरी तशी उपकरणे बनविण्याची ओढ त्यांच्या मनात निर्माण होईल व त्यासाठी सर्व मदत छंदगृहात मिळेल हे कळल्यावर कुतुहलातून शिक्षण, शिक्षणातून प्रयोग व प्रयोगातून संशोधन ही साखळी प्रक्रिया सुरू होईल.

त्यामुळे पहिल्या टप्प्यात एक मोकळा हॉल, दोन टेबले व इलेक्ट्रॉनिकची काही सर्कीट यावर छंदगृहाची सुरुवात होऊ शकेल. याच हॉलचा उपयोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चर्चासत्र, फिल्म वा स्लाईडशो यासाठी होऊ शकेल. १० ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी काही सोपी सर्कीत तयार करण्यास सांगणे शक्य आहे. यास साधने कमी लागतात. खर्च कमी येतो. यापुधचा टप्पा म्हणजे फेविकॉल, प्लॅस्टिक, पत्रा व लाकूड यांचा वपर करून उपकरणे बनविण्याची सोय करणे. त्यासाठी आवश्यक असणारि सामुग्री व हत्यारे विकत घेऊन काही उपकरणे मुलांच्याकडून करवून घेणे. यामध्ये प्रथम भर द्यायचा तो स्प्रिंग, लोहचुंबक आणि बॅटरी सेल यांच्या साहाय्याने स्वयंचलित खेळणी बनविण्यावर. कारण खेळण्याचे आकर्षण मुलांना स्वभावतःच असते. शिवाय खेळणे बनविताना वस्तूचे गुणधर्म व वैज्ञानिक तत्व यांचीही मुलांना माहिती होते.

मनोरंजनातून पुढची पायरी म्हणजे नेहमीच्या वापरातील उपयुक्त साधने व उपकरणे बनविणे. ताणकाटा, विजेची घंटा, कारंजे,रॉकेलचा पंप यासारख्या वस्तू बनविताना दैनंदिन व्यवहारात विज्ञानाचा कसा उपयोग होतो हे समजेलच शिवाय ही उपकरणे स्वतः तयार केल्याने प्रयत्न केल्यास आपण मोठे कारखानदार होऊ असा आत्मविश्वास मुलांच्या मनात निर्माण होईल.

यानंतरचा टप्पा म्हणजे सूर्यशक्तीवर चालणारी आधुनिक साधने, पवनचक्की, बायोगॅस संयंत्र यासारख्या उपकरणांची कार्यपद्धती, तांत्रिक ज्ञान आणि निर्मिती याविषयी माहिती उपलब्ध करून देणे. विज्ञानविषयक मराठी, इंग्रजी पुस्तके, मासिके व इंटरनेट यावरून अशी माहिती मिळू शकते. तज्ञांचे मार्गदर्शन व प्रत्यक्ष प्रतिकृती व साधनांचे निरीक्षण यातून मुलांना हे तंत्रज्ञान आत्मसात करणे सहज शक्य होईल.

या छंदगृहासाठी जनमानसात कुतुहल व आकर्षण निर्माण करण्यासाठी एक प्रभावी उपकरण म्हणजे दुर्बीण. छंदगृहातून या दुर्बिणीच्या साहाय्याने नियमितपणे आकाशदर्शनाचे कार्यक्रम व्हावेत. त्याद्वारे चंद्राचा पृष्ठभाग, गुरूचे गृह आणि शनीची कडी, सूर्य व चंद्र ग्रहण क्वचितप्रसंगी धूमकेतू पहायला मिळतात असे कळल्यावर सर्वसामान्य जनताही छंदगृहाकडे आकर्षित होईल.


तंत्रविज्ञान व निसर्ग संग्रहालये

लहानपणापासूनच मुलांच्या मनात सभोवतालच्या परिस्थितीबद्दल व घडणार्‍या घटनांबद्दल जिज्ञासा असते. मूल का व कसे या प्रश्नांचा शोध घेत मोठे होते. या प्रश्नांना योग्य उत्तर देण्याची जबाबदारी पालक व शिक्षकांवर येऊन पडते. रोजच्या घाईगडबडीमुळे या सर्व प्रश्नांना उत्तरे मिळत नाहीत. बर्‍याच वेळा अशा प्रश्नांची उत्तरे पालकांना व शिक्षकांनाही माहीत नसतात. योग्य व यथार्थ माहिती मिळाली नाही तर अंधश्रद्धा वाढीस लागते.याउलट योग्य मार्गदर्शन मिळाले तर जिज्ञासू मूल संशोधक बनू शकते.

विज्ञानाच्या बाबतीत तर या जिज्ञासापूर्तीला अनन्यसाधारण महत्व आहे. विज्ञान प्रदर्शन हे निसर्ग व तंत्रज्ञानातील प्रगतीची प्रत्यक्ष माहिती मिळविण्याचे हे एक प्रभावी साधन आहे. त्याबरोबरच मुलांना स्वतःच्या हाताने विज्ञान प्रतिकृती बनविणे व त्याचे प्रदर्शन करणे मनापासून आवडते. शाळाकॉलेजात दरवर्षी अशी विज्ञान प्रदर्शने भरत असतात. भारतात अनेक मोठ्या शहरांत अशी कायमस्वरुपी मोठी विज्ञान प्रदर्शने व प्रत्यक्ष प्रयोग करता येऊ शकणारी छंद गृहे कार्यरत आहेत.

मुंबईचे नेहरू प्लॅनिटोरियम व पुण्याचे होमी भाभा विज्ञान छंदगृह ही त्याचीच उदाहरणे होत. सांगली येथे असे प्रदर्शन उभारणे आवश्यक आहे. त्याच्या संयोजनास साहाय्य व्हावे म्हणून परदेशातील अशा काही प्रदर्शनांची माहिती देत आहे.

अमेरिकेत अशी तंत्रविज्ञान प्रदर्शने व निसर्ग संग्रहालये जवळजवळ प्रत्येक शहरात आहेत. माझ्या अमेरिकेच्या दौर्‍यात मला अशा काही प्रदर्शनांना भेट देण्याची संधी मिळाली. त्यापैकी सॅन ओसे येथील टेकम्युझियम, ह्यूस्टन येथील निसर्गविज्ञान संग्रहालय व सॅन फ्रॅन्सिस्को येथील एक्स्प्लोरेटोरियम यांची माहिती खाली देत आहे.

सॅन ओसे येथील टेकम्युझियम-

या संग्रहालयात जैव अभियांत्रिकी, भूगर्भशात्र, अपारंपारिक ऊर्जा साधने, संगणकातील मायक्रोचिपचे डिझाईन व सिलिकॉन व्हॅलीतील संशोधनाचा इतिहास (संगणकक्षेत्रात अग्रेसर असणार्‍या कॅलिफोर्नियाला सिलिकॉन व्हॅली म्हटले जाते.) यांची माहिती देणार्‍या चलप्रतिकृती पहावयास मिळतात. मुलांना प्रयोग करून पाहण्यासाठी अनेक वैज्ञानिक खेळणी येथे आहेत. याविषयी सविस्तर माहिती http://www.thetech.org या संकेतस्थळावर पाहता येईल.

ह्यूस्टन येथील निसर्गविज्ञान संग्रहालय-

पुरातत्व काळापासून निसर्गात झालेल्या घडामोडींची माहिती, पृथ्वीवर निरनिराळ्या ठिकाणी असणारी निसर्गसंपदा, वृक्षवेली, पशुपक्षी, कीटक, जलचर या सर्वांची माहिती व्हावी या दृष्टीने याची उभारणी केली आहे. आफ्रिकेतील रेन फोरेस्ट प्रत्यक्षात पाहता यावे यासाठी काचेचा मोठा घुमट तयार केला असून जिवंत फुलपाखरांचे संग्रहालय हे याचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे सिद्ध करणारा फोकाल्टचा पेंड्युलम व डायनासोर प्रचंड मोठे सांगाडे ही येथील विशेष आकर्षणाची ठिकाणे आहेत. याविषयी सविस्तर माहिती http://www.hmns.org/ या संकेतस्थळावर पाहता येईल. 



सॅन फ्रॅन्सिस्को येथील एक्स्प्लोरेटोरियम-

प्रचंड मोठ्या हॉलमध्ये ६५० हून जास्त वैज्ञानिक उपकरणे व चलप्रतिकृती असणारे हे संग्रहालय कॅलिफोर्नियात अतिशय प्रसिद्ध आहे. भूमिती, प्रकाश, गति, चुंबकत्व, आधुनिक विज्ञान या विषयांतील तत्वे बालांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना सहज समजावून देणारी खेळणी ( एवढ्या मोठ्या प्रतिकृतींना खेळणी म्हणणे बरोबर नाही) येथे आहेत. याविषयी सविस्तर माहिती http://www.exploratorium.edu या संकेतस्थळावर पाहता येईल.


 या सर्व प्रदर्शनाला प्रत्यक्ष भेट देणे सर्वांना शक्य नसले तरी www.youtube.com या संकेतस्थळावर याच्या व्हिडिओ क्लिप पहावयास मिळतील. याविषयी सविस्तर माहिती ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फौंडेशनच्या  www.vidnyan.net    www.school4all.org  या संकेतस्थळांवर देण्यात आली आहे. ती पहावी.

माझ्या डोळ्यासमोर जे उद्याच्या भारताचे स्वप्न आहे त्यात गावोगावी मध्यवर्ती ठिकाणी अशी विज्ञान संशोधन छंदगृहे आहेत व नव्या पिढीची स्फूर्तीकेंद्रे म्हणून ती काय करीत आहेत. आपल्या फुरसतीच्या वेळातसुट्टीत व रात्रीदेखील छोटे संशोधक त्यात उपकरणे बनवीत आहेत. प्रयोग करीत आहेत. स्वतः धडपडत शिकत आहेत. कुशल तंत्र वैज्ञानिक व शास्त्रज्ञ बनण्याची ईर्षा त्यांच्या मनात निर्माण होत आहे. त्यातूनच ग्रामविज्ञानाच्या कल्पनेने भारलेले काही तरूण दूर दुर्गम ग्रामीण भागांत जाऊन तेथे विज्ञानाचा नवा प्रकाश पोहोचवीत आहेत. इतर काही प्रयोगशाळातील संशोधनातून निसर्गाची रहस्ये उलगडण्याची उमेद बाळगून आहेत. काही तंत्रज्ञ बनून विविध वस्तूंच्या निर्मितीप्रक्रियांचे ज्ञान मिळविण्याच्या मागे आहेत. तर काही जीवरासायनिकवैद्यकीय वा पर्यावरण शास्त्रात नवे संशोधन करण्यात रंगून गेले आहेत.


या छंदगृहातील प्रयोगांचे व चर्चांचे पडसाद मोठ्या माणसांच्या सुस्त प्रयोगशाळासंथ कारखाने आणि मंद उत्पादन केंद्रे यावर आदळून नवी क्रांती घडवून आणित आहेत.छोट्या संशोधकांच्या कार्याने सारे खडबडून जागे झाले आहेत आणि नवा विज्ञानाधिष्ठित बलशाली भारत उदयास येत आहे.

हे स्वप्न तर खरेचपण विस्फारलेल्या डोळ्यांनी उपकरणे पाहणार्‍या मुलांच्या नजरेतूनबुद्धी गुंग करणार्‍या त्यांच्या प्रश्नांमधून आणि वक्तृत्वातील जोषात हे स्वप्न वास्तव सृष्टीत येणे सहज शक्य आहे असा मला विश्वास वाटतो.


विज्ञान व इतर सर्व विषयांवर इंटरनेटवर असणार्‍या अशा अमूल्य माहितीच्या खजिन्याची माहिती घेण्यासाठी www.school4all.org या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. आपल्या कल्पना, लेख व माहिती यांना या संकेतस्थळावर आपल्या नावानिशी प्रसिद्धी देण्यात येईल. मोफत सदस्य होऊन माहिती व ध्वनीचित्रफिती डाऊनलोड करण्याच्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फौंडेशन आपणास करीत आहे. 

Thursday, June 21, 2018

स्वप्नपूर्तीच्या दिशेने पहिले पाऊल - नाशिक


Ref: https://twitter.com/nashikcity

पुण्यानंतर खास  सदाशिव पेठी पुणेकर संस्कॄती जपणारी जी दोन शहरे आहेत ती म्हणजे नाशिक व सांगली. एकमेकांपासून फार दूर असूनही या दोन शहरात विलक्षण साम्य व घनिष्ठ संबंध आहेत. नाशिक-सांगली सासर माहेर असणारी अनेक कुटुंबे आज सांगली मिरजेत पहावयास मिळतात.आमच्याबद्दल बोलायचे झाले तर आम्ही सातारहून १९६१ मध्ये सांगलीत आलो व सांगलीकर झालो. त्याचप्रमाणे  माझ्या दोन्ही मावश्या म्हणजे दातार व परांजपे कुटुंबीय त्याच काळात (एक पुण्याहून तर दुसरे मुंबईहून ) नाशिकला भगूरमध्ये रहायला गेले ते कायमचे नाशिककरच बनले.

माझ्याहून एकदीड वर्षाने मोठी असणारी उषामावशी (उषा परांजपे) माझ्या दृष्टीने मावशीपेक्षा थोरली बहीण ह्या नात्याची मला वाटते. कारण मला सख्खी बहीण नसल्याने मी लहानपणापासून तिलाच बहीण मानत आलो आहे.  नकोशी म्हणून चार बहिणींनंतर जन्माला आल्याने व वडील लवकर गेले व आई संधिवाताने आजारी अशा स्थितीत तिने सातार्‍यात आपले बालपण काढले.  सातारला असताना ती तिच्या आईबरोबर आमच्या घरापासून दूर अंतरावर रहायची. गरीबी व काबाडकष्ट करावे लागले तरी सतत आनंदी व उल्हसित असायची. त्यामुळे मी तिला आपला आदर्श मानले होते. माझे सारे बालपण तिच्याबरोबर खेळण्यात, हिंडण्यात गेले. ती चहा प्यायची नाही मग  मी पण चहा घेत नसे. आम्ही कोठे एकत्र गेलो तर लोक आम्हाला बहीणभाऊच समजायचे. त्यामुळेच मी नाशिकमध्ये तिच्या घरीच मुक्कम केला व रात्रभर गप्पा मारल्या.तिचे काही लेख मी तिच्या आवाजात रेकॉर्ड करून घेतले तिने केलेल्या कलाकॄती पाहिल्या.

 बालपण कष्टात गेले तरी लग्नानंतर तिच्या वाट्याला सुख आले. मुंबईच्या सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या आधुनिक विचारसरणीच्या परांजपे कुटुंबात ती सून म्हणून गेली व तेथले संस्कार तिने आपलेसे केले.   तिच्यापेक्षा मोठी असणारी विमलमावशीचे दातार कुटुंब नोकरीनिमित्त नाशिकजवळ भगूरला स्थायिक झाले होते. त्यामुळे उषामावशीचे यजमान शरदराव यांनीही  भगूर येथे ऒषधाचे दुकान काढले.  नंतर दोन्ही कुटुंबे १९६५च्या सुमारास नाशिकला रहावयास गेली. आता विमलमावशीच्या सुमेधा आणि नयना या दोन मुली व मुलगा धनंजय तसेच उषामावशीचा थोरला मुलगा भूषण नाशिक्मध्ये रहात आहेत. काही कार्यक्रमांनिमित्त आमचे व त्यांचे नाशिक - सांगली दॊरे होत असतात.

या दोन्ही मावश्यांचे वॆशिष्ठ्य सांगायचे म्हणजे त्या जिद्दीच्या व आपल्या मतावर ठाम असणार्‍या व त्यांनी स्वीकारलेल्या तत्वाशी कोणतीही तडजोड न कणार्‍या ताठ कण्याच्या व्यक्ती आहेत, ( शुभांगी पण तशीच होती ) त्यामुळेच काही मते पटत नसली तरी मला त्यांचेबद्दल आदर आहे.

 विमलमावशी पुण्यातील सदाशिव पेठेत धार्मिक संस्कारात वाढली असल्याने देवावर अपार श्रद्धा असणारी आहे.   मात्र मॄणाल गोरेंच्या कार्याशी संपर्क आल्याने उषामावशीची बांधिलकी समाजवादी विचारसरणीशी जडली, उषामावशीने मुलगा मोठ्या फ्लॅटमध्ये रहात असतानाही स्वत:  सिडको चाळीतील छोट्या घरात राहण्याचे पसंत केले आहे. चार वर्षांपूर्वी तिच्या यजमानांचे ( शरदराव) निधन झाले. त्यावेळी देहदान करण्यात तिने पुढाकार घेतला होता. तिचे चोफेर वाचन, विविध विषयांवर लेखन, सामाजिक कार्य चालू असते. तिने चांगल्या पुस्तकांचे घरात वाचनालय केले आहे व शेजारच्यांना पुस्तके वाचण्यास ती उद्युक्त करते. त्यांच्या कोणत्याही अडचणीत त्यांना मदत करते. रामदेवबाबा यांची ती खरी शिष्या बनली आहे. योग व पातंजलीचे पदार्थ कटाक्षाने वापरते.


 दोन्ही मावशींच्या संसारात मोठी संकटे आली व  अगदी जवळच्या व्यक्ती त्यांना कायमच्या सोडून गेल्या. त्यामुळे सध्या या  दोघी खचून गेल्या असल्या तरी त्यांनी हार मानलेली नाही व पुन्हा जिद्दीने त्या जीवनाशी संघर्ष करीत आहेत. दोघींना एकलेपणाचे दुख: असले तरी त्या एकत्र रहायला तयार नाहीत. कारण दोघींना आपले स्वातंत्र्य जाईल आसे वाटते. उषामावशी मला म्हणाली ’ तू अमेरिकेला रहायला जाणार हे ठीक आहे. पण ही वेळ जर शुभांगीवर आली असती तर तिने सांगली सोडली नसती.  नाशिकच्या माझ्या दॊर्‍यात मला या दोघींकडून जीवनाचे तत्वज्ञान दोन्ही बाजूंनी  शिकावयास मिळाले.

सकाळी हिंडत असताना सप्तशॄंगी व दुर्गामाताची सुंदर मूर्ती असणारी देवळे दिसली. जॉगिंग ट्रॅकच्या पटांगणात प्रॊढांसाठी व्यायामाची साढने पाहिली. सर्वसामान्य घरातील प्रॊढ स्त्रियादेखील त्याठिकाळी व्यायाम करीत असल्याचे पाहून मॊज वाटली.


 दुसरे दिवशी भूषण (उषामावशीचा मुलगा) बरोबर मी शुभांगीची भाची माधवी दीक्षित हिला भेटायला गेलो. तिचे यजमान उदयन्‌ यांचे सजावट नावाचे फर्निचरचे दुकान आहे. दीक्षित घराणे हे नाशिकमधील जुने व नावाजलेले घराणे आहे, विमलमावशीचे जावई डॉ. जयराम महाबळ यांचा फिजिकोथेरॅपीचा पिढीजात व्यवसाय आहे. आता त्यांची दोन मुलेही या क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन व्यवसाय करीत आहेत.


 ती भेट आटोपून आम्ही पुस्तकांच्या दुकानाकडे आमचा मोर्चा वळवला. नाशिकसंबंधी मराठी माहिती असणारी पुस्तके विकत घेतली. नंतर विमलमावशीकडे जेवावयास गेलो. मुलगा हरिद्वारला गेला असल्याने सध्या ती तिच्या नयना (चिपळूणकर)व सुमेधा(महाबळ)  या मुलींकडे  रहात आहे. तिने माझ्या लहानपणीच्या अनेक घटना मला सांगितल्या. मी भेटल्यामुळे तिला बरे वाटले.

जेवणानंतर दुपारी मी भूषणच्या घरी गेलो तेथे सांगलीची माहेरवाशीण व वालचंदची विद्यार्थिनी असलेली भूषणची बायको सुवर्णा व त्यांची मुलगी मनाली ( पुण्यात सीऒईपीमध्ये बीई कॉम्प्युटर झालेली व सुवर्णपदक मिळविलेली ) भेटली. दीड वर्षांपूर्वी त्यांचा अत्यंत हुषार व मॅकेंझी मध्ये उच्च पदावर काम करीत असलेला मुलगा निनाद याचे पुण्यात स्मार्ट सिटीबाबत मिटींग साठी आला असताना अचानक हार्ट अटॅकने दु:खद निधन झाले. त्यामुळे घरातील सर्वजण विलक्षण तणावाखाली व दु:खात होते.

याही परिस्थितीत सुवर्णाने रेशीमधाग्यांचा वापर करून वर्षभरात शेकडोअप्रतिम डिझाईन केलेली पाहून मला गहीवरून आले.

तिला मी नाशिकच्या संकेतस्थळासाठी मदत करायचे आवाहन केले. मी आणलेली सर्व नाशिकची पुस्तके तिच्याकडेच ठेवली. मनालीने तिच्यासाठी लॅपटॉप[ मागविला आहे. ती आपल्या ज्ञानदीपच्या टीममध्ये महत्वाची सहकारी बनेल असे मला वाटते. भूषण मायको व महेंद्र कंपनीतून मॅनेजरच्या पदावरून स्वेच्छेने निवृत्ती घेऊन इन्व्हेस्टरचा व्यवसाय करीत आहे. दहावी ते बारावीपर्यंतच्या मुलांना फुकट शिकविण्याचे कार्य तो करीत आहे. सुवर्णाही एका शाळेत सेवा म्हणून शिक्षण देण्यात आपले मन रमवत आहे. ज्ञानदीपचे कार्य दोघांनाही एक नवे आवडते कार्यक्षेत्र देऊ शकेल असे वाटते.

यापूर्वीच्या नाशिक भेटींमध्ये मी भगूरमधील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे घर, त्र्यंबकेश्वर, वणी येथील सप्तशॄंगी देवी, शिर्डीचे साईबाबा तसेच नाशिकमधील प्रेक्षणीय स्थलॆ पाहिली होती. नाशिक्मध्ये ज्ञानदीपतर्फे एक दिवसाचे ग्रीनबिल्डींगवर कार्यसत्रही आम्ही घेतले होते. सातपूरच्या कारखान्यांसाठी प्रदूषण नियंत्रण सल्ला देण्यासाठीदेखील तसेच  काकासाहेब वाघ कॉलेजमध्ये भाषण, देण्यासाठी जाण्याचा योग आला होता.  माझे  दोन विद्यार्थी कडवे आणि वरणे येथे प्रोफेसर म्हणून कार्य करीत आहेत. सांगलीच्या कॄष्णेप्रमाणेच नाशिकमधील गोदावरी नदीच्या प्रदूषणाबद्दल आम्ही संशोधन प्रकल्प केले होते. तेथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी माझे विद्यार्थी होते. या व अशा अनेक कारणांनी नाशिकबद्दल माझ्या मनात आपुलकीची भावना आहे.

सांगलीच्या मानाने नाशिकची लोकसंख्या, उद्योगधंदे, व पायाभूत सुविधांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. नाशिक - दिल्ली विमानसेवाही मी तेथे असताना सुरू झाल्याचे कळले. नाशिकचा कुंभमेळा हा एक राष्ट्रीय पातळीवरील मोठा उत्सव असतो. नाशिक जिल्ह्यात अनेक साखर कारखाने, त्र्यंबकेश्वर, शिर्डीसारखी लोकप्रिय देवस्थाने असल्याने नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्रात मानाचे स्थान आहे. तेथे माय नाशिक संकेतस्थळाच्या निमित्ताने ज्ञानदीपचे कार्य पोचले तर नवे सहकारी व कार्यकर्ते मिळतील असा मला विश्वास वाटतो.





Wednesday, June 20, 2018

स्वप्नपूर्तीच्या दिशेने पहिले पाऊल - पुणे


धावडशी पाहून झाल्यावर शुक्रवारी दुपारी सातार्‍याहून निघालो. पुण्यात नातेवाईकांकडे न उतरता सुशांत यळगुडकर या ज्ञानदीपच्या माजी सहकार्‍याकडे मी रहाणार हे कळल्यावर अनेकांना आश्चर्य वाटले. पण ज्ञानदीपमधील आम्ही सर्वजण एका कुटुंबाप्रमाणे वागत असल्याने ज्ञानदीप सोडून दुसरीकडे गेले तरी आमच्यातील संबंध जिव्हाळ्याचे व आपुलकीचे राहिले आहेत. मलाही त्यामुळे परकेपणा वाटत नाही.

पुण्यात स्वारगेट स्टेशनवर रिक्षात बसलो. कर्वेनगरचा पत्ता सांगूनही मी गाफिल राहिल्याने रिक्षावाल्याने रिक्षा लक्ष्मी रोडवर नेली. तो उत्तर प्रदेशातील होता. मला नक्की पत्ता माहीत नाही हे त्याने ताडले व आपल्यालाही कर्वेनगर कोठे आहे माहीत नाही असे सांगितले.

मग सुशांतशी फोनवर संपर्क साधत लांबच्या रस्त्याने कसा तरी सुशांतपर्यंत  पोचलो. पुण्यात अनेक वेळा गेलो असतानाही रस्त्यांचा भुलभुलॆय्या व रिक्षेवाल्याची चलाखी यांनी मला चाट मारली.सुशांतने मला राजाराम पुलावरून विठ्ठलमंदिर रस्त्याने घरी यायचा जवळचा मार्ग दाखविला.  रात्री जेवण झाल्यावर लांबवर फिरून कर्वेनगर परिसर पाहिला. दत्ताचे देऊळ बघितले. चाळीसारख्या घरातील अडचणीला कंटाळून सुशांत फ्लॅट घ्यायच्या मनस्थितीत आहे पण मनाजोगता व बजेटमध्ये बसणारा फ्लॅट पुण्यात मिळणे किती दुरापास्त झाले आहे हे लक्षात आले.

दुसरे दिवशी सुशांतबरोबर  सिंहगड रोडवरील सरितावॆभव येथे शुभांगीच्या थोरल्या बहिणीकडे गेलो. तिची सून मधुरा घरात खाद्यपदार्थ करून मोठा व्यवसाय करते हे पाहून कॊतुक वाटले. तेथून    ज्ञानदीप टीमच्याच प्रतिमा व प्रणिता इनामदार यांच्या सांगवीच्या घरी जेवणासाठी गेलो. सिंहगड रोड ते सांगवी हे मोटारसायकलने जाण्यासाठी पाऊण तास लागला. वाहतुकीचे नियम न पाळणार्‍या वाहनांच्या गर्दीतून शिताफीने वाट काढत जाणारे लहान मोठे, स्त्री पुरूष पुणेकर पाहून त्यांच्या कॊशल्याविषयीचा आदर द्विगुणित झाला.

ज्ञानदीपची पुण्यातील शाश्वत टीम

प्रतिमा व प्रणिताच्या घरी जेवण घेताना साहजिकच ज्ञानदीपविषयी गप्पा झाल्या. (सुशांत, प्रणिता, प्रतिमा)


ज्ञानदीप टीममधील बहुतेक सर्व सहकारी बराच काळ ज्ञानदीपमध्ये काम करून पुण्यात प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करीत आहेत. मायमराठी, कोल्हापूर महानगरपालिका, बंगलोर महाराष्ट्र मंडळ, मराठी साहित्य संमेलन व अशा अनेक वेबसाईट तसेच परदेशी प्रोजेक्ट्स यशस्वीपणे पूर्ण करणारी ही मंडळी हा ज्ञानदीपचा मोठा ठेवा होता. प्रमोद जाधव, अमोल पवार, शिवराज पाटील, स्वप्निल व प्रिया माळी, सुशांत, प्रतिमा, प्रणिता, अमोल भोकरे, संचित कुलकर्णी, अवधूत पाटील, दिनेश खोत यांच्याबद्दल मला माहिती असली तरी इतर अनेकांचा ज्ञानदीपशी संपर्क तुटला आहे. या सर्वांना एकत्र केले तर ज्ञानदीपची मोठी टीम पुण्यात होईल व त्यांनी ज्ञानदीप फॊंडेशनच्या कार्यात सहभागी झाले तर ज्ञानदीपला प्रगतीचे नवे शिखर गाठता येईल. शिवाय सध्या सांगलीत कार्यरत असणार्‍या टीमला मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळेल असे मी त्यांना सांगितले. त्यांनीही मला या कार्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ज्ञानदीपच्या कार्यास चिरस्थायी आधार मिळाला.

शुभांगीचे माहेर पुण्याचे असल्याने आमचे पुण्याला जाणे येणे खूप होत असे. शुभांगीने पुण्यातील त्यांच्या पेंडसे चाळीविषयी सविस्तर लेख लिहिला आहे. मी स्वत: १९७२ मध्ये पर्वती पाणीपुरवठा टाक्यांचे हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे बांधकाम चालू असताना तीन महिने पुण्यात राहिलो होतो. पिंपरीतील अँटिबायोटिक फॅक्टरी तसेच अनेक कारखान्यांच्या प्रदूषण नियंत्रण यंत्रणेचे डिझाईन व सल्ला देण्यासाठी पुण्यात जात असे.

२००६ मध्ये पुण्यात मयुरेश इन्फोटेकमध्ये आम्ही ज्ञानदीपची शाखा काढली होती. त्यावेळी सॊ. शुभांगी व मोड्युलर सिस्टीमच्या सॊ. मीना जोशी  यांनी दीपप्रज्वलन केले होते.



 विज्ञानपरिषदेचेअनेक कार्यक्रम व मेळावे पुण्यात भरत असत. त्यांना माझी उपस्थिती असे. ज्ञानदीपतर्फे काही सेमिनार व कार्यसत्रे पुण्यत मध्यंतरीच्या काळात आम्ही आयोजित केली होती. त्यातील ’स्वप्न हरित नगरीचे ’ या ना्वाच्या कार्यसत्रात  केवळ पुण्याच्या पर्यावरण व बांधकामविषयक समस्यांवर तज्ज्ञांनी आपले प्रबंध वाचले.


अलिकडच्या काळात प्रथम माझा मुलगा सुशांत याने कल्याणीनगर येथे स्वत:चा फ्लॅट घेतला. आमचे इतर अनेक नातेवाईक, सहकारी मित्र, विद्यार्थि पुण्यात असल्याने पुण्याविषयी माहिती मिळविण्यात फारशी अडचण येणार नाही. प्रश्न एवढाच की पुण्याचा विस्तार व प्रगतीचा आवाका एवढा मोठा आहे की एका संकेतस्थळावर त्याचा मागोवा घेणे सोपे नाही. तरीपण पुण्याविषयी मराठीतून एकत्रित माहिती देणारी वेबसाईट पाहण्यात नसल्याने ज्ञानदीप ते धाडस करणार आहे.

अर्थात हे स्वप्न प्रत्यक्षात येण्यास बराच अवधी तसेच  साधनसामुग्रीची जुळवाजुळव करावी लागेल. आज त्यानिमित्ताने संकल्प सोडायला काय हरकत आहे?

Tuesday, June 19, 2018

स्वप्नपूर्तीच्या दिशेने पहिले पाऊल - सातारा

’अधुरे स्वप्न ' या नावाचा लेख लिहीत असताना सातारा,पुणे, नाशिक,सोलापूर यांच्या प्रस्तावित संकेतस्थळांचा मी उल्लेख केला होता. पुन्हा तोच लेख वाचताना मनात आले. आपण नाही तरी भविष्यात दुसरे कोणीतरी हे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यास नक्की पुढे येईल. पण त्यासाठी आपणच पहिले पाऊल उचलायला हवे. कल्पना यायचा अवकाश की सातारा, पुणे, नाशिक यांचा धावता दॊरा करायचा प्लॅन आखला.  .

तसे पाहता गेल्या वर्षी मी असाच दॊरा केला होता. पण त्यावेळी केवळ नातेवाईकांना भेटणे व जुन्या स्मृतींना उजळा देणे एवढाच त्यामागे उद्देश होता. यावेळी मात्र संकेतस्थळांविषयी प्रारंभिक माहिती जमवणे व त्यासाठी योग्य व्यक्तींचा शोध घेणे व जमल्यास  तेथे आपल्या या स्वप्नांची बीजे विखरून टाकावी असे वाटले. निसर्ग बीजाबरोबर नेहमी पोषकद्रव्यांची छोटी शिदोरी देत असतो. त्यामुळे बीज अंकुरण्यास मदत होते. त्याप्रमाणे आपणही थोडी प्रारंभिक माहिती सोबत द्यावी असे वाटले म्हणून हा प्रपंच.

प्रत्यक्षात मला या दॊर्‍यात आणखीही काही नवीन स्वप्नांची व प्रश्नांची ओळख झाली.

लॊकिकार्थाने सामान्य असणारी माणसेही आपल्या स्वप्नपूर्तीसाठी कसे कष्ट करतात  नवनिर्मितीचा ध्यास घेऊन नव्या वस्तू, कलाकृती वा व्यवसाय यात आपले तन, मन, धन खर्चतात. बर्‍याच वेळा हे त्यांचे प्रयत्न दुर्लक्षित राहतात वा अपेक्षित यश मिळवू शकत नाहीत हे पहावयास मिळाले. यांच्या प्रयत्नांना उभारी मिळेल यासाठी काही करता येईल का याचाही विचार मनात आला.

सातारा माझे जन्मगाव. माझे बालपण तेथे गेले. सज्जनगड, कास तलाव, कोयना धरण अनेक जुनी देवळे, किल्ले, पर्यटनस्थळे आणि ऎतिहासिक घटना यामुळे सातारा या शहरास भारतात मानाचे स्थान आहे.

सातारा शहर हे एक महत्वाचे ऎतिहासिक ठिकाण आहे. चालुक्य, राष्ट्राकुट, शीलाहार, यादव, बहामनी, आदिलशाही राजवटीनंतर  मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून ते नावलॊकिकाला आले. राजाराम महाराजांच्या मॄत्यूनंतर ताराबाईंनी शिवाजी दुसरा या नावाने सातार्‍यातून कारभार चालविला. मोगलांच्या कॆदेतून सुटल्यानंतर शाहूंनी १७०८ मध्ये सातार्‍याच्या गादीवर कब्जा केला.

माझे वडील ( तात्या) विमाकंपनीत नोकरीस लागण्यापूर्वी राजवाड्यात महिना २० रु. पगारावर हिशोबनीस म्हणून नोकरीस होते. त्यावेळी त्यांना सातारा संस्थानातील सर्व किल्ल्यांवर हिशोब गोळा करण्यासाठी जावे लागे. घोड्यावरून, बॆलगाडीतून वा ढोलीतून प्रवास करावा लागे. प्रतापगडावर त्यावेळी फडणीस नावाचे कारभारी होते. तात्यांच्या सोबत मी एकदा प्रतापगडावर गेलो होतो व भवानीदेवीचे गाभार्‍यात जाऊन दर्शन घेतले होते.

सातारा म्हटले की सात डोंगरांनी वेढलेले पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याची राजधानी असलेले, अजिंक्यतार्‍याच्या कुशीत वसलेले एक सुसंस्कृत शहर  डोळ्यासमोर येते.

मध्यभागी भव्य राजवाडा व जलमंदिर, जागोजागी तलाव व हॊद, देवळे व शाळा यांनी सजलेले हे शहर आपले  प्राचीन वेगळेपण जपणारे शहर आहे,

छत्रपती प्रतापसिंहांनी सुरू केलेली मराठी शाळा, भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्था(१९१९), न्यू इंग्लिश स्कूल (१८९९), बापूजी साळुंखे यांनी स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था(१९५५), आर्याग्ल वॆद्यक महाविद्यालय(१९१३) ही सातार्‍याची शिक्षणक्षेत्रास मिळालेली देणगी आहे.

आम्ही रहायचो ते घर, आमची शाळा, सातार्‍यातील अनेक परिचित ठिकाणे पायी हिंडून पाहिल्यावर बालपणीच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या.

बोगद्याबाहेर जकातवाडी हे आमचे मूळ गाव. तेथील काळेश्वरी ही आमची कुलदेवता.
जुन्या इमारती व वास्तूंचे बदललेले रूप पाहताना कधी आनंद तर कधी विषाद वाटला. माझे घर पंचपाळे हॊदाजवळील चाळीत होते. चाळ व फणसळकरांचे माडीचे घर तसेच असले तरी पंचपाळे हॊदामध्ये मंदीर बांधले आहे. मात्र बाजूचे हॊद कचर्‍याने भरलेले आढळले. बहुतेक नाले आपले मूळ रूप  सांभाळून असले तरी  झाडे झुडपे, सांडपाणी व कचरा यांचे आ्श्रयस्थान झाल्याचे पाहून खेद वाटला.


माझी मावसबहीण कुसुमताई हिच्या घरी मी मुक्काम केला. तिची दोन्ही मुले, श्री व सुहास ज्या जिद्दीने वडिलांनी सुरू केलेले किराणा दुकान चालवीत आहेत हे पाहून कॊतुक वाटले. कोणीही गडी वा मदतनीस न ठेवता सकाळी ६.३० पासून रात्री १०पर्यंत त्यांनी हे कार्य अखंड चालू ठेवले आहे.  सुनांनीदेखील नवीन ड्रेसेसचे दुकान सुरू केले आहे हे पाहून आश्चर्य वाटले.


’उद्यमे श्री प्रतिवसति ।’ हे त्यांच्याकडून मला शिकायला मिळाले.

दुसरे दिवशी मी श्री, नाना रहाळकरांबरॊबर धावडशीला गेलो. लहानपणी दर मे महिन्याच्या सुट्टीत मी धावडशीला माझ्या थोरल्या मावशीकडे जात असे. मावशीचे यजमान ( नाना गोडबोले) तेथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक होते. अतिशय धार्मिक, कर्मठ पण हाडाचे शिक्षक म्हणून सारा गाव त्यांना मान द्यायचा. दररोज रात्री ते गावातील सर्व मुलांना शाळेत गोष्टी सांगत. मुले त्या गोष्टी ऎकत शाळेतच झोपत. गावाचे मुख्य वॆशिष्ठ्य़  तेथे असणारे ब्रह्मेंद्रस्वामींचे मंदीर. प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे भव्य मंदिर आम्हा मुलांचे आवडते स्थान होते. या मंदिरातील ब्रह्मेंद्रस्वामी व नरसिंह यांच्यावर नानांची अढळ श्रद्धा होती. त्यानी आपल्या मुलाचे नाव देखील नरसिंह (भार्गव) असे ठेवले होते. शाळेत सानेगुरुजी वाचनालय होते. त्यातील  पुस्तके वाचणे, आंबे, चिंचा पाडणे, फुले काढणे, रानोमाळ भटकणे, देवळात रात्री कीर्तन ऎकणे वा अभिषेक व पूजाअर्चा करणे या गोष्टीत आमचे मन रमून जाई.

धावडशीला पुन्हा भेट देऊन स्मृतींना नवी झळाळी द्यावी असे ठरवले होते.

राजवाड्यापासून सकाळी दर अर्ध्या तासाला धावडशीची बस आहे. आम्ही ९.३० च्या बसने निघालो व १०वाजता १५ किमी अंतरावर असणार्‍या धावडशीच्या प्रवेशद्वाराशी पोचलो. मात्र मुलांची मोठी मिरवणूक चालू असल्याने बस वाटेतच थांबली आम्ही खाली उतरलो. तेथील शाळेचा पहिला दिवस असल्याने नव्या मुलांचे स्वागत करण्यासाठी शाळा तसेच सर्व गावकरी यांनी वाजंत्री लावून  व सजवलेल्या बॆलगाड्यांसहित मिरवणूक काढली होती. शाळेबद्दल गावकर्‍यांचा उत्साह व प्रेम पाहून मला फार आनंद झाला. देवळाला लागूनच नवी शाळा बांधली आहे व दहावीपर्यंतच्या या  शाळेत २५० मुले आहेत हे समजले.


देवळाच्या परिसराचे फोटॊ काढले.
ब्रह्मेंद्रस्वामींचे मंदीर. प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे भव्य मंदिर 

झाशीच्या राणीचे जन्मस्थळ धावडशी आहे . राणी लक्ष्मीबाईंचे माहेरचे नाव मनूताई तांबे होते. त्यांच्या वाड्याची आता फक्त चॊकटच राहिली आहे.


आम्ही रहायचो ते घर शाळा आता पाडून टाकली आहे. सातारच्या पेंढारकर डॉक्टरांचे मूळ गाव धावडशी. त्यांच्या तिन्ही पिढ्यांनी धावडशीच्या प्रगतीसाठी खूप कार्य केले आहे. त्यांच्यापॆकी डॉ. गिरीश पेंढारकर यांची ओळख झाली. भागवत वकिलांनीही तेथे क्रीडांगण व हॉल बांधले आहेत. गावातील जुनी झोपडीवजा घरे जावून नवी टुमदार वीटबांधकामाची व कॉन्क्रीट्ची घरे पाहिल्यावर मन प्रसन्न झाले.

परंतु देवळाच्या ट्रस्ट्कडे बराच पॆसा असला तरी देवळाच्या सुशोभिकरणाकडे फारसे लक्ष नसल्याचे दिसून आले. कळसाचा रंग उडाला आहे. शेजारच्या तीन तलावातील पाण्यात शेवाळे व परिसरात झाडेझुडपे व अस्वच्छता यामुळे देवळाचे सॊंदर्य झाकळलेले आहे. खरेतर हे देवळाचा इतिहास, भव्यता व शिल्पकला यामुळे  धावडशीला एका पर्यटनस्थळाचा दर्जा मिळू शकेल.

सातार्‍यातील या छोट्या भेटीत मला सातार्‍याच्या सद्यस्थितीचे  थोडेफार ज्ञान झाले.  सातारा पुण्यापासून अगदी जवळ असला तरी मागासच का राहिला.  याचा शोध घेण्याची गरज आहे. मायसातारा संकेतस्थळ सातार्‍यातील जुनी वॆशिष्ठ्ये तसेच नव्या समस्या व भावी प्रगतीच्या दिशा यांचे सम्यक्‌ दर्शन घडवू शकेल असे वाटते.

सातार्‍यातील बदलांचे साक्षीदार असणार्‍यांनी या कार्यात सहकार्य करावे असे ज्ञानदीपच्या वतीने मी करीत आहे. मायसांगली मायकोल्हापूरच्या धर्तीवर सातारा शहर व जिल्हा यांची माहिती एकत्र करून मायसातारा हे नवे संकेतस्थळ नजिकच्या भविष्यकाळात आकारास येईल अशी आशा बाळगूया,