Sunday, February 18, 2024

डॉकरच्या पेटा-यात प्रोग्रॅम करा

 भारतात बहुतेक लोक मायक्रोसॉफ्ट विंडोज कार्यप्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम) असणारा कॉम्प्युटर वापरत असले तरी अमेरिका व इतर प्रगत देशात ॲपलचा एक्सकोड कार्यप्रणाली असणारा मॅक कॉम्पुटर वापरतात. या दोन्ही खाजगी कार्यप्रणालींऐवजी लिनक्स व युनिक्स ही मुक्त कार्यप्रणाली वापरण्याचे प्रमाण वाढले असून अनेक विशेष सॉफ्टवेअरसाठी विशिष्ठ  कार्यप्रणाली असणारा कॉम्युटर आवश्यक असतो. 

यामुळे आपल्या कॉम्पयुटरवर असणा-या कार्यप्रणालीपेक्षा वेगळी कार्यप्रणाली लागणा-या सॉफ्टवेअरचा वापर करता येत नाही.

यावर उपाय म्हणजे आभासी कार्यप्रणाली ( व्हीएमवेअर) स्थापित करून त्याच्या साहाय्याने  प्रोग्रॅमिंग करणे. मात्र या पद्धतीत वेगळी कार्यप्रणाली, त्यावर चालणारी प्रोग्रॅमिंग भाषा तसेच डाटाबेस ( माहितीकक्ष असे घटक जोडावे लागतात. 

याला एक उत्तम पर्याय डॉकरने उपलब्ध करून दिला आहे.  

आपल्या कॉम्प्युटरवर डॉकर हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यावर  आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रोग्रॅम वा सॉफ्टवेअर प्रोजेक्ट कार्यान्वित करता येते. त्यासाठी आवश्यक असणारी कार्यप्रणाली, प्रोग्रॅमिंग भाषा, डाटाबेस इत्यादी सर्व घटक एकत्र करून त्याची एक इमेज (रेडीमिक्ससारखी मिसळ) केली जाते व ती कार्यान्वित करून उत्तर काढता येते. मोठी अवजड यंत्रसामुग्री वा अनेक परस्पर संबंधित वस्तू एकत्रपणे जहाजावरून पाठविताना भलेमोठे सीलबंद पेटारे वापरले जातात. त्यांना कंटेनर म्हणतात त्यांची वाहतूक करणा-या जहाजावरून डॉकर हे नाव या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण सॉफ्टवेअरला दिले आहे. 


डॉकरची ही कल्पना मला फार आवडली. डॉकरमध्ये सर्व क्रिया अगदी छोट्या प्रोग्रॅमने स्वयंचलितपणे आपोआप होत असल्याने मला डॉकर ही जादुची कुपीच वाटते.


आता कुपी  आणि पेटारा हे दोन शब्द लहान आणि मोठा कंटेनर दर्शवितात.  आपली मराठी भाषा शब्दसंपदेत समृद्ध आहे. अत्तराची कुपी ते शिवाजी महाराजांनी वापरलेला पेटारा या शब्दांचा विचार करताना डॉकरसाठी मला इतर अनेक शब्द सुचले.

कागदाची पुडी वा पुडा

पत्र्याची डबी व डबा

पेटी आणि पेटारा

कप्पा आणि कपाट

तिजोरी

पेटारा हा शब्द मला जास्त योग्य वाटला. पण अगदी कितीही मोठा प्रोग्रॅम असला तरी तो ठेवण्यासाठी अगदी लहाम चिप पुरेशी होते. मग डॉकरऐवजी कुपी म्हटले तरी चालण्यासारखे आहे. अर्थात याला जादूचा दिवा वा उडणारी चटई असेही नाव देता आले अलते. 

हे विषयांतर झाले. पण सांगायचा मुद्दा हा की डॉकर सॉफ्टवेअर आपल्याला कोणतेही सॉफ्टवेअर वापरण्याची  सुविधा प्रदान करते.

मी या डॉकरचा वापर करून वर्डप्रेस इन्स्टॉल करून पाहिले. आणि माझी याच्या उपयुक्ततेबद्दल खात्री पटली.