एकच प्याला हे राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले मराठीतील नाटक आहे. मद्यपान व त्याचे दुष्परिणाम हा विषय असलेले हे नाटक गडकऱ्यांनी इ.स. १९१७ सालच्या सुमारास लिहिले.
दारूच्या व्यसनामुळे सुधाकरसारखा एक बुद्धिमान, तेजस्वी आणि स्वाभिमानी माणूस स्वतःचा, आपल्या साध्वी पत्नीचा आणि आपल्या संसाराचा कसा नाश करून घेतो, ही भयानक गोष्ट गडकऱ्यांनी प्रभावी भाषेतूननी रोमांचकारी घटनांमधून प्रेक्षकांना परिणामकारक रीतीने सांगितलेली आहे.
आजच्या काळात तरूण पिढी नशेच्या आहारी जात असल्याने या नाटकातील संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा या दृष्टीने मी या नाटकाचे हिंदी व इंग्रजीत भाषांतर केले आहे.
आता ए आय च्या मदतीने त्याचे नाट्य रुपांतर करण्याचा संकल्प आहे.
एकच प्याला - मराठी नाटक - निवडक मजकूर
एकच प्याला - पहिला अंक
प्रवेश पहिला -(स्थळ: सुधाकराचे घर.)
सुधाकर - मी सोळा वर्षांचा असेन नसेन, माझी प्रवेश परीक्षा उतरण्याच्या आधीच बाबांनी स्वर्गप्रवेश केला; आपला वृध्दापकाळ झाला असं पाहून आपल्या पश्चात् शरद्च्या संगोपनाची जबाबदारी माझ्यावर पडू नये म्हणून बाबांनी तिच्या आठव्या वर्षीच तिचं लग्न लावून दिलं. परंतु लग्नाच्या सोळाव्या दिवशीच तिचं दुर्दैव तिच्या पुढं उभं राहिलं; नवर्याच्या मुळावर आलेली मुलगी, म्हणून तिच्या सासर्यानं तिला आमच्या घरी कायमची परत लावून दिली!
आईबापावेगळी आम्ही दोन परकी मुलं! पैशाचं पाठबळ नाही आणि आप्तेष्टांचा आधार नाही! त्या वेळी रामलाल देवासारखा माझ्या पुढं उभा राहिला! माझ्या मानी स्वभावामुळं माझ्या शिक्षणासाठी मी त्याची प्रत्यक्ष मदत कधी घेतली नाही हे खरं; परंतु शरद्ला सांभाळण्याची जबाबदारी मात्र त्यानं माझ्यावर फारशी पडू दिली नाही; पुढं शिकवण्या वगैरे पत्करून माझ्या शिक्षणक्रमातून शेवटपर्यंत मी यशस्वी रीतीनं पार पडलो;
रामलाल मानलेला का होईना, पण तिचा भाऊ शोभतोस खरा! सिंधूताई,
रामलाल - वकिलीच्या धंद्यात सुधाकर हल्ली या स्थितीत आहे. सर्वांनी एकच परीक्षा दिली असल्या कारणानं त्याच्या जोडीला वकिलांना तो आपल्यापैकीच एक वाटत आहे.
मला या वेळी आज नजरेपुढून जात असलेलं हिंदुस्थानचं दारिद्रय आणि उद्या दिसणारं इंग्लंड देशाचं वैभव, दोन्ही दिसताहेत.
या भूमीवर तुझा, माझा, त्याचा, याचा, कोणाचाही प्रेमाचा हक्क अगदी सारखा आहे. ऋषीश्वरांच्या यज्ञकर्माची योगभूमी, शिबिगौतमांसारख्या महात्म्यांची त्यागभूमी, प्रतापशाली वीरांची जी कर्मभूमी, युधिष्ठिर- अशोक यांसारख्या पुण्यश्लोकांची जी धर्मभूमी, तीच आपली ही जन्मभूमी! तिच्याकडे पाहून श्रीशिवछत्रपतींनी मागं जितक्या अधिकारानं म्हटलं असेल की, ही माझी जन्मभूमी- तिच्याकडे पाहून लोकमान्य टिळक जितक्या अधिकारानं आज म्हणत आहेत की, ही माझी जन्मभूमी- उद्या इंग्लंडहून परत आल्यावर तिच्याकडे पाहून माझ्यासारख्या पामरालाही तितक्याच अधिकारानं म्हणता येईल की, ही माझी जन्मभूमी!
प्रवेश दुसरा - (स्थळ : तळीरामाचे घर. पात्रें : तळीराम व भगीरथ)
तळीराम याचे तत्वज्ञान
खरंच दारू एकदा घेतली म्हणजे सुटत नाही! पण तेवढयानं दारू वाईट कशी ठरते? !
इंग्रजी अंमल सुरू झाल्यामुळं आमच्या हतभागी देशात ज्या अनेक आपत्ती आल्या, त्यात पदवी आणि प्रेम या अग्रगण्य आहेत.
काव्यात कमल, नाटकात सूड, कादंबरीत भुयार, मासिक पुस्तकांत खास अंक, वर्तमानपत्रांत खास बातमीदार, संसारात प्रेम, औद्योगिक चळवळीत सहकारिता, सुधारणेत देशभक्तीत स्वार्थत्याग आणि वेदान्तात परब्रह्म यांचा धुमाकूळ माजला नसता, तर त्या त्या गोष्टींची थट्टा करायला जागाच उरली नसती प्रेमात राजासुध्दा अगदी गुलाम होतो, पण मदिरेत गुलामसुध्दा अगदी राजासारखा स्वतंत्र होतो.
मद्यपान नीतिमत्तेला फार पोषक आहे. ऐका कसं ते. मद्यपी कधी खोटं बोलत नाही. कारण खोटं रचून त्याला कधी सांगताच येत नाही! मद्यपी कधी कुणाची कुणाजवळ चहाडी करीत नाही. कारण, मागं कोण काय बोलला याची त्याला आठवण नसते! तो कधी कुणाचा विश्वासघात करीत नाही, कारण, त्याच्यावर कुणी विश्वासच ठेवीत नाही!
रंगभूमीच्या आणखी प्रेक्षकांच्या मध्ये दिव्यांची एक धगधगीत अग्निरेषा असते. नाटयसृष्टीची ही मर्यादा ओलांडून प्रीतिविवाह सत्यसृष्टीत उतरला, म्हणजे त्याचे पोरखेळ निम्मे दरानंसुध्दा पाहण्याच्या लायकीचे नसतात. लोक म्हणतात, नाटक हे संसाराचं चित्र आहे. पण मी म्हणतो की, हल्ली संसार हे नाटकाचं चित्र बनत चाललं आहे! प्रीतिविवाहाच्या पूर्वार्धाचा उत्तरार्धाशी काडीइतकाही संबंध नसतो; किंवा काडीइतकाच संबंध असतो. प्रीतिविवाह हा द्वंद्वसमास असून वकिलामार्फत त्याचा विग्रह करून घ्यावा लागतो.
कोटयान्कोटी अस्सल आर्यांची कर्तबगारी कारकुनी पेशानं साहेबांच्या भेटीसाठी बंगल्याबाहेर उभी आहे व बंगल्याच्या आत पेल्यावर पेले घेणा-या कामामुळं सत्ताधारी साहेबांना बाहेर येण्याची फुरसत नाही!
एकटयादुकटया दागिन्याची मिरवणूक काढली म्हणजे आपल्या गरिबीबरोबरच मनाचा हलकेपणाही लोकांच्या नजरेला येतो. सर्वांग सजलेल्या श्रीमंतांच्या ठिकाणी एखाद्या दागिन्याची उणीव चंद्राच्या कलंकाप्रमाणे शोभिवंत दिसते. पण उघडयाबागडया गरिबांना एकच दागिना घातला म्हणजे तो काळया कुळकुळीत अंगावरील पांढ-या कोडासारखा किळसवाणा दिसतो.
प्रवेश तिसरा -(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे: सुधाकर, पद्माकर, सिंधू आणि शरद्.)
पद्माकर : श्रीमंतांच्या आणखी आमच्या घराचा ऋणानुबंध किती आहे तो! इंदिराबाई म्हणजे संस्थानिकांची मुलगी, त्यातून एकुलती एक, पोरवय आणि नव्यानं सासरी जायला निघालेली. आमची सिंधूताई म्हणजे तिची जिवाभावाची सोबतीण. तेव्हा घेतला हट्ट, की सिंधूताईच पाठराखणी पाहिजे म्हणून! दादासाहेब, एक म्हण आहे, राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्रीहट्ट, विधात्यालासुध्दा पुरवावे लागतात,
निदान चार महिने तरी मला या बदलीवर राहावं लागणार
प्रवेश चवथा (स्थळ : आर्यमदिरामंडळ.
पात्रे: शास्त्री, खुदाबक्ष, मन्याबापू मवाळ, जनुभाऊ जहाल,सोन्याबापू सुधारक, यल्लप्पा, मगन, रावसाहेब, दादासाहेब, भाऊसाहेब वगैरे मंडळी.
पात्रांची निवड प्रातिनिधिक स्वरुपाची - हिंदू, मुस्लीम, मवाळ, जहाल, सुधारक, मारवाडी,इतर प्रतिष्ठित.)
तळीराम - आज आमच्या दादासाहेबांची सनद मुन्सफांनी सहा महिने रद्द केली.
कुठल्याशा मुद्दयावर यांचं म्हणणं मुन्सफांना पटेना; दादासाहेबांनी नीट समजावून द्यायला पाहिजे होतं; पण नव्या दमात एवढा पोच कुठून राहणार? हे रागारागानं बोलू लागले. चारचौघांनी हसून हेटाळणी करायला सुरुवात केली. झालं, दादासाहेबांचा सुमार सुटला, अन् मुन्सफाला होय नव्हे वाटेल ते बोलू लागले. तेव्हा मुन्सफांना असं करणं भाग आलं. तरी बरं म्हातारा पुष्कळ पोक्त, म्हणून सहा महिन्यांच्या मुदतीपुरतीच त्यानं सनद रद्द केली;
आर्यमदिरामंडळ - स्थापना चर्चा
प्रवेश पाचवा -(स्थळ : सुधाकराचे घर. पात्रे: सुधाकर व तळीराम.)
सुधाकर : (स्वगत) चोवीस तास झाले, मस्तकावर नुसते घणाचे घाव बसताहेत! काही सुचत नाही, काही नाही.
तळीराम - व्यसन म्हणून दारू अति भयंकर आणि निंद्य आहे हे मलाही कबूल आहे. पण आपणाला ती केवळ औषधाकरता म्हणून घ्यायची आहे आणि तीसुध्दा अगदी किती अगदी थोडी! एवढीशी घेतल्याने सवय लागेल अशी नादानपणाची धास्ती आपल्याला वाटायचं काही कारण नाही.
सुधाकर पिऊ लागतो.
----
एकच प्याला - दुसरा अंक
प्रवेश पहिला -(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे: सिंधू व सुधाकर.)
सुधाकर : अगं, या सनदेच्या कामासाठी खटपट करायची असते तर चारचौघांकडे जाऊन, तेव्हा हिंडावं लागतं असं सारखं! कुणाच्या तरी घरी फराळाचा होतोच आग्रह. काम सोडून फराळासाठी घरी तर उठून यायचं नाही! रात्री दोन दोन वाजेपर्यंत बसावं लागतं आताशा! तेवढयावरून तुझा रागच मला आला आहे हे कसं ठरविलंस?
गीता रामलालला सांगते: आताशा त्यांनी प्यायला सुरुवात केली आहे- (हळूच) दारू प्यायला!
प्रवेश दुसरा -(स्थळ: रस्ता. पात्रे: भगीरथ व रामलाल)
भगीरथ : (स्वगत) दारूपासून सुख नाही हे खरं; पण दु:खी जिवाला दारू सुखाचं स्वप्न तरी दाखविते खास! या पापपूर्ण संसारात कधी कधी दु:खाचा अर्क वाटेल त्या रीतीनं कोळून प्यावा लागतो, हेच खरं!
रामलाल : (स्वगत) यांच्याशी एकदम बोलायला सुरुवात केली आणि गीतानं सांगितलेलं खरं नसलं तर- नाही पण- तिचं म्हणणं हजार हिश्श्यांनी खोटं नाहीच! त्याच्या नकळत शोधावे
(प्रकट): आज संध्याकाळी आम्हालाही तुमच्या मंडळात दाखल करून घ्या! अगदी सुरुवातीपासूनच नको! मंडळी रंगात आली म्हणजे गेलेलं बरं! म्हणजे दुसर्याला संकोच नाही, आपल्यालाही संकोच नाही!
भगीरथ : मी दुर्दैवाची दिशाभूल होऊन या आडवाटेला लागलो आहे! संसाराच्या सुरुवातीलाच माझा प्रेमभंग झालेला आहे. ज्या मुलीवर माझं प्रेम होतं, तिचं दुसर्याशी लग्न लागलं आणि संसाराला रामराम ठोकून मी असा फकीर बनलो!
प्रवेश तिसरा - स्थळ: आर्यमदिरामंडळ –
(सुधाकर पितो व गुंगत पडतो. सर्वांचे पेले तयार होतात. इतक्यात रामलाल व भगीरथ एका बाजूने येतात.)
रामलाल : (भगीरथास एकीकडे) भगीरथ, पाहा या एकमेकांच्या लीला! आश्चर्याने माझ्याकडे पाहता भगीरथ? एका कार्यासाठी मघाशी तुमच्याजवळ खोटं बोललो त्याची मला क्षमा करा. मी मद्यपी नाही! माझ्या एका मित्राला- जो या शहराची केवळ शोभा- त्याला- सुधाकराला इथून परत नेण्यासाठी म्हणून मी तुमच्याबरोबर आलो. तुमची फसवणूक केली याबद्दल मला क्षमा करा.
दारु पिणा-यांची चर्चा
जनूभाऊ : सोन्याला कंठ फुटला वाटतं हा! या सुधारकांना प्रत्येक बाबतीत बायकांचे देव्हारे माजविण्याची मोठी हौस! कसला रे कपाळाचा स्त्रीवर्ग? यामुळेच या सुधारकांची चीड येते!
शास्त्री : नाही, माझा सुधारकांच्यावर कटाक्ष या मुद्दयावर नाही! सुधारणेच्या नावाखाली सुधारकांनी जो सावळागोंधळ मांडला आहे, धर्माचा जो उच्छाद मांडला आहे, तो आम्हाला नको आहे! सुधारणेचे नाव सांगून उद्या तुम्ही जर अपेयपान करू लागलात, अभक्ष्य भक्षण करू लागलात, सुधारक म्हणून मांसाहार करू लागलात- खुदाबक्ष, आज मटण शिजलं आहे चांगलं नाही?-
रामलाल : अरेरे, भगीरथ, संस्काराने पवित्र मानलेल्या आपापल्या धर्मासाठी पूर्वीच्या हिंदू-मुसलमानांचं वैरसुध्दा या नरपशूंच्या स्नेहापेक्षा जास्त आनंददायक वाटतं. कुठं पवित्र योग्यतेचा गीतारहस्य ग्रंथ, कुठं श्रीशंकराचार्य, कुठं सनातनधर्म आणि कुठं हे रौरवातले कीटक! आगरकर आणखी टिळक या महात्म्यांचा परस्परविरोध म्हणजे आकाशातल्या नक्षत्रांच्या शर्यती! तुमच्या-आमच्यासारख्या पामरांनी भूलोकावरूनच त्यांच्याकडे पहावं, आणखी त्यांच्या तेजानं आपला मार्ग शोधून काढावा! शूचिर्भूत ब्राह्मणांनासुध्दा संध्येच्या चोवीस नावांबरोबरच टिळक-आगरकर यांची नावं भरतीला घालावी, भगीरथ पाहा, या कंगालांचा किळसवाणा प्रकार! भगीरथ, भगीरथ, पुरे झाला हा प्रसंग!
रामलाल : अरेरे, भगीरथ, संस्काराने पवित्र मानलेल्या आपापल्या धर्मासाठी पूर्वीच्या हिंदू-मुसलमानांचं वैरसुध्दा या नरपशूंच्या स्नेहापेक्षा जास्त आनंददायक वाटतं. कुठं पवित्र योग्यतेचा गीतारहस्य ग्रंथ, कुठं श्रीशंकराचार्य, कुठं सनातनधर्म आणि कुठं हे रौरवातले कीटक! आगरकर आणखी टिळक या महात्म्यांचा परस्परविरोध म्हणजे आकाशातल्या नक्षत्रांच्या शर्यती! तुमच्या-आमच्यासारख्या पामरांनी भूलोकावरूनच त्यांच्याकडे पहावं, आणखी त्यांच्या तेजानं आपला मार्ग शोधून काढावा! शूचिर्भूत ब्राह्मणांनासुध्दा संध्येच्या चोवीस नावांबरोबरच टिळक-आगरकर यांची नावं भरतीला घालावी, भगीरथ पाहा, या कंगालांचा किळसवाणा प्रकार! भगीरथ, भगीरथ, पुरे झाला हा प्रसंग!
भगीरथ : रोज सुरुवातीपासून यांच्याबरोबर पीत गेल्यामुळं हा सर्वस्वी निंद्य प्रकार माझ्या कधीही लक्षात आला नाही.
रामलाल : भगीरथ, पाहा या प्रेतांच्याकडे! यांच्याबरोबर तुम्ही दारू पिऊन बसता? हतभागी महाभागा, तू ताज्या रक्ताचा तरुण आहेस, तीव्र बुध्दीचा आहेस, थोर अंत:करणाचा आहेस, रोमारोमात जिवंत आहेस आणि म्हणूनच तुझ्यासाठी अंतरात्मा तळमळून मी बोलतो आहे. संसारात प्रेमभंग झाला म्हणून तू या दारूच्या व्यसनाकडे वळलास?
एकोणीसशे मैल लांबीचा आणि अठराशे मैल रुंदीचा, नाना प्रकारच्या आपदांनी भरलेला, हजारो पीडांनी हैराण झालेला, तुझा स्वदेश तेहतीस कोटी केविलवाण्या किंकाळयांनी तुला हाका मारीत असताना प्रेमभंगामुळं अनाठायी पडलेलं जीवित सार्थकी लावायला तुला दारूखेरीज दुसरा मार्गच सापडला नाही का?
असल्या प्रेमभंगानं स्वार्थाच्या संसारातून तुला मोकळं केल्याबद्दल, तुझ्या जन्मभूमीची अशा अवनतकाली सेवा करायची तुला संधी दिल्याबद्दल भाग्यशाली भगीरथ, आनंदाच्या भरात परमेश्वराचे आभार मानायच्या ऐवजी तू वैतागून दारू प्यायला लागलास, आणखी या नरपशूंच्या पतित झालास?
पवित्र आणखी प्रियतम गोष्टींना संकटकाली साहाय्य करण्याचं भाग्य पूर्वपुण्याई बळकट असल्याखेरीज प्राणिमात्रांना लाभत नाही.
पतितांच्या उध्दारासाठी, साधूंच्या परित्राणासाठी वारंवार अवतार घेण्याचा मोह प्रत्यक्ष भगवंतालासुध्दा आवरत नाही. भगीरथ, दीन, हीन, पंगू, अनाथ, अशी ही आपली भारतमाता तुम्हा तरुणांच्या तोंडाकडे आशेने पाहात आहे. पाणिग्रहणांवाचून रिकामा असलेला तुझा हात- चुकलेल्या बाळा, जन्मदात्री स्त्रीजात गुलामगिरीत पडली आहे, लक्षावधी निरक्षर शूद्र ज्ञानप्राप्तीसाठी तळमळत आहेत, साडेसहा कोटी माणसांसारखी माणसं नुसत्या हस्तस्पर्शासाठी तळमळत आहेत, या बुडत्यांपैकी कोणाला तरी जाऊन हात दे-
भगीरथ : रामलाल, भगीरथाला पुनर्जन्म देणार्या परमेश्वरा, मी अजाण आहे, रस्ता चुकलो आहे; यापुढं मला मार्गदर्शक व्हा. आजपासून हा भगीरथ भारतमातेचा दासानुदास झाला आहे.
----
एकच प्याला - तिसरा अंक
प्रवेश पहिला
(स्थळ : सुधाकराचे घर. पात्रे- सिंधू मुलाला गोकर्णाने दूध पाजीत आहे. जवळ शरद्.)
सिंधू : वन्सं, आपदा चंद्रा सूर्यासारख्या वेळा सांगून का येत असतात. बरं व्हायचं ते जपातपानं होतं आणि वाईट मात्र झाल्यावर कळायला लागतं. फळ पिकण्यापूर्वी पाडानं रंगून जातं; पण पुरतेपणी कुजल्याखेरीज त्याला कधी घाण सुटली आहे का? एकेकाच्या गोष्टी ऐकल्या म्हणजे जिवाला अगदी कसा चरका बसतो!
रामलाल : ताई, तुला काय सांगू? आपल्या सुधाकरला एक व्यसन- एक फारच भयंकर व्यसन- (स्वगत) निष्ठुर दैव, काय सांगायचं हे माझ्या कपाळी आणलंस? दारू हा अमंगल शब्द या मंगलदेवतेपुढं मी कोणत्या तोंडानं उच्चारू? व्यसनी चांडाळांनो, तुम्ही आपल्या जिवलग मित्रांना कसल्या संकटात पाडता, याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? परमेश्वरा, दारूनं भिजलेला हा वाग्बाण हिच्या हृदयावर रोखण्यापेक्षा एखाद्या विषारी बाणानं हिचा एकदम हृदयभेद करण्याचं काम माझ्याकडे का दिलं नाहीस? (उघड) सिंधू, सुधाकराला दारूचं व्यसन लागलं!
(तळीराम सुधाकरला घेऊन येतो.)
सुधाकर : काय रडारड आहे घरात? सनद गेली म्हणून कोण रडतं आहे? नामर्द बायको आहे. तळीराम, एकेकाला लाथ मारून ही गर्दी मोडून टाक. (खाली बसतो.)
रामलाल : शरद्, तळीराम, सुधाकरला आत नेऊन निजवा.
सुधाकर : सनद गेली तरी हरकत नाही. मी नामर्द नाही- हा रामलाल नामर्द आहे- सिंधू नामर्द आहे- सनद नामर्द आहे! (ते त्याला घेऊन जातात.)
प्रवेश दुसरा -(स्थळ: तळीरामाचे घर. पात्रे: तळीराम आणि गीता)
तळीराम : घरात असेल ते सामान पुढे आण! मंडळाची वर्गणी द्यायची आहे आज. काय जे असेल ते आण. काय बेमुर्वत बाजारबसवी आहे! घेऊ का नरडं दाबून जीव? मी दारू पितो म्हणून माझी अशी अमर्यादा करतेस? थांब, अशी पालथी पाडून तुलाही दारू पाजतो! चल, दारू तरी पी, नाहीतर घरातून चालती तरी हो! नाही तर जुन्या बाजारात नेऊन लिलाव पुकारून आडगि-हाइकाला फुंकून टाकीन!
तळीराम : जातेस का पितेस? दादासाहेबांच्या तिथं लावालावी करून मला त्यांच्या घरी जायला बंदी करवलीस? चल, घे हा दारूचा घोट का घेऊ नरडीचा घोट? (तिला धरतो. दोघांची झटापट होते. ती त्याला ढकलून देते.)
गीता : देवा, नकोरे नको या घरात राहणं आता! (जाते.)
प्रवेश तिसरा
(स्थळ: रामलालचे घर. पात्रे: भगीरथ व शरद्)
भगीरथ - एखाद्या बालविधवेनं एखाद्याला नुसता रस्ता विचारला तर बघणार्याला असंच वाटतं की, ती पापाचाच मार्ग विचारीत आहे! फार काय सांगावं, पाण्यात बुडून असलेल्या बालविधवेला एखाद्यानं हात दिला तर तो तिला बाहेर काढण्याऐवजी नरकात ढकलीत आहे, इतकं मानण्याची आमच्या आर्य मनाची वृत्ती होऊन बसली आहे!
आणि बालविधवांनी जितेपणी या नरकयातनांत तळमळत पडून आयुष्य कोणत्या सुखात कंठीत राहावं म्हणून विचारलं, तर पोक्तबुध्दीचे हे धर्मसिंधू लागलीच गंभीरपणानं म्हणतील, की आप्तइष्टांची मुलं खेळवीत बसल्यानं विधवांना जे सात्त्विक समाधान होतं, त्यापुढं वैधव्याच्या यातनांची काय प्रौढी आहे? असं जर असेल तर मी म्हणतो, या विवेकशाली महात्म्यांनी, आपली द्रव्योपार्जनाची लालसा शेजार्यांचे रुपये मोजून का भागवू नये? पोटाची खळी भागविण्यासाठी पंचपक्वान्नांकडे धाव घेण्याचं सोडून परक्याच्या पोटात चार घास कोंबून आपलं समाधान हे का करून घेत नाहीत?
रामलाल : भगीरथ, लोककल्याणाचा एकच राजमार्ग म्हणून दाखविण्याइतकं हिंदुस्थानचं भावी सौख्य आज एकदेशीय नाही. एकीकडे राजकीय सुधारणा आहेत, एकीकडे सामाजिक सुधारणा आहेत. इकडे धर्म आहे, इकडे उद्योग आहे, इकडे शिक्षण आहे. इकडे स्त्रियांचा प्रश्न आहे. इकडे अस्पृश्यांची बाबत आहे, तर तिकडे जातिभेदाचा गोंधळ आहे. अशा या चमत्कारिक प्रसंगी अमूक एकच मार्ग इतरांच्यापेक्षा चांगला आहे, असं सांगणं मोठं धाडसाचं आहे. परिस्थितीच्या अनुभवाप्रमाणं या विषयावर ज्याचे त्याचे विचार अगदी निरनिराळे झालेले आहेत.
हजारो वर्षांच्या ओझ्याखाली तेहतीस कोटी जिवांच्या जडपणानं खालावत चाललेल्या आमच्या भरतभूमीला उचलून धरण्यासाठी जितक्या भिन्नभिन्न प्रकृतींच्या मूर्ती आम्हाला लाभतील तितक्या हव्याच आहेत. लोकहितात पडू पाहणार्या विद्यार्थ्याला कायावाचामनसा आधी हा धडा हस्तगत- नाही; अगदी जिवाशी- नेऊन भिडविला पाहिजे. आपल्याहून भिन्न रीतीनं लोकहिताचा प्रयत्न कोणी करीत असलं तर त्याच्याबद्दल सहानुभूती न दाखविणं, दुसर्याच्या प्रयत्नाबद्दल अनादर दाखविणं, देशहिताच्या बुध्दीतच स्पर्धा वाढवून एकमेकांना खाली पाडणं, या कारणांमुळे आज आमची जितकी अवनती होत आहे, तितकी दुसर्या कोणत्याही कारणामुळं होत नसेल.
भगीरथ, मी लोकोत्तरबुध्दीचा एखादा महात्मा नाही; पण शक्य तितक्या शांतपणानं आणि समतोल मनानं सरळ गोष्टी पाहात असल्यामुळे माझे विचार असे होऊ लागले आहेत. राजकीय सुधारणेचे पुरस्कर्ते आपल्या मार्गानं जाताना विधवांच्या दुबळया हृदयाच्या पायघडया तुडवीत जायला मागंपुढं पाहात नाहीत, केवळ सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते विधवांच्या कपाळी कुंकू लावण्यातच इतके रंगून गेलेले आहेत की, आपल्या भारतमातेच्या वैधव्याचा त्यांना विचारच करता येत नाही!
आर्यधर्माचा भलता अभिमान धरणारे, आर्यधर्माची विजयपताका अधिकाधिक उंच दिसावी म्हणून धर्माभिमानाच्या भरात तिच्या उभारणीसाठी सहा कोटी माहारामांगांच्या हाडांच्या सांगाडयांची योजना करीत आहेत. नामशुद्रांचे आणि अतिशुद्रांचे वाली म्हणविणारे त्या वर्गाला उच्चपदी नेण्याऐवजी बिचार्या ब्राह्मणवर्गाला रसातळी गाडण्याचा अधम प्रयत्न करीत आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रकृती तितकी मतं, आणखी मतं तितके मार्ग, असा प्रकार होऊन आज जबाबदार, आणि बेजबाबदार लोकांना सर्वांनाच बारा वाटा मोकळया होऊन बसल्या आहेत.
त्रिसप्तकोटिकंठकृतनिनादकराले जननि इतक्या हाका आरोळयांच्या कल्लोळात तुझ्या नेमक्या हिताचा संदेश आम्हा पामर बाळांना कसा ऐकू जाणार? भगीरथ, व्यापक लोकशिक्षण, सार्वजनिक लोकशिक्षण हा तरी सध्या असा एक मार्ग दिसतो आहे की, जो एकटाच आम्हाला आत्यंतिक हिताला नेऊन पोहोचविणारा नसला, तरी इतर सर्व मार्गांवर आपला प्रकाश पाडणारा आहे खास. भगीरथ आर्यवर्ताच्या उदयोन्मुख भाग्याचा अचूक मार्ग सांगणार्या मंत्रद्रष्टा महात्मा अजून अवतरावयाचा आहे. मनुष्यस्वभावाला शोभणार्या आतुर आशेनं त्याच्या आगमनाची वाट पाहात बसणं हेच आज तुझ्या माझ्यासारख्या पतितांचं कर्तव्य आहे. सर्वच मार्ग स्वच्छ करून ठेवले म्हणजे त्या महात्म्याचा यांपैकी वाटेल त्या मार्गाने होणारा प्रवास तितका तरी सुखकर होईल.
प्रवेश चवथा -(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे: तळीराम, सुधाकर, सिंधू, शरद्.)
सुधाकर : सगळे पाजी, चोर, हरामखोर लोक आहेत! येऊ दे, पद्माकर येऊ दे, नाही तर त्याचा बाप येऊ दे! पद्माकर, त्याचा बाप, रामलाल, शरद्, सिंधू- एकेकाला लाथ मारून हाकलून देतो घराबाहेर!
सुधाकर : सिंधूच्या गळयातलं मंगळसूत्र तोड! ऊठ तळीराम, माझी तुला शपथ आहे!
(तळीराम मंगळसूत्राला हात घालतो, तोच रामलाल, पद्माकर व बाबासाहेब येतात. पद्माकर तळीरामला लाथेने उडवितो. तळीराम रडू लागतो व पिऊ लागतो.)
सुधाकर : तू कसा आलास घरात? चल, माझ्या घरातून चालता हो! पद्माकर, तू पण चालता हो! त्या थेरडयाला एक लाथ मार! चले जाव! तळीराम, लगाव लाथ एकेकाला! पाजी लोक!
सिंधू : हा नरक? हे पाय जिथं आहेत तिथं नरक? दादा, अरे, तू चांगला शहाणा ना? वेडया, हे पाय जिथं असतील तिथंच माझा स्वर्ग, तिथंच माझं वैकुंठ, आणि तिथंच माझा कैलास!
कशी या त्यजू पदाला।
मम सुभगशुभपदाला।
सिंधू : हा! दादा, या घरात, या पायांसमोर- माझ्यासमोर असं अमंगल मी तुला बोलू देणार नाही! पतिव्रतेच्या कानांची ही अमर्यादा आहे! जा- बाप, भाऊ, माझं या जगात कोणी नाही? पतिव्रतेला नाती नसतात. ती बापाची मुलगी नसते, भावाची बहीण नसते, मुलाची आई नसते! देवाब्राह्मणांनी दिलेल्या नवर्याची ती बायको असते! बाबा, ज्या दिवशी माझं लग्न झालं त्याच दिवशी तुमची मुलगी तुमच्या घराला मेली आणि नव्या नावानं मी या घरात जन्माला आले. मुलीच्या लग्नाचा समारंभ आई बापांना सुखदायक वाटतो; पण मुलीचं लग्न म्हणजे तिची उत्तरक्रिया हे त्या बापडयांच्या ध्यानीमनीसुध्दा येत नाही. बाबा, कन्यादानासाठी इकडच्या हातावर तुम्ही जे उदक सोडलंत, त्यानंच माझ्या माहेरच्या नावाला तिलांजली दिलीत
एकच प्याला - चौथा अंक
प्रवेश पहिला (स्थळ: रामलालचा आश्रम. पात्रे: शरद् व रामलाल.)
रामलाल - भारतवर्षीय राजर्षीच्या सात्त्विक संसाराचं संपूर्ण चित्र या एकाच सर्गात कविकुलगुरूनं रेखाटलं आहे! ऐक, तुझ्या श्लोकाचा अर्थ- 'मरणं प्रकृति: शरीरिणाम्'- मरण हा सदेह प्राणिमात्राचा स्वभाव आहे; 'विकृतिर्जीविमुच्यते बुधै:'- जिवंत राहणं हे सुज्ञ लोकांना अपवादरूप वाटतं! 'क्षणमप्यवतिष्ठते श्वसन' आणि म्हणून क्षणभरच जरी जीवित लाभलं, तरी 'यदि जन्तुर्न तु लाभवानसौ'- तो प्राणी भाग्यशाली नाही काय?
जीवमात्राचा जन्म केवळ एकरूप आहे; परंतु मरणाला हजार वाटा आहेत. एवढयासाठीच या संसाराला मृत्यूलोक म्हणतात! परिस्थितीकडे विचारपूर्वक पाहिलं तर मरणाच्या इतक्या हजारो कारणांतून आपण क्षणमात्र तरी कसे वाचतो, याचं प्रत्येकाला मोठं आश्चर्य वाटेल! आणि म्हणून इथं म्हटलं आहे की, पदरात पडलेल्या पळापळाबद्दल आनंद मानून भावी कलाकडे आपण उदासीन दृष्टीनंच पाहिलं पाहिजे!
सौंदर्य कोणत्याही स्थितीत आपली नाजूक शोभा सोडीत नाही! सौंदर्याला वैधव्याचा अलंकारसुद्धा करुण शोभाच देतो! शरद्, पुनर्विवाहाबद्दल आम्ही तुला सर्वजण आग्रह करीत असताही (तिच्या पाठीवरून हात फिरवीत) बेटा, अजून तुला- (स्वगत) हिच्या अंगाचा स्पर्श होताच माझ्या हातावर असा खरखरीत काटा का बरं उभा राहिला? हा अनुभव अगदी नवीन- पण नको हा अनुभव! माझा हात सारखा थरथर कापत आहे! (तिच्या पाठीवरून हात काढतो. शरद् रामलालकडे पाहते.)
शरद् : नाही हो! रामलाल, हा बापाचा हात नाही! मुलीला बापाचा हात अगदी आईच्या हातासारखाच- जरासा राकट- देवाच्या पाषाणमूर्तीच्या हाताइतका राकट असतो! तुमचा हात बापाचा हात नव्हता! हा पुरुषाचा हात होता! मुलीच्या दृष्टीला बाप पुरुषासारखा दिसत नाही; तर देवासारखा निर्विकार दिसतो! बापासमोर मुलगी मोकळेपणानं वागते! आज माझा तो मोकळेपणा नाहीसा झाला! आज माझे वडील मला अंतरले! आज तुम्ही माझ्यासमोर तरुण पुरुष म्हणून उभे आहात आणि मी तुमच्यासमोर तरुण स्त्री म्हणून उभी आहे! स्त्रीनं पुरुषासमोर वागताना सावधगिरीनं राहायला पाहिजे.
प्रवेश दुसरा
(स्थळ: सुधाकरचे घर. पात्रे: सिंधू कागदाच्या घडया पाडीत आहे, मागे सुधाकर उभा आहे. इतक्यात गीता येते.)
सिंधू : अहो, उरापोटी करीन कसं तरी झालं! अर्धपोटी, नाही अगदी रित्यापोटी कंबर कसून आला तो दिवस साजरा करायला हवा ना? माझं ऐका तुम्ही. खुशाल कुठं दळण मिळालं तर घेऊन या! अहो, दुसऱ्याासाठी का करायचं आहे हे? बघाल ना कुठं?
सुधाकर : (स्वगत) अरेरे, काय ऐकलं मी हे? या उदार मनाच्या पण गरीब कुळीच्या भोळया मुलीनं सहजासहजी सिंधूच्या हृदयाला केवढी जबर जखम केली ही! धनसंपन्नाची जी कन्या, ज्ञानसंपन्नाची जी पत्नी, तिच्या उपासमारीची दया येऊन या उदार मुलीनं तिला सदावर्ताचा उपदेश द्यावा? सुधाकरा, काय हा तुझा संसार! धिक्कार असो तुझ्या व्यसनाला आणि पुरुषार्थाला!
गीता - हे हो कसले देव? अहो हे शेंदूरकमी देव, निव्वळ दगडधोंडे! आणि यांच्यावरचा शेंदूर पिऊन मुळूमुळू रडत बसायचं! राणीचं राज्य झालं आहे ना म्हणतात आताशा? मग राणीच्या या राज्यात बायकांचे का असे धिंडवडे निघतात हे?मला कुणी राज्य दिलं तर मी साऱ्या बायकांना सांगून ठेवीन की, नवरा दारू पिऊन घरी आला तर खुशाल त्याला दाव्यादोरखंडानं गोठयात नेऊन बांधीत जा! नवरा म्हणे देवासारखा! अशानं तर नवरेपणाचे देव्हारे माजले! दारू पितो तो कसला हो नवरा? माणसात देखील जिंमा व्हायची नाही त्यांची!
सुधाकर : सिंधू, मी आजपासून दारू पिणं सोडलं!
सिंधू : (आनंदाने) खरंच का हे?
सुधाकर : खरं, अगदी खरं! आजपासून दारू पिणं सोडलं; कायमचं सोडलं!
सिंधू : अहाहा! असं झालं तर देवच पावला!
सुधाकर : बाळ, तुझी शपथ घेऊन सांगतो की, या सुधाकरानं आजपासून दारू कायमची सोडली, अगदी कायमची सोडली! (दोघेही मुलाचा मुका घेऊ लागतात. पडदा पडतो.)
प्रवेश तिसरा - (स्थळ- बंडगार्डन. पात्रे- सुधाकर व इतर मंडळी.)
सुधाकर - दारूसारख्या हलक्या वस्तूच्या नादानं ज्या सोज्ज्वळ समाजातून, प्रतिष्ठित परिस्थितीतून, बरोबरीच्या माणसांतून- अगदी माणसांतूनच- मी उठलो, त्या जगात हे काळं तोंड पुन्हा घेऊन जाताना मला चोरटयासारखं होतं आहे.
सुधाकर : तळीरामाचा प्राण जात असला तरी आता मला क्लबात यायचं नाही!
शास्त्री : चला, खांसाहेब, तापलेली काच आपोआप थंड पडू द्यावी हे उत्तम! निवविण्यासाठी पाणी घातलं की, ती एकदम तडकायचीच! हा या घटकेपुरताच पश्चात्ताप आहे. स्मशानवैराग्यामुळं डोक्यात घातलेली राख फार वेळ टिकायची नाही. जरा धीरानं घ्या, म्हणजे आपोआपच गाडं रस्त्याला लागेल. सुधाकरा, आम्ही तर जातोच; पण तू आपण होऊन क्लबात आला नाहीस तर यज्ञोपवीत काढून ठेवीन, हे ब्रह्मवाक्य लक्षात ठेव! (शास्त्री व खुदाबक्ष जातात.)
सुधाकर : (स्वगत) दारूच्या गटारात या पामर किटकांच्या बरोबर आजपर्यंत मी वाहात आलो ना? पण यांना दोष देण्यात काय अर्थ आहे? जळलेला उल्का मातीत मिसळून दगडाधोंडयांच्या पंक्तीत बसतो याचा दोष त्याच्या स्वत:च्याच अध:पाताकडे आहे.
एक गृहस्थ नमस्कार न घेता निघून जातो-
दुसरा गृहस्थ : सध्या मी जरा गडबडीत आहे- हे दादासाहेब गेले- (जातो.)
तिसरा गृहस्थ: बेशरम मनुष्या, भलत्या गोष्टीची भलत्या ठिकाणी आठवण करून द्यायची तुला लाज वाटत नाही? मूर्खा, पहिल्यानं मी तुला न ओळखल्यासारखं केलं होतं तेवढयावरूनच तू सावध व्हायला पाहिजे होतंस!
चौथा गृहस्थ : तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे- आम्ही तुमच्यासाठी काय नाही करणार? आहे एक नोकरी- दरमहा पंधरापर्यंतची
आपलं स्पष्ट बोलायचं- हे बघा, तुम्ही बोलूनचालून व्यसनी, तुमची जामिनकी म्हणजे धोतरात निखारा बांधूनच हिंडायचं- हो तुम्हीच सांगा- व्यसनी माणसांचा भरवसा काय घ्या?
दारूबाजाच्या ओळखीचं मृत्यूचं एकच रूप म्हणजे दारू! तडफडणाऱ्या जिवाच्या जाचण्या बंद करण्याचा दारूखेरीज आता मार्ग नाही! मुलासकट माणुसकीला, सिंधूसकट संसाराला, सद्गुणांसकट सुखाला, जगासकट जगदीश्वराला, सुधाकराचा हा निर्वाणीचा निराशेतला शेवटचा प्रणाम! आता यापुढं एक दारू- प्राण जाईपर्यंत दारू- शेवटपर्यंत दारू! (जातो. पडदा पडतो.)
एकच प्याला - पाचवा अंक
प्रवेश पहिला - (पात्रे- भगीरथ व शरद्; शरद् रडते आहे.)
भगीरथाचा स्वार्थत्याग
भगीरथ : (स्वगत) भाईसाहेबांचं माझ्याशी असं तुटकपणाचं वागणं का होतं याचं कारण आता माझ्या लक्षात आलं! हा रोगातला रोग, मनाला मारणारा, जिवाला जाळणारा, हा मत्सर आहे! प्रेमाच्या स्पर्धेत निराश झालेल्या दीन जिवांचा हा निर्वाणीचा मत्सर आहे....त्यांनी माझ्यावर केलेले उपकार आठवले म्हणजे माझ्या स्वत:चाही मला विसर पडायला हवा! दारूच्या नादानं जीवन्मृत झालेल्या भगीरथाला त्यांनी पुनर्जन्म दिला आणि त्यांच्या वर्तनाकडे त्या मीच अशा टीकादृष्टीनं पाहायचं? पित्याच्या पुण्यवृत्तीबद्दल संशय घ्यायचा,...माझ्या जीविताची वाटेल ती वाट लागली तरी भाईसाहेबांच्या सुखाच्या वाटेत मी कधीही आड येणार नाही. भगीरथप्रयत्नांनी शरद्च्या प्रेमाचा वेग भाईसाहेबांकडे वळविलाच पाहिजे.
भगीरथ : मनाचा धडा करून एकदाच, एकदम स्पष्टपणं काय ते बोलून टाकतो. शरद्, दुसर्या कशासाठी जरी नाही, तरी केवळ या भगीरथाच्या सुखासाठी- शरद्, क्षमा कर, हात जोडून हजार वेळा तुझी क्षमा मागतो- पण तुला भाईसाहेबांची विनंती मान्य करावी लागेल! रामलालशीच तुला पुनर्विवाह करावा लागेल!
भगीरथाच्या जगातली परमेश्वराची मूर्ती रामलालच्या रूपानं उभी आहे. आचार्य देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव, या आपल्या आर्यधर्माच्या अनुल्लंघनीय आज्ञा आहेत. भाईसाहेबांनी पित्याप्रमाणं मला पुनर्जन्म दिला. जगाच्या उपहासानं दु:खावलेल्या माझ्या मनोवृत्तीची मातृप्रेमानं जोपासना केली; भावी आयुष्याचं सार्थक होण्यासाठी महन्मान्य मार्गाचा मला गुरुपदेश केला; माता, पिता, गुरू, यांच्या या त्रिभूवनवंद्य त्रिमूर्तीला माझ्या दृष्टीनं परमेश्वराची पुण्यपदवी प्राप्त झाली आहे. या परमेश्वराच्या इच्छेसाठी सर्वस्वी आत्मयज्ञ करण्याला मला तत्पर व्हायला नको का?
भगीरथ : रामलालच्या सुखासाठी अखिल ब्रह्मांडही ब्रह्मार्पण करणं हा भगीरथाचा एकच धर्म आहे. रामलालचं सुख तेच भगीरथाचं सुख, हे मी तुला सांगतो. आणि भगीरथाचं सुख तेच शरद्चं सुख, हे तू मला सांगितलंस. आपणा तिघांनाही सुखी होण्याचा याखेरीज दुसरा मार्गच नाही.
प्रवेश दुसरा
- (स्थळ- तळीरामाचे घर. पात्रे- बिछान्यावर आसन्नमरण तळीराम, त्याच्या भोवती आर्यमदिरामंडळाचे सभासद.)
तळीरामचा मृत्यू आणि इतर दारुबाज यांचा विनोदी संवाद. शेवट
(सर्व अस्ताव्यस्त पडतात. पडदा पडतो.)
प्रवेश तिसरा - (स्थळ- रामलालचा आश्रम. रामलाल प्रवेश करतो.)
रामलालचे स्वगत - भगीरथाबद्दल वाटणा-या मत्सराची जाणीव - खरे कारण शरदविषयी अभिलाषा , पश्चाताप
धिक्कार, शतश: धिक्कार असो मला! यात्किंचित् सुखाच्या क्षुद्र लोभानं पुत्राप्रमाणं मानलेल्या भगीरथाला दुखवून, कन्येप्रमाणं मानलेल्या शरद्च्या कोवळया हृदयावर रसरशीत निखारे टाकून माझ्या वयाच्या वडीलपणावर, नात्याच्या जबाबदारीवर आणि विचाराच्या विवेकवृत्तीवरही पाणी सोडायला मी तयार झालो, हा आमच्या आजच्या दुर्दैवी परिस्थितीचा परिपाक आहे.
पराक्रमी पुरुषार्थानं मिळवलेली सत्ता मोकळेपणाच्या उदारपणानं मर्यादित करण्याचा आम्हाला सराव नसल्यामुळं दैवयोगानं प्राप्त झालेली अल्प सत्ता दुबळया जिवांवर आम्ही सुलतानी अरेरावीनं गाजवत असतो. आज हजारो वर्षे मेलेल्या रूढींच्या ठराविक ओझ्याखाली सापडून आमची मनंही मुर्दाड झाल्यामुळं आज आमच्यात वस्तुमात्रांतील ईश्वरनिर्मित सौंदर्य शोधून काढण्याची रसिकता नाही. असं सौंदर्य मिळविण्याची पवित्र अभिलाषबुध्दी नाही. त्या अभिलाषाची पूर्णता करणारी पुरुषार्थाची पराक्रमशक्ती नाही. आणि खरं कारण मिळताच जिवलग सुखाचाही त्याग करणारी उदार कर्तव्यनिष्ठा नाही!
पूर्वजांनी तोंडावर टाकलेल्या अर्थशून्य शब्दांची विचारी वेदांताची वटवट क्षुद्र सुखाच्या आशेनंही ताबडतोब बंद पडते. विद्येनं मनाला उंच वातावरणात नेऊन ठेवलं तरी आमची मनं आकाशात फिरणार्या घारी गिधाडांप्रमाणं अगदी क्षुद्र अमिषानंसुध्दा ताबडतोब मातीला मिळतात.
भगीरथ आणि शरद् यांच्याजवळ कोणत्या तोंडानं मी क्षमा मागू? नाही, मनाचा तीव्र आवेग आता मरणाखेरीज दुसर्या कशानेही थांबणार नाही. (भगीरथ व शरद् येतात.) हतभागी रामलाल, कृतकर्माची फळं भोगण्यासाठी दगडाचं मन करून तयार हो, आणि या दुखावलेल्या जिवांची क्षमा माग.
भगीरथ :भाईसाहेब, या नव्या पध्दतीला अनुसरून मी तुम्हाला गुरुदक्षिणा अर्पण करण्यासाठी आलो आहे. तिचा स्वीकार करून या आपल्या बाळाला आशीर्वाद द्या!
रामलाल : बेटा शरद्, माझ्या अभद्र शब्दांची, पामर मनाची आणि या शेवटच्या पापस्पर्शाची मला एकदाच क्षमा कर! भगीरथ, शिष्यानं गुरूला आधी गुरुदक्षिणा द्यावी, हा जसा हल्लीचा परिपाठ आहे, त्याचप्रमाणं कुशाग्रबुध्दीच्या शिष्याला उत्तेजनासाठी पारितोषिक द्यावं, असाही नियम आहे.
(शरद्चा हात भगीरथाच्या हातात देतो.)
पद्माकर : भाई, सुधाकरानं आपल्या मुलाचा खून केला आहे आणि ताईला घातक जखम केली आहे! त्याला फौजदाराच्या ताब्यात देण्यासाठी मी निघालो आहे- चल माझ्याबरोबर-
---
सुधाकर : वेडया, दारू ही अशीतशी गोष्ट नाही की, जी या कानानं ऐकून या कानानं सोडून देता येईल! दारू ही एखादी चैनीची चीज नव्हे, की शोकाखातर तिची सवय आज जोडता येईल आणि उद्या सोडता येईल! दारू हे एखादे खेळणे नव्हे, की खेळता खेळता कंटाळून ते उशापायथ्याशी टाकून देऊन बिनधोक झोप घेता येईल!
अजाण मुला, दारू ही एक शक्ती आहे, दारू हे काळाच्या भात्यातलं अस्त्र आहे. दारू ही जगाच्या चालत्या गाडयाला घातलेली खीळ आहे. दारू ही पोरखेळ करता येण्यासारखी क्षुद्र, क्षुल्लक वस्तू असती, तर तिच्याबद्दल एवढा गवगवा जगात केव्हाच झाला नसता! हजारो परोपकारी पुरुषांनी आपल्या देहाची धरणं बांधली तरीसुद्धा जिचा अखंड ओघ चारी खंडांत महापुरानं वाहत राहिला, वेदवेदांची पानं जिच्या ओघावर तरंगत गेली, कठोर शक्तीचे मोठाले राजदंड जिच्या गळयात रुतून बसले, ती दारू म्हणजे काही सामान्य वस्तू नव्हे!
दारूची विनाशक शक्ती तुला माहीत नाही! मुसळधार कोसळणाऱ्या पावसात टिकाव धरून राहणारी इमारत दारूच्या शिंतोडयांनी मातीला मिळेल! दारूगोळयांच्या तुफानी माऱ्यासमोर छाती धरणारे बुरुज, या दारूच्या स्पर्शानं गारद होऊन जमीनदोस्त पडतील! फार कशाला, पूर्वीचे जादूगार मंतरलेले पाणी शिंपडून माणसाला कुत्र्या-मांजऱ्याची रूपं देत असत. ही गोष्ट तुझ्यासारख्या शिकल्या-सवरलेल्या आजच्या पंडिताला केवळ थट्टेची वाटेल; पण रामलाल, दारूची जादू तुला पाहायची असेल, तर तुला वाटेल तो बत्तीसलक्षणी आणि सर्व सद्गुणी पुरुष पुढं उभा कर आणि त्याच्यावर दारूचे चार थेंब टाक; डोळयाचं पातं लवतं न लवतं तोच तुला त्या मनुष्याचा अगदी पशू झालेला दिसू लागेल! अशी ही दारू आहे, समजलास?
रामलाल, दारूची सवय सुटण्याची एकच वेळ असते आणि ती वेळ म्हणजे प्रथम दारू पिण्यापूर्वीचीच! पहिला एकच प्याला-- मग तो कोणत्या का निमित्तानं असेना- ज्यानं एकदा घेतला तो दारूचा कायमचा गुलाम झाला! निव्वळ हौसेनं जरी दारूशी खेळून पाहिलं तरी दिवाळीचा दिवा भडकून होळीचा हलकल्लोळ भडकल्यावाचून राहायचा नाही!
प्रत्येक व्यसनी मनुष्याच्या दारूबाज आयुष्याच्या संमोहावस्था, उन्मादावस्था व प्रलयावस्था अशा तीन अवस्था हटकून होतात. या प्रत्येक अवस्थेची क्रमाक्रमानं सुरुवात एकच प्याला नेहमी करीत असतो.
प्रत्येक दारूबाजाची दारूशी पहिली ओळख नेहमी एकच प्यालानं होत असते! थकवा घालविण्यासाठी, तंदुरुस्तीसाठी, कुठल्याही कारणामुळं का होईना, शिष्टाचाराचा गुरुपदेश म्हणून म्हण किंवा दोस्तीच्या पोटी आग्रह म्हणून म्हण, हा एकच प्याला नेहमी नवशिक्याचा पहिला धडा असतो! एखादा अक्षरशत्रू हमाल असो; किंवा कवींचा कवी, आणि संजीवनी विद्येचा धनी एखादा शुक्राचार्य असो; दोघांचाही या शास्त्रातला श्रीगणेशा एकच- हा एकच प्याला!
दारूच्या गुंगीनं मनाची विचारशक्ती धुंदकारल्यामुळं मनुष्याला मानसिक त्रासाची किंवा देहाच्या कष्टाची जाणीव तीव्रपणानं होत नाही, आणि म्हणून या अवस्थेत दारूबाजाला दारू नेहमी उपकारी वाटत असते. जनलज्जेमुळं आणि धुंद उन्मादाच्या भीतीमुळं- समजत्या उमजत्या माणसाला घटकेपुरतीसुद्धा बेशुध्दपणाची कल्पना अजाणपणामुळं फारच भयंकर वाटत असते आणि म्हणून सुरुवातीला जनलज्जेइतकीच नवशिक्या दारूबाजाला गैरशुध्दीची भीती वाटत असते! अशा दुहेरी भीतीमुळं या अवस्थेत मनुष्य, दुष्परिणाम होण्याइतका अतिरेक तर करीत नाहीच; पण आपल्याला पाहिजे त्या बेताची गुंगी येईल इतक्या प्रमाणातच नेहमी दारू पीत असतो. आणि म्हणून संमोहावस्थेत दारूबाजाला प्रमाणशीर घेतलेली दारू हितकारक आणि मोहकच वाटते! दारूच्या दुसऱ्या आणखी तिस ऱ्या परिस्थितीतले दुष्परिणाम त्याच्या इष्टमित्रांनी या वेळी दाखविले म्हणजे ते त्याला अजिबात खोटे, अतिशयोक्तीचे किंवा निदान दुसऱ्याच्या बाबतीत खरे असणारे, वाटू लागतात.
सुरुवातीच्या प्रमाणशीरपणामुळं स्वत:चं व्यसन त्याला शहाण्या सावधपणाचं वाटतं आणि अवेळी दाखविलेली ही चित्रं पाहून, आपले इष्टमित्र भ्याले असतील किंवा आपल्याला फाजील भिवविण्यासाठी ती दाखविली जातात, अशी तरी स्वत:ची मोहक फसवणूक करून घेऊन दारूबाज आपल्या उपदेशकांना मनातून हसत असतो. याच अवस्थेतून न कळत आणि नाइलाजानं पुढच्या अवस्था उत्पन्न झाल्यावाचून राहात नाहीत. हे दुर्दैवी सत्य या वेळी मनुष्याला पटत नाही, आणि तो आपलं व्यसन चालू ठेवतो!
परंतु मनुष्याच्या मनावर आणि शरीरावर सवयीचा जो परिणाम होतो तोच तितक्यामुळे उद्या होत नाही आणि म्हणून दारूबाजाला रोजच्याइतकी गुंगी आणण्यासाठी कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या अधिक दारू पिण्याचं प्रमाण अधिक वाढवीत न्यावं लागतं! या संमोहावस्थेच्या शेवटच्या दिवसांत तर हे प्रमाण वाढत वाढत इतक्या नाजूक मर्यादेवर जाऊन ठेपलेलं असतं, की बैठक संपल्यानंतर एकच प्याला अधिक घेतला तर तो अतिरेकाचा झाल्यावाचून राहू नये! या सावधपणाच्या अवस्थेची मुख्य खूण हीच असते, की अगदी झोप लागण्याच्या वेळी मनुष्य पूर्ण सावध असतो. निशेचा थोडासा तरी अंमल असेल अशा स्थितीत त्याला झोप घेण्याचा धीर होत नाही. अशा स्थितीत एखाद्या दिवशी कुठल्या तरी कारणामुळे विशेष रंग येऊन मित्रमंडळी एकमेकांना आग्रह करू लागतात.
आपण होऊन आपल्या प्रमाणाच्या शुध्दीत राहण्याच्या कडेलोट सीमेवर जाऊन बसलेल्या दारूबाजाला त्या बैठकीचा शेवटचा म्हणून आणखी एकच प्याला देण्यात येतो. संमोहावस्था संपून उन्मादावस्था पहिल्यानं सुरू करणारा असा हा एकच प्याला! बरळणं, तोल सोडणं, ताल सोडणं, कुठं तरी पडणं, काहीतरी करणं या गोष्टी या अतिरेकामुळे त्याच्याकडून घडू लागतात.
रामलाल, ही भाकडकथा ऐकून कंटाळू नकोस. या पुढच्या अवस्थांत जितक्या जलदीनं दारू मनुष्याचं आख्यान आटोपतं घेत जाते, तितक्याच जलदीनं मी दारूचं आख्यान आटोपतं घेतो. या उन्मादावस्थेत दररोज मनुष्याला भरपूर उन्माद येईपर्यंत दारू घेतल्याखेरीज चैन पडत नाही आणि समाधान वाटत नाही. इतक्या दिवसांच्या सरावामुळे शरीर आणि मन यांना जगण्यासाठी दारू ही अन्नापेक्षा अधिक आवश्यक होऊन बसते.
या उन्मादावस्थेत निशेच्या अतिरेकामुळे वेळोवेळी अनाचार आणि अत्याचार घडतात. सावधपणाच्या काळी पश्चात्तापामुळे तो हजारो वेळा दारू सोडण्याची प्रतिज्ञा करतो, आणि कमकुवत शरीराच्या गरजेमुळे तितक्याच वेळा त्या प्रतिज्ञा मोडतो.
कंगाल गरिबी आणि जाहीर बेअब्रू यांच्या कैचीत सापडून तो दारू सोडण्याचा प्रयत्न करतो आणि निर्जीव शरीर आणि दुबळे मन यांच्या पकडीत सापडून तो अधिकाधिक पिऊ लागतो. पहिल्या अवस्थेत मनुष्य दारूला सोडीत नाही; आणि या अवस्थेत दारू मनुष्याला सोडीत नाही.
मद्यपानाचे भयंकर दुष्परिणाम भावी काळी आपल्याही ठिकाणी शक्य आहेत अशी दूरदृष्टीने भाग्यशाली जाणीव झाली तर एखादा नवशिका दारूबाज अतिशय करारीपणानं, पोलादी निश्चयानं आणि अनिवार विचारशक्तीनं पहिल्या अवस्थेत असताना एखादे वेळी तरी दारूचं व्यसन सोडायला समर्थ होईल.
पण या दुसऱ्या अवस्थेत काही दिवस घालविल्यानंतरही दारूच्या पकडीतून अजिबात सुटणारा मनुष्य मात्र अवतारी ताकदीचा, ईश्वर शक्तीचा, आणि लोकोत्तर निग्रहाचाच असला पाहिजे. उत्तरोत्तर अनाचार वाढत जातात आणि त्यानंतरचे पश्चात्तापाचे क्षण मनाला सहन होईनासे होतात. अशा वेळी जगात तोंड दाखवायला वाटणारी लाज कोळून पिण्यासाठी निर्लज्जपणानं दारू कधीही सुटणार नाही. आणि पश्चात्तापामुळे पिळून काढणारा सावधपणाचा एकही क्षण आपल्याजवळ न येऊ देण्याच्या निश्चयानं अष्टौप्रहर आणखी अखंड गुंगीत पडून राहण्यासाठी म्हणून तो एकच प्याला घेतो; दारू न पिण्याची प्रतिज्ञा मोडतो; आणि पुन्हा तशी प्रतिज्ञा करीत नाही. हा एकच प्याला म्हणजे तिसऱ्या प्रलयावस्थेची सुरुवात!
माझं हे ब्रह्मज्ञान पश्चात्तापाचं नाही; ते विषारी निराशेचं आहे. माझ्या दारूबाज आयुष्यातली ही तिसरी प्रलयावस्था आहे. पहिल्या अवस्थेत मनुष्य दारूला सोडीत नाही. दुसऱ्या अवस्थेत दारू मनुष्याला सोडत नाही, आणि तिसऱ्या अवस्थेत दोघेही एकमेकांला सोडीत नाहीत. या अवस्थेत दारू आणि मनुष्य यांचा इतका एकजीव झालेला असतो की, जीव जाईपर्यंत त्यांचा वियोग होत नाही.
आता माझ्या दृष्टीनं या एकच प्याल्यात काय भरलेलं आहे ते पाहा!
पृथ्वीनं आपल्या उदरीच्या रत्नांचा अभिलाष केल्यामुळे खवळलेल्या सप्तसमुद्रांनी आपल्या अवाढव्य विस्तारानं पृथ्वीला पालाण घालण्याचा विचार केला; त्या जलप्रलयाच्या वेळी कूर्मपृष्ठाच्या आधारावर पृथ्वीनं आपला उद्धार केला! पुढे विश्वाला जाळण्याच्या अभिमानानं आदित्यानं बारा डोळे उघडले! त्या अग्निप्रलयात एका वटपत्रावर चित्स्वरूप अलिप्त राहून त्यानं सारी सृष्टी पुन्हा शृंगारली!
उभयतांच्या या अपमानामुळं अग्नि आणि पाणी यांनी आपापलं नैसर्गिक वैर विसरून सजीव सृष्टीच्या संहाराचा विचार केला! परीक्षितीचा प्राण घेण्यासाठी मत्सराच्या त्वेषानं तक्षकानं बोरातल्या आळीचं रूप घेतलं, त्याप्रमाणे खवळलेले सप्तसमुद्र सुडाच्या बुध्दीनं या इवल्याशा टीचभर प्याल्यात सामावून बसले; आणि आदित्यानं आपली जाळण्याची आग त्यांच्या मदतीला दिली! मनुष्याच्या दृष्टीला भूल पाडणारा मोहकपणा आणण्यासाठी, तरण्याताठया विधवांच्या कपाळाचं कुंकू कालवून या बुडत्या आगीला लाल तजेला आणला! या एकाच प्याल्यात इतकी कडू अवलादीची दारू भरली आहे!
उद्योगी, गरीब, आळशी श्रीमंत, साक्षर पढतमूर्ख, निरक्षर व्यवहारी सर्वांना सरसकट जलसमाधी देणारा हा पाहा एकच प्याला!
प्रवेश पाचवा
(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे: सिंधू दीन वेशाने दळीत आहे. पाळण्यात मूल.)
सिंधू : काय सांगायचं, गीताबाई? आज किनई आमच्या घरात अन्नपूर्णामाई अगदीच रुसून बसली आहे हो! देवाच्या अक्षतांपुरतेसुद्धा तांदूळ नाहीत घरात! म्हणून म्हणत होते- मूठभर भात उकडला म्हणजे मध्यान्ह टळेल कशी तरी! माझ्यापाशी हे एवढे दोन पैसे बाळाच्या दूधापुरते आहेत काय ते!
सुधाकर : सिंधू, इकडे ये, मला आणखी प्यायची आहे! फार नाही, फक्त एकच प्याला! पैसे आण! सिंधू, पैसे आण!
सिंधू : आता कुठले बरं आणू पैसे मी? माझ्याजवळ काही नाही अगदी!
सुधाकर : खोटं बोलतेस! आहेत! चल आण! आणतेस की नाही? का जीव घेऊ?
सिंधू : आपल्या पायांशपथ मजजवळ आता काही नाही. आता दोन पैसे होते तेवढे बाळासाठी दूध आणायला दिले तेवढेच! अगदी बाळाच्या गळयावर हात ठेवून सांगते हवी तर!
सुधाकर : त्याचा गळा दाबून टाक! का दिलेस पैसे?
सिंधू : बाळासाठी नकोत का द्यायला? असं काय करायचं हे?
सुधाकर : चल जाव! मला नाहीत आणि त्याला पैसे आहेत? नवऱ्यापेक्षा ते कारटं जास्त आहे काय? सिंधू, तू पतिव्रता नाहीस! हरामखोर! ते कारटं त्या रामलालचं आहे! माझं नाही!
सिंधू : शिव शिव! काय बोलणं हे?
सुधाकर : शिव शिव नाही, रामलालच आहे! आता मारून टाकतो!
(एक मोठी काठी घेऊन मुलाकडे जातो.)
सिंधू : (घाबरून) अगं बाई, आता कसं करू? हाका मारून चारचौघांना जमविलं तर तिकडून काही तरी भलतंच व्हायचं! देवा, काय रे करू आता? माझ्या फाटक्या अंगाचं मायेचं पांघरूण कसं पुरणार माझ्या बाळाला आता!
(सुधाकर काठी मारतो. सिंधू मध्ये येते; तिला काठी लागून खोक पडून ती बेशुध्द पडते.)
सिंधू : देवा, सांभाळ रे माझ्या बाळाला!
सुधाकर : तू मर! आता कारटं मर जाव! (काठी मारतो. मूल मरते.) प्रवेश चवथा -(स्थळ- सुधाकराचे घर. पात्रे- आसन्नमरण सिंधू; जवळ सुधाकर, पद्माकर, रामलाल आणि फौजदार)
पद्माकर : दादासाहेब, हे पाहा मेलेलं मूल; हे या हरामखोरानं ठार मारलं! ही पाहा माझी ताई! या दीनदुबळया देहाची या दारूबाज दुष्टानंच प्राणांतिक दुर्दशा केली आहे! असाच पकडा या नराधमाला-
सिंधू : मी दोन दिवसांची उपाशी होते. मला राहूनराहून भोवळ येत होती. मुलाला घेऊन माळयावरून उतरताना मला घेरी आली; पडल्यामुळं मला कपाळावर खोक पडली! मूल माझ्या अंगाखाली चेंगरलं! इकडचा काही संबंध नाही त्यात!
फौजदार : भाऊसाहेब, काही करता येणार नाही आता! आपला राग कितीही अनावर झाला, तरी यांच्या पुण्याईपुढं तुमचं-आमचं काय चालणार? न्यायाचं शस्त्र कितीही तीक्ष्ण असलं तरी अशा पवित्र पतिव्रतेच्या पुण्याईची ढाल आड आल्यावर ते काय करणार?
रामलाल : शाबास, सिंधूताई, शाबास! भारतवर्ष साध्वीसतीचं माहेरघर आहे! सरकारनं सतीचा कायदा करून आमच्या साध्वींना सहगमनानं देह जाळून घेण्याची बंदी केली तर जितेपणीत आतल्या आत जळून नवर्याच्या नावासाठी या मंगलदेवता आत्मयज्ञ करीत आहेत!
सुधाकर : (स्वगत) उघडले, भाऊसाहेब, माझे डोळे साफ उघडले! मात्र माझे डोळे असे उघडले आहेत तोवर या देवतेच्या जात्या जीवज्योतीच्या प्रकाशात या क्षणीच स्वर्गाचा रस्ता एकदा नीट पाहून ठेवतो म्हणजे मग भोवती काळाकुट्ट अंधार पडला आणि माझे डोळे कायमचे मिटले तरी दिशाभूल होण्याची भीतीच नको. (इकडे तिकडे पाहून व औषध उघडून) हं, हेच ते विषारी औषध! कुठं आहे ती जिवाला जाऊन भिडलेली साता जन्मांची वैरीण? (एका पेल्यात दारू व विष ओततो.)
सिंधू : माझं डोकं आपल्या मांडीवर ठेवावं! आपला हात माझ्या हातात द्यावा
सिंधू : आपण असा जिवाला त्रास का बरं करून घ्यायचा? मी फुटक्या कपाळाची का म्हणून? भरल्या हाती हळदीकुंकवानं, आपल्या मांडीवर मला मरणं आलं, याहून आणखी कोणतं भाग्य हवं मला? माझं मंगल झालं! आपण मनाला त्रास करून घेऊ नये. माझ्या गळयाची शपथ आहे!
सिंधू : नाथ, जिवाला सांभाळा- सुधाकर! माझ्या सुधाकरांना, देवा- (सिंधू मरते. रामलाल येतो. सुधाकर पेला घेतो व उठून उभा राहतो. रामलाल सुधाकराच्या हातून पेला घ्यावयाला जातो, तोच तो झटकन विष पितो.)
रामलाल, असा भेदरून जाऊ नकोस, हा घे तो एकच प्याला! हा एकच प्याला नीट चव्हाटयावर मांडून सार्या जगाला दाखीव आणि आल्यागेल्याला, शिकलेल्याला- अडाण्याला, राजाला-रंकाला, ब्राह्मणाला-महाराजाला-म्हातार्याला आणि मुलाला, तुझ्या जिवाभावाच्या दोस्ताला आणि सात जन्मांच्या दुश्मनाला, हात जोडून कळकळीनं सांग, की सार्या अनर्थाचं कारण हा दारूचा पहिला एकच प्याला असतो! त्याच्यापासून दूर राहा! जो जो भेटेल त्याला त्याला सांग- सिंधूच्या पवित्र रक्तानं तोंड धुऊन मी सांगतो आहे- मला मोठयानं ओरडवत नाही- तू मुक्तकंठानं प्रत्येकाला सांग, की काय वाटेल ते पातक कर- पण दारू पिऊ नकोस! (सिंधूच्या पायावर डोके ठेवून मरतो.)

No comments:
Post a Comment