Monday, March 11, 2024

एकच प्याला - व्यक्ती आणि समाज यांना अधोगतीला नेणारे मोहिनी अस्त्र

 प्रसिद्ध व विलक्षण प्रतिभावंत लेखक, कवी आणि नाटककार कै. राम गणेश गडकरी  यांचे एकच प्याला हे नाटक प्रत्यक्ष पाहिले नसले तरी मला पूर्वीपासून माहिती होते. पहिल्या मोहाला बळी पडल्याने सुधाकर  दारूच्या  व्यसनात कसा अडकत गेला आणि  सुधाकर व सिंधू यांच्या संसाराचाच कसा  सर्वनाश झाला याचा जीवनपटच नाटकाने प्रेक्षकांपुढे उभा केला आहे. जवळजवळ तशाच  पद्धतीने दुर्दशा माझ्या जवळच्या नातेवाईकांची आणि सहका-यांची झालेली मी प्रत्यक्ष अनुभवलेली असल्याने आणि सध्याच्या सामाजिक परिस्थितीमुळे  मी त्याबाबतीत अतिसंवेदनशील बनलो आहे. गरीबांना अन्न मिळण्याची भ्रांती असताना धान्यापासून दारू करण्याचे उद्योग सुरू होत आहेत याविरोधात   मी एक लेखही पूर्वी लिहिला होता.  

 राज्यसरकारच्या वाईन विक्रीसंबंधित धोरणावर समाजात व प्रसारमाध्यमात उलटसुलट चर्चा चालू असल्याने मला हे नाटक समाजापुढे पुन्हा परत आणण्याची गरज भासू लागली.  सुदैवाने मराठी विकीपीडीयाच्या विकीस्रोतमध्ये मला त्याची डिजिटल आवृत्ती मिळाली.

राम गणेश गडकरी यांनी  सुरुवातीच्या काळात पुण्यातील `ज्ञानप्रकाश` मध्ये उपसंपादक, `न्यू इंग्लिश स्कूल` मध्ये शिक्षक अशा नोकर्‍या केल्या. नंतर त्यांना किर्लोस्कर नाटक कंपनीत नाटयपदं लिहिण्याची संधी मिळाली व इथून त्यांची कारकीर्द सुरु झाली. नाटकांबरोबरच राम गणेश गडकरी काव्य आणि विनोदी लेखनांतही तितकेच लोकप्रिय ठरले. त्यांनी आपल्या कविता `गोविंदाग्रज` या टोपणनावाने लिहिल्या. त्या वाग्वैजयंती (1921) या संग्रहातून प्रसिध्द झाल्या.  आपलं विनोदी लेखन त्यांनी `बाळकराम` या नावाने केले. त्यांच्या साहित्यातून त्यांची अलौकिक प्रतिभा, सामाजिक व राजकीय परिस्थितीची जाण आणि प्रखर बुद्धीमत्ता यांचे दर्शन होते. त्यांचे मराठी साहित्यातील योगदान महत्वाचे आहे. व्यसन लागल्यानंतर त्यातून बाहेर पडणे कठीण असल्याने सुरवातीसच त्याचा मोह कटाक्षाने टाळावा असा महत्वाचा संदेश त्यानी एकच प्याला या आपल्या नाटकातून दिला आहे. आजच्या युवा पिढीला याची अत्यंत गरज आहे.  

नाटकातील मजकुराचे वाचन करताना जसजसे मी सर्व नाटक वाचत गेलो तसतशी  कट्यार काळजात घुसली या उक्तीप्रमाणे दारूच्या भीषण परिणामांचे दाहक सत्य मला जाणवू लागले.  व्यसनाधीनाची अगतिकता  सुधाकराच्या तोंडी घालून इतक्या उत्कटतेने मांडलेली पाहून मन बेचैन झाले व गडकरींच्या अलौकिक प्रतिभेची साक्ष पटली. 

नाटकाची कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील सुधारक आणि जहाल समाजगट, स्त्रियांची दयनीय अवस्था, देशी विदेशी औषधांतील परस्परविरोध, दारू पिणा-यांचे तत्वज्ञान आणि स्त्री-पुरुष संबंधातील भावनिक ताणतणाव यांचे सुंदर दर्शन घडविते. व्यसनाधीनता हा व्यक्ती आणि समाजाला अधोगतीला नेणारा कायमचा धोका आहे. हे नाटकाने  प्रभावीपणे समाजापुढे मांडले आहे. व्यसनाधीनता इी जागतिक समस्या असल्याने या नाटकाचे इतर भाषांत भाषांतर वा रुपांतर झाले पाहिजे असे मला वाटले.

हे काम प्रथम आपणच हाती घेतले तरच या नाटकातील पश्चातापदग्ध सुधाकराची आर्त विनवणी सर्वांपर्यंत पोहोचेल या कल्पनेने मी या नाटकाचे हिंदी व इंग्रजीत भाषांतर करावयास घेतले आणि पाहता पाहता दोन महिन्यात मी दोन्ही भाषांतरे पूर्ण केली. माझे हिंदी व इंग्रजीचे ज्ञान मर्यादित असल्याने त्यात सुधारणा व योग्य वाक्यरचना करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची गरज भासणार आहे. मी हे सर्व भाग मायमराठी वेबसाईटवर प्रसिद्ध केले असून त्याच्या संपादनासाठी वाचकांनी मदत करावी ही विनंती.




No comments:

Post a Comment