महाराष्ट्रात प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरानगर येथे १९४८ साली पहिला साखरकारखाना काढला व सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.
त्यानंतर मा. यशवंतराव चव्हाण व अनेक ग्रामीण भागातील शेतकरी कुचुंबात ही सहकारी चळवळ पुढे नेणारे नवे नेते उदयास आले. आपली वाडवडिलार्जित विकून त्यांनी या नव्या सहकारी तत्वावर साखर कारखान्याबरोबर बॅंकींग व इतर क्षेत्रातही प्रगती केली आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाची सर्वांगीण प्रगती झाली. पाणीपुरवठा, शिक्षण, रस्ते, दवाखाने या सोयी झाल्या त्याचबरोबर छोटे कृषी उद्योग सुरू होऊन रोजगार उपलब्ध झाला.
तरीदेखील महाराष्ट्रात उच्च तंत्रज्ञान शिक्षण देणा-या सरकारी महाविद्यालयांची क्षमता फार कमी असल्याने फारच कमी विद्यार्थ्यांना य़ा आधुनिक तंत्रशिक्षणाचा लाभ घेता येत लव्हता. यावर उपाय म्हणून सांगलीचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री . पद्मश्री श्री वसंतराव दादा पाटील यांनी विनाअनुदान तत्वावर तंत्रशिक्षण महाविद्यालये सुरू करण्याचा क्रांतीकारक निर्णय घेतला व महाराष्ट्राच्या कानाकोप-यात अशी महाविद्यालये सुरू झाली. याचा फायदा उच्च वर्गातील श्रीमंत मुलांबरोबर मागास व आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंबातील मुलांनाही झाला. एका दृष्ठीने हे सहकाराचेच नवे रूप होते.
तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे महाराष्ट्राची आर्थिक प्रगती झाली.
नव्या संगणक व इंटरनेटच्या युगात मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या पुण्या-मुंहईसारख्या मोठ्या शहरात आल्या. इन्फोसिस, लिप्रो, कॉग्निजंट, परसिस्टन्स सारख्या भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्याही आपल्या आकर्षक पे पॅकेजच्या जोरावर बुद्धिमान तरूण वर्गाला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. यामुळे अशा शहरांतील राहणीमान वाढले. जास्त पगाराच्या अपेक्षेने खेड्याकडून शहराकडे वा परदेशात नोकरी करण्याकडे युवकांचा लोंढा वाहू लागला.
इंटरनेटच्या साहाय्याने जागतिक संस्थांनी भारतातील बाजारपेठ काबीज केली.
नोक-या कमी आणि जास्त पगाराच्या नोकरीच्या शोधात असणारे असंख्य विद्यार्थी अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली. संगणक क्षेत्रात एवढी प्रगती झाली तरी स्थानिक पातळीवरील छोट्या कामासाठी प्रसिद्ध असणा-या चांगल्या संस्थांची वाढ खुंटली कारण त्यात काम करणारे कर्मचारी मोठ्या कंपन्यात नोकरी मिळविण्यासाठीच धडपडत राहिले. सांगलीत इ. स. २००० मध्ये स्थापन झालेल्या ज्ञानदीप इन्फोटेक कंपनीची आणि इ. स.. २००५ मध्ये स्थापन झालेल्या ज्ञानदीप फौंडेशनची वाटचाल यानुळेच कायम बिकट राहिली. चांगले कर्मचारी येथे शिकून व अनुभव घेऊन मोठ्या कंपन्यात जात राहिले व ज्ञानदीपला एखाद्या शिक्षणसंस्थेचे रूप आले.
बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या संपत्तीच्या जोरावर छोटी शहरे व ग्रामीण भागातील कामेही गिळंकृत करण्यास सुरुवात केली व एका नव्या एकाधिकारशाहीचा विस्तार झाला व त्यातील लोकशाहीचा अस्त झाला. अशा संस्थांमध्ये कामाचा ताण व नोकरी जाण्याची भीती यांनी कर्मचा-यांचे मनस्वास्थ्य बिघडण्याच्या वा अचानक नोकरकपातीच्या घटना वार्ता येऊ लागल्या आहेत.
या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कार्य जागतिक उलाढालींवर व आर्थिक पाठबळ शेअरमार्केटवर अवलंबून असल्याने या नोक-यात एक अनिश्चितता आली आहे.
या परिस्थितीत सहकारी तत्वावर सर्व छोट्या संगणक संस्था एकत्र आल्या आणि फ्री लान्स पद्धतीने सुशिक्षित बेरोजगारांना काम देऊन योग्य नियोजल आणि व्यवस्थापन केले तर बेभरवंशाच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना एक सशक्त व स्थायी पर्याय देता येईल.
ज्ञानदीप फौंडेशनने याबाबतीत पुढाकार घेण्याचे ठरविले असून त्या दृष्टीने फौंडेशन विविध शिक्षण संस्थांशी परस्पर सहकार्याचा करार करून तेथील शिक्षक व विद्यार्थी यांना आपल्या कार्यात सहभागी करून घेणार आहे.
ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि, या कंपनीने ज्ञानदीप फौंडेशन प्रायोजित केले असल्याने देशातील वा परदेशातील कामे वा प्रकल्प मिळविण्याचे व ते काम ज्ञानदीप फौंडेशनच्या माध्यमातून सर्वांच्या सक्रीय सहभागातून करण्याचे योजिले आहे.
जर असे संस्थात्मक सहकारी नेटवर्क करता आले तर शिक्षणसंस्था, विद्यार्थी व घरबसल्या काम करू इच्छिणारे इतर नागरीक यांना आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण होऊ शकेल.
या योजनेत सध्या ग्रामीण भागात कार्यरत असणा-या संगणक संस्थांनाही सहभागी करता येईल.
विना सहकार नही उद्धार असे म्हणतात.
महाराष्ट्राच्या सहकारभूमीत या माझ्या कल्पनेला चोगला प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे.. – सु. वि. रानडे, ज्ञानदीप इन्फोटेक व ज्ञानदीप फौंडेशन, सांगली.
No comments:
Post a Comment