प्रवेश पाचवा
(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे: सिंधू दीन वेशाने दळीत आहे. पाळण्यात मूल.)
सिंधू : काय सांगायचं, गीताबाई? आज किनई आमच्या घरात अन्नपूर्णामाई अगदीच रुसून बसली आहे हो! देवाच्या अक्षतांपुरतेसुद्धा तांदूळ नाहीत घरात! म्हणून म्हणत होते- मूठभर भात उकडला म्हणजे मध्यान्ह टळेल कशी तरी! माझ्यापाशी हे एवढे दोन पैसे बाळाच्या दूधापुरते आहेत काय ते!
सुधाकर : सिंधू, इकडे ये, मला आणखी प्यायची आहे! फार नाही, फक्त एकच प्याला! पैसे आण! सिंधू, पैसे आण!
सिंधू : आता कुठले बरं आणू पैसे मी? माझ्याजवळ काही नाही अगदी!
सुधाकर : खोटं बोलतेस! आहेत! चल आण! आणतेस की नाही? का जीव घेऊ?
सिंधू : आपल्या पायांशपथ मजजवळ आता काही नाही. आता दोन पैसे होते तेवढे बाळासाठी दूध आणायला दिले तेवढेच! अगदी बाळाच्या गळयावर हात ठेवून सांगते हवी तर!
सुधाकर : त्याचा गळा दाबून टाक! का दिलेस पैसे?
सिंधू : बाळासाठी नकोत का द्यायला? असं काय करायचं हे?
सुधाकर : चल जाव! मला नाहीत आणि त्याला पैसे आहेत? नवऱ्यापेक्षा ते कारटं जास्त आहे काय? सिंधू, तू पतिव्रता नाहीस! हरामखोर! ते कारटं त्या रामलालचं आहे! माझं नाही!
सिंधू : शिव शिव! काय बोलणं हे?
सुधाकर : शिव शिव नाही, रामलालच आहे! आता मारून टाकतो!
(एक मोठी काठी घेऊन मुलाकडे जातो.)
सिंधू : (घाबरून) अगं बाई, आता कसं करू? हाका मारून चारचौघांना जमविलं तर तिकडून काही तरी भलतंच व्हायचं! देवा, काय रे करू आता? माझ्या फाटक्या अंगाचं मायेचं पांघरूण कसं पुरणार माझ्या बाळाला आता!
(सुधाकर काठी मारतो. सिंधू मध्ये येते; तिला काठी लागून खोक पडून ती बेशुध्द पडते.)
सिंधू : देवा, सांभाळ रे माझ्या बाळाला!
सुधाकर : तू मर! आता कारटं मर जाव! (काठी मारतो. मूल मरते.)
No comments:
Post a Comment