Saturday, February 5, 2022

एकच प्याला - पाचवा अंक - निवडक मजकूर

  प्रवेश पहिला - (पात्रे- भगीरथ व शरद्; शरद् रडते आहे.)

भगीरथाचा स्वार्थत्याग 

भगीरथ : (स्वगत) भाईसाहेबांचं माझ्याशी असं तुटकपणाचं वागणं का होतं याचं कारण आता माझ्या लक्षात आलं! हा रोगातला रोग, मनाला मारणारा, जिवाला जाळणारा, हा मत्सर आहे! प्रेमाच्या स्पर्धेत निराश झालेल्या दीन जिवांचा हा निर्वाणीचा मत्सर आहे....त्यांनी माझ्यावर केलेले उपकार आठवले म्हणजे माझ्या स्वत:चाही मला विसर पडायला हवा! दारूच्या नादानं जीवन्मृत झालेल्या भगीरथाला त्यांनी पुनर्जन्म दिला आणि त्यांच्या वर्तनाकडे त्या मीच अशा टीकादृष्टीनं पाहायचं? पित्याच्या पुण्यवृत्तीबद्दल संशय घ्यायचा,...माझ्या जीविताची वाटेल ती वाट लागली तरी भाईसाहेबांच्या सुखाच्या वाटेत मी कधीही आड येणार नाही. भगीरथप्रयत्नांनी शरद्च्या प्रेमाचा वेग भाईसाहेबांकडे वळविलाच पाहिजे. 

भगीरथ : मनाचा धडा करून एकदाच, एकदम स्पष्टपणं काय ते बोलून टाकतो. शरद्, दुसर्‍या कशासाठी जरी नाही, तरी केवळ या भगीरथाच्या सुखासाठी- शरद्, क्षमा कर, हात जोडून हजार वेळा तुझी क्षमा मागतो- पण तुला भाईसाहेबांची विनंती मान्य करावी लागेल! रामलालशीच तुला पुनर्विवाह करावा लागेल!

 भगीरथाच्या जगातली परमेश्वराची मूर्ती रामलालच्या रूपानं उभी आहे. आचार्य देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव, या आपल्या आर्यधर्माच्या अनुल्लंघनीय आज्ञा आहेत. भाईसाहेबांनी पित्याप्रमाणं मला पुनर्जन्म दिला. जगाच्या उपहासानं दु:खावलेल्या माझ्या मनोवृत्तीची मातृप्रेमानं जोपासना केली; भावी आयुष्याचं सार्थक होण्यासाठी महन्मान्य मार्गाचा मला गुरुपदेश केला; माता, पिता, गुरू, यांच्या या त्रिभूवनवंद्य त्रिमूर्तीला माझ्या दृष्टीनं परमेश्वराची पुण्यपदवी प्राप्त झाली आहे. या परमेश्वराच्या इच्छेसाठी सर्वस्वी आत्मयज्ञ करण्याला मला तत्पर व्हायला नको का

 भगीरथ : रामलालच्या सुखासाठी अखिल ब्रह्मांडही ब्रह्मार्पण करणं हा भगीरथाचा एकच धर्म आहे. रामलालचं सुख तेच भगीरथाचं सुख, हे मी तुला सांगतो. आणि भगीरथाचं सुख तेच शरद्चं सुख, हे तू मला सांगितलंस. आपणा तिघांनाही सुखी होण्याचा याखेरीज दुसरा मार्गच नाही.

 प्रवेश दुसरा - (स्थळ- तळीरामाचे घर. पात्रे- बिछान्यावर आसन्नमरण तळीराम, त्याच्या भोवती  आर्यमदिरामंडळाचे सभासद.)

तळीरामचा मृत्यू आणि इतर दारुबाज यांचा विनोदी संवाद. शेवट

(सर्व अस्ताव्यस्त पडतात. पडदा पडतो.)

प्रवेश तिसरा -  (स्थळ- रामलालचा आश्रम. रामलाल प्रवेश करतो.)

रामलालचे स्वगत - भगीरथाबद्दल वाटणा-या मत्सराची जाणीव - खरे कारण शरदविषयी अभिलाषा , पश्चाताप 

धिक्कार, शतश: धिक्कार असो मला! यात्किंचित् सुखाच्या क्षुद्र लोभानं पुत्राप्रमाणं मानलेल्या भगीरथाला दुखवून, कन्येप्रमाणं मानलेल्या शरद्च्या कोवळया हृदयावर रसरशीत निखारे टाकून माझ्या वयाच्या वडीलपणावर, नात्याच्या जबाबदारीवर आणि विचाराच्या विवेकवृत्तीवरही पाणी सोडायला मी तयार झालो, हा आमच्या आजच्या दुर्दैवी परिस्थितीचा परिपाक आहे.

पराक्रमी पुरुषार्थानं मिळवलेली सत्ता मोकळेपणाच्या उदारपणानं मर्यादित करण्याचा आम्हाला सराव नसल्यामुळं दैवयोगानं प्राप्त झालेली अल्प सत्ता दुबळया जिवांवर आम्ही सुलतानी अरेरावीनं गाजवत असतो. आज हजारो वर्षे मेलेल्या रूढींच्या ठराविक ओझ्याखाली सापडून आमची मनंही मुर्दाड झाल्यामुळं आज आमच्यात वस्तुमात्रांतील ईश्वरनिर्मित सौंदर्य शोधून काढण्याची रसिकता नाही. असं सौंदर्य मिळविण्याची पवित्र अभिलाषबुध्दी नाही. त्या अभिलाषाची पूर्णता करणारी पुरुषार्थाची पराक्रमशक्ती नाही. आणि खरं कारण मिळताच जिवलग सुखाचाही त्याग करणारी उदार कर्तव्यनिष्ठा नाही!

पूर्वजांनी तोंडावर टाकलेल्या अर्थशून्य शब्दांची विचारी वेदांताची वटवट क्षुद्र सुखाच्या आशेनंही ताबडतोब बंद पडते. विद्येनं मनाला उंच वातावरणात नेऊन ठेवलं तरी आमची मनं आकाशात फिरणार्‍या घारी गिधाडांप्रमाणं अगदी क्षुद्र अमिषानंसुध्दा ताबडतोब मातीला मिळतात.

भगीरथ आणि शरद् यांच्याजवळ कोणत्या तोंडानं मी क्षमा मागू? नाही, मनाचा तीव्र आवेग आता मरणाखेरीज दुसर्‍या कशानेही थांबणार नाही. (भगीरथ व शरद् येतात.) हतभागी रामलाल, कृतकर्माची फळं भोगण्यासाठी दगडाचं मन करून तयार हो, आणि या दुखावलेल्या जिवांची क्षमा माग.

भगीरथ :भाईसाहेब, या नव्या पध्दतीला अनुसरून मी तुम्हाला गुरुदक्षिणा अर्पण करण्यासाठी आलो आहे. तिचा स्वीकार करून या आपल्या बाळाला आशीर्वाद द्या!

रामलाल : बेटा शरद्, माझ्या अभद्र शब्दांची, पामर मनाची आणि या शेवटच्या पापस्पर्शाची मला एकदाच क्षमा कर! भगीरथ, शिष्यानं गुरूला आधी गुरुदक्षिणा द्यावी, हा जसा हल्लीचा परिपाठ आहे, त्याचप्रमाणं कुशाग्रबुध्दीच्या शिष्याला उत्तेजनासाठी पारितोषिक द्यावं, असाही नियम आहे.

(शरद्चा हात भगीरथाच्या हातात देतो.)

पद्माकर : भाई, सुधाकरानं आपल्या मुलाचा खून केला आहे आणि ताईला घातक जखम केली आहे! त्याला फौजदाराच्या ताब्यात देण्यासाठी मी निघालो आहे- चल माझ्याबरोबर-

 

 प्रवेश चवथा -(स्थळ- सुधाकराचे घर. पात्रे- आसन्नमरण सिंधू; जवळ सुधाकर, पद्माकर, रामलाल आणि फौजदार)

पद्माकर : दादासाहेब, हे पाहा मेलेलं मूल; हे या हरामखोरानं ठार मारलं! ही पाहा माझी ताई! या दीनदुबळया देहाची या दारूबाज दुष्टानंच प्राणांतिक दुर्दशा केली आहे! असाच पकडा या नराधमाला-

सिंधू : मी दोन दिवसांची उपाशी होते. मला राहूनराहून भोवळ येत होती. मुलाला घेऊन माळयावरून उतरताना मला घेरी आली; पडल्यामुळं मला कपाळावर खोक पडली! मूल माझ्या अंगाखाली चेंगरलं! इकडचा काही संबंध नाही त्यात!

फौजदार : भाऊसाहेब, काही करता येणार नाही आता! आपला राग कितीही अनावर झाला, तरी यांच्या पुण्याईपुढं तुमचं-आमचं काय चालणार? न्यायाचं शस्त्र कितीही तीक्ष्ण असलं तरी अशा पवित्र पतिव्रतेच्या पुण्याईची ढाल आड आल्यावर ते काय करणार

 रामलाल : शाबास, सिंधूताई, शाबास! भारतवर्ष साध्वीसतीचं माहेरघर आहे! सरकारनं सतीचा कायदा करून आमच्या साध्वींना सहगमनानं देह जाळून घेण्याची बंदी केली तर जितेपणीत आतल्या आत जळून नवर्‍याच्या नावासाठी या मंगलदेवता आत्मयज्ञ करीत आहेत! 

 सुधाकर : (स्वगत) उघडले, भाऊसाहेब, माझे डोळे साफ उघडले! मात्र माझे डोळे असे उघडले आहेत तोवर या देवतेच्या जात्या जीवज्योतीच्या प्रकाशात या क्षणीच स्वर्गाचा रस्ता एकदा नीट पाहून ठेवतो म्हणजे मग भोवती काळाकुट्ट अंधार पडला आणि माझे डोळे कायमचे मिटले तरी दिशाभूल होण्याची भीतीच नको. (इकडे तिकडे पाहून व औषध उघडून) हं, हेच ते विषारी औषध! कुठं आहे ती जिवाला जाऊन भिडलेली साता जन्मांची वैरीण? (एका पेल्यात दारू व विष ओततो.)

सिंधू : माझं डोकं आपल्या मांडीवर ठेवावं! आपला हात माझ्या हातात द्यावा

सिंधू : आपण असा जिवाला त्रास का बरं करून घ्यायचा? मी फुटक्या कपाळाची का म्हणून? भरल्या हाती हळदीकुंकवानं, आपल्या मांडीवर मला मरणं आलं, याहून आणखी कोणतं भाग्य हवं मला? माझं मंगल झालं! आपण मनाला त्रास करून घेऊ नये. माझ्या गळयाची शपथ आहे! 

सिंधू : नाथ, जिवाला सांभाळा- सुधाकर! माझ्या सुधाकरांना, देवा- (सिंधू मरते. रामलाल येतो. सुधाकर पेला घेतो व उठून उभा राहतो. रामलाल सुधाकराच्या हातून पेला घ्यावयाला जातो, तोच तो झटकन विष पितो.)

रामलाल, असा भेदरून जाऊ नकोस, हा घे तो एकच प्याला! हा एकच प्याला नीट चव्हाटयावर मांडून सार्‍या जगाला दाखीव आणि आल्यागेल्याला, शिकलेल्याला- अडाण्याला, राजाला-रंकाला, ब्राह्मणाला-महाराजाला-म्हातार्‍याला आणि मुलाला, तुझ्या जिवाभावाच्या दोस्ताला आणि सात जन्मांच्या दुश्मनाला, हात जोडून कळकळीनं सांग, की सार्‍या अनर्थाचं कारण हा दारूचा पहिला एकच प्याला असतो! त्याच्यापासून दूर राहा! जो जो भेटेल त्याला त्याला सांग- सिंधूच्या पवित्र रक्तानं तोंड धुऊन मी सांगतो आहे- मला मोठयानं ओरडवत नाही- तू मुक्तकंठानं प्रत्येकाला सांग, की काय वाटेल ते पातक कर- पण दारू पिऊ नकोस! (सिंधूच्या पायावर डोके ठेवून मरतो.) 

 

 

 

No comments:

Post a Comment