प्रवेश पहिला
(स्थळ: रामलालचा आश्रम. पात्रे: शरद् व रामलाल.)
रामलाल - भारतवर्षीय राजर्षीच्या सात्त्विक संसाराचं संपूर्ण चित्र या एकाच सर्गात कविकुलगुरूनं रेखाटलं आहे! ऐक, तुझ्या श्लोकाचा अर्थ- 'मरणं प्रकृति: शरीरिणाम्'- मरण हा सदेह प्राणिमात्राचा स्वभाव आहे; 'विकृतिर्जीविमुच्यते बुधै:'- जिवंत राहणं हे सुज्ञ लोकांना अपवादरूप वाटतं! 'क्षणमप्यवतिष्ठते श्वसन' आणि म्हणून क्षणभरच जरी जीवित लाभलं, तरी 'यदि जन्तुर्न तु लाभवानसौ'- तो प्राणी भाग्यशाली नाही काय?
जीवमात्राचा जन्म केवळ एकरूप आहे; परंतु मरणाला हजार वाटा आहेत. एवढयासाठीच या संसाराला मृत्यूलोक म्हणतात! परिस्थितीकडे विचारपूर्वक पाहिलं तर मरणाच्या इतक्या हजारो कारणांतून आपण क्षणमात्र तरी कसे वाचतो, याचं प्रत्येकाला मोठं आश्चर्य वाटेल! आणि म्हणून इथं म्हटलं आहे की, पदरात पडलेल्या पळापळाबद्दल आनंद मानून भावी कलाकडे आपण उदासीन दृष्टीनंच पाहिलं पाहिजे!
सौंदर्य कोणत्याही स्थितीत आपली नाजूक शोभा सोडीत नाही! सौंदर्याला वैधव्याचा अलंकारसुद्धा करुण शोभाच देतो! शरद्, पुनर्विवाहाबद्दल आम्ही तुला सर्वजण आग्रह करीत असताही (तिच्या पाठीवरून हात फिरवीत) बेटा, अजून तुला- (स्वगत) हिच्या अंगाचा स्पर्श होताच माझ्या हातावर असा खरखरीत काटा का बरं उभा राहिला? हा अनुभव अगदी नवीन- पण नको हा अनुभव! माझा हात सारखा थरथर कापत आहे! (तिच्या पाठीवरून हात काढतो. शरद् रामलालकडे पाहते.)
शरद् : नाही हो! रामलाल, हा बापाचा हात नाही! मुलीला बापाचा हात अगदी आईच्या हातासारखाच- जरासा राकट- देवाच्या पाषाणमूर्तीच्या हाताइतका राकट असतो! तुमचा हात बापाचा हात नव्हता! हा पुरुषाचा हात होता! मुलीच्या दृष्टीला बाप पुरुषासारखा दिसत नाही; तर देवासारखा निर्विकार दिसतो! बापासमोर मुलगी मोकळेपणानं वागते! आज माझा तो मोकळेपणा नाहीसा झाला! आज माझे वडील मला अंतरले! आज तुम्ही माझ्यासमोर तरुण पुरुष म्हणून उभे आहात आणि मी तुमच्यासमोर तरुण स्त्री म्हणून उभी आहे! स्त्रीनं पुरुषासमोर वागताना सावधगिरीनं राहायला पाहिजे.
प्रवेश दुसरा
(स्थळ: सुधाकरचे घर. पात्रे: सिंधू कागदाच्या घडया पाडीत आहे, मागे सुधाकर उभा आहे. इतक्यात गीता येते.)
सिंधू : अहो, उरापोटी करीन कसं तरी झालं! अर्धपोटी, नाही अगदी रित्यापोटी कंबर कसून आला तो दिवस साजरा करायला हवा ना? माझं ऐका तुम्ही. खुशाल कुठं दळण मिळालं तर घेऊन या! अहो, दुसऱ्याासाठी का करायचं आहे हे? बघाल ना कुठं?
सुधाकर : (स्वगत) अरेरे, काय ऐकलं मी हे? या उदार मनाच्या पण गरीब कुळीच्या भोळया मुलीनं सहजासहजी सिंधूच्या हृदयाला केवढी जबर जखम केली ही! धनसंपन्नाची जी कन्या, ज्ञानसंपन्नाची जी पत्नी, तिच्या उपासमारीची दया येऊन या उदार मुलीनं तिला सदावर्ताचा उपदेश द्यावा? सुधाकरा, काय हा तुझा संसार! धिक्कार असो तुझ्या व्यसनाला आणि पुरुषार्थाला!
गीता - हे हो कसले देव? अहो हे शेंदूरकमी देव, निव्वळ दगडधोंडे! आणि यांच्यावरचा शेंदूर पिऊन मुळूमुळू रडत बसायचं! राणीचं राज्य झालं आहे ना म्हणतात आताशा? मग राणीच्या या राज्यात बायकांचे का असे धिंडवडे निघतात हे?मला कुणी राज्य दिलं तर मी साऱ्या बायकांना सांगून ठेवीन की, नवरा दारू पिऊन घरी आला तर खुशाल त्याला दाव्यादोरखंडानं गोठयात नेऊन बांधीत जा! नवरा म्हणे देवासारखा! अशानं तर नवरेपणाचे देव्हारे माजले! दारू पितो तो कसला हो नवरा? माणसात देखील जिंमा व्हायची नाही त्यांची!
सुधाकर : सिंधू, मी आजपासून दारू पिणं सोडलं!
सिंधू : (आनंदाने) खरंच का हे?
सुधाकर : खरं, अगदी खरं! आजपासून दारू पिणं सोडलं; कायमचं सोडलं!
सिंधू : अहाहा! असं झालं तर देवच पावला!
सुधाकर : बाळ, तुझी शपथ घेऊन सांगतो की, या सुधाकरानं आजपासून दारू कायमची सोडली, अगदी कायमची सोडली! (दोघेही मुलाचा मुका घेऊ लागतात. पडदा पडतो.)
----
प्रवेश तिसरा - (स्थळ- बंडगार्डन. पात्रे- सुधाकर व इतर मंडळी.)
सुधाकर - दारूसारख्या हलक्या वस्तूच्या नादानं ज्या सोज्ज्वळ समाजातून, प्रतिष्ठित परिस्थितीतून, बरोबरीच्या माणसांतून- अगदी माणसांतूनच- मी उठलो, त्या जगात हे काळं तोंड पुन्हा घेऊन जाताना मला चोरटयासारखं होतं आहे.
सुधाकर : तळीरामाचा प्राण जात असला तरी आता मला क्लबात यायचं नाही!
शास्त्री : चला, खांसाहेब, तापलेली काच आपोआप थंड पडू द्यावी हे उत्तम! निवविण्यासाठी पाणी घातलं की, ती एकदम तडकायचीच! हा या घटकेपुरताच पश्चात्ताप आहे. स्मशानवैराग्यामुळं डोक्यात घातलेली राख फार वेळ टिकायची नाही. जरा धीरानं घ्या, म्हणजे आपोआपच गाडं रस्त्याला लागेल. सुधाकरा, आम्ही तर जातोच; पण तू आपण होऊन क्लबात आला नाहीस तर यज्ञोपवीत काढून ठेवीन, हे ब्रह्मवाक्य लक्षात ठेव! (शास्त्री व खुदाबक्ष जातात.)
सुधाकर : (स्वगत) दारूच्या गटारात या पामर किटकांच्या बरोबर आजपर्यंत मी वाहात आलो ना? पण यांना दोष देण्यात काय अर्थ आहे? जळलेला उल्का मातीत मिसळून दगडाधोंडयांच्या पंक्तीत बसतो याचा दोष त्याच्या स्वत:च्याच अध:पाताकडे आहे.
एक गृहस्थ नमस्कार न घेता निघून जातो-
दुसरा गृहस्थ : सध्या मी जरा गडबडीत आहे- हे दादासाहेब गेले- (जातो.)
तिसरा गृहस्थ: बेशरम मनुष्या, भलत्या गोष्टीची भलत्या ठिकाणी आठवण करून द्यायची तुला लाज वाटत नाही? मूर्खा, पहिल्यानं मी तुला न ओळखल्यासारखं केलं होतं तेवढयावरूनच तू सावध व्हायला पाहिजे होतंस!
चौथा गृहस्थ : तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे- आम्ही तुमच्यासाठी काय नाही करणार? आहे एक नोकरी- दरमहा पंधरापर्यंतची
आपलं स्पष्ट बोलायचं- हे बघा, तुम्ही बोलूनचालून व्यसनी, तुमची जामिनकी म्हणजे धोतरात निखारा बांधूनच हिंडायचं- हो तुम्हीच सांगा- व्यसनी माणसांचा भरवसा काय घ्या?
दारूबाजाच्या ओळखीचं मृत्यूचं एकच रूप म्हणजे दारू! तडफडणाऱ्या जिवाच्या जाचण्या बंद करण्याचा दारूखेरीज आता मार्ग नाही! मुलासकट माणुसकीला, सिंधूसकट संसाराला, सद्गुणांसकट सुखाला, जगासकट जगदीश्वराला, सुधाकराचा हा निर्वाणीचा निराशेतला शेवटचा प्रणाम! आता यापुढं एक दारू- प्राण जाईपर्यंत दारू- शेवटपर्यंत दारू! (जातो. पडदा पडतो.)
No comments:
Post a Comment