Saturday, February 5, 2022

एकच प्याला - चवथा अंक -प्रवेश चवथा - दारूची विनाशक शक्ती

 सुधाकर : वेडया, दारू ही अशीतशी गोष्ट नाही की, जी या कानानं ऐकून या कानानं सोडून देता येईल! दारू ही एखादी चैनीची चीज नव्हे, की शोकाखातर तिची सवय आज जोडता येईल आणि उद्या सोडता येईल! दारू हे एखादे खेळणे नव्हे, की खेळता खेळता कंटाळून ते उशापायथ्याशी टाकून देऊन बिनधोक झोप घेता येईल! 

अजाण मुला, दारू ही एक शक्ती आहे, दारू हे काळाच्या भात्यातलं अस्त्र आहे. दारू ही जगाच्या चालत्या गाडयाला घातलेली खीळ आहे. दारू ही पोरखेळ करता येण्यासारखी क्षुद्र, क्षुल्लक वस्तू असती, तर तिच्याबद्दल एवढा गवगवा जगात केव्हाच झाला नसता! हजारो परोपकारी पुरुषांनी आपल्या देहाची धरणं बांधली तरीसुद्धा जिचा अखंड ओघ चारी खंडांत महापुरानं वाहत राहिला, वेदवेदांची पानं जिच्या ओघावर तरंगत गेली, कठोर शक्तीचे मोठाले राजदंड जिच्या गळयात रुतून बसले, ती दारू म्हणजे काही सामान्य वस्तू नव्हे!

दारूची विनाशक शक्ती तुला माहीत नाही! मुसळधार कोसळणाऱ्या पावसात टिकाव धरून राहणारी इमारत दारूच्या शिंतोडयांनी मातीला मिळेल! दारूगोळयांच्या तुफानी माऱ्यासमोर छाती धरणारे बुरुज, या दारूच्या स्पर्शानं गारद होऊन जमीनदोस्त पडतील! फार कशाला, पूर्वीचे जादूगार मंतरलेले पाणी शिंपडून माणसाला कुत्र्या-मांजऱ्याची रूपं देत असत. ही गोष्ट तुझ्यासारख्या शिकल्या-सवरलेल्या आजच्या पंडिताला केवळ थट्टेची वाटेल; पण रामलाल, दारूची जादू तुला पाहायची असेल, तर तुला वाटेल तो बत्तीसलक्षणी आणि सर्व सद्गुणी पुरुष पुढं उभा कर आणि त्याच्यावर दारूचे चार थेंब टाक; डोळयाचं पातं लवतं न लवतं तोच तुला त्या मनुष्याचा अगदी पशू झालेला दिसू लागेल! अशी ही दारू आहे, समजलास?

 रामलाल, दारूची सवय सुटण्याची एकच वेळ असते आणि ती वेळ म्हणजे प्रथम दारू पिण्यापूर्वीचीच! पहिला एकच प्याला-- मग तो कोणत्या का निमित्तानं असेना- ज्यानं एकदा घेतला तो दारूचा कायमचा गुलाम झाला! निव्वळ हौसेनं जरी दारूशी खेळून पाहिलं तरी दिवाळीचा दिवा भडकून होळीचा हलकल्लोळ भडकल्यावाचून राहायचा नाही!

प्रत्येक व्यसनी मनुष्याच्या दारूबाज आयुष्याच्या संमोहावस्था, उन्मादावस्था व प्रलयावस्था अशा तीन अवस्था हटकून होतात. या प्रत्येक अवस्थेची क्रमाक्रमानं सुरुवात एकच प्याला नेहमी करीत असतो. 

प्रत्येक दारूबाजाची दारूशी पहिली ओळख नेहमी एकच प्यालानं होत असते! थकवा घालविण्यासाठी, तंदुरुस्तीसाठी, कुठल्याही कारणामुळं का होईना, शिष्टाचाराचा गुरुपदेश म्हणून म्हण किंवा दोस्तीच्या पोटी आग्रह म्हणून म्हण, हा एकच प्याला नेहमी नवशिक्याचा पहिला धडा असतो! एखादा अक्षरशत्रू हमाल असो; किंवा कवींचा कवी, आणि संजीवनी विद्येचा धनी एखादा शुक्राचार्य असो; दोघांचाही या शास्त्रातला श्रीगणेशा एकच- हा एकच प्याला!

दारूच्या गुंगीनं मनाची विचारशक्ती धुंदकारल्यामुळं मनुष्याला मानसिक त्रासाची किंवा देहाच्या कष्टाची जाणीव तीव्रपणानं होत नाही, आणि म्हणून या अवस्थेत दारूबाजाला दारू नेहमी उपकारी वाटत असते. जनलज्जेमुळं आणि धुंद उन्मादाच्या भीतीमुळं- समजत्या उमजत्या माणसाला घटकेपुरतीसुद्धा बेशुध्दपणाची कल्पना अजाणपणामुळं फारच भयंकर वाटत असते आणि म्हणून सुरुवातीला जनलज्जेइतकीच नवशिक्या दारूबाजाला गैरशुध्दीची भीती वाटत असते! अशा दुहेरी भीतीमुळं या अवस्थेत मनुष्य, दुष्परिणाम होण्याइतका अतिरेक तर करीत नाहीच; पण आपल्याला पाहिजे त्या बेताची गुंगी येईल इतक्या प्रमाणातच नेहमी दारू पीत असतो. आणि म्हणून संमोहावस्थेत दारूबाजाला प्रमाणशीर घेतलेली दारू हितकारक आणि मोहकच वाटते! दारूच्या दुसऱ्या आणखी तिस ऱ्या परिस्थितीतले दुष्परिणाम त्याच्या इष्टमित्रांनी या वेळी दाखविले म्हणजे ते त्याला अजिबात खोटे, अतिशयोक्तीचे किंवा निदान दुसऱ्याच्या बाबतीत खरे असणारे, वाटू लागतात.

सुरुवातीच्या प्रमाणशीरपणामुळं स्वत:चं व्यसन त्याला शहाण्या सावधपणाचं वाटतं आणि अवेळी दाखविलेली ही चित्रं पाहून, आपले इष्टमित्र भ्याले असतील किंवा आपल्याला फाजील भिवविण्यासाठी ती दाखविली जातात, अशी तरी स्वत:ची मोहक फसवणूक करून घेऊन दारूबाज आपल्या उपदेशकांना मनातून हसत असतो. याच अवस्थेतून न कळत आणि नाइलाजानं पुढच्या अवस्था उत्पन्न झाल्यावाचून राहात नाहीत. हे दुर्दैवी सत्य या वेळी मनुष्याला पटत नाही, आणि तो आपलं व्यसन चालू ठेवतो! 

परंतु मनुष्याच्या मनावर आणि शरीरावर सवयीचा जो परिणाम होतो तोच तितक्यामुळे उद्या होत नाही आणि म्हणून दारूबाजाला रोजच्याइतकी गुंगी आणण्यासाठी कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या अधिक दारू पिण्याचं प्रमाण अधिक वाढवीत न्यावं लागतं! या संमोहावस्थेच्या शेवटच्या दिवसांत तर हे प्रमाण वाढत वाढत इतक्या नाजूक मर्यादेवर जाऊन ठेपलेलं असतं, की बैठक संपल्यानंतर एकच प्याला अधिक घेतला तर तो अतिरेकाचा झाल्यावाचून राहू नये! या सावधपणाच्या अवस्थेची मुख्य खूण हीच असते, की अगदी झोप लागण्याच्या वेळी मनुष्य पूर्ण सावध असतो. निशेचा थोडासा तरी अंमल असेल अशा स्थितीत त्याला झोप घेण्याचा धीर होत नाही. अशा स्थितीत एखाद्या दिवशी कुठल्या तरी कारणामुळे विशेष रंग येऊन मित्रमंडळी एकमेकांना आग्रह करू लागतात. 

आपण होऊन आपल्या प्रमाणाच्या शुध्दीत राहण्याच्या कडेलोट सीमेवर जाऊन बसलेल्या दारूबाजाला त्या बैठकीचा शेवटचा म्हणून आणखी एकच प्याला देण्यात येतो. संमोहावस्था संपून उन्मादावस्था पहिल्यानं सुरू करणारा असा हा एकच प्याला! बरळणं, तोल सोडणं, ताल सोडणं, कुठं तरी पडणं, काहीतरी करणं या गोष्टी या अतिरेकामुळे त्याच्याकडून घडू लागतात. 

रामलाल, ही भाकडकथा ऐकून कंटाळू नकोस. या पुढच्या अवस्थांत जितक्या जलदीनं दारू मनुष्याचं आख्यान आटोपतं घेत जाते, तितक्याच जलदीनं मी दारूचं आख्यान आटोपतं घेतो. या उन्मादावस्थेत दररोज मनुष्याला भरपूर उन्माद येईपर्यंत दारू घेतल्याखेरीज चैन पडत नाही आणि समाधान वाटत नाही. इतक्या दिवसांच्या सरावामुळे शरीर आणि मन यांना जगण्यासाठी दारू ही अन्नापेक्षा अधिक आवश्यक होऊन बसते. 

या उन्मादावस्थेत निशेच्या अतिरेकामुळे वेळोवेळी अनाचार आणि अत्याचार घडतात. सावधपणाच्या काळी पश्चात्तापामुळे तो हजारो वेळा दारू सोडण्याची प्रतिज्ञा करतो, आणि कमकुवत शरीराच्या गरजेमुळे तितक्याच वेळा त्या प्रतिज्ञा मोडतो. 

कंगाल गरिबी आणि जाहीर बेअब्रू यांच्या कैचीत सापडून तो दारू सोडण्याचा प्रयत्न करतो आणि निर्जीव शरीर आणि दुबळे मन यांच्या पकडीत सापडून तो अधिकाधिक पिऊ लागतो. पहिल्या अवस्थेत मनुष्य दारूला सोडीत नाही; आणि या अवस्थेत दारू मनुष्याला सोडीत नाही.

मद्यपानाचे भयंकर दुष्परिणाम भावी काळी आपल्याही ठिकाणी शक्य आहेत अशी दूरदृष्टीने भाग्यशाली जाणीव झाली तर एखादा नवशिका दारूबाज अतिशय करारीपणानं, पोलादी निश्चयानं आणि अनिवार विचारशक्तीनं पहिल्या अवस्थेत असताना एखादे वेळी तरी दारूचं व्यसन सोडायला समर्थ होईल. 

 पण या दुसऱ्या अवस्थेत काही दिवस घालविल्यानंतरही दारूच्या पकडीतून अजिबात सुटणारा मनुष्य मात्र अवतारी ताकदीचा, ईश्वर शक्तीचा, आणि लोकोत्तर निग्रहाचाच असला पाहिजे. उत्तरोत्तर अनाचार वाढत जातात आणि त्यानंतरचे पश्चात्तापाचे क्षण मनाला सहन होईनासे होतात. अशा वेळी जगात तोंड दाखवायला वाटणारी लाज कोळून पिण्यासाठी निर्लज्जपणानं दारू कधीही सुटणार नाही. आणि पश्चात्तापामुळे पिळून काढणारा सावधपणाचा एकही क्षण आपल्याजवळ न येऊ देण्याच्या निश्चयानं अष्टौप्रहर आणखी अखंड गुंगीत पडून राहण्यासाठी म्हणून तो एकच प्याला घेतो; दारू न पिण्याची प्रतिज्ञा मोडतो; आणि पुन्हा तशी प्रतिज्ञा करीत नाही. हा एकच प्याला म्हणजे तिसऱ्या प्रलयावस्थेची सुरुवात!

माझं हे ब्रह्मज्ञान पश्चात्तापाचं नाही; ते विषारी निराशेचं आहे. माझ्या दारूबाज आयुष्यातली ही तिसरी प्रलयावस्था आहे. पहिल्या अवस्थेत मनुष्य दारूला सोडीत नाही. दुसऱ्या अवस्थेत दारू मनुष्याला सोडत नाही, आणि तिसऱ्या अवस्थेत दोघेही एकमेकांला सोडीत नाहीत. या अवस्थेत दारू आणि मनुष्य यांचा इतका एकजीव झालेला असतो की, जीव जाईपर्यंत त्यांचा वियोग होत नाही.

आता माझ्या दृष्टीनं या एकच प्याल्यात काय भरलेलं आहे ते पाहा! 

पृथ्वीनं आपल्या उदरीच्या रत्नांचा अभिलाष केल्यामुळे खवळलेल्या सप्तसमुद्रांनी आपल्या अवाढव्य विस्तारानं पृथ्वीला पालाण घालण्याचा विचार केला; त्या जलप्रलयाच्या वेळी कूर्मपृष्ठाच्या आधारावर पृथ्वीनं आपला उद्धार केला! पुढे विश्वाला जाळण्याच्या अभिमानानं आदित्यानं बारा डोळे उघडले! त्या अग्निप्रलयात एका वटपत्रावर चित्स्वरूप अलिप्त राहून त्यानं सारी सृष्टी पुन्हा शृंगारली! 

 उभयतांच्या या अपमानामुळं अग्नि आणि पाणी यांनी आपापलं नैसर्गिक वैर विसरून सजीव सृष्टीच्या संहाराचा विचार केला! परीक्षितीचा प्राण घेण्यासाठी मत्सराच्या त्वेषानं तक्षकानं बोरातल्या आळीचं रूप घेतलं, त्याप्रमाणे खवळलेले सप्तसमुद्र सुडाच्या बुध्दीनं या इवल्याशा टीचभर प्याल्यात सामावून बसले; आणि आदित्यानं आपली जाळण्याची आग त्यांच्या मदतीला दिली! मनुष्याच्या दृष्टीला भूल पाडणारा मोहकपणा आणण्यासाठी, तरण्याताठया विधवांच्या कपाळाचं कुंकू कालवून या बुडत्या आगीला लाल तजेला आणला! या एकाच प्याल्यात इतकी कडू अवलादीची दारू भरली आहे!

उद्योगी, गरीब, आळशी श्रीमंत, साक्षर पढतमूर्ख, निरक्षर व्यवहारी सर्वांना सरसकट जलसमाधी देणारा हा पाहा एकच प्याला!

No comments:

Post a Comment