Saturday, February 5, 2022

एकच प्याला - अंक तिसरा – निवडक मजकूर

प्रवेश पहिला (स्थळ : सुधाकराचे घर. पात्रे- सिंधू मुलाला गोकर्णाने दूध पाजीत आहे. जवळ शरद्.)

 सिंधू : वन्सं, आपदा चंद्रा सूर्यासारख्या वेळा सांगून का येत असतात. बरं व्हायचं ते जपातपानं होतं आणि वाईट मात्र झाल्यावर कळायला लागतं. फळ पिकण्यापूर्वी पाडानं रंगून जातं; पण पुरतेपणी कुजल्याखेरीज त्याला कधी घाण सुटली आहे का? एकेकाच्या गोष्टी ऐकल्या म्हणजे जिवाला अगदी कसा चरका बसतो!

रामलाल : ताई, तुला काय सांगू? आपल्या सुधाकरला एक व्यसन- एक फारच भयंकर व्यसन- (स्वगत) निष्ठुर दैव, काय सांगायचं हे माझ्या कपाळी आणलंस? दारू हा अमंगल शब्द या मंगलदेवतेपुढं मी कोणत्या तोंडानं उच्चारू? व्यसनी चांडाळांनो, तुम्ही आपल्या जिवलग मित्रांना कसल्या संकटात पाडता, याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? परमेश्वरा, दारूनं भिजलेला हा वाग्बाण हिच्या हृदयावर रोखण्यापेक्षा एखाद्या विषारी बाणानं हिचा एकदम हृदयभेद करण्याचं काम माझ्याकडे का दिलं नाहीस? (उघड) सिंधू, सुधाकराला दारूचं व्यसन लागलं!

(तळीराम सुधाकरला घेऊन येतो.)

सुधाकर : काय रडारड आहे घरात? सनद गेली म्हणून कोण रडतं आहे? नामर्द बायको आहे. तळीराम, एकेकाला लाथ मारून ही गर्दी मोडून टाक. (खाली बसतो.)

रामलाल : शरद्, तळीराम, सुधाकरला आत नेऊन निजवा.

सुधाकर : सनद गेली तरी हरकत नाही. मी नामर्द नाही- हा रामलाल नामर्द आहे- सिंधू नामर्द आहे- सनद नामर्द आहे! (ते त्याला घेऊन जातात.)

प्रवेश दुसरा -(स्थळ: तळीरामाचे घर. पात्रे: तळीराम आणि गीता)

तळीराम : घरात असेल ते सामान पुढे आण! मंडळाची वर्गणी द्यायची आहे आज. काय जे असेल ते आण. काय बेमुर्वत बाजारबसवी आहे! घेऊ का नरडं दाबून जीव? मी दारू पितो म्हणून माझी अशी अमर्यादा करतेस? थांब, अशी पालथी पाडून तुलाही दारू पाजतो! चल, दारू तरी पी, नाहीतर घरातून चालती तरी हो! नाही तर जुन्या बाजारात नेऊन लिलाव पुकारून आडगि-हाइकाला फुंकून टाकीन!

तळीराम : जातेस का पितेस? दादासाहेबांच्या तिथं लावालावी करून मला त्यांच्या घरी जायला बंदी करवलीस? चल, घे हा दारूचा घोट का घेऊ नरडीचा घोट? (तिला धरतो. दोघांची झटापट होते. ती त्याला ढकलून देते.)

गीता : देवा, नकोरे नको या घरात राहणं आता! (जाते.)

प्रवेश तिसरा

(स्थळ: रामलालचे घर. पात्रे: भगीरथ व शरद्)

भगीरथ - एखाद्या बालविधवेनं एखाद्याला नुसता रस्ता विचारला तर बघणार्‍याला असंच वाटतं की, ती पापाचाच मार्ग विचारीत आहे! फार काय सांगावं, पाण्यात बुडून असलेल्या बालविधवेला एखाद्यानं हात दिला तर तो तिला बाहेर काढण्याऐवजी नरकात ढकलीत आहे, इतकं मानण्याची आमच्या आर्य मनाची वृत्ती होऊन बसली आहे!

आणि बालविधवांनी जितेपणी या नरकयातनांत तळमळत पडून आयुष्य कोणत्या सुखात कंठीत राहावं म्हणून विचारलं, तर पोक्तबुध्दीचे हे धर्मसिंधू लागलीच गंभीरपणानं म्हणतील, की आप्तइष्टांची मुलं खेळवीत बसल्यानं विधवांना जे सात्त्विक समाधान होतं, त्यापुढं वैधव्याच्या यातनांची काय प्रौढी आहे? असं जर असेल तर मी म्हणतो, या विवेकशाली महात्म्यांनी, आपली द्रव्योपार्जनाची लालसा शेजार्‍यांचे रुपये मोजून का भागवू नये? पोटाची खळी भागविण्यासाठी पंचपक्वान्नांकडे धाव घेण्याचं सोडून परक्याच्या पोटात चार घास कोंबून आपलं समाधान हे का करून घेत नाहीत?

रामलाल : भगीरथ, लोककल्याणाचा एकच राजमार्ग म्हणून दाखविण्याइतकं हिंदुस्थानचं भावी सौख्य आज एकदेशीय नाही. एकीकडे राजकीय सुधारणा आहेत, एकीकडे सामाजिक सुधारणा आहेत. इकडे धर्म आहे, इकडे उद्योग आहे, इकडे शिक्षण आहे. इकडे स्त्रियांचा प्रश्न आहे. इकडे अस्पृश्यांची बाबत आहे, तर तिकडे जातिभेदाचा गोंधळ आहे. अशा या चमत्कारिक प्रसंगी अमूक एकच मार्ग इतरांच्यापेक्षा चांगला आहे, असं सांगणं मोठं धाडसाचं आहे. परिस्थितीच्या अनुभवाप्रमाणं या विषयावर ज्याचे त्याचे विचार अगदी निरनिराळे झालेले आहेत.

हजारो वर्षांच्या ओझ्याखाली तेहतीस कोटी जिवांच्या जडपणानं खालावत चाललेल्या आमच्या भरतभूमीला उचलून धरण्यासाठी जितक्या भिन्नभिन्न प्रकृतींच्या मूर्ती आम्हाला लाभतील तितक्या हव्याच आहेत. लोकहितात पडू पाहणार्‍या विद्यार्थ्याला कायावाचामनसा आधी हा धडा हस्तगत- नाही; अगदी जिवाशी- नेऊन भिडविला पाहिजे. आपल्याहून भिन्न रीतीनं लोकहिताचा प्रयत्न कोणी करीत असलं तर त्याच्याबद्दल सहानुभूती न दाखविणं, दुसर्‍याच्या प्रयत्नाबद्दल अनादर दाखविणं, देशहिताच्या बुध्दीतच स्पर्धा वाढवून एकमेकांना खाली पाडणं, या कारणांमुळे आज आमची जितकी अवनती होत आहे, तितकी दुसर्‍या कोणत्याही कारणामुळं होत नसेल.

भगीरथ, मी लोकोत्तरबुध्दीचा एखादा महात्मा नाही; पण शक्य तितक्या शांतपणानं आणि समतोल मनानं सरळ गोष्टी पाहात असल्यामुळे माझे विचार असे होऊ लागले आहेत. राजकीय सुधारणेचे पुरस्कर्ते आपल्या मार्गानं जाताना विधवांच्या दुबळया हृदयाच्या पायघडया तुडवीत जायला मागंपुढं पाहात नाहीत, केवळ सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते विधवांच्या कपाळी कुंकू लावण्यातच इतके रंगून गेलेले आहेत की, आपल्या भारतमातेच्या वैधव्याचा त्यांना विचारच करता येत नाही!

आर्यधर्माचा भलता अभिमान धरणारे, आर्यधर्माची विजयपताका अधिकाधिक उंच दिसावी म्हणून धर्माभिमानाच्या भरात तिच्या उभारणीसाठी सहा कोटी माहारामांगांच्या हाडांच्या सांगाडयांची योजना करीत आहेत. नामशुद्रांचे आणि अतिशुद्रांचे वाली म्हणविणारे त्या वर्गाला उच्चपदी नेण्याऐवजी बिचार्‍या ब्राह्मणवर्गाला रसातळी गाडण्याचा अधम प्रयत्न करीत आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रकृती तितकी मतं, आणखी मतं तितके मार्ग, असा प्रकार होऊन आज जबाबदार, आणि बेजबाबदार लोकांना सर्वांनाच बारा वाटा मोकळया होऊन बसल्या आहेत.

त्रिसप्तकोटिकंठकृतनिनादकराले जननि इतक्या हाका आरोळयांच्या कल्लोळात तुझ्या नेमक्या हिताचा संदेश आम्हा पामर बाळांना कसा ऐकू जाणार? भगीरथ, व्यापक लोकशिक्षण, सार्वजनिक लोकशिक्षण हा तरी सध्या असा एक मार्ग दिसतो आहे की, जो एकटाच आम्हाला आत्यंतिक हिताला नेऊन पोहोचविणारा नसला, तरी इतर सर्व मार्गांवर आपला प्रकाश पाडणारा आहे खास. भगीरथ आर्यवर्ताच्या उदयोन्मुख भाग्याचा अचूक मार्ग सांगणार्‍या मंत्रद्रष्टा महात्मा अजून अवतरावयाचा आहे. मनुष्यस्वभावाला शोभणार्‍या आतुर आशेनं त्याच्या आगमनाची वाट पाहात बसणं हेच आज तुझ्या माझ्यासारख्या पतितांचं कर्तव्य आहे. सर्वच मार्ग स्वच्छ करून ठेवले म्हणजे त्या महात्म्याचा यांपैकी वाटेल त्या मार्गाने होणारा प्रवास तितका तरी सुखकर होईल.

प्रवेश चवथा -(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे: तळीराम, सुधाकर, सिंधू, शरद्.)

सुधाकर : सगळे पाजी, चोर, हरामखोर लोक आहेत! येऊ दे, पद्माकर येऊ दे, नाही तर त्याचा बाप येऊ दे! पद्माकर, त्याचा बाप, रामलाल, शरद्, सिंधू- एकेकाला लाथ मारून हाकलून देतो घराबाहेर!

सुधाकर : सिंधूच्या गळयातलं मंगळसूत्र तोड! ऊठ तळीराम, माझी तुला शपथ आहे!

 (तळीराम मंगळसूत्राला हात घालतो, तोच रामलाल, पद्माकर व बाबासाहेब येतात. पद्माकर तळीरामला लाथेने उडवितो. तळीराम रडू लागतो व पिऊ लागतो.)

सुधाकर : तू कसा आलास घरात? चल, माझ्या घरातून चालता हो! पद्माकर, तू पण चालता हो! त्या थेरडयाला एक लाथ मार! चले जाव! तळीराम, लगाव लाथ एकेकाला! पाजी लोक!

सिंधू : हा नरक? हे पाय जिथं आहेत तिथं नरक? दादा, अरे, तू चांगला शहाणा ना? वेडया, हे पाय जिथं असतील तिथंच माझा स्वर्ग, तिथंच माझं वैकुंठ, आणि तिथंच माझा कैलास!

कशी या त्यजू पदाला।
मम सुभगशुभपदाला।

सिंधू : हा! दादा, या घरात, या पायांसमोर- माझ्यासमोर असं अमंगल मी तुला बोलू देणार नाही! पतिव्रतेच्या कानांची ही अमर्यादा आहे! जा- बाप, भाऊ, माझं या जगात कोणी नाही? पतिव्रतेला नाती नसतात. ती बापाची मुलगी नसते, भावाची बहीण नसते, मुलाची आई नसते! देवाब्राह्मणांनी दिलेल्या नवर्‍याची ती बायको असते! बाबा, ज्या दिवशी माझं लग्न झालं त्याच दिवशी तुमची मुलगी तुमच्या घराला मेली आणि नव्या नावानं मी या घरात जन्माला आले. मुलीच्या लग्नाचा समारंभ आई बापांना सुखदायक वाटतो; पण मुलीचं लग्न म्हणजे तिची उत्तरक्रिया हे त्या बापडयांच्या ध्यानीमनीसुध्दा येत नाही. बाबा, कन्यादानासाठी इकडच्या हातावर तुम्ही जे उदक सोडलंत, त्यानंच माझ्या माहेरच्या नावाला तिलांजली दिलीत

No comments:

Post a Comment