Tuesday, September 26, 2017

भूमितीच्या स्वप्ननगरीत अनुषा - १

अनुषा ही चौथीत शिकणारी एक हुशार मुलगी होती. तिला शाळा खूप आवडायची. दररोज  सकाळी लवकर उठून ती शाळेत जायची.  नवनव्या गोष्टी शिकायची. तिला वर्ग शिक्षिका आवडायच्या.  शाळेतल्या बाईंनाही तिच्या  धीटपणाचे कौतुक वाटायचे. एकदा बाईंनी तिला वर्गात मुलांना  शिकवायला सांगितले. अनुषा  अजिबात घाबरली  नाही. धीटपणे ती  फळ्याकडे गेली आणि मुलांसमोर उभी  राहिली.   फळ्यावर १ ते २० पर्यंत आकडे काढून मुलांना ते वााचण्यास सांगितले.  तसेच त्यांना पाटीवर लिहिण्यास  सांगितले. अनुषाची हुशारी पाहून बाईंना  खुप आनंद  झाला त्यांनी  अनुषाला गणिताचे नवे   पुस्तक भेट  म्हणून दिले

शाळा  सुटल्यावर अनुषा आनंदात घरी आली.  दिवसभर खूप दमल्यामुळे  गादीवर  पडून  तिने  भेट मिळालेले   पुस्तक हातात घेतले आणि वाचावयास सुरुवात केली पण तिचे डोळे केव्हा मिटले तिला कळलेच नााही.

पुस्तकावर   तिला स्वत:चाच फोटो दिसला व ती आश्चर्यचकित झाली तिने पुस्तक उघडले मात्र, ती एका नव्या  शाळेच्या इमारतीत आपल्या शाळेतल्या बाईंसमोर उभी होती. बाईं म्हणाल्या, "अनुषा, तू एक छान शिक्षिका आहेस.  म्हणून मी तुला या नवीन भूमितीशाळेसाठी शिक्षिका म्हणून निवडले आहे. या शाळेत तू आता पहिलीच्या मुलांना शिकव."

अनुषा  लगेच आपल्या स्वप्नातच  शाळेच्या मैदानावर गेली. तेथे तिने पाहिले तर छोटी छोटी गोल आकाराची मुले खेळत होती. तिने एका मुलाला विचारले "तुझे नाव काय?' तर तो म्हणाला "बिंदू". दुस-या मुलानेही बिंदू असेच नाव सांगितले.  अनुषा गोंधळून गेली. तिने सर्व मुलांना एकत्र बोलावले आणि त्यांची नावे विचारली. सगळ्यांनी आपले नाव "बिंदू" असेच सांगितले.

अनुषाला आश्चर्य वाटलं. सर्व मुलांचे नाव एकच असले तर त्यांना वेगवेगळे कसे ओळखता येईल?  तिने  क्षणभर विचार केला आणि तिला कल्पना सुचली. तिने त्या सर्व मुलांना एका ओळीत उभे राहण्यास सांगितले. मग तिने त्यांना ब-१, ब-२, ब-३ अशाप्रकारे  नावे दिली.

एकूण २० मुले होती. त्यांना आपले वेगळे नाव मिळाल्याचा आनंद झाला.  ती आता  एकमेकांना नावाने हाका मारू लागली.

अनुषाने त्यांना  वर्गात येऊन बसण्यास सांगितलं.  शाळेच्या वर्गात मुलांसाठी लहान  लहान खुर्च्या होत्या. तिला न विचारता मुलाचे नाव जाणून घेणे अवघड होते.

अनुषा खूप हुशार होती. तिने विचार केला की मी जर या मुलांची नावे त्यांच्या बसायच्या जागेनुसार दिली तर अधिक सोयीस्कर होईल.  मी सर्व चार ओळींसाठी प्रत्येक ओळीत नाव १ ते ५ देऊ शकते आणि प्रत्येक  आडव्या ओळीला १,२,३४ अशी नावे देता येतील. मग  तिने फळ्यावर मुलांच्या बसण्याच्या जागा दाखविणारे चित्र काढले. अनुषाने त्यांची ५ x ४ अशी रचना केली की   प्रत्येक ओळीत ५ खुर्च्या  अशा ४ ओळी तयार होतील. 


तिने  मुलांची नावेही बसायच्या जागेनुसार पहिल्बया ओळीत  ब(१,१) ,   ब(१,२),   ब(१,३), ब(१,४), ब(१,५) तर दुस-या ओळीत ब(२,१) ,  ब(२,२) , ब(२,३),  ब(२,४) , ब(२,५)  आणि अशीच पुढच्या ओळींसाठी नावे दिली. मुलांची नावेही त्याप्रमाणेच बदलली. आता  कोणत्याही मुलाला ओळखणे फार सोपे झाले. सर्व मुलांनी त्यांची नवी नावे पसंत केली.अनुषाने फळ्यावर बिंदू जोडून उभ्या  आडव्या रेषा,  त्रिकोण, चौकोन,बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार, भागाकाराची चिन्हे कशी करता येतात ते मुलांना दाखविले.

सर्व मुलांना  खूप आनंद झाला .   खेळाच्या मैदानावर जाऊन अनुषाच्या सांगण्यानुसार त्यांनी अनेक आकार तयार केले. तेवढ्यात शाळेच्या मुख्य बाई तेथे आल्या.

अनुषाने  बाईंना मुलांचे हे खेळ दाखविले. ते पाहून बाईंना खूप आनंद झाला.  त्यांनी अनुषाला शाबासकी दिली.

पाठीवर हात पडल्याचे अनुषाला जाणवले आणि ती स्वप्नातून जागी झाली. तिची आई तिला जेवणासाठी बोलावत होती...

No comments:

Post a Comment