Friday, November 13, 2020

ज्ञानदीपचा दिवाळी अंक - २०२०


दिवाळीची महती

आली हसत दिवाळी
दारी सजते रांगोळी
तिच्या स्वागताला सारी
झाली सज्ज घरीदारी - - - १

अंधराचा नायनाट
मंद प्रकाश दारात
पणतीने उजळते
झूंजूमुंजू ती पहाट - - - २

स्नानलेपनादि कामे
करताती आनंदाने
सुवासिक अत्तराने
भरताती तनमने - - - ३

भरजरी ती वसने
मनमोहक दागिने
देवदर्शना जाती ते
सारे मिळूनी गोडीने - - - ४

लाडू चिवडा करंजी
चकलीची स्वारी खाशी
शंकरपाळे अनारशाने
ताटे भरती हौसेने - - - ५

गप्पागोष्टी करण्यात
सारे दंग फराळात
जुन्या गोड आठवणी
रमता ये डोळा पाणी - - - ६

दिवाळीचे चार दिन
जाती सुखात बुडून
दृढ करी नाती-गोती
ऎसी दिवाळीची महती - - - ७

-------कै, सौ. शुभांगी रानडे

संस्कारभारतीच्या रांगोळ्या

रांगोळी हा चित्रकलेतील अतिशय उपयुक्त व सोपा प्रकार असून संस्कारभारतीच्या रांगोळ्या फार प्रसिद्ध आहेत. आपल्या घरासमोर रांगोळी काढून चित्रकलेतील कौशल्य दाखविता येते. संस्कारभारती ही कलेच्या माध्यमातून संस्कार करणारी अखिल भारतीय संस्था आहे.

बोधचिन्ह - कोणार्कच्या सूर्यमंदिरातील रथचक्र. परिघावरील १६ कीलक ( उंचवटे) हे १६ विद्यांचे प्रतीक आहेत. ते जेव्हा गतीमान होतात. तेव्हा रथ पुढे जातो आणि १६ गुणिले ४ म्हणजे ६४ दले दिसू लागतात. ही ६४ दले ६४ कलांचे प्रतीक आहेत.

संस्कारभारती गीत - साधयति संस्कारभारती भारते नव जीवनम्‌, सत्यं शिवं सुंदरं यांच्या अभिनव संस्कारातून भारतात नवजीवन निर्मिण्याचा प्रयत्न संस्कारभारती करीत आहे.

 

कागदाची स्प्रिंग व भिरभिरे

१. कागदी दोन पट्ट्या कापून चित्रात दाखविल्याप्रमाणे उलट सुलट घड्या घालून कागदाची छोटी स्प्रिंग बनविता येते.




२. कोलगेट वा अन्य ट्यूबच्या रिकाम्या बॉक्सच्या पट्ट्या कापून अधिक चांगली स्प्रिंग तयार करता येते.


चित्रात दाखविल्याप्रमाणे कापलेल्या पट्ट्या मध्य्भागी दुमडाव्यात. नंतर एका दुमडलेल्या पट्टीच्या दोन्ही बाजूतून दुसर्‍या पट्टीच्या बाजू घालून कोन करावा. या जोडाची एक बाजू बंद असून दुसर्‍या बाजूस दोन पट्ट्य़ा मोकळ्या राहतात. त्यातून तिसर्‍या पट्टीच्या बाजू घालून ही साखळी वाढवावी. अशीच क्रिया पुनःपुन्हा करीत सर्व पट्ट्या जोडून स्प्रिंग तयार करावी ही आता कमी जास्त लांबीची करता येते. या साखळीचा उपयोग करून आणखीही चांगली डिझाईन करता येतील.


कागदाचे भिरभिरे.

 
केवळ तीन पट्ट्या मध्ये दुमडून व एकमेकीत अडकवून भिरभिरे तयार करता येते. काडीच्या टोकावर ते उभे धरले तर वारा असेल तर ते फिरू लागते. असे भिर्भिरे करून पंख्याखाली धरल्यास सुदर्शन चक्रासारखे ते दिसते.



हेच भिरभिरे उलट धरून उंचावरून खाली टाकले तर फिरत फिरत खाली येते.

 

दिवाळीचा किल्ला


 


दीपावलीचा सणही आला
आकाशकंदील दारी  लावला
पणत्या त्याही येती साथीला
मंगलमय तो प्रकाश पडला
मंगलमय तो प्रकाश पडला . . . १

मातीचा तो किल्ला केला
हळीव मोहरी गहू पेरला
हरित तृणांनी बहरून आला
हिरवा शेला जणू ल्यायिला
हिरवा शेला जणू ल्यायिला . . . २

वळणावळणाच्या वाटेला
रंग विटकरी हळूच भरला
खडू रोवुनी कडेकडेला
सुंदरसा तो रस्ता सजला
सुंदरसा तो रस्ता सजला . . . ३

पायथ्याशी ती नगरी वसली
छोटी_मोठी घरे लाविली
तळेही केले बदके आली
शोभा आली त्या नगरीला
शोभा आली त्या नगरीला . . . ४

किल्ल्यावरती बुरुज लाविला
सिंहासनी तो शिवबा बसला
उभे मावळे सभोवतीला
रक्षण करण्या त्या किल्ल्याला
रक्षण करण्या त्या किल्ल्याला . . . ५

बाजूस एका गुहाही केली
वाघोबाची स्वारी लपली
सर्व मंडळी खूष जाहली
पाहून ऎशा सजावटीला
पाहून ऎशा सजावटीला . . . ६

   -------कै, सौ. शुभांगी रानडे




I give below list of my blogs concerning Innovation Center
There are many more blogs on teachers of schools and retired professors of Walchand College which form the basis of starting this movement.


1 comment: