Thursday, July 12, 2018

रसायनशास्त्राच्या ज्ञानावर निर्यातक्षम पदार्थांची निर्मिती करणारे उद्योजक महेश पागनीस

विलिंग्डन कॉलेजचे माजी विद्यार्थी श्री. महेश पागनीस यांनी आपल्या रसायनशास्त्रातील ज्ञानाचा कल्पक उपयोग करून मोठा उद्योग उभा केला असून आफ्रिकेमध्ये दोन कारखाने सुरू केले आहेत. वालचंद हेरिटेज इनोव्हेशन सेंटरबाबत त्यांचे विचार ऎकण्यासाठी प्रा. भालबा केळकर यांचेबरोबर मी त्यांच्या "गंगाई" या कुपवाड रस्त्यावरील निवासस्थानी भेट घेतली. प्रा. भालबा केळकर यांची कन्या प्रा. संजीवनी आपटेही चर्चेत सहभागी झाल्या होत्या.  आमच्या प्रकल्पाची कल्पना त्यांना आवडली.


 त्यांनी विद्यार्थ्यांत कोणत्याही नेहमीच्या वापरातील वस्तूचा विक्रीयोग्य वस्तू किंवा प्रॉडक्ट या दृष्टीकोनातून विचार करण्याचे शिक्षण देण्याची आवश्यकता व्यक्त केली.

साधे पेन तयार करताना त्यात किती विविध वस्तूंचा वापर करावा लागतो. अशा वस्तू उत्पादन करण्यासाठी काय पद्धत व किती खर्च येतो? याचा अभ्यास केला तर पेन निर्मिती उद्योगाची माहिती होऊ शकते. शर्टाची कॉलर ताठ रहाण्यामागे आतील कापडी अस्तर प्लॅस्टीकच्या थेंबांनी कसे बनविले जाते हे त्यांनी सांगितले.  शिसपेन्सिलमध्ये शिसे नसून ग्राफाईट असते हेही बहुतेकांना माहीत नसते. एक घनमीटर टाकीत किती पाणी मावेल वा  कंडेन्सरचे डिझाईन आले तरी त्याचे कार्य कसे चालते याची माहिती नसल्याचा अनुभव आल्याने त्यांनी सध्याच्या शिक्षणपद्धतीबद्दल खंत व्यक्त केली व चॊकटीबाहेर विचार करून प्रत्यक्ष कृतीचा अनुभव देण्याची गरज  प्रतिपादन केली.

जॆविक पद्धतीने विघटन होणारे प्लॅस्टिक, काजूच्या टरफलापासून वा सोयाबीनच्या वाया जाणार्‍या टरफलांपासून  विविध दर्जाचे लेसिथिन रसायन, जुन्या टायर्सपासून बर्नर डिझेल, पॅरॅफिन असे अनेक पदार्थ  तयार करण्यात त्यांनी यश मिळविले. 


सुरवातीस सायकलवरून दुधाचा रतीब घालतात तसे कारखान्यांना लेसिथिन रसायन देण्यापासून सुरुवात करून आता आफ्रिकेमध्ये अशा पदार्थ निर्मितीचे दोन कारखाने त्यांनी  उभारले आहेत.
 त्यांची ही यशोगाथा त्यांच्याच शब्दात ऎका.



मिसेस पागनीस नवकृष्णा व्हॅलीच्या शाळेत संचालक असल्याने त्यांनीही शाळेच्या विज्ञानविषयक उपक्रमांची माहिती दिली. माझा भाऊ श्रीकांत  मिरज विद्यामंदिर येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना अशा कार्यक्रमात मदत करीत असे त्यांनी आवर्जून सांगितले.

                                       (प्रा. संजीवनी आपटे, मिसेस पागनीस, रानडे, प्रा. केळकर)
 आमच्या इनोव्हेशन सेंटरच्या कार्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे उभयतांनी आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment