ज्ञानदीपच्या प्रगतीचा आलेख इ. स. २००० पासून ते २०१३ पर्यंत धीम्या पण वाढत्या दिशेने होता. माझ्या पत्नीच्या आजारपणात त्याला उतरती कळा लागली. तिचे निधन झाल्यानंतर गेली चार वर्षे मी अमेरिकेत राहिल्यामुळे प्रगतीत अडथळा आला. तरी अमेरिकेत राहण्यास मिळाले ही संधी समजून मी ज्ञानदीपची परदेशस्थ भारतीयांच्या साहाय्याने पुन्हा उभारणी करण्याचे ठरविले. परदेशस्थ भारतीयांनी अगदी थोडी गुंतवणूक केली तरी त्याचा खूप फायदा होईल असे वाटून मी फ्री लान्स फोरमच्या सहकारी तत्वावर ज्ञानदीपच्या कार्याचा विस्तार करण्याचे ठरविले. मात्र अजूनतरी मला यात यश आलेले नाही.
परदेशात राहणा-या माझ्या संपर्कातील विद्यार्थी व इतर परिचितांना मी ज्यावेळी भारतात उद्योग उभारणीसाठी आर्थिक गुंतवणुकीचे आवाहन करतो. त्यावेळी मला भारतीयांच्यात गुणवत्ता नाही तसेच त्यांच्यावर भरवंसा टाकता येत नाही. बरेच लोक नोकरी सोडून जातात. आधुनिक व्यवस्थापन आणि कालमर्यादा पाळण्यात ते कमी पडतात अशी अनेक कारणे त्यांच्याकडून दिली जातात.
स्पष्टपणे त्यांच्याशी युक्तीवाद करण्याचे माझ्या मनात खूपदा येते पण मी गप्प बसतो. कारण मला मान देण्यासाठी त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले तरी त्यांच्याकडून प्रत्यक्ष काही कृती घडेल याची मला खात्री देता येत नाही. अधिक मागे लागले तर ते विषय बदलतील वा माझ्याशी बोलण्याचेच टाळतील अशी मला भीती वाटते. मग मग मी त्यांच्या कार्यकुशलतेचे कौतुक करतो व त्यांच्या गप्पागोष्टीत रंगून जातो. भारतातील राजकारण, भ्रष्टाचार, शेतकर्यांच्या आत्महत्या, बॉलीवुड, कला, कोशल्य आणि सण, समारंभ या विषयावर या गप्पा असतात. नक्षलवाद आणि जहाल डावे कम्युनिस्ट यांचेबद्दलदेखील काळजी आणि संताप येथे व्यक्त होतो. पण ही परिस्थती का उद्भवली व यावर आपण शासनाला काही योगदान देऊ शकतो याचा विचार देखील केला जात नाही.
हा अनुभव मला केवळ परदेशातच येतो असे नाही तर पुण्या-मुंबईत मोठ्या पदांवर काम करणा-या व्यक्तींकडून, अगदी माझ्या कंपनीत ज्यांनी प्राथमिक धडे गिरवले त्यांच्याकडूनही येतो तेव्हा मनस्वी खेद होतो.
चांगले जॉब प्लेसमेंट झाले की विद्यार्थ्याला 'ग 'ची बाधा होते. आपल्या अंगभूत हुशारीमुळेच आपल्याला हे यश मिळाले व इतरांच्यात ती कुवतच नव्हती असा सोयीस्कर समज ते करून घेतात.
आता मात्र मी माझी मते स्पष्ट मांडण्याचे धाडस करीत आहे.
माझ्यामते प्रत्येक व्यक्ती बुद्धीमत्तेत जन्मतःच फारसा फरक नसतो. प्रयत्नाने कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही उंचीपर्यंत जाता येते. मात्र यासाठी लागणारी भोवतालची परिस्थिती, आर्थिक पाठबळ, शिक्षण आणि त्याचे स्वतःचे प्रयत्न यांचाच प्रभाव त्याच्या कामगिरीवर पडत असतो.
ब-याच वेळा व्यक्तीच्या आवडीनुसार त्याची ज्ञान मिळविण्याची इच्छा आमि दिले जाणारे शिक्षण यांचा मेळ बसत नाही. कौटुंबिक जबाबदा-या अंगावर असल्याने आवश्यक तेवढा वेळ अभ्यासासाठी दिला जात नाही. परिक्षेतील यशच एकमेव कसोटी असल्याने ख-या बुद्धीमत्तेचे वा कुशलतेचे यथार्थ मोजमाप होत नाही.
साहजिकच विद्यार्थ्यांत हुषार, साधारण व अपात्र असे गट पडतात. चांगल्या शिक्षणाची व नोकरीची ज्यांना संधी मिळते ते उच्चपदांवर विराजमान होतात. काही परदेशात जाऊन अत्युच्च पदावर जाण्यातही यशस्वी होतात. असे जाले तरी त्यांची विचार करण्याची क्षमता सर्वसाधारणपणे एकसारखीच असते.
उच्च पदांच्या जागा कमी आणि परदेशात जाण्याच्या संधी तर अत्यल्प असल्याने बराच मोठा समाज हा स्थानिक पातळीवर मिळेल ती नोकरी वा व्यवसाय करून आपला चरितार्थ चालवितो.
उच्च पदावर काम करणा-या आपल्या सहका-यांबद्दल त्यांना, संस्थेला आणि सा-या समाजाला अभिमान असतो. परदेशात जाणा-या लोकांबद्दल तर अभिमानाबरोबर आदराचा भावना असते. अगदी माझे उदाहरण घेतले तरी मी अमेरिकेत राहतो हे ऐकल्यावर माझ्याबद्दल लोकांची माझ्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे हे मला जाणवते. परदेशी भारतीय भारतात आले की त्यांचे सर्वत्र कौतुक केले जाते. त्यांचे शब्द मौलिक विचार असल्यासारखे सर्वांना वाटतात. मग या सा-या प्रशंसेने त्यांना आपण कोणी ग्रेट आहोत असे वाटायला लागते. मग त्यांच्या बोलण्याला उपदेशाची धार येते.
त्यांचा आपल्या स्वतःच्या विचारांवर जास्त विश्वास बसतो. मग इतरांच्या चुका त्यांना दिसू लागतात. इतरही त्यांच्या शब्दांना मान देतात.
आणि खरेच. अशा चुका सामान्य लोकांच्याकडून होत असतातच. कारण त्यांच्या चुका दुरुस्त करण्यासाठी त्यांच्याकडे सहायकांचा ताफा नसतो. मोठ्या कंपन्यात वा परदेशात काम करणा-या लोकांना मदत करण्यासाठी अनेक त्यांच्यासारखेच लोक त्यांच्या दिमतीस असतात. पैशासाठी इतर उद्योग त्यांना करावे लागत नाहीत. त्यांच्याकडील पैसाच त्यांना शेअर्सच्या माध्यमातून आणखीनच श्रीमंत करीत असतो.
पण अशा लोकांनी आपल्या पूर्वेतिहासाकडे पाहण्याची ज्या समाजाने आपल्याला इतक्या उंचीवर चढविण्यास सहकार्य केले त्या समाजात केवळ नशिबाने कितपत पडलेल्या आपल्या सहका-यांना वा पुढील पिढीला वर आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. कारण जेव्हा समाजाच्या तळागाळातील व्यक्तींच्या उन्नतीचा प्रयत्न होईल तेव्हाच सारा समाज एकसंध, सशक्त आणि राष्ट्रउभारणीस सज्ज होईल. अन्यथा समाजात भेदभाव, यादवी, गुन्हेगारी, परस्पर अविश्वास वाढत राहील.
आजच्या आपल्या समाजपुरुषाचे वर्णन करायचे तर डोके ( मध्यम वर्ग) बुद्धी आणि कल्पकतेने युक्त, शरीर ( व्यापारी) धन दौलतीने सुदृढ तर पाय (गरीब ) रोगराईने त्रस्त असे करावे लागेल. या समाज पुरुषाने शिखराकडे धाव घेण्यासाठी आधी आपले जाय बळकट आणि निरोगी करण्याची गरज आहे. आणि हे काम डोकेच करू शकते. या डोक्यातील ब्रेनड्रेन होऊन परदेशात समृद्ध झालेल्या लोकांवर तर याची अधिकच जबाबदारी आहे.
ग्रामीण भागात शेतीवर गुजराण करणारे लोक, घरात स्वयंपाकपाण्यात आयुष्य काढणार्या महिला, झोपडपट्टीत हलाखीचे जीवन जगणारे लोक हे ती आपली संपत्ती आहे. त्यांना आयटीचा जादूचा दिवा देण्याची व त्यांना आहे तेथेच सुदृढ, निरोगी, संपन्न व समाधानी करण्याची गरज आहे.
ज्ञानदीपचे कार्य याच हेतूने मी चालू ठेवले आहे. आज ना उद्या परदेशस्थ भारतीयांमध्ये असे दीप प्रज्वलित करण्यात मला यश येईल असे वाटते. - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.
No comments:
Post a Comment