Thursday, November 26, 2020

उद्योगरत्न वि. रा वेलणकर

सांगलीत उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणारे श्री गजानन मिल्सचे संस्थापक उद्योगरत्न वि. रा वेलणकर आणि त्यांची परंपरा तेवढ्याच हिमतीने चालविणारे सांगली भूषण श्री रामसाहेब वेलणकर यांच्या कार्याची ओळख व्हावी या हेतूने मी जानेवारी २०२० मध्ये श्री रामसाहेब व संचालिका श्रीमती अंजुताई वेलणकर यांची भेट घेतली आणि ज्ञानदीपतर्फे त्यांची वेबसाईट करण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यास त्यांनी आनंदाने मान्यता दिली.मात्र नंतर मी अमेरिकेला आल्याने आणि कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आम्हाला त्यांच्याकडून सर्व माहिती मिळण्यात व्यत्यय आला. 

तरी त्यांच्या कॅलेंडरवरून उपलब्ध झालेली काही माहिती खाली देत आहे.

सुदामपुरी
७ मार्च १९१४ रोजी दादासाहेब पुण्याहून माग घेऊन सांगलीच्या पटवर्धन सरकारांच्या मुळे त्यांच्या गणपतीमळ्यात आले. सांगलीत येण्याचा हा दिवस गुढी पाडव्याचा- वर्षप्रतिपदेचा दिवस होता. त्यामुळे सांगलीच्या नागरिकांनी गुढ्यातोरणे उभारली होती. दादासाहेबांनी ती आपल्यासाठीच असल्याचा शकुन मनाशी बाळगला. गणपती मळ्यातील सोपा, पाण्याने भरलेली विहीर, नारळीची बाग हे सारे पाहून दादासाहेबांना अत्यंत आनंद वाटला. पुढे या जागेतच त्यांनी आपला कारखाना सुरू केला. तीन मागांवर सुरू झालेला कारखाना पुढे १0 मागांचा झाला. प्रत्येक मागासाठी एक मागवाला लागायचा. हे मागवालेही दादासाहेबांनी स्वतःच्या तालमीत मोठ्या मेहनतीने तयार केले. १० मागाचे १८ माग झाले. राजेसाहेबांकडून घेतलेले ७००० रुपयांचे कर्ज दादासाहेबांनी मुदतीच्या वर्षभर आधीच फेडले होते. त्यामुळे १९२६ साली ते जेव्हा स्वत:च्या जागेत आले, तेव्हा त्यांना एका पैशाचेही कर्ज नव्हते.

गणपती मळ्यात गरज पडेल तसे दोन तीन सोपे बांधून झाले होते आणि आता पुढील वाढीस अनुलक्षून दुसरी जागा शोधणे क्रमप्राप्त होते कारण गणपती मळ्यातल्या कारखान्याला जागा अपुरी पडू लागली. १९२६ साली ही जागा तर खाली करून द्यावी लागणार होती. त्यामुळे स्वतःची जागा असावी असे त्यांच्या मनाने घेतले. त्याप्रमाणे त्यांनी जागा घेतली आणि म्हणूनच त्यांना मोठा पसारा मांडता आला.

जागा घ्यायची हे ठरले परंतु ती कुठे मिळणार आणि कशी मिळणार हे प्रश्न होते. तिच्यासाठी ठरलेले निकष कोणते? कोरडी जागा हा पहिला निकष आणि पाया कमी खणायला लागावा त्यामुळे खर्च कमी होईल हा दुसरा निकष. अशी जागा. कुठेतरी सांद्रीकोंद्रीत नसावी. १९२२ साली अशी जागा मिळाली. मग दादासाहेबांनी राजेसाहेबांना मोठ्या हिकमतीने राजी करून त्यांच्या संमतीने ही जागा जमीन मालकाकडून मिळवली. उत्तराभिमुख इमारत बांधण्यासाठी ती सोयीस्कर होती. कारखान्यासाठी घेतलेली सर्व जागा दादासाहेबांनी राजेसाहेबांकडून फॅक्टरी एरिया करून घेतली. ही त्यांची दूरदृष्टीच नव्हे का? नंतर पहिले काम कोणते केले असेल तर तिथे विहीर खणली. १९२३ साली या विहिरीला पाणी लागले तेव्हा ते बेताचेच होते, पण पुढे ते वाढत गेले. विहिरीला असलेल्या भरपूर पाण्यामुळे कारखान्याचे रंगखाते जोमाने कार्यरत राहू शकले. विहीर, पाण्याची टाकी, विहिरीच्या आत तळघरासारखे जलमंदिर व हवा खात बसावयाची गच्ची. या सर्वांना मिळून नाव मिळाले 'आनंद भवन”. तालमीचे काम पूर्ण होईपर्यंत दादासाहेब तिथेच रोजचा व्यायाम करायचे. 

श्री गजानन मिल्सच्या आकाशमंदिराची (टॉवरची) इमारत १९२५ च्या श्रावण महिन्यात पूर्ण झाली. १९२६ साली.गणपती मळ्यात १८ लूम होते. ते सगळे नवीन इमारतीत आणले.

कारखान्याची इमारत बांधायला गोकाकचा दगड मागवला. समोर उभे राहून, गवंडी हाताखाली घेऊन दादासाहेबांनी हा कारखाना बांधला. आतासारखे आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनिअर वगैरे कोणीही हाताशी नव्हते. विहिरीपासूनची इमारत, पोर्च, पाठीमागे मागासाठीची इमारत एवढा पसारा त्यांनी बांधून पूर्ण केला.

पोर्चसमोर रेल्वेलाईन असल्यामुळे कारखान्याची जाहिरात उत्तम प्रकारे .करता येत असे. दोही बाजूंना ऑफिस, मध्यभागी सायझिंग-वापिंग, मागे मागखाते असे इमारतीचे सर्वसाधारण स्वरूप होते गणपती मळ्यातले जुने घर जसेच्या तसे उकरून आणून इथे लावले. घर म्हणायचे त्याची इमारत म्हणजे कुडाच्या भिंती, कडेला लाकडी खांब आणि वर छप्पर. ही अशी!

कारखान्याची इमारत ही दादासाहेबांच्या आयुष्यातली पहिलीच इमारत पण अतिशय अभ्यास करून आणि हौसेने ती बांधलेली. एक सुंदर टॉवर, पोर्च यांचा समावेश असलेली १२० > ४० फुटांची ही सुंदर इमारत. त्यात मग १८ मागांचा कारखाना दिमाखात सुरू झाला. जवळूनच आगगाड्यांच्या येरझाऱ्यांमुळे उत्पादनाची जाहिरात करणे हेही आयतेच जमून गेले.

दादासाहेब जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्याच्या कृतार्थतेचा विचार करत तेव्हा सांगलीच्या राजेसाहेबांचे उपकार व प्रेम त्यांना आठवल्याखेरीज रा॒हूत नसे. पुराणकाळात कृष्णाच्या सुदाम्यावरील मित्रप्रेमाची आणि सुदाम्याच्या कृष्णावरील भक्तिप्रेमाची परिणती कशी झाली याची तुलना त्यांच्या मनात सुरू होई. आपल्या श्रमांचे सार्थक करण्यामध्ये राजेसाहेबांचा फार मोठा आधार होता

या वास्तविक समजामुळे राजेसाहेबांच्या विषयी दादासाहेबांच्या मनात आदर आणि प्रेमाचा भाव नेहमीच वसत असे. त्यातूनच स्वतःला सुदाम्याच्या जागी कल्पून त्यांनी आपल्या कारखान्याच्या लहानग्या वाडीला सुदामपुरी हे नाव देऊन टाकले. .

 रामभरोसे माग शेड
१९१४ साली दादासाहेब सांगलीत आले तेव्हा सांगलीत एकाही कोष्ट्याचे घर नव्हते. दादासाहेबांनी प्रयत्नांची शिकस्त करून तीन मागांच्या कारखान्याला सुरुवात केली. त्यावेळी यांत्रिक मागावर काम करणारी माणसे सांगलीत अजिबात नव्हती. प्रत्येक मागवाला ती. दादासाहेबांना प्रयत्नपूर्वक तयार करावा लागला. कारखान्यातला प्रत्येक प्रोसेसचा कारागीर त्यांना अगदी शून्यातून तयार करावा लागला. सांगलीत सुताशी संबंध आलाय असे दोनच समाज होते ते म्हणजे एक तर ब्राह्मण समाज- त्यांना जानव्याकरता आणि दुसरा भुई समाज- त्यांना मच्छी पकडण्यासाठी सुताचा वापर करायला लागायचा. यातील भुईगल्ली जवळ असल्याने त्यांना माग आणि इतर प्रोसेसिंगची कामे शिकवण्याचे काम ती. दादासाहेबांनी सुरू केले. असे तयार केलेले कामगार फोडणे आणि त्यांच्या साह्याने आपले माग चालवणे हा मार्ग स्पर्धकांना मोकळा होता. 

गजानन मिल्सच्या टॉवरची घंटा वाजू लागलेली घंटा ऐकून का कोण जाणे, पण एका उद्योजकाला विणकामाच्या धंद्यात शिरावे असे वाटू लागले. वेलणकरांशी स्पर्धा करू पाहणाऱ्या या माणसाने वेलणकरांच्या कारखान्यातील माणसे फोडून स्वतःचा कारखाना सुरू करण्याची योजना केली. त्यावेळी संस्थानातील अधिकाऱ्याला मुख्य पाहुणा म्हणून बोलवून या प्रतिस्पर्ध्याने त्याच्या उद्घाटन समारंभाला ती.दादासाहेबांनाही आमंत्रण केले, एवढेच नव्हे तर त्या आपल्या भाषणात ती.दादासाहेबांनाच आव्हान देणारी भाषा केली. ते जाहीररीत्या म्हणाले की, 'शेंडी तुटो की पारंबी तुटो मी थांबणार नाही.तुमच्याशी कडक स्पर्धा करायलाच मी हा कारखाना सुरू केलाय." असं म्हटल्यावर या लागट कुरापतीमुळे ती.दादासाहेबांच्या मनाला ही गोष्ट फार झोंबली. आपल्याशीच आणि भर समारंभात केलेली ही आव्हानाची भाषा ऐकून त्यांची झोप उडाली. पण त्यावर शाब्दिक प्रतिटोला मारण्याच्या भरीस न पडता रचनात्मक वृत्तीने ते आव्हान दादासाहेबांनी मनोमन स्वीकारले आणि कामाला लागले. दुसऱ्याच दिवशी रात्रीच्या गाडीने दादासाहेबांनी मुंबईला प्रस्थान ठेवले. मुंबईला जाऊन मुंबईच्या मुक्कामात ६0 मागांची खरेदी त्यांनी केली व ते ६० मागांचे खाते सुरू करण्याचे काम त्यांनी हातात घेतले.

या मागाच्या खात्याकरता इमारतीची गरज होती, ती इमारत दादासाहेबांनी बांधायला काढली आणि नवीन ९० » ६0 फुटांचे नवीन खाते उभे राहिले. एवढी मोठी गुंतवणूक, स्पर्धेला निकराने तोंड देण्याच्या ठाम निश्चयाने केली आणि त्यातील यशापयशाची गोष्ट त्यांनी श्री रामरायाच्या हवाली सोडली. यश-अपयश सगळे रामरायावर हवाला ठेवून त्यांनी या नव्या खात्याचे नामकरण 'रामभरोसे मागखाते' असेच केले.

कोणतीही गोष्ट करताना ती सकारात्मक विचारानेच करायची ही दादासाहेबांची वृत्ती या प्रसंगातून दिसून येते.

जपानी माग खाते

१९३५ मध्ये दादासाहेब जपानला गेले, तेव्हा इतरत्र जगभर ब्रिटिश साम्राज्य होते. त्यामुळे परदेशी जायचे म्हटले की लोकांचा ओढा इंग्लंड, अमेरिका, युरोप इकडे जाण्याचा होता. युरोपमध्ये निर्माण होणारे नवीन कारखाने फार मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणुकीचे असल्यामुळे त्यासाठी जास्त पैसे गुंतवावे लागतील, त्यापेक्षा लहान कारखाना घालायचा असेल तर जपानला जाऊन अशा प्रकारच्या कारखान्याचा अभ्यास घडला तर तो योग्य होईल असे वाटून दादासाहेबांनी जपानला जायचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय म्हणजे एक प्रकारे एक क्रांतीच होती.परंतु जपानला जायचे म्हटल्यावर त्यांच्या मार्गात काही अडचणी होत्या आणि उद्दिषटेही होती.

१) नवीन ज्ञान घ्यायचे म्हणजे मुख्य अडचण भाषेची होती. दादासाहेबांचे तर फक्त इंग्लिश पाचवीपर्यंतचे शिक्षण असल्याने त्यांना इंग्रजीही चांगले येत नव्हते. त्यात जपानी भाषा तर पूर्णपणे परकी होती.
२) आहे तोच धंदा वाढवायचा की नवीन धंदा घालायचा हा एक प्रश्‍न त्यांच्यासमोर होता.
३) तिथल्या धंद्यांचे स्वरूप अजमावून आपल्या चालू असलेल्या साड्या-लुगड्यांच्या धंद्यामध्ये जपानच्या कारखानदारांची आपल्याला काही स्पर्धा होईल काय, याबाबत अभ्यास करायचा होता.
४) जपानी भाषा शिकून त्यांना एक पुस्तक काढायचे होते, पण ते कसे साध्य करायचे ही एक अडचणच होती.
५) तिथले कारखाने जाऊन बघायचे कसे ?आपल्याला तेथे प्रवेश कसा मिळायचा? हाही मोठा प्रश्न होता.
१- पहिला प्रश्न त्यांनी सहजी सोडवला. ज्याचं इंग्रजी चांगलं आहे अशा आपल्या एका सहकारी मित्राला बरोबर घेऊन जायचे त्यांनी ठरवले.
२- दुसऱ्या प्रश्नाला त्यांनी उत्तर ठरवलं की, आहे तोच धंदा वाढवायचा.
३- आपल्याला तिथला कारखाना काही कॉम्पिटिशन करेल का हे पाहायला, ते इथून आपल्या कारखान्यातल्या साड्या बरोबर घेऊन गेले कन *असा माल तुम्ही पुरवू शकाल का?” याची चौकशी करून तेवढ्या व्हरायटीज ते काढू शकत नाहीत हे अजमावले.
४- जपानमध्ये त्यांनी एक दुभाषा नेमला. दिवसभरात जी जी वाक्ये अडतात, ती सहकारी मित्र श्री. विठ्ठल जोश्यांकडून इंग्रजीत लिहून घ्यायची आणि जेव्हा जपानी भाषेतील आदल्या दिवसांची वाक्ये घेऊन दुभाष्या यायचा तेव्हा ती नवीन वाक्ये त्याच्याकडे द्यायची.
५- तिथले कारखाने पाहण्यासाठी सहजच आत जायचे आणि कोणी अडवले तर 'मी परदेशी आहे, पाहायला आलो होतो” असे सांगून जेवढे बघता येईल तेवढे पाहायचे आणि बाहेर पडायचे असा क्रम त्यांनी ठरवला.
या अडचणीतून मार्ग काढणे तसे अवघड होते, पण दादासाहेबांनी ते केले.
येताना, आपल्या कारखान्यासाठी आवश्यक यंत्रे आणून ती कशी बसवायची हे योजून दादासाहेबांनी जपानला असतानाच इथे सांगलीत त्यासाठी गरजेच्या इमारतीचे काम चालू केले. त्यांची समज आणि दूरदृष्टी किती पल्लेदार होती हे यावरून लक्षात येते.

२२ डिसेंबर १९३५ ला ते भारतात आले. तिथून येताच ८0 मागांचा कारखाना स्वतःसाठी आणि विठ्ठुलराव जोशीसाठी रोप आणि टेपचा छोटा कारखाना ते घेऊन आले.

जपानी माग खात्याची उभारणी पूर्ण करून १ ऑगस्ट १९३६ ला त्यातून उत्पादन  केलेला माल त्यांनी मार्केटला टाकला. 'वल्कली कापड असे नाव त्याला देऊन पहिला   आर्टसिल्कचा कारखाना त्यांनी सुरूही केला या वल्कली कापडाचा कारखाना जपानमधून  आणणे हाच हेतू प्रामुख्याने डोळ्यांसमोर ठेवून दादासाहेबांनी जपानचा प्रवास केला असावा  असेच म्हटले पाहिजे.

 जपानहून येताना दादासाहेबांनी काही सुंदर सुंदर गोष्टीही इथे आणल्या. तिथून एक बोनसाय आणले. आणलेल्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंत बारा माहितीपटांचा (फिल्मस्‌) समावेश त्यात होता. रणगाडा किंवा मशीनगन टँकर व्हेलची शिकार कशी काय करतो या माहितीपटाचाही त्यात समावेश होता. येताना सोन्याच्या मुलामा असलेल्या कपबश्या  त्यांनी आणल्या. मोती, विविध प्रकारचे पडदे, जाहिरातीसाठी पातळे नेसवायच्या  बाहुल्याही आणल्या होत्या. जे जे उत्तम, वेचक वाटले, त्या वस्तूंचा उपयोग करून  घेण्यासाठी त्यांनी त्या बरोबर आणल्या. इथे आल्यानंतर ज्ञानमंदिरात' या वस्तूंचे  प्रदर्शनही त्यांनी भरवले. ते प्रदर्शन पाहायला सांगलीतीलच काय पण बाहेरगावाहूनही  लोकांनी गर्दी केली. तीन-चार दिवस लोकांच्या झुंडी प्रदर्शन पाहायला लोटत होत्या.

 सांगलीच्या राणीसाहेबांना द्यायला सुंदर पार्टिशन्स आणली होती. इतरही अनेक मान्यवरांना त्यांनी सुंदर सुंदर वस्तू भेट म्हणून मोठ्या हौसेने दिल्या. जपानमधून निऑन साईन आणून श्री गजानन मिल्स या नावाचा ५0 फूट लांब आणि  ५ फूट उंचीचा बोर्ड उभा केला.

 एका जपानच्या प्रवासात अनेक गोष्टी त्यांनी साध्य केल्या. केवळ अशक्य  वाटतील अशा गोष्टी करून दाखवल्या. आमच्या कुटुंबासाठी तर हा चमत्कारच होता. 'जपानच्या प्रवासाची शिदोरी” हे माहितीपूर्ण पुस्तकही त्यांनी लिहिले आणि ते चांगले  वाचकप्रिय झाले.

 केवळ सातवी पास माणसाची कर्तृत्वाची झेप भव्यदिव्य दृष्टिकोन लक्षात घेतला तर शाळेबाहेर अनुभवाचीही एक शाळा असते आणि तिथले शिक्षण माणसाला उंचीवर नेते हे  पटल्याखेरीज रहात नाही.

No comments:

Post a Comment