Friday, September 14, 2018

दिखाऊ संमेलनापेक्षा कार्यात सातत्य महत्वाचे

सांगलीच्या माजी जिल्हाधिकारी माननीय सौ. लीना मेहेंदळे सांगलीत आल्याचे कळल्याने वालचंद कॉलेजमध्ये आम्ही घेतलेल्या सेमिनारची माहिती देण्यासाठी त्यांची भेट घेण्याचे आम्ही ठरविले. सांगलीचे आयुक्त माननीय श्री. रविंद्र खेबुडकर यांचे निवासस्थानी त्या उतरल्या होत्या. श्री. अरविंद यादव, प्रा. भालबा केळकर, प्रा. रामचंद्रे व मी असे सर्वजण त्यांना भेटायला गेलो.


वालचंद कॉलेजमध्ये आम्ही घेतलेल्या सेमिनारबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र दिखाऊ संमेलनापेक्षा कार्यात सातत्य महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. लहानपणची एक गोष्ट त्यांवी सांगितली.


चार पाच वय असताना त्यांचे आजोबा करीत असलेल्या  अभिषेकाची त्यांना गंमत वाटली. आजोबांनी एक मोठी कळशी भरून पाणी अभिषेकासाठी आणले होते.

त्यातून एका तांब्यात, तांब्यातून भांड्यात, भांड्यातून पळीने ते अभिषेक करीत होते. भांडे रिकामे झाले की तांब्यातून भांड्यात पाणी घ्यायचे, तांब्या रिकामा झाला की कळशीतून तांब्यात पाणी घ्यायचे,असे कळशी संपेपर्यंत करायचे असा तो अभिषेक होता. या छोठ्या मुलीने विचारले यापेक्षा सबंध कळशीच का एकदम ओतत नाही. आजोबा हसले आणि म्हणाले मग तो अभिषेक होत नाही. एक एक पळीने अभिषेक करताना तुमच्या संयमाची परीक्षा होते. तुम्ही किती निष्ठावान आहात ते समजते.

 खरेच किती मौल्यवान विचार आहे. आज अनेक राजकीय, सामाजिक, शिक्षणक्षेत्रात संमेलन घेण्यापुरते त्यांचे कार्य मर्यादित राहते. साहजिकच त्याचा फारसा उपयोग होत नाही. महात्मा गांधी यांची असहकार चळवळ यशस्वी झाली कारण त्यात सातत्य होते.कॉंग्रेस व समाजवादी पक्षांचे राष्ट्रसेवादल असेच होते. आता ते लोप पावले आहे. आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दररोज शाखा भरते. कार्यात सातत्य असल्याने समाजाच्या तळागाळात त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपली पाळेमुळे रोवली आहेत.

नवनिर्मिती केंद्र उभे करण्यासाठी अशाच निष्ठावान कार्यकर्त्यांना जमवावे लागेल.मला काही मिळेल या अपेक्षेने येणार्या सदस्यांऐवजी मला  समाजाचे ऋण फेडायचे आहे, पुढच्या पिढीत नवनिर्मिती व उद्योजकतेची आवड निर्माण करण्यासाठी मीच पुढाकार घेतला पाहिजे  या भावनेने स्वार्थत्याग करून कार्यात सहभागी होणार्या व्यक्तींवरच या योजनेचे यश अवलंबून राहील.

No comments:

Post a Comment