Thursday, August 9, 2018

भारतात विदेशी खेळण्यांचा बाजार नको

माझ्या अमेरिकेतील अनुभवाबद्दल सुमारे बारा वर्षांपूर्वी मी Toy Mania in US ( अमेरिकेतील खेळण्यांचे बाजारीकरण)  हा लेख लिहिला होता. त्याची सुरुवातच अशी होती.

Since my visit to USA three years back, I am becoming increasingly restless about the way the toy industry is handling American children. ...

सध्याही हा बाजार जोमाने चालू असून तेथील विद्यार्थ्यांना ह्या मोहमयी दुनियेचे वेड लागले आहे व त्याचा शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे. आता या बाजाराने आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण केले असून भारतात आधुनिकतेच्या  नावाखाली मोठ्या प्रमाणावर त्याने हातपाय पसरविण्यास सुरुवात केली आहे, त्यास वेळीच आवर घातला पाहिजे. अन्यथा आपल्या शेक्षणिक परंपरेचे नुकसान होईल.

अमेरिकेतील खेळण्यांचे जग प्राचीन डायनॊसार, आधुनिक रोबोट वा यंत्रमानव आणि जादूच्या विचित्र मिश्रणातून तयार झाले आहे. याचे एक कारण म्हणजे अमेरिकेला सांगावा असा इतिहासच नाही. सार्‍या जगातून स्थलांतरित झालेल्या  लोकांनी हा प्रदेश व्यापला आहे. विविध देशांतून आपआपल्या संस्कृती घेऊन आलेल्या लोकांना एकसूत्रात बांधण्यासाठी त्यांना प्राचीन डायनोसॉर युगाची व उंदरामांजरांची मदत घ्यावी लागली. त्यातूनच जगप्रसिद्ध डिस्ने लँड निर्माण झाले.  मुलांची संवेदनशील मने अशा काल्पनिक गोष्टीत रमून जातात. याचात फायदा तेथील व्यापारी वृत्तीच्या हुशार लोकांनी घेतला व खेळण्यांचा एक सर्वव्यापी व्यवसाय त्यांनी सुरू केला.

लेखक, कलाकार व संगणकक्षेत्रातील लोकांना यात काम मिळाले. बघताबघता बालविश्वाच्या सर्व क्षेत्रात
या खेळण्यांना फार महत्व प्राप्त झाले. मिकी माऊस, डोनाल्ड डक,  ही मुलांची आवडती जिवंत पात्रे बनली. आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी या खेळण्यांची  विविधप्रकारे प्रसिद्धी करण्याची चढाओढ सुरू झाली. खेळण्यांवर आधारित स्टिकर्स, गोष्टी, पुस्तके, टीव्ही प्रोग्रॅम, सिनेमा,  कपडे, खाद्यपदार्थ यात त्यांचे वेगळे स्तोम बनले. खेळण्यांच्या मोठ्या प्रतिकृती,  हलणारी, बोलणारी यांत्रिक वा खरी पात्रे, मोठी प्रदर्शने यांनी मनोरंजनाचे एक नवे आकर्षक क्षेत्र बनविण्यात आले.
 
खेळ म्हणजे स्पर्धा, संघर्ष, लढाई. मग त्यात यशस्वी होण्यासाठी विज्ञान कल्पनांचा आधार घेत मात्र अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्‍या गोष्टी रचल्या गेल्या. त्यात अभ्यास न करता जादूच्या प्रयोगाने सर्व काही साध्य होऊ शकते निसर्गनियमांवर आपण मात करू शकतो असा विश्वास मुलांच्यात  रुजविण्यात आला. शस्त्रांचा वापर, हिंसा, मोडतोड यांना शॊर्याचे प्रतीक समजण्यात येऊ लागले. स्पायडर मॅन,  हॅरी पॉटर, स्टार वार्स,  गुगलचे "Angry Young Birds",यामुळेच मुलांच्यात आवडीचे झाले आहेत. या गोष्टी वाचून, वा असे खेळ खेळून मुले स्वप्नाळू, विज्ञान म्हणजे जादूचा दिवा आहे असा भ्रम असणारी व विध्वंसात आनंद मानणारी होत आहेत याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.

जादू चालण्यासाठी विशिष्ठ मंत्र लागतो. या मंत्रासाठी नेहमीचे शब्द चालत नाहीत हे सांगण्यासाठी अक्षरांच्या विचित्र जोडणीने केलेले शब्द गोष्टीत सर्वत्र विखुरलेले असतात. मुले ते शब्द पाठ करतात. असे शब्द वापरल्याने त्यांचे शुद्धलेखन बिघडते.

कोठलीही गोष्ट कष्टाशिवाय मिळत नाही. अभ्यास केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. पदार्थ, वस्तू, उर्जा, गती हे अविनाशी निसर्गनियमांनी बांधले गेले आहेत व विज्ञान हे ते नियम शिकण्यासाठी आहे.  विज्ञानकल्पनांचा जादूसारखा वापर करणे म्हणजे आधुनिक युगातील  अंधश्रद्धा आहे.

खेळण्यांचा उद्देश हा मुलांना प्रत्यक्ष जगाचे ज्ञान व्हावे असा असावा, आपला भातुकलीचा खेळ मुलांना आवडतो. ते त्यात स्वयंपाक शिकतात. भोवरा, भिंगरी, गोट्या, कॅरम  यातून हाताचे कॊशल्य वाढते. चेंडू, विटीदांडू, क्रिकेट यांनी व्यायाम होतो.

आरसा, भिंग, दुर्बीण, लगोर, कागदाचे विमान  ही खेळणी विज्ञान समजण्यास उपयुक्त असतात.

साध्या वस्तूंचा उपयोग करून वॆज्ञाननिक खेळणी बनविणे  हा विज्ञान शिकविण्याचा उत्तम उपाय आहे. मुलांची जिज्ञासा वृत्ती वाढीस लागून, निर्मितीकॊशल्य व नवे प्रयोग करण्याची प्रेरणा यातून मिळते. प्रा. भालबा केळकरांनी सुमारे ३० वर्षांपूर्वी सुरू केलेल्या चळवळीला पुन्हा गती देण्याची आवश्यकता आहे.

No comments:

Post a Comment