Saturday, October 31, 2020

वेबसाईटच्या माध्यमातून सामाजिक समरसता

 अमेरिकेत भय  चोरांचे, पोलिसांचे आणि शेजा-यांचेही

 आपण निर्जन ठिकाणी वा जंगलात हिंडताना एखादे श्वापद आपल्यावर हल्ला करेल का अशी एक अनामिक भीती मनात असते. नेमकी त्याच प्रकारची भीती अमेरिकेत राहणा-या स्थलांतरित कुटुंबांत पहावयास मिळते.  पण ही भीती प्राण्याची नसून अनोळखी माणसांची असते. आपले शेजारी कोण आहेत याची माहितीच बहुतेक लोकांना नसते. 

 माझ्या मुलाच्या अपार्टमेंटमध्ये रात्री खिडकीच्या काचेवर दगडासारख्या काही वस्तूचा आघात होऊन काच फुटली. कशामुळे काच फुटली हे पाहण्यासाठी दार उघडायला भीती वाटल्याने त्याने  जवळच्या एका भारतीय कुटुंबाकडे फोन केला. कोणीच येईना पाहून त्याने सरळ पोलिसांना ९११ वरून फोन केला. थोड्या वेळाने दारावर थप थप असा आवाज आला. आता दार उघडावे की नाही या शंकेने त्याने परत पोलिस लाईनला फोन लावला तिकडून सांगण्यात आले की फोन चालू ठेवा आम्ही कळविल्या शिवाय दार उघडू नका. नंतर फोन आला की दार उघडा बाहेर पोलीसच आहेत. 

दार उघडल्यावर पिस्तूल रोखलेले पोलीस आत आले त्यांनी घराचा काना कोपरा व मागची मोकळी जागा तपासली व कोणी न दिसल्याने परत जाऊ लागले तेवढ्यात पुन्हा दारावर थपथप असा आवाज आला पोलिसांनी पिस्तूल रोखतच दार किलकिले उघडले. बाहेर आधी फोन केलेल्या घरातील मुलगा काय झाले विचारायला आला होता. मग पोलिसांनी त्याला सुरक्षित घरी सोडण्यासाठी त्याच्याबरोबर गेले. काच कशाने फुटली याचा शोध लागलाच नाही. दुसरे दिवशी पोलीस पुन्हा येऊन पाहणी करून गेले.  अपार्टमेंटमध्ये १०० ब्लॉक्स असूनही ही स्थिती बाकी कोणालाच समजली नाही. भारतात असे होईल का

बागेत कुत्र्याला घेऊन फिरायला आलेल्या एका महिलेला एक आफ्रिकन माणूस हातात काही वस्तू घेऊन फिरताना दिसला तिने पोलिसांना फोन केला तो माणूस पक्षी निरिक्षणासाठी कॅमेरा घेऊन हिंडत होता असे नंतर समजले.
पोलिसांना काही संशय आला तर स्वसंरक्षणासाठी गोळी घालण्याचे अधिकार असल्याने गैरसमजुतीतूनही एखाद्याची हत्या होते.

 मध्यंतरी एका आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीला खाली पाडून पकडताना त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तो वर्णद्वेषातून  खून झाला असा आरोप होऊन मोठी दंगल उसळली व तिचे लोण अनेक शहरात पसरले. 

भारतातील संवेदनशील व सहयोगी समाज

आपल्याकडे समाजव्यवस्था बरीच सोशीक आणि परस्पर दुःख जाणणारी  असल्याने अनोळखी शहरात वा गर्दीतही लोक परस्परांना मदत करतात.  छोट्या गावात तर सर्व माणसे माहितीची असल्याने सारे गावच कुटुंबासारखे मिळून मिसळून असते. त्यामुळे सुरक्षिततेची व अर्ध्या रात्रीही गरज पडल्यास मदतीसाठी शेजारी धावून येतील अशी खात्री असते. त्यामुळे पोलिसांना बोलाविण्याची वेळच येत नाही.

आपण एखाद्या भिका-याला हाकलले किंवा भीक दिली नाही तर तो काही आपल्यावर हल्ला करीत नाही. मात्र येते तशी भीती लोकांना वाटते. रहायला घर नसणारी माणसे आपल्या देशाप्रमाणेच कोठेकोठे आपला बिस्तारा टाकून असतात. त्यात व्यसनी व हिंसक लोक असणार या समजुतीने अशा लोकांच्या निवारा स्थानांना लोकांचा विरोध असतो.

आपल्याकडे इतक्या झोपडपट्ट्या असून त्यात हलाखीचे जीवन जगणारे लोक असले तरी आपला त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सहानभूतीचा असतो. तेथालच अनेक लोक श्रीमंतांच्या घरी कामास जातात वा कचेरीत नोकरी करतात. अमेरिकेत परवाना असल्याशिवाय असे काम करता येत नाही व बेघर लोकांना कोणीच थारा देत नाहीत. चर्चमध्ये त्याना काही सुविधा मिळतात. काही सामाजिक संघटना त्यांचे पुनर्वसनासाठी काम करतात पण ती संख्या फारच कमी आहे.

विखुरलेली समाजव्यवस्था

एकंदरित पाहता अमेरिकेत मला सारा समाज पूर्णपणे विखुरलेला जाणवतो. प्रत्येक देशातील लोक, व भारतातील लोकांत प्रत्येक प्रांतातील वा भाषा बोलणा-यांचे गट असतात. येथील स्थानिक समाजातही सर्वच लोक बाहेरच्या देशांतून पूर्वी येथे आलेले असल्याने त्यांच्यातही फार विविधता आढळते.

विविधतेतून एकता हे भारतात आपण अभिमानाने सिद्ध करू शकतो मात्र अमेरिकेत हे घडणे फार अवघड आहे. शाळा वा व्यवसायाच्या निमित्ताने लोक एकत्र येत असले आणि ओळखी होत असल्या तरी त्यामुळे भौगोलिक प्रदेशाची फारशी माहिती नसल्याने त्यांना आपल्या भागाविषयी आत्मियता वाटत नाही. शाळेत अशा किटुंबातील मुले जाऊ लागली की त्यांना इतिहास, भूगोल, पर्यावरण, समाज व संस्कृती यांचे शिक्षण मिळू लागते. मग मुलांच्या माध्यमातून समरसतेची वाटचाल सुरू होते यात १०-१५ वर्षांचा काळ संघर्षाचा व अविश्वासाचा जातो.

ज्ञानदीप फौंडेशनमार्फत मी मायसिलिकॉनव्हॅली नावाची वेबसाईट करून सर्वांना स्थानिक इतिहास, भूगोल,पर्यावरणाची तसेच स्थानिक जनतेचे प्रश्न आशा आकांक्षा यांची माहिती देऊन नवे बंध निर्माण करण्याची योजना आखली आहे.

http://mysiliconvalley.net  ही वेबसाईट मी दोन वर्षांपूर्वीच सुरू केली.


 

अजून ही वेबसाईट बाल्यावस्थेत असून येथाल लोकांच्या सक्रीय सहभागाची मी प्रतीक्षा करीत आहे.


यात जर मी यशस्वी झालो तर स्थलांतरितांना एकत्र गुंफण्याचा व त्यांचे स्थानिकांशी नाते जोडण्याचा एक नवा अध्याय सुरू करण्याचा मान ज्ञानदीप फौंडेशनला मिळेल असे वाटते.

No comments:

Post a Comment