ऑटोमोबाईल क्षेत्रातील व्यावसायिक असलेले पाषाणकर बेपत्ता झाले त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत ते आत्महत्या करण्यास जात असल्याचा उल्लेख आहे ही बातमी वाचली आणि माझ्या मनात चर्र झाले. पुण्यात लक्ष्मीरोडवर गोखले हॉलशेजारी पाषाणकर वाडा आहे.
माझ्या लहानपणी म्हणजे १९५०-५५ च्या सुमारास माझी मावशी या भल्या मोठ्या चौसोपी दुमजली पाषाणकर वाड्याच्या आतल्या चौकात माडीवर रहात होती. त्यवेळी पाषाणकर कुटुंब तेथे, तळमजल्यावर रहात होते. माझी पुण्याची आठवण या पाषाणकर वाड्याशी निगडीत आहे. मला या वाड्याचा तसेच आमच्या मावशीच्या दूध डेअरीचा फार अभिमान वाटे. माझ्या साता-यातील बालमित्रांना मी या वाड्याचे वर्णन जणु आपलाच वाडा आहे अशा थाटात सांगत असे. आज त्या आठवणीवर कधी न पुसला जाणारा एक काळा डाग पडला आहे.
तीन पिढ्यांपूर्वीपासून श्रीमंत असणा-या कुटुंबातील तेवढ्याच कर्तृत्ववान उद्योजकाला आत्महत्या करावी लागली हे वाचून अतिशय वाईट वाटले व यासाठी आपला सारा समाजच यास कारणीभूत आहे असे मला वाटले.
सत्यम कॉम्प्युटरचे निर्माते राजू यांच्या आणि कष्टातून मोठे उद्योजक बनलेले डी. एस. कुलकर्णी यांच्या तुरुंगवासाच्या बातम्या ऐकून माझी अशीच अवस्था झाली होती. ते तुरुंगात गेले तेंव्हा लोकांनी लगेच त्यांच्या प्रतिमेला काळे फासले. त्यांचे सर्व कर्तृत्व विलरले गेले.
वालचंद कॉलेजमधील माझे ज्येष्ठ सहकारी प्रा. भालबा केळकर यांची एआरई, काकासाहेब मराठेंची कापडगिरणी, रोहिणी पंप व इतर अनेक उद्योग बंद पडल्यावरही मला असेच वाटले होते.
आज प्रकर्षाने हे जाणवण्याचे कारण म्हणजे मुंबईतील सुशांतसिंग रजपूत याच्या संशयास्पद आत्महत्येवर प्रसारमाध्यमांत, राजकीय व सामाजिक स्तरावर जो भडक प्रचार व शोध चालू आहे आणि टीव्ही, मोबाईलवर सर्वजण त्याच चर्चा करीत आहेत. या गदारोळात पाषाणकरांच्या बातमी केव्हाच लुप्त होईल अशी भीती वाटली. मन खिन्न झाले पण त्यापेक्षाही समाजाच्या व शासनाच्या उद्योगविश्वाकडे पाहण्याच्या संशयी आणि बेफिकीरीच्या दृष्टीकोनाची मनस्वी चीड आली.
राजू, डीएसके यांनी आर्थिक घोटाळे केले व त्यांना शिक्षा होणे योग्य असले तरी त्यामागच्या कारणांचा कोणी बारकाईने शोध घेतला नाही. आपले उद्योग बॅंकांच्या कर्जावर वा लोकांकडून घेतलेल्या पैशांवर अवलंबून असतात. भारतात बॅंक व्याजदर १० ते १५ टक्के असतो लोकांना त्यपेक्षाही जास्त व्याज द्यावे लागते.
शासकीय अधिकारी, उद्योग नियंत्रणाच्या विविध संस्था यांच्या ससेमि-यातून निलटून उद्योग फायद्यात चालवावा लागतो. जरा फायदा जास्त झाल्याचे दिसले की इनकमटॅक्स मागे लागतो. कमी झाल्याचे दिसले की लोक आपले पैसे परत मागतात.
फायदा व तोटा हा मागणी -पुरवठा यापेक्षा स्पर्धकांच्या कामगिरीवर बदलता राहतो. आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्या प्रचंड धनशक्तीच्या जोरावर छोट्या स्वदेशी कंपन्यांना वाढू देत नाहीत. त्या करीत असलेला भ्रष्ठाचार लोकांपर्यंत कधीच येत नाही.
मग मोठ्या उमेदीने स्वतःचा उद्योग सुरू करणारे काही यातही नेटाने लढत राहतात. कामगार संघटना पगारवाढीसाठी संघर्ष करतात. सामाजिक व राजकीय गटही त्यांना साथ देतात.
परिणामी एकतर आर्थिक अफरातफर करून उद्योग वाचविणे, दिवाळे काढणे वा काहीच जमले नाही तर आत्महत्येस प्रवृत्त होणे यापेक्षा य़ा उद्योदकांपुढे दुसरा पर्याय रहात नाही.
अफरातफर करून कुटुंबावर बट्टा लावण्याऐवजी काहीजण आपला जीव देतात. मग लोक हळहळ करतात. पण या परिस्थितीला आपणच कारणीभूत आहोत हे सोयीस्करपणे विसरतात.
मी स्वतः उद्योगाच्या विविध छटा जवळून पाहिलेल्या आहेत. भ्रष्टाचाराला सामोरे गेलो आहे व लोकांची नकारात्मक प्रतिक्रियाही अनुभवली आहे.
आता मात्र वाटते की आपण गप्प बसले तर हे असेच चालू राहणार. निदान उद्योजकासाठी न्याय असा हॅशटॅग लावून ब्लॉग तरी लिहायला काय हरकत आहे.
निदान तो मनाला दिलासा देणारा व निर्धोक पर्याय आपल्या हाती आहे.
ज्ञानदीप फौंडेशनमध्ये माझ्या पूर्वअनुभवाच्या संचितावर मी आता शहाणा झालो आहे. उद्योगाला जगवण्याची वा मारण्याची जबाबदारी अंगावर घेणा-यांना एकत्र करूनच मी उद्योग करणार आहे. सर्वांनीच गुंरवणूक करावी, सर्वांनीच काम करावे जगावे वा मरावेही एकत्रच. जे येतील ते येतील निदान माझी तरी इतर उद्योजकांसारखी अवस्था होणार नाही.
No comments:
Post a Comment