तो काल राजकीय धामधुमीचा होता. कानपूर आयआयटी अमेरिकेच्या अर्थसाहाय्यातून उभी राहिली असली तरी विद्यार्थीवर्गावर पश्चिम बंगालमधील डाव्या कम्युनिस्टांचा पगडा होता. लायब्ररीत येणारी मासिके याच विचाराची असत. संघाचे काही होते पण त्यांची संख्या कमी होती. संपूर्ण क्रांती हे त्यांचे ध्येय होते. डॉ. जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन सुरू झाले होते. डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी शिवाजी विद्यापिठचे माजी कुलगुरू धनागरे त्याच काळात तेथे होते. डॉ. आगरवाल व मलय चौधरी उत्तरप्रदेशातील हिंदीवाले तर प्रभाकरराव, वेंकोबोचार, अय्यंगार, दयारत्नम इत्यादी दक्षिण भारतातीत इंग्रजी बोलणारे, शिक्षकांतही उत्तर दक्षिण आणि कम्युनिस्ट संघवाले असे गट दोते. महाराष्ट्रीय बोकील एकमेव मराठी असून दोन्ही गटांशी मिळवून घ्यायचे ( पुढे प्रमोशनवादात त्यांनी आत्महत्या केली. ) डॉ. आगरवाल यांनाही त्यांच्या फटकळ स्वभावामुळे इतर प्राध्यापकांकडून दूर ठेवले जायचे. ( पुढे डायरेक्टरशिप सोडण्यास ते कारण ठरले हे मला त्यांच्या पत्रावरून कळले. )
मला पहिली टर्म होस्टेलवर काढावी लागली नंतर दोघात एक अशी क्वार्टर्स मिळाल्यावर मी सौ. शुभांगी व अडीच वर्षांची सुमेधा यांना घेऊन बसुराय या बंगाली कुटुंबाबरोबर राहू लागलो. बसुराय मेकॅनिकलमध्ये पीएचडी करत होता व तो पक्का डावा कम्युनिस्ट होता. स्वयंपाकघर व एक खोली आमच्याकडे तर मुख्य हॉल व एक खोली त्याच्याकडे. त्याला आमच्या सुमेधा एवढाच मुलगा होता. आमची राजकीय मते विरुद्ध टोकाची असली तरी घरात आमचा सलोखा असे. विद्यार्थ्यांच्या डायरेक्टरविरुद्ध चळवळी सुरू असत. त्यांच्या रात्री मिटिंगा होत दारू, सिगरेटची व्यसन हा कम्युनिस्टांचा विद्यार्थी आकर्षित करण्याचा मार्ग होता. माझे अगदी जवळचे मित्रही त्याच्या आहारी जाऊन कम्यवनिस्ट बनले होते. आयआयटीत शिस्त राीखम्याचे काम बहुधा आगरवालना करावे लागे. ( पुढे ते विद्यार्थी डीन झाले) त्यांची कडक शिस्त विद्यार्थ्यांना आवडत नसे. दक्षिणेकडील काही प्राध्यापक विद्यार्थ्यांना फूस लावत.
कानपूरमध्ये त्याकाळी अत्यंत गरीबी आणि अत्यंत श्रीमंती असे दोनच गट होते. गुंडगिरी, हत्या या सर्वसामान्य गोष्टी होत्या. आमच्या आयआयटीमध्ये भर सभेत एकाची गोळी घालून हत्या झाली होती. आम्ही ज्या टेम्पोतून कानपूरमध्ये ( १३ किमी अंतरावर ) जायचो त्यावेळी सोबत घन असणारे प्रवासीही असायचे. कोणाला जिवाची पर्वा नसायची. रात्री हैनाच्या टोळ्या बाहेर झोपलेली लहान मुले पळवून न्यायची. मी सुद्धा रात्री लायब्ररीतून घरी येताना हैनांच्या तावडीतून कसाबसा सुटलो होतो.
गंगेच्या काठी झोपडपट्टी, अस्वच्छता आणि गुन्हेगारी यांचे साम्राज्य असे. त्यात सुधारणा करण्याचा आगरवालांचा प्रयत्न असे. डॉ. आगरवाल भोवतालच्या ग्रामीण भागात आम्हाला घेऊन जात. तेथील शाळा व समाजमंदिरे यांचे स्वच्छता व शिक्षण कार्यक्रम यात भाग घेत असू. आयआयटीने एक गाव विकासासाठी दत्तक घेतले होते. दक्षिणेकडील प्राध्यापक यात सहभागी होत नसत. इंग्रजी कमी येणारे व हिंदीचा आग्रह धरणारे म्हणून आपल्याला कमी लेखले जाते व बढतीत डावलले जाते अशी उत्तरेकडील प्राध्यापकांची तक्रार असे.
डॉ. आगरवाल अमेरिकेतून पीएचडी करून आलेले असले तरी त्यांना कॉंम्प्युटर अजिबात आवडत नसे. त्यांनी मला तशी सक्त सूचना दिली होती. कॉंप्युटरच्या उत्तरापेक्षा स्वतः गणित केले तर नीट समजते अशी त्यांची धारणा होती.
मला मात्र तेथील कॉम्प्युटरचे विलक्षण आकर्षण होते. आमच्या घरी संध्याकाळी माझे मराठी मित्र येत असत. त्यापैकी बहुतेकांचे काम कॉम्प्युटरवर असे. त्यांच्या मदतीने डॉ. आगरवालांच्या न कळत रात्री मी कॉम्प्युटर लॅबमध्ये जाई. आमच्या शेजारी आठवले म्हणून एक कुटुंब होते. मिसेस आठवले कॉम्प्युटर लॅबमध्ये नोकरीस होत्या त्यांच्या ओळखीने मला तेथे प्रवेश मिळाला. कार्ड पंच करून प्रत्येक वाक्यासाठी एक कार्ड असा प्रोग्रॅमसाठी कार्डांचा गठ्ठा गिरणीत दळण टाकतो तसा कॉम्प्युटर लॅबमध्ये दिला जाई. सर्व विद्यार्थ्यांचे गठ्ठे एकत्र करून रात्री कॉम्प्युटर चालू केला जाई दुसरे किंवा तिसरे दिवशी कार्ड गठ्ठा आणि कॉम्प्युटर कागदाची भेंडोळी आम्हाला मिळत. चिकीचे कार्ड पुन्हा पंच करून गठ्ठा द्यावा लागे. एक चूक झाली तरी कोरे कागद मिळतात हे पाहून काहीजण मुद्दामच चुका करायचे. हे लक्षात आल्यानंतर प्रोग्रॅम चेक करण्यासाठी वेगळ्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली.
डॉ. जी. डी. आगरवालना प्रयोगशाळेत वा सैद्धांतिक विषयावर संशोधन करणे आवडत नसे. ग्रामीण भागात नारळाच्या कवचाचे तुकडे वापरून ड्युएल मिडीयाचे फिल्टर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर श्री कर्डिले य़ांनी नाशुकमध्ये उभारले होते. उत्तर प्रदेशात मुबलक प्रमाणात मिळणा-या जर्दाळू ( खूबानी)च्या तुकड्यांचा वापर करून असा फित्टर करण्याचे डॉ. आगरवाल यांनी सुचविले. त्याप्रमाणे मी प्रायोगिक फिल्टरवर संशोधन केले व पेपर प्रसिद्ध केला. परदेशात अॅंथ्रासाईट या उच्च दर्जाच्या कोळशाचा वापर ड्युएल मिडियासाठी होतो हे आम्हाला माहीत होते पण तो भारतात उपलब्ध नव्हता. उत्तरभारतात कमी प्रतीचा दगडी कोळसा घराघरात वापरला जात असल्याने व त्याच्या धुरामुळे हवाप्रदूषणाचा प्रश्न चर्चेत असल्याने आमचे लक्ष या दगडी कोळशाच्या भौतिक गुणधर्माकडे गेले आणि त्याचा उपयोग फिल्टरसाठी योग्य ठरेल असे प्रयोगाने सिद्ध झाले.
मग डॉ आगरवालनी कानपूरमधील वाटरवर्क्समध्ये मला अभ्यास करण्यास सांगितले. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे रोज सकाळी मी कानपूर वाटरवर्क्सवर जाऊन डबा घेऊन जात असे आणि तेथील सर्व यंत्रणेचा अभ्यास व पाण्याच्या नमुन्यांचे परिक्षण करीत असे. दुपारी फिल्टरहाऊसमध्ये कामगारांबरोबरच डबा खाणे होई. दिवसभर तेथील कामगार, केमिस्ट आणि इंजिनिअर यांच्या संपर्का राहिल्याने मला तेथील सर्व तांत्रिक तसेच सामाजिक परिस्थितीचे पूर्ण आकलन झाले. कामगारांची हलाखीची परिस्थिती मी जवळून पाहिली आहे. डब्यात सातूची भाकरी कांदा व ओली हरभरा डाळ, व मिरची यावर त्यांची भिस्त असे. इंजिनिअर त्यांना राबवून घेत.
तेथील मुख्य इंजिनिअर श्री. वाय. डी. मिश्रा अतिशय कडक शिस्तीचे पण प्रसिद्धीस महत्व देणारे होते. रोज सकाळी सर्व प्लॅंटवर माझ्याबरोबर ते फेरी मारत.स्वच्छता राखत. त्यांचे घर आतच होते. घरातील सर्व कामे तेथील कर्मचारीच करत. मिश्रा बाहेरच्या पाहुण्यांना मुदाम बोलावत माझी ओळक करून देत. तेथे गंगा नदीचे तसेच गंगा नदीच्या लोअर कॅनालमधून असे दोन प्रकारचे पाणी येत असे. दोन मोठे साधे सेटलिंग टॅंकमधून निम्मे पाणी पाच स्लो सॅंड फिल्टरमध्ये व निम्मे पाणी फ्लॉक्युलेटरवाटे मेकॅनिकल फिल्टर हाऊसमध्ये घेतले जात असे. तुरटीच्या लाद्या टाकून गाळ फिल्ट्रेशनपूर्वी वेगळा केला जाई पाणीपुरवठ्याची मागणी वाढत असल्याने शुद्धीकरण व्यवस्थेत वाढ करण्याची गरज होती. त्यांनी मला एका रॅपिड सॅंड फिल्टर बेडचे ड्युएल मिडिया फिल्टर करण्यास संमती व प्रोत्साहन दिले.
डॉ. आगरवालना हे हवेच होते. त्यांनी कानपूरच्या पंकी पावरहाऊसमध्ये रोज वापरली जाणारी एक ५५टन दगडी कोळशाची वॅगनच प्रयोगासाठी मिळवून दिली. कोळशाची भुकटी कशी करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी नजीबाबाद येथील कथ्था ( कात) फॅक्टरी पहायला मी गेलो. हॅमरमिलमध्ये सुधारणा करून भुकटीतील कणांचा आकार निश्चित करता येतो हे मला तेथे समजले. हा कोळसा मिळविणे. त्याची ट्रकने वाहतूक करून कानपूरमधील सुरखी ( विटांची भुकटी) करणा-या एका कारखान्यात हा कोळसा नेणे तेथील क्रशरमध्ये बदल करून चुरा तपासणे व नंतर कोळशाचा चुरा चाळून आवश्यक त्या आकाराचे कण असणारा १७ टन कोळसा करताना मला खूप शिकायला मिळाले. तेथील लोकांचे वागणे, बोलणे त्यांचे प्रश्न समजू लागले. तेही सर्व लोक आयआयटीतील संशोधक म्हणून मला मान देत.
No comments:
Post a Comment