Saturday, October 17, 2020

घटस्थापना आयटी क्षेत्रातील सहकारी चळवळीची

 


सध्या सहकारी संस्थांतील भ्रष्टाचाराबद्दल सर्वत्र बोलबाला होत आहे. अशा भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणून आपणाकडे जनमत खेचण्याची चढाओढ विविध प्रसारमाध्यमे, राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांच्यात सुरू झाली आहे. लोकशाहीतील सत्ता संपादनाचा हा एक राजमार्गच बनला आहे. मात्र याचा एक परिणाम म्हणून सहकारावरचा लोकांचा विश्वास उडू लागला आहे व लोक खाजगी उद्योगांकडे आकर्षित होत आहेत. 

खाजगी उद्योग व सेवासुविधांच्या आकर्षक जाहिराती, त्यांची दिमाखदार दुकाने, तत्पर सेवा यामुळे खाजगी सेवासुविधा व वस्तू खरेदी करण्याकडे सर्वसामान्य जनतेचा कल वाढू लागला आहे. सहकारातून मोठे झालेले राजकीय नेतेदेखील छुप्या पद्धतीने खासगी उद्योगांना प्रोत्साहन देत आहेत व असलेल्या सहकारी उद्योगांचे झपाट्याने खाजगीकरण होऊ घातले आहे. 

पुरेशी आर्थिक तरतूद न करताही विकास प्रकल्प राबविणे त्यांना बीओटी सारख्या योजनांतून शक्य होत असल्याने शासकीय व निमशासकीय यंत्रणा सहकारी संस्थांपेक्षा खाजगी व्यावसायिकांना विकास कामात सहभागी करण्यात अधिक रुची दाखवीत आहे. खाजगी उद्योग हा नफा हे एकमेव उद्दीष्ट ठेऊन चालविला जातो. त्यात कोणत्याही भल्याबुर्‍या मार्गांचा अवलंब झाला तरी त्या सर्व व्यवहारांवर गुप्ततेचे भक्कम आवरण असते. त्यातील उच्च पातळीवरील भ्रष्टाचार कधीच लोकांसमोर येत नाही. 

खाजगी उद्योगातील कर्मचारी मालकाच्या वा व्यवस्थापनाच्या कडक नियंत्रणाखाली असतात. कार्यक्षमतेवर त्यांचे वेतन अवलंबून असते व ही कार्यक्षमता नफ्याच्या संकल्पनेशी निगडित असते. नोकरी व वेतन हे मालकाच्या मर्जीवर अवलंबून असल्याने कर्मचार्‍यांवर वरिष्ठांचे सतत दडपण असते. उद्योग व्यवस्थित व फायदेशीर चालण्यासाठी आवश्यक असले तरी त्यात जास्त यांत्रिक गुलामगिरीचा प्रत्यय येतो. असा उद्योग म्हणजे एक सामर्थ्यवान यंत्र बनते व आपल्या फायद्यासाठी ते काहीही करावयास कचरत नाही. 

सहकारी उद्योगाचे असे होऊ शकत नाही. सकारी उद्योगाची उभारणीच मुळी उत्पादक, ग्राहक वा कष्टकर्‍यांच्या सामुहिक प्रयत्नातून झालेली असते. त्यातील प्रत्येक सभासदाला माहिती मिळविण्याचा, तक्रार करण्याचा वा कोणत्याही निर्णयास विरोध करण्याचा अधिकार असतो. सहकारी उद्योगातील सत्ताधार्‍यांनाही आपले निर्णय निदान आपल्या गटातील सभासदांच्या संमतीने घ्यावे लागतात. त्याविषयीची पारदर्शकता खाजगी उद्योगापेक्षा निश्चितच मोठी असते. शिवाय़ सभासद गट्बदल करू शकत असल्याने त्यात गुप्तता राहू शकत नाही. निवडणुकीत सत्ता जाण्याची भीती असल्याने लोकोपयोगी कामे व योजना अमलात आणण्याशिवाय गत्यंतर नसते. तरीही सत्तेच्या अंगभूत गुणधर्मामुळे सत्ताधीश भ्रष्टाचार करतात. मात्र सहकाराच्या लोकशाही प्रक्रियेत ते सत्ताभ्रष्टही होतात. विरोधक सत्तास्थानी आले तरी काही काळाने पुनः चक्र फिरते व सत्ताधारी व विरोधक यात अदलाबदल होतो. मात्र या सर्व प्रक्रियेत लोकशाही प्रबळ ठरते. 

उद्योगाचा लाभ सर्व सभासदांपर्यंत पोहोचण्याची क्रिया कळत नकळत अबाधित रहाते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सहकाराचे अध्वर्यु डॉ. वसंतदादा पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून शेती,व्यापार व शिक्षण या क्षेत्रात महाराष्ट्रास आघाडीचे स्थान मिळवून दिले. त्याची आठवण ठेवून सध्याच्या नेत्यांनी आपली व शासनाची खाजगीकरणाकडे वळलेली पावले पुनः सहकाराकडे वळवून उद्योगात सहकाराचे स्थान भक्कम करावे असे वाटते.

सहकाराचे शुद्धीकरण आवश्यक आहे. त्यात लक्ष घालून आवश्यक ते निर्णय घ्यावेत उद्योगात प्रवेशबंदी करू नये वा आजारी सहकारी उद्योगांचे खाजगीकरण करू नये उलट सहकाराला प्रत्येक विकास प्रकल्पात कसे समाविष्ट करता येईल याचा विचार करावा असे वाटते. लोकशाही रक्षणासाठी सहकार हा आवश्यक आहे. साम्यवादी विचारसरणी व भांड्वलशाही विचारसरणी या दोन्ही व्यवस्थांतील चांगले एकत्र करून सहकार प्रणाली विकसित झाली आहे.त्यास सध्या लागलेले खाजगीकरणाचे ग्रहण सुटण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. असे झाले तरच आपण आपली लोकशाही खर्‍या अर्थाने जतन करू शकू.

राजकीय क्षेत्रात खाजगी उद्योगांनी आपली पाळेमुळे भक्कम रोवली असून सर्वच पक्षांतून सहकारी चळवळ नष्ट करण्याचे व खाजगी उद्योगास पाठबळ देण्याचे कार्य केले जात आहे. निकोप लोकशाहीच्या दृष्टीने हे अत्यंत घातक आहे. सहकारातील अंगभूत लोकशाहीला सशक्त करण्यासाठी समाजसेवी लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे व प्रत्येक पक्षात सहकाराचे महत्व पुनर्स्थापित केले पाहिजे.

ज्ञानदीप फौंडेशनने आय. टी. क्षेत्रात सहकाराचे नवे युग सुरू करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचे ठरविले आहे. यात सर्व संगणक अभियंते आणि छोट्या संस्था सक्रीय सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. 

एकमेका साह्य करू

अवघे धरू सुपंथ

 असे म्हटले जाते

त्यापुढे जाऊन एकत्रित संघशक्तीने बलाढ्य कार्पोरेट कंपन्यांवर विजय मिळविण्याचा येत्या विजयादशमीनिमित्त संकल्प करूया. 

- डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

No comments:

Post a Comment