Friday, October 16, 2020

स्वयंउद्योगाविषयी कृतीशून्य जाहिरात


स्वयंउद्योग सुरू करण्यासाठी सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. तरी फारच थोडे आणि भक्कम आर्थिक पाठबळ असणारे याचा विचार करतात. अत्यंत कल्पक व हुषार विद्यार्थ्याच्याबाबतीतही पालक विद्यार्थ्याला चांगली नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगतात. कारण शिक्षणासाठी खर्च केलेला पैसा त्यांना परत मिळवायचा असतो. याउलट उद्योग काढण्यासाठी जागा, दुकान, कर्मचारी, यंत्रयामुग्री, कच्चा माल आणि विक्रीची व्यवस्था यासाठी फार मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते.
बॅंकांकडून कमी व्याजाने कर्ज मिळत असले तरी त्यासाठी तारण लागते. शिवाय ते कर्ज वेळेवर फेडता आले नाही तर व्याजावर व्याज वाढून उद्योग अडचणीत येतात. शिवाय पदवी मिळविलेल्या विद्यार्थ्याकडे ज्ञान असले तरी अनुभव नसतो. आंतरराष्ट्रीय बलाढ्य कंपन्या अशा छोट्या उद्योगांना सहज चिरडून टाकू शकतात. याचा अर्थ कोणीच उद्योग सुरू करू नयेत का. मग आत्मनिर्भर भारताची वाटचाल परदेशी कंपन्यांच्या गुंतवणुकीवरच अवलंबून राहणार का याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.
 आपल्याकडे दुष्काळ पडला की गावातल्या प्रत्येक घरातून दूध आणून शंकराच्या देवळातील गाभारा भरण्याची जुनी प्रथा होती. असे केले की देव प्रसन्न होऊन सर्व गावाच्या शेतीस पुरेल एवढा पाऊस पाडेल अशी श्रद्धा या रूढीमागे होती. याला अंधश्रद्धा म्हणा हवे तर, पण या प्रथेने एक महत्वाचा संदेश सर्वांच्या मनात दृढ होई. तो म्हणजे स्वार्थत्यागाचा व सर्वांनी एकत्र काम करण्याचा. असे केले तरच यश मिळू शकते. 'स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही' अशी म्हण आहे ती 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' या भोळ्या समजुतीवर प्रहार करणारी आहे.
स्वयंउद्योग सुरू करण्यासाठी सरकारने वा कोणी उदार धनवानाने पैसा उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षा बाळगली तर ते केवळ दिवास्वप्न ठरण्याचीच शक्यता असते.
त्यामुळेच स्वयंउद्योग करण्यासाठी लागणारे भांडवल सहकारी तत्वाने सभासदांनीच उभारावे. उद्योगासाठी एकमेकांना मदत करावी. ' एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ ' या उक्तीप्रमाणे कार्य करावे असे ज्ञानदीप फौंडेशनने ठरविले आहे. त्यामुळे उद्योग सुरू करण्याची इच्छा असणा-या व्यक्तींनी भांडवल उभारणीत भाग घेणे आवश्यक ठरविले गेले.

कृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर तोलून धरला तरी सर्व गुराख्यांनी आपापल्या काठ्यांचा आधार त्यसाठी दिला होता. त्याचप्रमाणे ज्ञानदीप फौंडेशनने आपला सार्वजनिक संस्थात्मक दर्जा आणि गेल्या पंधरा वर्षांत केलेल्या कार्याचा स्थायी आधार देऊ केला तरी प्रत्यक्षात उद्योग सुरू करणा-या सदस्यांनीच सारे भांडवल उबे करावयाचे आहे.

त्यामुळे ज्ञानदीपचा हा प्रकल्प सभासदांच्या सक्रीय सहभागातूनच साकार होणार असून तूझा तू वाढवी राजा अशीच भुमिका ज्ञानदीपची राहणार आहे. साहजिकच कोणत्याही अडथळ्याविना धीम्या गतीने पण स्वबळावर त्याचा कार्यविस्तार होणार आहे. सुदैवाने आवश्यक तेवढे आजीव सभासद मिळविण्यात फौंडेशन यशस्वी झाले असल्याने प्रकल्पाची स्थायी स्थापना तर झाली आहे. ज्यांना या संधीचा फायदा घ्यावयाचा असेल त्यांनी www.dnyandeep.net या वेबसाईटवर आपली नावे नोंदवावी व या प्रकल्पात सामील व्हावे ही विनंती.   – डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप फौंडेशन, सांगली  

No comments:

Post a Comment