पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट किंवा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था यामध्ये ट्रस्टी कंवा विश्वस्त यांच्यावर संस्थेचे पालक म्हणून फार मोठी जबाबदारी असते. नावातील सार्वजनिक शब्द व्यवहारातील पारदर्शकता तर धर्मादाय हा शब्द समाजोपयोगी कार्य यांचे निदर्शक आहेत. भारतात सर्व शैक्षणिक संस्थांची नोंदणी सार्वजनिक विश्वस्त संस्था आणि सहकारी संस्था ( सोसायटी अॅक्ट) म्हणून करावी लागते. शिक्षण संस्थेच्या उद्देशास हे अनुरूपच आहे.
प्रत्यक्षात असे दिसते की आज बहुतेक सर्व सहकारी संस्था खाजगी उद्योगासारख्या चालविल्या जातात व विश्वस्तांना आपणच मालक असल्यासारखे वाटते. साहजिकच स्वतःच्या फायद्यासाठी मनमानी निर्णय घेणे, निर्णय प्रक्रियेत कमालीची गुप्तता पाळणे, खोटे इतिवृत्त लिहिणे, आर्थिक उलाढालींची माहिती सभासदांपासून लपवून ठेवणे अशा गोष्टी घडतात. नामांकित सहकारी उद्योग, बॅंका, शिक्षणसंस्था या संस्थांमध्ये होत असलेले घोटाळे कोणीतरी तक्रार केल्याशिवाय लोकांच्या लक्षात येत नाहीत. सत्तेचे राजकारण यातूनच जन्मास येते. मग सभासदांचे गट करून आर्थिक घोटाळ्यांचे आरोप करून सत्ता काबीज करण्याची कारस्थाने सुरू होतात. यदाकदाचित विरोधी गटाला यात यश आले की पुन्हा जुन्या सत्ताधारी पक्षाच्या पावलावर पाऊल टाकून तशाच प्रकारे शिरजोरीने संस्था चालविली जाते.
सर्वसामान्य सभासदाला या साठमारीत पडण्याची भीती वाटते. सत्ताधा-यांनाच खूष करून आपले काम करता येते का यासाठी त्याचे प्रयत्न असतात. बंडखोर सभासदांना वठणीवर आणण्यासाठी बळाचाही वापर केला जातो. अनेकांचा विरोध सुरू झाला की त्याला हिंसक वळण लागते आणि मूळ प्रश्नाऐवजी सामाजिक सुरक्षेचा मुद्दा महत्वाचा ठरतो.
या सर्व गदारोळात सहकारी संस्थेचा उदात्त हेतू केव्हाच लुप्त होतो आणि मग लोक खाजगी उद्योगास पसंती देऊ लागतात. मोठे आंतरराष्ट्रीय उद्योग याचा फायदा घेतात.
या सर्वांवर उपाय म्हणजे पब्लिक ट्रस्ट कायदा अधिक कडक करणे. निनावी तक्रारीचीही दखल घेऊन तपासणी करणे आणि वार्षिक आर्थिक ताळेबंद सभासदांना उपलब्ध करून देणे ह्या गोष्टी करणे आवश्यक आहे.
सहकारी संस्था, शिक्षणसंस्था व आंतरराष्ट्रीय संस्था यांचेबाबतीत मला स्वतःला आणि ज्ञानदीपला अशा अनेक हानीकारक प्रसंगांना तोंड द्यावे लागले आहे. तरीदेखील सर्व पर्यायांचा विचार करता सहकारी संस्था याच लोकशाहीची खरी जपणूक करू शकतात असा मला विश्वास वाटतो. त्यामुळेत जनतेला व शासनाला निकोप सहकारी चळवळीचे महत्व पटवून देण्याची गरज आहे.
ज्ञानदीप फौंडेशनने ज्यावेळी सहकार तत्वावर आयटी उद्योग सुरू करण्याची कल्पना मांडली त्यावेळी सहकाराविषयी लोकांच्या मनात असणारी नकारात्मक अढी काढण्याचे काम सर्वप्रथम करणे आवश्यक वाटल्याने मी हे विचार मांडले आहेत. डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.
No comments:
Post a Comment