श्री. गजानन वीव्हिंग मिल्सची स्थापना १९०८ साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या प्रेरणेने झाली. लो. टिळकांनी सर्व राष्ट्नला स्वदेशीची हाक दिली. निदान अन्न व वस्त्र याबाबत तरी आपण स्वावलंबी झाले पाहिजे या हाकेला प्रतिसाद देऊन उद्योगरत्न धनी वि. रा. तथा दादासाहेब वेलणकर यांनी या मिलची स्थापना केली. दादासाहेब त्यावेळी ज्यु. इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होते. त्यांनी स्कूल सोडले व ते बडोद्याच्या कलाभुवनमध्ये हजर झाले. तेथील अभ्यासक्रम संपवून ते कलकत्त्याला गेले. तेथे त्यांनी वीव्हिंगची कला आत्मसात केली.
१९०८ साली लिंबाला स्वत:च्या राहत्या घरी त्यांनी हातमागाचा कारखाना सुरू केला. व्यापारी ज्ञानाच्या अभावामुळे त्यांचा हा कारखाना बुडाला. हातमागात आपण यशस्वी होणार नाही हे ओळखून, बाजाराची गरज लक्षात घेऊन १९०८ ते १९१२ सालापर्यंत त्यांनी यंत्रमागाचे सर्व शिक्षण आत्मसात केले. १९१२ मध्ये त्यांनी पुण्याला अॅग्र`ीकल्चरल कॉलेजजवळ श्री. भट यांच्या सोप्यात यंत्रमागाचा कारखाना सुरू केला. पण १९१४ साली पहिले महायुद्ध सुरू झाले. क्रेडिट स्प्मिमुळे भट सावकार पैसे परत मागू लागले. त्यावेळी मदतीसाठी ती. दादासाहेबांनी सांगलीच्या राजेसाहेबांकडे धाव घेतली. सांगलीला कारखाना आणायच्या अटीवर राजेसाहेबांनी मदत मान्य केली. अशाप्रकारे १९१४ साली या कारखान्याने सांगलीत पदार्पण केले.
या कारखान्यात महाराष्ट्र पद्धतीच्या साड्या व लुगडी बनू लागली. डब्लिंगचे मर्सराइज्ड व जर्मन इंडार्थीन कलर वापरून रंगीत फॅशनेबल साड्या सांगलीत तयार होऊ लागल्या. उत्तम किनारी, भरदार पदर , व रास्ता, झेब्रा, चौकडा वगैरे अंगभरणीच्या साडया लोकप्रिय झाल्या. लांबी-रूंदीची खात्री, फॅशनेबल हलके सुंदर रंग व मनमोहक किनारी यामुळे बेंगलोरपासून इंदौरपर्यत या मालाला मागणी येऊ लागली. आंतरप्रांतीय कीर्ति मिळवून व प्रगतीचा हिमालय उभा करून हा सांगलीतील पहिला यशस्वी कारखाना सर्व भारतभर प्रसिद्ध झाला. श्री. गजानन मिल्सचे नाव सर्वतोमुखी झाले.
तीन मागांचे तीनशे माग झाले. आठ हजार स्पिंडल्स सुरू झाल्या. १९४० पासून हा कारखाना सुताच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. ग्राहकांच्या कृपेमुळे हा एवढा मोठा प्रकल्प यशस्वी झाला.
ऑगस्ट १९३५ मध्ये दादासाहेब जपानला गेले. तेथून आर्टिफिेशयल सिल्क विणणारे माग व मागाच्या संदर्भातील यंत्रे आणून जोडली. १९३६ साली वल्कली (आर्टिफिेशयल सिल्क) कापडाचा कारखाना सुरू केला व परदेशातून आवक होणार्या कापडास प्रतिबंध करणयाचा प्रयत्न केला.
या समाजाचे उपकार फेडावे या उद्देशाने १९ जानेवारी १९४७ या दिवशी उद्योगरत्न दादासाहेबांनी स्वत:ची सुवर्णतुला करून त्या सोन्याच्या रकमेचा दानधर्म केला. त्यातून तीन ट्न्स्ट निर्माण केले. या ट्न्स्टमधून दरसाल दोन लाख रूपयांचा दानधर्म होतो.
हा कारखाना १९४८ साली गांधीहत्येनंतर झालेल्या जनक्षोभाला बळी पडला. त्यात सर्वस्वाचे नुकसान झाले. संपत्ती, कीर्ति व तपश्चर्या या सर्वांची राख झाली. तथापि दादासाहेबांनी अलोट धैर्याने पुन्हा कामाला सुरूवात केली. अग्निप्रलयातून सावरून हा कारखाना लोकसेवेचे कार्य पुन्हा त्याच उमेदीने व जोमाने करू लागला.
७ नोव्हेंबर १९५३ रोजी श्री. गजानन मिलची संपूर्ण मालकी दादासाहेबांनी रामसाहेबांच्या ताब्यात दिली. १९५४ मध्ये पॉवरलुम्सच्या साड्यांच्या उत्पादनावर सरकारने बंदी घातली. त्यामुळे परिश्रमपूर्वक बसविलेले साड्यांचे उत्पादन बंद करावे लागले व साड्यांचे मार्केट सोडावे लागले. अशा अवघड परिस्थितीतून प्रयत्नांची पराकाष्ठा करून रामसाहेबांनी हळूहळू धोतरनिर्मितीच्या धंद्यात पदार्पण केले. अचूक व्यवस्थापन कौशल्य व दूरदृष्टी ठेवून केलेल्या नियोजनाने मा. रामसाहेबांनी मजबूत अशी व्यावसायिक व आर्थिक बळकटी आणली.
No comments:
Post a Comment