Saturday, June 27, 2020

आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थकारण आणि भारतीय समाज

गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा काही घटना घडल्या की त्यामुळे भारतातील राजकीय व सामाजिक संस्था यांच्या भूमिका, नेत्यांचे बोलणे आणि करणे यांचा विलक्षण गोंधळ झाला.  कोरोनाचे सा-या जगावर आक्रमण, अमेरिकेतील वर्णद्वेषाची घटना, एच वन बी व्हिसा बंदी, चीनची सीमेवर घुसखोरी आणि आपल्या शूर सैनिकांचे बलिदान या एका पाठोपाठ येणा-या बातम्यांमुळे एरवी शांत सामंजस्याने व्यवहार करणारा भारतीय समाज खवळून उठला.

चीनवर बहिष्कार टाकून चिनी वस्तू वापरणे बंद करा, चीनचे भारतात चालणारे व येऊ घातलेले फार मोठ्या गुंतवणुकीचे प्रकल्प रद्द करा. अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपन्या व त्यांच्यामार्फत भारतात येणारी यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान व ग्राहकोपयोगी सामानाची आयात बंद करा अशी आग्रहाची मागणी सत्ताधारी व विरोधक दोन्ही पक्षांतील राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून शासनाकडे करण्यात आली.

मात्र भारताच्या केंद्र व राज्य सरकारांनी याबाबत त्वरीत कार्यवाही करण्यास  स्पष्टपणे न सांगता चालढकल करण्याचे धोरण अवलंबले. सर्वसामान्य जनतेला या नाकर्तेपणाची मनस्वी चीड आली. आपल्याच पक्षाचे सरकार असूनही सत्ताधारी आपले ऐकत नाहीत अशी भावना निर्माण झाली.

मात्र शासनाने असे का केले याबाबत मात्र फारसे कोणी बोलले नाही वा त्यांच्या या धीमेपणाने गोष्टी हाताळण्याच्या मागील कारणपरंपरा जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.

भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक हितसंबंध गुंतलेले असतात. आयात बंद केली तर निर्यातीला धक्का पोहोचतो. प्रकल्प रद्द केले तर विकास थांबतोच शिवाय कमी खर्चात प्रकल्प करण्याऐवजी मोठ्या पर्यायी परदेय़ी प्रकल्पाची निवड करावी लागते व त्यात मोठा तोटा होतो. सत्तेचा समतोल आपल्या बाजूने राहण्यासाठी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने  कोणत्याही परकीय राष्ट्राबाबत एकाच वेळी शत्रू व मित्र असे दोन्ही संबंध ठेवावे लागतात.

अमेरिकेने स्थानिक लोकांचा निवडणुकीत पाठिंबा मिळविण्यासाठी घाईघाईने जे निर्णय घेतले त्याची जबर किंमत त्या देशाला भविष्यकाळात चुकवावी लागणार आहे.

मी आपले राज्य वा केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन करीत नाही. तर केवळ असे निर्णय घेण्याची कारणे, देशाचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील स्थान, देशातील उद्योगांना लागणारी सुट्या मालाच्या आयातीची गरज आणि भविष्यातील आर्थिक लाभ व विकास गती कायम राखण्याची गरज यावर अवलंबून असतात. हे सर्वांनी समजून घ्यावे व समाजस्वास्थ्य नष्ट करण्याच्या वा दुही पाडण्याच्या आंदोनांपासून दूर रहावे यासाठी माझे हे विचार आपणापुढे मांडत आहे.

No comments:

Post a Comment