सध्या गुगल हे आपल्या सर्वांचे आवडते, सोपे आणि नाद लावणारे शोधयंत्र झाले आहे. कोणतीही माहिती पाहिजे असल्यास आपण गुगल वापरतो. तशी इतरही अनेक शोध यंत्रे आहेत पण गुगलची सर कोणालाच येणार नाही. मात्र हे गुगल म्हणजे एक भुलभुलैया आहे. माहिती बघताबघता तुम्ही दुस-याच कोठल्यातरी आकर्षक जाहिरातीकडे आकर्षित होता. त्यावर क्लिक केले की काही वस्तू वा सेवा विकत घेण्याची इच्छा होते.
म्हणजे आपण गुगलवर एकाचा शोध घेत असतो मात्र प्रत्यक्षात ती माहिती न बघता आपण त्यात जाहिरात देणा-या कंपन्यांचे ग्राहक बनतो.
गुगल जाहिरातीच्या या लोकप्रियतेमुळे बहुतेक व्यापारी व व्यावसायिक आपल्या जाहिरातींसाठी गुगल अॅड वापरतात. गुगलला यातून प्रचंड पैसा मिळतो.
प्रत्येक क्लिकचा आणि प्रत्यक्ष विक्रीचा हिशोब देऊन गुगल कंपन्याकडून पैसे गोळा करते.
ज्ञानदीप फौंडेशनने अनेक शैक्षणिक वेबसाईट, मोबाईल अॅप केले व त्याचा वापरही लाखांच्या घरात आहे. पण त्यातून काही अर्थप्राप्ती होत नसल्याने गुगलच्या जाहिरात योजनेचा फायदा घ्यावा असा विचार केला व जाहिराती देण्यास गुगलला संमती दिली. मात्र गुगलच्या जाहिराती परदेशी मालाच्या व सेवासुविधांच्याच असल्याचे व ज्ञानदीपच्या ध्येयधोरणाशी विसंगत असल्याचे निदर्शनास आले. शिवाय अनेक जाहिराती फसव्या, अतिरंजित फायद्याचे आमिष दाखविणा-या, चैनीस उत्तेजन देणा-या व प्रसंगी असंस्कृत पद्धतीच्या असल्याचे आढळून आले.
आर्थिक लाभाच्या दृष्टीनेही जागरूक ग्राहकांनी जाहिरातींकडे दुर्लक्ष केल्याने व गुगलच्या आकडेवारीतील चलाखीमुळे फारशी मिळकत होत नव्हती. माहिती पाहण्यामाठी आलेल्या विद्यार्थी व इतर लोकांना या जाहिरातींचा त्रास होत होता. शिवाय अशा जाहिरातींमुळे वेबसाईटचा उद्देश सफल होत नव्हता.
त्यामुळे न्र्धार करून या गुगलच्या मोहजालातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
आता केवळ भारतीय उत्पादनांच्या आणि सेवासुविधांच्या विधायक स्वरुपाच्या जाहिराती देण्याचे ज्ञानदीपने ठरविले आहे. सर्वांच्या सहकार्याने यातही यश मिळेल अशी आशा आहे.
No comments:
Post a Comment