Friday, June 5, 2020

प्रदूषण नियंत्रण शिक्षणाची गरज

शासनाने पर्यावरण शिक्षण हा विषय सर्व शॆक्षणिक स्तरांवर आवश्यक ठरवला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेत पर्यावरण प्रदूषणाबद्दल जागरुकता निर्माण झाली आहे. तसेच पर्यावरण रक्षणासाठी संघटितपणे कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

अनेक पर्यावरण विषयातील शास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते याबाबतीत पुढाकार घेऊन स्वच्छता, वॄक्षसंवर्धन, वन्यप्राणी संरक्षण यासारखे विधायक कार्य करीत आहेत.

मानवाच्या प्रगतीसाठी पर्यावरणाचा र्‍हास न होता विकास कसा साधता येईल या विषयावर सार्‍या जगात संशोधन सुरू आहे.

लोकसंख्या वाढ व शहरीकरण यामुळे आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्यावर वेळीच उपाययोजना होण्याची गरज आहे. उद्योगधंद्यांची वाढ, पायाभूत सुविधांची उभारणी, दळणवळण आणि उर्जानिर्मिती यामध्ये अपेक्षित वाढ झाली नाही तर बेरोजगारी, गरीबी, वर्गकलह व यादवी माजून राष्ट्राची अधोगती होण्यास वेळ लागणार नाही.

उद्योगाची उभारणी करायची तर जमीन, पाणी व विजेची उपलब्धता, रस्ते वा रेल्वे मार्ग यांची आवश्यकता असते. जमीन पडीक असली तरी त्याचा गुरांना चारा मिळण्यासाठी उपयोग होत असतो. वनजमीन असली तर वनखात्याची संमती मिळवावी लागते. तसेच वॄक्षतोड अपरिहार्य असते. शेतजमीन असेल  शेतकरी विस्थापित होतात व त्यांना पर्यायी जमीन द्यावी लागते. पाण्यासाठी धरणे बांधावी लागतात. कोळसा, तेल वा वीजनिर्मितीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी लागते. या सर्व गोष्टींमुळे पर्यावरणाची हानी होते. याशिवाय उद्योगातून बाहेर पडणार्‍या धूर, काजळी व सांडपाण्यामुळे भोवतालच्या पर्यावरणाला अधिक धोका पोहोचू शकतो.

विकासप्रकल्पांमुळे भविष्यात पर्यावरणाची किती हानी होऊ शकेल याविषयी जनतेच्या मनात संभ्रम असतो. पूर्वी झालेल्या विकास कामांमुळे वा कारखान्यांमुळे पर्यावरणाचे झालेले नुकसान पाहून विकास म्हणजे पर्यावरणाचा नाश ही कल्पना लोकांच्या मनात पक्की झाली आहे. त्यामुळे विकासास विरोध हे सामाजिक वा राजकीय चळवळीचे अमोघ शस्त्र बनले आहे. याचा परिणाम म्हणजे विकासाच्या रथाची चाके सामाजिक विरोधाच्या दलदलीत अडकून बसत आहेत.

पर्यावरण शास्त्र हे पर्यावरणाच्या हानीस कारणीभूत असणार्‍या घटकांचा अभ्यास करते तर पर्यावरण अभियांत्रिकी प्रदूषण नियंत्रण व्यवस्थेचा अभ्यास करते. विज्ञान व तंत्रज्ञान यातील संशोधनातून अनेक प्रदूषण नियंत्रक साधनांची निर्मिती केली असून हवा, पाणी व जमीन यांच्या नॆसर्गिक गुणधर्मात प्रदूषणामुळे हानीकारक बदल होऊ नयेत यासाठी प्रभावी यंत्रणा विकसित केल्या आहेत. नव्या उद्योगांसाठी या यंत्रणांचा वापर करणे कायद्याने बंधनकारक असल्याने पुढील काळात प्रदूषणाचा धोका राहाणार नाही. सध्या चालू असणार्‍या व प्रदूषण करणार्‍या उद्योगांनाही अशा यंत्रणा बसविण्याची व त्या योग्य प्रकारे चालविण्याची कायद्याने सक्ती करण्यात आली आहे.



कारखान्यातील सांडपाण्याचा पुनर्वापर, धूरातील काजळी व दूषित विषारी वायू  काढून हवा प्रदूषण होणार नाही याची खात्री देणारी प्रदूषण नियंत्रण व्यवस्था विकसित करण्यात आली आहे. दूषित पाण्याचे पिण्यायोग्य पाण्यात रूपांतर करून पाण्याचा पुनर्वापर करण्याची यंत्रणा सिंगापूरमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे.




भावनगर, चेन्नई तसेच परदेशात समुद्राच्या खार्‍या पाण्यापासून पिण्याचे गोडे पाणी मिळविण्याच्या मोठ्या यंत्रणा यशस्वीपणे चालविण्यात येत आहेत.

घनकचर्‍याचे रूपांतर शेतीसाठी आवश्यक असणार्‍या खतात करण्याचे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उभारले जात आहेत. कारखान्याच्या वा शहराच्या सांडपाण्याचा व घनकचर्‍याचा उपयोग करून बायोगॅस व खतनिर्मिती करण्याच्या विविध पद्ध्ती विकसित झाल्या आहेत.

एवढेच नव्हे तर प्लॅस्टिक, वॆद्यकीय  व इलेक्ट्रॉनिक कचर्‍यातून उपयोगी वस्तूंची निर्मिती व उर्जा मिळविण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. शांततेसाठी अणुशक्तीचा वापर करता यावा यासाठी किरणोत्सर्गी प्रदूषकांवर प्रक्रिया करण्यात यश मिळाले आहे.

दुर्दॆवाने सध्याच्या पर्यावरण शिक्षण अभ्यासक्रमामध्ये प्रदूषण नियंत्रण विषयक तंत्रज्ञानाविषयी फारच त्रोटक माहिती दिली जाते. साहजिकच पर्यावरण व प्रदूषणामुळे होणारी हानी याबाबतीतच प्रबोधन व जनजागॄती झाल्याने सर्वसामान्य जनता विकासप्रकल्पांच्या विरोधात उभी राहिली आहे.


पर्यावरण अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती व अभियंते यांनी जनतेला प्रदूषण नियंत्रण व्यवस्थेच्या कार्याची तसेच पर्यावरण रक्षणाविषयी शासनाने केलेल्या विविध कायद्यांची सविस्तर माहिती द्यावयास हवी  तसेच अभ्यासक्रमात  त्याचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करावयास हवेत.

 ज्ञानदीप फॊंडेशनने याबाबतीत जनजागॄती करण्यासाठी www.envis.org www.green-tech.biz ही दोन संकेतस्थळे विकसित केली आहेत.

त्यापॆकी www.envis.org या संकेतस्थळावर पर्यावरण शास्त्र, प्रदूषण नियंत्रण तंत्रज्ञान आणि कायदे यांची सर्वंकष माहिती दिली आहे


तर www.green-tech.biz या संकेतस्थळावर पर्यावरणपूरक बांधकाम व वस्तूंची निर्मिती तसेच सॊरशक्तीचा वापर याविषयी ज्ञानदीप फॊंडेशनच्या परिसंवादांचॆ समालोचन देण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment