Thursday, June 4, 2020

माहिती तंत्रज्ञान क्षेत्र - नियंत्रण व विकेंद्रीकरणाची आवश्यकता

भारताच्या आत्मनिर्भर  विकासासाठी मोठ्या आयटी कंपन्यांना भारतातील प्रकल्प योजना व उभारणीचे काम प्राधान्य क्रमाने देऊन त्यांचे स्थैर्य व वाढ सुनिश्चित करणे व भारतात उपलब्ध असणार्यार बौद्धिक संपदेचा भारताच्या विकासासाठी उपयोग करणॆ अत्यावश्यक आहे. भारतापुढे आज अनेक समस्या आहेत परंतू भारतीय आयटी उद्योगाचा त्या सोडविण्यात फारसा वाटा नाही. उलच त्यांच्यामुळे समस्यात वाढच होत आहे. त्यांचा फायदा आज फक्त पाश्च्यात्य बहुराष्ट्रीय कंपन्यांना आपला विस्तार वाढविण्यासाठी  होत आहे.

सर्वप्रथम शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, व्यापार अशा विविध क्षेत्रातील प्रगतीसाठी कामांची प्राथमिकता निश्चित करून  त्यासाठी कालमर्यादा, मनुष्यबळ, आर्थिक साहाय्य यांचे नियोजन केले तर भारतीय आयटी संस्थांना पुरेसे काम व निधी येथेच उपलब्ध होऊ शकेल आणि येथील पैसा बाहेर जाणार नाही.

भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. वैश्विक ज्ञानाचा साठा इंटरनेटवर प्रामुख्याने इंग्रजी भाषेत उपलब्ध असल्याने बहुतांश जनतेपर्यंत तो पोहोचत नाही यासाठी आय टी कंपन्यांना भारतीय भाषांत हे ज्ञान आणण्यासाठी उद्युक्त करण्याची गरज आहे. आज गुगल, फेसबुक, एपल  व मायक्रोसॉफ्ट असे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर करीत आहेत.. मात्र त्यांचा त्यामागील उद्देश येथील ग्राहक बाजारावर नियंत्रण मिळविणे हा असल्याने त्याचा परदेशी उत्पादक व सेवा पुरविणा-या   कंपन्यांना फायदा होणार आहे.

आयटी कुशल कर्मचारी भारताचा सर्व भागात, उपलब्ध व्हावेत. त्याना शहराकडे धावण्याचा मोह होणार नाही अशा प्रकारे रोजगारनिर्मिती करण्याची आवश्यकता आहे. सध्या अशा व्यक्तींना शहराशिवाय रोजगार मिळणेही मुष्कील होत आहे.असे शिकलेले लोक शहरात गेले की ग्रामीण छोट्या गावात आयटी शिक्षित व्यक्तींचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीचा ग्रामीण विकसासाठी वा तेथील समस्या सोडाविण्यासाठी काहीही उपयोग होत नाही. शिवाय मोठ्या शहरांच्या समस्याही अशा शहरीकरणामुळे वाढत आहेत. घरांचे भाव गगनाला भिडले आहेत.शहरी सुविधांवर व दळणवळण व्यवस्थेवर तसेच पर्यावरण दर्जावर याचा प्रचंड ताण पडत आहे.शहरात नोकरीच्या आशेने गेलेले अनेक विद्यार्थी नव्या नोक-या उपलब्ध नसल्याने निराश होत आहेत.

या सर्व समस्या विकेंद्रित विकासाने सुटू शकतील व हे विकेंद्रीकरण सर्वप्रथम आयटी क्षेत्राचे व्हावयास हवे व ते शासनाने घडवून आणणे आवश्यक आहे. असे झाले तर ग्रामीण व्यवस्थेत व अन्नधान्य उत्पादनात बिघाड न होता सर्व क्षेत्राचा विकास होईल. घरातील महिला वर्गाला नवा रोजगार उपलब्ध होईल. व भारताचे सर्वंकष प्रगतीचे लक्ष्य माहिती तंत्रज्ञानाच्या या क्रांतीने साध्य होईल.



No comments:

Post a Comment