Friday, July 13, 2018

पुण्यातील प्रेक्षणीय स्थळे - भाग -२

( ज्ञानदीपच्या मायपुणे या प्रस्तावित वेबसाईटसाठी सॊ. शुभांगीने २००३ मध्ये लिहिलेली माहिती जुन्या कागदपत्रात सापडली. त्यातील दुसरा भाग)

आगाखान पॅलेस - 

आगाखान पॅलेस म्हणजे खोजा जमातीचे धर्मगुरू प्रिन्स आगाखान यांचा भला मोठा राजवाडा. हा बंडगार्डन पुलापासून १-२ किमी. अंतरावर आहे. आगाखान पॅलेस म्हटल्याबरोबर भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आत्माहुती देणार्‍या स्वातंत्र्यवीरांची तीव्रतेने आठवण होते.


८ ऑगस्ट १९४२ मध्ये महात्मा गांधींनी ’चलेजाव’ चळवळ सुरू केली. त्यामुळे त्यांना पकडून आगाखान पॅलेस येथे बंदी म्हणून ठेवले. गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा यांनीही सत्याग्रह केल्याने त्यांना व त्यांच्या सहकार्‍यांना पण आगाखान पॅलेसमध्ये नजर्कॆदेत ठेवले होते. येथेच १९४४ साली कसुरबा स्वर्गवासी झाल्या. त्यांची समाधी याच परिसरात आहे. आगाखान पॅलेसमधील ७ एकरांच्या भागात गांधी राष्ट्रीय स्मारक उभारण्यात आले आहे. तेथील भव्य दालनात भारतीय स्वातंत्र्य्लढ्याचा इतिहास चित्ररुपाने रेखाटला आहे. तसेच गांधींच्या वापरातील वस्तूही जपून ठेवल्या आहेत. येथे एक मोठे खादी ग्रामोद्योग भांडार आहे. हे स्मारक सर्वांना पाहण्यासाठी खुले असते.

लालमहाल - 

शिवाजी महाराजांचे बालपण या लाल महालात गेले. शहाजी राजांनी हा महाल बांधला. येथे शिवबा व त्यांची आई जिजाबाई रहात असत. पुढे कालांतराने ऒरंगजेबाचा सरदार शाहिस्तेखान  या महालात राहण्यासाठी आला होता. शिवरायांनी केलेल्या गनिमी हल्ल्यात तो खिडकीतून पळून जात असताना त्याची बोटे तुटली. सध्या याच लाल महालात शिवरायांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना चित्रकार प्रतापराव मुळीक यांनी उत्तमरीतीने चितारल्या आहेत. ही चित्रे पाहताना प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाचे मन आभिमानाने भरून येते.

लोकमान्य टिळक स्मृतीसंग्रहालय - केसरीवाडा

नारायण पेठेतील या वाड्यामधूनच केसरी हे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले वर्तमानपत्र छापले जाते.









याच वाड्यात लोकमान्य टिळकांनी वापरलेल्या सर्व वस्तूंचे आगळेवेगळे प्रदर्श्न मांडण्यात आले आहे. त्यांचा पोषाख, पगडी, काठी, टेबल, लेखणी, दिवा इत्यादी वस्तूंबरोबर त्यांचे अनेकविध फोटोही येथे आकर्षक रीतीने मांडून ठेवले आहेत. मंडाले येथे तुरुंगातील त्यांचे गीतारहस्याचे हस्तलिखितही येथे सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. राष्ट्रीय नेत्यांच्या या गोष्टींपासून नवीन पिढीला स्फूर्ती यावी ही यामागची प्रमुख कल्पना आहे.

No comments:

Post a Comment