Friday, July 13, 2018

ग्रामस्थांचे शाळेवरील प्रेम

जुन्या आठवणी जागृत करण्यासाठी मी सातारला गेलो होतो. १९५३ ते १९५५ चा काळ. माझे वय १०-१२ वर्षांचे. मे महिन्याच्या सुट्टीत मी सातार्‍यापासून १५ कि.मी. वर असणार्‍या धावडशीला, माझ्या मावशीच्या घरी जात असे. मावशीचे यजमान ( आम्ही त्यांना ’नाना’ असे म्हणत असू) तेथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक होते. चार खोल्यांची शाळा. त्यातल्याच दोन खोल्यात त्यांचे घर होते.

शाळा संपली तरी रात्री जेवण झाल्यावर गावातील सर्व मुले आपापल्या वाकळी घेऊन झोपायला शाळेत येत. कारण नाना त्यांना रामायण महाभारतातील गोष्टी सांगायचे. गोष्टी ऎकण्यात मुले रंगून जात. माझा मावसभाऊ आणि मीही त्यांच्याबरोबरच शाळेत झोपत असू.  धावडशीतील ब्रह्मेंद्र्स्वामींचे देखणे देऊळ आणि शाळा यांनी माझ्या मनात कायमचे घर केले आहे.


आज तेथे काय स्थिती आहे हे पाहण्याची  तीव्र इच्छा झाली व मी धावडशीला जायचे ठरविले. श्री. रहाळकर यांचेबरोबर राजवाड्यापासून निघणार्‍या एसटीने धावडशीला निघालो.

पूर्वी हा प्रवास बॆलगाडीने होत असे. त्यावेळी रस्ताही नीट नव्हता. खाचखळग्यातून धक्के खात दोन तास  प्रवास करावा लागे. पण त्यातही एक वेगळीच गंमत होती. एसटीने जाताना आपला भोवतालच्या परिसराशी काही संबंध रहात नाही. त्यावेळी प्रत्येक झाड, घर आणि शेत खूण म्हणून लक्षात असायचे. ऊन, वारा, पाऊस तसेच भोवतालची धूळ व फुलांचे सुगंधही प्रवासात आपली सोबत करीत. वाटेत जाणारे येणारे लोक, गाई, म्हशी व शेळ्यामेढ्यांचे कळप वेगळी रंगत आणीत.  बॆलांचा अवखळपणा व गाडीवानाचे कॊशल्य याचे कॊतुक वाटे.

अर्ध्या एक तासात आम्ही धावडशीत पोचलो. मात्र गावात मोठी मिरवणूक आसल्याने एसटी गावाच्या प्रवेशद्वाराशीच थांबली. आम्ही खाली उतरलो व कसली मिरवणूक ते पाहू लागलो.

तो दिवस १५ जून म्हणजे शाळेचा पहिला दिवस होता. शाळेत येणार्‍या पंचक्रोशीतील मुलांचे स्वागत करण्यासाठी गावातील सर्व लोक आपापल्या बॆलगाड्या सजवून मुलांच्या मिरवणुकीत सामील झाले होते. जवळजवळ अडीचशे मुलेमुली गणवेशासह मिरवणुकीने शाळेकडे निघाली होती.


मला हे सर्व नवीन होते. लग्नाची वरात मला माहीत होती पण  नव्या मुलांचे स्वागत करण्यासाठी काढलेली ही मिरवणूक माझ्या दृष्टीने एक सुखद अनुभव होता. शाळेबद्दल आणि शिक्षणाबद्दल ग्रामस्थांचा असलेला जिव्हाळा पाहून माझे मन उचंबळून आले. जमेल तेवढे फोटो आणि व्हिडिओ मी काढले.



गावात गेल्यावर मला दिसले की आमची पूर्वीची प्राथमिक शाळा व घर जमीनदोस्त झाले आहे. पण नव्या इमारतीतैल दहावीपर्यंतची शाळा देवळाला लागूनच दिमाखात उभी आहे. तेथील माझ्या वयाच्या वृद्ध ग्रामस्थांशी चर्चा करताना त्यांनी माझ्या मनातील जुन्या शाळेच्या आठवणी  सांगितल्या व त्यावेळी शिक्षकाला गावात किती मान असे याची माहिती दिली. आता शिक्षक बाहेर गावातून वा शहरातून येतात त्यामुळे त्यांचा ग्रामस्थांशी फारसा संबंध येत नाही. मात्र शाळेचे कोठलेही काम ग्रामस्थ आपल्या घरचे कार्य आहे या भावनेने करतात. कारण शिक्षणाचे महत्व ते जाणतात.

पहिल्या दिवसाच्या स्वागत समारंभाला सातार्‍यातील डॉ. गिरीश पेंढारकर जातीने हजर होते. पेंढारकर कुटुंब धावडशीचे. गेल्या तीन पिढ्यात त्यांनी धावडशीच्या शाळेला नवे रूप दिले. योगायोगाने त्यांची माझी ओळख झाली. मी धावडशी पहाण्यासाठी इतक्या वर्षांनी आलो याचे त्यांना आश्चर्य वाटले. त्यांच्या शाळेसाठी योगदानाबद्दल मी त्यांचे आभार मानले.

एकूणच या भेटीमुळे मला ग्रामस्थांमध्ये आजही शाळेबद्दल किती आपुलकी व जिव्हाळा आहे व गावातून शहरात गेलेल्यांचे आपल्या मूळ गाव व शाळेवर किती प्रेम आहे याचे दर्शन झाले.

No comments:

Post a Comment