Friday, July 13, 2018

पुण्यातील प्रेक्षणीय स्थळे - भाग -१

( ज्ञानदीपच्या मायपुणे या प्रस्तावित वेबसाईटसाठी सॊ. शुभांगीने २००३ मध्ये लिहिलेली माहिती जुन्या कागदपत्रात सापडली त्यातील पहिला भाग)

पर्वती -


पुणे शहराचे खास वॆशिष्ठ्य म्हणजे ’पर्वती’ होय. ती एक लहानशी टेकडी आहे त्यामुळे नाव पर्वतावरून आले असावे असे वाटते.या नावातच तिचे आगळेवेगळेपण दिसून येते. दोन अडीचशे फूट उंची असलेले हे ठिकाण सार्‍यांचेच अत्यंत आवडते आहे.

पर्वतीवरील देवळांचे व चढण्यासाठी असलेल्या फरश्यांचे काम १७४९ साली नानासाहेब पेशवे यांच्या काळात झाले.

शंकर, विष्णू, विठोबा, कर्तिकस्वामी इत्यादी देवतांची मंदिरे असलीतरी शिवमंदिर त्यातले प्रमुख आहे. शिवमंदिरावरील सज्जावरून संपूर्ण पुणे शहराचे मनमोहक दर्शन घडते. जवळच एक बांधीव भुयार आहे. या भुयाराचे दुसरे टोक थेट शनिवारवाड्यात निघते. पेशवेकाळात याचा वापर केला जात असे.

शिवमंदिराच्या बाहेरच्या बाजूला श्रीमंत नानासाहेब पेशवे  यांची समाधी आहे. येथेच पेशवेकालीन शस्त्रात्रांचे प्रदर्शन मांडलेले आहे. दररोज सकाळ संध्याकाळ पर्वतीवर चढून जाणारे अनेक पुणेकर आपणास दिसतात.

शनिवारवाडा -

पुण्यातील पेशवेकालीन ऎतिहासिक वास्तू म्हणजे शनिवारवाडा होय. थोरले बाजीराव पेशवे यांनी १७३० मध्ये हा वाडा बांधला. यावाड्यात पेशवे रहात असत.इंग्रजांना व दिल्लीच्या बादशहाला वचक दाखविणार्‍या मराठेशाहीचा कारभार येथूनच चालत असे.

सहा ऎकर क्षेत्रफळ असलेला हा शनिवारवाडा अति भव्य आहे. संरक्षणाच्या दृष्टीने याचे बांधकाम अत्यंत योजनाबद्ध रीतीने केलेले आहे.


चॊरसाकृती वाड्याच्या भोवती २०फूट उंचीची प्रशस्त  तटबंदी आहे. तसेच याला पाच प्रमुख दरवाजे आहेत. चारही कोपर्‍यांना भक्कम बुरूज आहेत. मुख्य दरवाज्याला ’दिल्ली दरवाजा’ असे म्हणतात. गणेश, मस्तानी, नारायण व जांभूळ अशी इतर चार दरवाज्यांची नावे आहेत.  वाड्याच्या आतील भागाचे बांधकाम अतिशय देखणे आहे. गणेशमहाल, रंगमहाल, आरसेमहाल, हस्तीदंतीमहाल अशी विविध दालने होती. सवाई माधवराव पेशवे यांनी बांधलेले कारंजे ही वास्तू अजूनही मानाने उभी आहे.

शनिवारवाड्यासमोर सावरकर इत्यादी अनेक नेत्यांची आवेशपूर्ण भाषणे झाली. विविध राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक आंदोलने यांचा साक्षीदार असलेला हा शनिवारवाडा भावी पिढ्यांचे प्रेरणास्थान आहे. शनिवारवाड्याच्या पटांगणात असलेला बाजीराव पेशव्यांचा अश्वारूढ पुतळा  शनिवारवाड्याच्या उज्वल इतिहासाचे प्रतीक आहे.



शिंद्यांची छत्री - 

पेशवेकालीन प्रसिद्ध कर्तबगार सरदार महादजी शिंदे यांची समाधी वानवडी या भागात आहे. ही एक दुमजली भव्य इमारत आहे. महादजी शिंदे यांनी स्वत:च्या पराक्रमाने महाराष्ट्राचे नाव देशभर पसरविले. या इमारतीवर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले आढळते. पेशवाईची भिस्त शिंदे, होळकरांसारख्या शूर, पराक्रमी सरदारांवर होती. दोन अडीचशे वर्षांपूर्वीचे हे बांधकाम शिद्यांच्या वारसांनी मोठ्या कॊतुकाने सांभाळून ठेवले आहे. येथे महादजींची समाधी व एक शिवमंदिरही आहे. शिंदेघराण्यातील व्यक्तींच्या तसबिरीही आहेत.


No comments:

Post a Comment