Friday, July 13, 2018

पुण्यातील प्रेक्षणीय स्थळे - भाग -३

( ज्ञानदीपच्या मायपुणे या प्रस्तावित वेबसाईटसाठी सॊ. शुभांगीने २००३ मध्ये लिहिलेली माहिती जुन्या कागदपत्रात सापडली त्यातील तिसरा भाग)

पुणे विद्यापीठ ( सावित्रीबाई फुले विद्यापीठ)

पुण्याच्या वॆभवात मोलाची भर घालणारी संस्था म्हणजे पुणे विद्यापीठ होय.   २५० च्यावर महाविद्यालये पुणे विद्यापिठाच्या अधिपत्याखाली येतात. तसेच १२५ हून अधिक संशोधनसंस्था याच्याशी संलग्न आहेत. यावरून या विद्यापिठाची व्याप्ती किती मोठी आहे हे लक्षात येते. २११ एकरांचा अफाट परिसर लाभलेल्या या विद्यापिठात संस्कृत, मराठी, इम्ग्रजी, हिंदी इत्यादी विविध भाषा तसेच पदार्थविज्ञान, संगणकशास्त्र, रसायनशास्त्र या शास्त्रशाखा, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी विषयातील पदव्युत्तर शिक्षणाचे कार्य केले जाते.

या संस्थेची स्थापना १९४९साली झाली.  येथील मुख्य इमारत पूर्वी मुंबईच्या गव्हर्नरांचा राजवाडा म्हणून बांधली होती. या इमारतीत अनेक अतिभव्य दालने आहेत. प्रत्येक दालनाचे वॆशिष्ठ्य निराळे आहे. त्यांची नावे सध्या ज्ञानेश्वर सभागृह, शिवाजी सभागृह, रामदास सभागृह, गाडगेमहाराज सभागृह इ.   देण्यात आली  आहेत. या इमारतीचे बांधकाम इटालियन पद्धतीचे आहे. सभोवताली  हिरवळ नजरेस येते. सर्वत्र अत्यंत शोभनीय असे नक्षीकाम दिसते. या इमारतीचा मुख्य भाग म्हणजे त्यावरील असलेला १०० फूट उंचीचा लाल दगडी मनोरा. त्यावर ध्वजस्तंभ आहे.

 इमारतीभोवतालचा परिसर प्राचीन व अतिउंच झाडांनी समृद्ध आहे. १५० वर्षांपूर्वीची ही झाडॆ आपले पाय रोवून ताठ मानेने डोलात उभी आहेत. तसेच येथील जयकर ग्रंथालय हे पुण्यातील सर्वात मोठे ग्रंथालय मानले जाते. तेथे ४ लाखाहून अधिक पुस्तके ज्ञानी जनांच्या सेवेस उपलब्ध आहेत.

याच परिसरात  डॉ. जयंत नारळीकर यांची ’आयुका’ ही प्रसिद्ध संस्था आहे. तसेच सी-डॅक, बायोइन्फोसायन्स  टेक्नॉलॉजी पार्क अशा संस्थाही येथे कार्यरत आहेत.

राजा दिनकर केळकर संग्रहालय 

केवळ जिद्द असली की एकटा मनुष्यसुद्धा काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे संग्रहालय. प्रत्येकाला कसला ना कसला छंद असतो. तसा दिनकर केलकर यांना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू जमवण्याचा छंद होता.  ९५ वर्षांच्या आपल्या आयुष्यात त्यांनी भारतभर हिंडून वीस हजारावर दुर्मिळ वस्तूंचा अप्रतिम कजिना जमा केला. त्यांचा विविध प्रकारच्या दिव्यांचा व अडकित्त्यांचा संग्रह केवळ एकमेवाद्वितीय आहे.



फुले मंडईजवळ आपल्या तीन मजली इमारतीत त्यांनी हे संग्रहालय सुसज्जपणे उभे केले आहे. त्यात विविध प्रकारच्या लाकडी, रूपी धातूच्या मूर्ती, दरवाजे, शस्त्रात्रे इत्यादी बघावयास मिळतात. तसेच अनेक प्रकारची वाद्ये, प्राचीन हस्तलिखिते, तॆलचित्रे यांचाही समावेश यात होता. या अतिमॊल्यवान, दुर्मिळ वस्तुसंग्रहाबद्दल पुणे विद्यापिठाने त्यांना डी. लिट. ही बहुमानाची पदवी प्रदान केली. आपल्या मुलाच्या आठवणीसाठी त्यांनी हे संग्रहालय उभे केले असून आता ते शासनाकडे सुपूर्त केले आहे.

विश्रामबागवाडा 

शनिवारवाड्याप्रमाणे विश्रामबागवाडा ही वास्तू पेशवेकालीन आहे. २०० वर्षांपूर्वी केलेल्या लाकडी कोरीव कामावरून या वास्तूचे महत्व लक्षात येते. अतिशय सुरेख कमानी असलेले प्रवेशद्वार हे याचे खास वॆशिष्ठ्य. याची बांधणी राजस्थानी दगडी पद्धतीची आहे. त्याकाळी हिंदू पंडित येथे वास्तव्य करीत असत. तसेच  अध्यापनकार्यासाठी या वाड्याचा उपयोग केला जात असे. सध्या येथे पुणे महानगरपालिकेच्या काही कचेर्‍या असून  वस्तुसंग्रहालय तयार करण्यात येत आहे.


सारसबाग

पुण्यातली आजची सारसबाग (घोड्यावरून रपेट मारण्याची जागा) म्हणजे पूर्वीचा तळ्यातला गणपती होय. माधवराव पेशवे पर्वतीचे बांधकाम पाहणीसाठी जात असत. त्यांना गणपतीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की ’पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या तळ्याचा जीर्णोद्धार करावा.’

त्याप्रमाणे तळे खोदून बांधून काढले. मध्यभागी उंचवटा ठेवून तेथे उजव्या सोंडेच्या गणेशाचे मंदिर बांधले. सभोवती झाडे झुडपे लावून बाग तयार केली. हाच तो तळ्यातला गणपती. पुणे महानगरपालिकेने लक्ष घालून ही सारसबाग अतिशय आकर्षक  पद्धतीने सजवली आहे. सर्वत्र हिरवळ व छोट्या धबधब्यासारखे वाहते पाणी हे येथील वॆशिष्ठ्य होय.

दिवसभर काम करून कंटाळलेली मंडळी करमनुकीसाठी विरंगुळा म्हणून सारसबागेत येतात. मोकळी हवा, मुलांना पळापळी व खेळायला भरपूर जागा असल्याने रविवारी वा सुट्टीच्या दिवशी ही सारसबाग मुलामाणसांनी फुलून गेलेली आसते. बाहेरच्या बाजूला भेळपुरी, पावभाजी अशा चटकदार पदार्थांची दुकाने असल्याने तेथेही गर्दी असते.

No comments:

Post a Comment