Tuesday, July 3, 2018

सुंदर लेणी तयात खोदा

“प्राप्त काल हा विशाल भूधर,
सुंदर लेणी तयात खोदा
 निजनामे त्यावरती नोंदा”

केशवसुतांनी आपल्या या अजरामर काव्यातून आपल्याला एक महत्वाचा संदेश दिला आहे.

कोणतेही कार्य करण्यासाठी वर्तमानकाल ही एकच पण आयुष्यभर चिरंतन  अशी संधी असते. या संधीचा उपयोग करून असे कार्य करा की जगाच्या इतिहासात त्याची सुंदर लेणी खोदली जातील. भावी पिढ्यांना ही लेणी पाहून आनंद मिळेलच पण शिवाय असे कार्य पुढे चालू ठेवण्यास प्रेरणा मिळेल.



या जगात असंख्य माणसे आहेत आणि  मानवजातीच्या उदयापासून आजपर्यंतच्या होऊन गेलेल्या माणसांची संख्या तर अनंत कोटीची भरेल. तरी आपल्याला यापैकी फारच थोड्या माणसांबद्दल काही माहिती असते. या माणसांचे जीवन कसे होते. त्यांना कोणकोणत्या नैसर्गिक, राजकीय वा सामाजिक संकटांना तोंड द्यावे लागले. या अविरत जीवनसंघर्षातून इतर सर्व प्राणीमात्रांच्या तुलनेत मानवजातीची सर्व क्षेत्रात एवढी विलक्षण प्रगती कशी होत गेली याचा शोध घेण्यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञ, पुराणवस्तूसंशोधक, इतिहासकार अथक प्रयत्न करीत आहेत.



मात्र ज्या काही लोकांनी आपले अनुभव, विचार व इतर साहित्य लिहिले तेवढेच संचित ज्ञान मानवजातीस उपलब्ध झाले आहे. भाषेव्यतिरिक्त चित्र वा मूर्तीकला व दगड मातीत खोदलेली लेणी, जुन्या इमारती, किल्ले, राजवाडे व इतर चिरस्थायी वस्तू यांच्या अभ्यासातून मानवजातीने केलेल्या प्रगतीचा मागोवा घेता येतो. पण मानवाने निर्माण केलेल्या एकूण ज्ञानभांडारातील अत्यंत अल्प कण आज आपल्याला अवगत आहे. भाषा व स्मृती साठवण्याच्या पद्धती पूर्वीपासून विकसित झाल्या असत्या तर आज आपल्याला विश्वाचे रहस्य समजून घेण्यास मदत झाली असती. भविष्य्काळासाठीही तो ठेवा अत्यंत मोलाचा ठरला असता.

सुदॆवाने आज आपल्याकडे स्मृती नोंदविण्याची, साठविण्याची व जगभर वितरित करण्याची सोपी साधने प्रत्येकाच्या हातात आली आहेत. आपण जर त्यांचा आपले अनुभव, कार्य व विचार व्यक्त करण्यासाठी वापर केला तर भावी पिढ्यांसाठी नवे ज्ञानभांडार उभे करू शकू आणि आपणही खर्‍या अर्थाने अमर होऊ शकू. कारण आपले अस्तित्व इतरांच्या दृष्टीने दिसणे ( शरीर) व व्यक्तित्व (मन) समजून घेणे एवढ्यापुरतेच मर्यादित असते. फोटो आणि चित्रफितींद्वारे आपले दिसणे आपण चिरंतन करू शकतो. पण आपले व्यक्तित्व व अनुभव व उपलब्धी मात्र विस्मृतीत नाश पावते.


यासाठी ’ लेखण्या मोडा व बंदुका हाती घ्या’ या प्रेरक संदेशाप्रमाणे ’मोबाईल सोडा आणि लेखणी वा लॅपटॉप हातात घ्या” असे म्हणावेसे वाटते.

फोन ऎवजी इ मेल करा,

इमॆलऎवजी स्वहस्ताक्षरात लिहा,

केवळ संदेशाऎवजी आपले मत मांडा.

मनातील भावनांचे प्रकटीकरण करा.

आपल्या आयुष्यातील अनुभवांचे चित्रण करा, आपले विचार मांडा,

आपली स्वप्ने विशद करा.

आपल्या आयुष्यातील अनुभवांचे चित्रण करा, आपले विचार मांडा,

आपल्याला आपले विचार टिकवायचे असतील तर आपण ते लिहिले पाहिजेत. आपल्याला ब-याच गोष्टी आठवत असतात. आपले पूर्व आयुष्य, नातेवाईक,मित्र, प्रवास, प्रसंग, वाचलेली पुस्तके, ऐकलेल्या गोष्टी इत्यादी.  आपली पंचेंद्रिये सतत बाहेरील माहिती ग्रहण करीत असतात. ही माहिती आपल्या प्रतिक्रियेसह मेंदूत साठवली जाते. आपली मते, आपले विचार आपले  काम  यावर आपले व्यक्तिमत्व अवलंबून असते.

जगाला आपली ओळख आपण दिसतो कसे, वागतो कसे आणि आपले विचार यावरून होत असते.या ज्ञान भांडाराचा कोणाला तरी केव्हातरी नक्की उपयोग होईल याची खात्री बाळगा. एवढे करणे आपल्यापॆकी सर्वांना शक्य आहे.

काही कर्तृत्ववान लोक प्रत्यक्ष नवनिर्मिती व समाजपरिवर्तन घडवतात त्यांच्या कार्याची माहिती लिहिण्यास त्यांना वेळ होत नाही अशा व्यक्तींचे कार्यही  इतिहासपटलावर नोंदण्याचे कार्य आपण करू शकता. ज्यांना लिहितावाचता येत नाही त्यांनाही बोलते करा, त्यांचे अनुभव, विचार जाणून घ्या व त्यांची जगाच्या ज्ञानभाडारात भर घाला. इतर सर्व सजीव सृष्टीत होणार्‍या बदलांचाही मागोवा घ्या आणि मानवजातीच्या चिरंतन अस्तित्वासाठी व प्रगतीसाठी आपले योगदान द्या.

आपण काळाच्या स्मतीपटलावर खोदलेली ही लेणी तुमचे जीवन चिरस्थायी करतील व ती मानवजातीच्या भविष्यकालीन संघर्षासाठी निश्चित मार्गदर्शक ठरतील.

1 comment:

  1. Superb blog you have here but I was wondering if you knew of any
    user discussion forums that cover the same topics discussed in this article?
    I'd really love to be a part of group where I can get feed-back from other experienced individuals that share the
    same interest. If you have any recommendations, please let me know.

    Thanks!

    ReplyDelete