Saturday, July 14, 2018

पुण्यातील प्रेक्षणीय स्थळे - भाग -५

( ज्ञानदीपच्या मायपुणे या प्रस्तावित वेबसाईटसाठी सॊ. शुभांगीने २००३ मध्ये लिहिलेली माहिती जुन्या कागदपत्रात सापडली त्यातील पाचवा भाग)

 देवालये

पुणे हे जसे पेठांचे गाव तसेच ते देवळांचेही गाव आहे. प्रत्येक घरात जसे स्वतंत्र देवघर असते. देवासाठी वेगळी जागा असते तसेच पुण्यातील प्रत्येक पेठेचे आहे. देव हा एकच हे जरी खरे असले तरी तो गणपती, मारुती, शंकर, विठोबा, विष्णू, कृष्ण, सरस्वती, लक्ष्मी अशा विविध रुपात असल्याचे आपण मानतो. समस्त जनांना मानसिकदृष्ट्या आधार देण्याचे काम ही मंदिरे वा देवळे निर्विकारपणे करीत असतात. पुण्यत अशी अगणित मंदिरे आहेत. पेशवे कालीन मंदिरांपासून ते काशीतीर्थासारखी अत्याधुनिक मंदिरे यात येतात.

 कसबा गणपती



 हे मंदिर शिवाजी महाराजांच्या काळातील आहे. जिजाबाई लहानग्या शिवबाला घेऊन लालमहालात रहात असत. तेव्हा त्यांनी शेजारी कसबा गणपतीची स्थापना केली. शिवरायांना घेऊन त्या रोज गणेशदर्शनास जात असत. गण[पती उत्स्दवात या कसबा गणपतीला मानाचा पहिला गणपती म्हणून मान दिला जातो. याला पुण्याचे मुख्य ग्रामदॆवत असेही मानले जाते.

 जोगेश्वरी मंदिर

जसा कसबा गणपती तसेच हे जोगेश्वरी मंदिर शिवाजीच्या काळातील आहे.  या देवीला पुण्याच्या ग्रामदेवतेचा मान दिला जातो. शिवाजी महाराज व सईबाई यांचे विवाहानंतर ते या जोगेश्वरीच्या दर्शनास आले होते. आजही लग्नानंतर वधुवर कसबा गणपती व जोगेश्वरीचे दर्शन घेऊन मगच गृहप्रवेश करतात.

चतुश्रृंगी मंदिर 



पुणे विद्यापिठाच्या जवळील टेकडीवरील हे मंदिर २००-२५० वर्षांपूर्वीचे आहे. ते जागृत देवस्थान मानले जाते. चतुश्रृंगी देवी म्हणजे नाशिकजवळील वणीच्या चतुश्रृंगी देवीचेच रूप आहे असे मानतात. याचे वॆशिष्ठ्य म्हणजे मूर्ती व गाभारा दगडातच कोरलेला आहे.मंदिरात जाण्यासाठी दगडी पायर्‍या बांधल्या आहेत. मंदिराभोवती भव्य सभामंडप आहे. नवरात्राच्या उत्सवात येथे मोठी जत्रा भरते. पर्वतीप्रमाणे हे देवस्थानही टेकडीवर असल्याने येथून पुणे शहराचे मनोहर दर्शन घडते. मंगळवारी व शुक्रवारी येथे भाविकांची गंगा दुथडीभरून वहात असते.

तुळशीबाग राममंदिर 

 पेशवेकालीन पुणे आजही आपणास विविध रुपात बघावयास मिळते. फुले मंडईजवळील या राममंदिराभोवती पूर्वी तुळशीच्या बागा होत्या. नानासाहेब पेशव्यांनी या मंदिराचे बांधकाम नारो आप्पा तुळशीबागवाले यांच्या देखरेखीखाली करून घेतले. हे झाले इतिहासकालीन वॆशिष्ठ्य त्याच्याच हातात हात घालून आधुनिक वॆशिष्ठ्य येथे बघायला मिळते.










या मंदिराभोवताली आज अनेक दुकाने थाटलेली दिसतात. त्यात संसारोपयोगी अनेक लहान मोठ्या वस्तू मिळतात.त्यामुळे मंदिराबाहेरचा परिसर आजही स्त्रीवर्गाने फुलून गेलेला दिसतो.

याशिवाय पुण्यात पेठापेठातून गणपती, मारुती यांची  देवळे आहेत, पुण्यातील  देव आणि त्यांची  देवळे काही विचित्र खास नावानेओळखली जातात. त्यांतली काही अशी अकरा मारुती, अवचित मारुती, उंटाडे मारुती, उंबर्‍या गणपती, उपाशी विठोबा, कसबा गणपती, काळा दत्त, खरकट्या मारुती, खुन्या मुरलीधर, गंज्या मारुती, गवत्या मारुती, चिमण्या गणपती, जिलब्या मारुती, डुल्या मारुती, नवश्या मारुती, निवडुंग्या विठोबा, पत्र्या मारुती, पावन मारुती, पासोड्या विठोबा, पिवळी जोगेश्वरी, प्रेमळ विठोबा, भिकारदास मारुती,माती गणपती, मोदी गणपती,शकुनी मारुती, सोट्या म्हसोबा,सोन्या मारुती,हत्ती गणपती इत्यादी

 म्हणजे पुणे हे खरोकरीच देवळांचे गाव आहे व त्यातील देवही पुणेकरांसारखे वॆशिष्ठ्यपूर्ण आहेत.

No comments:

Post a Comment