वालचंद इनोव्हेशन या ज्ञानदीपच्या प्रकल्पात वालचंद कॉलेजमधील निवृत्त प्राध्यापकांच्या कार्याची माहिती संकलित करण्याचे मी ठरविले आणि निवृत्त प्राध्यापकांच्या व्हॉट्स ऍप ग्रुपवर सर्वांना आपली माहिती पाठविण्याचे आवाहन केले. माझी अपेक्षा होती की सर्वजण या कल्पनेचे स्वागत करतील व आपली माहिती पाठवतील.
मात्र मला याबाबतीत अगदी उलटा अनुभव आला. काही जणांनी माझ्या पोस्टला लाईक केले काहींनी शुभेच्छा दिल्या पण कोणीही माहिती पाठविली नाही. मी बुचकळ्यात पडलो. मग ठरविले की प्रत्यक्ष सर्वांची गाठ घ्यायची व त्यांचेकडून माहिती संकलित करायची. माझ्या अगदी जवळच्या ज्येष्ठ प्राध्यापकांकडून मी माहिती मिळविण्यात यशस्वी झालो. पण इतर ठिकाणी मला वेगळाच अनुभव आला.
मी कोणाकडेही गेल्यानंतर त्यांनी माझ्या तब्बेतीची तसेच घरातील सर्वांची अगत्यपूर्वक चॊकशी केली. मात्र त्यांची माहिती देण्यास बहुतेक्जण अनुच्छुक दिसले. आमच्या आयुष्यात आम्ही काही विशेष केले नाही. त्यामुळे प्रसिद्धी करण्यासारखे त्यात काही नाही किंवा आपले नाव व कार्य यांची कोठे नोंद व्हावी असे वाटत नसल्याचे त्यांनी मला सांगितले. या प्रकल्पाचे मार्गदर्शक प्रा. भालबा केळकर यांनाही असाच अनुभव आला.
मग आम्ही त्यांना सांगितले की तुमच्या प्रसिद्धीसाठी नव्हे तर नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना तुमच्या अनुभवांचा फायदा होईल व तुम्हाला तुमच्या कामाबद्दल फारसे महत्वाचे वाटत नसले तरी त्यातून अनेक कल्पना व ज्ञान यांचा शोध ते घेऊ शकतील असे सांगितल्यावर ते अशी माहिती देण्यास राजी झाले.
काही जुने प्राध्यापक आज हयात नाहीत. त्यांचे घरी जाऊन माहिती घेत असताना मला एक नवे वास्तव उमगले. त्यांची माहिती द्या असे सांगत असताना प्राध्यापकपत्नींचेही योगदान आपण लक्षात घ्यावयास हवे याची मला जाणीव झाली. माझे स्वत:चेच उदाहरण घेतले तर माझ्या वाटचालीत व यशात शुभांगीचा समान वाटा होता. तिचाही माझ्या विद्यार्थ्यांशी परिचय होता. कॉलेजवर व नंतर कॉलेजजवळ रहात असल्याने कॉलेजच्या अनेक कार्यक्रमांमध्ये माझ्याबरोबर ती सहभागी असायची.
पण इतर क्षेत्रातही आपण पुरुषांच्या कामगिरीकडेच लक्ष देतो. त्यांचेच गुणगान करतो पण त्यांच्या आयुष्याला आधार व आकार देणार्या सहधर्मचारिणीबद्दल आपल्याला काहीही माहिती नसते. नव्हे आपण त्यांचे अस्तित्वच गृहीत धरत नाही. हा त्यांच्यावर अन्याय आहे. तरीही या स्त्रिया आपल्या यजमानांच्या कर्तृत्वात आनंद मानतात व स्वत:चे त्यातील योगदान नगण्य मानतात हा त्यांचा केवढा मोठेपणा.
प्रसिद्धीपराङ्मुखता हा या शिक्षकांचा स्थायी भाव दिसला. आपल्या विद्यार्थ्यांबद्दल मात्र ते उत्साहाने बोलते झाले. विद्यार्थ्यांचा त्यांना अभिमान वाटत होता. त्यांचे कॊतुक व प्रसिद्धी करण्यासाठी ते उत्सुक होते.
जुन्या पिढीतील माझ्या शाळेतील शिक्षकांबाबतही मला असाच अनुभव आला होता. माझे प्राथमिक शाळेतील एक शिक्षक श्री. दुडे आम्हाला पहाटे पाच वाजता अक्षरलेखन शिकविण्यासाठी बोलवायचे. त्यांच्या पत्नी आजारी होत्या. साधे मातीचे घर एका खोलीत दाटीवाटीने आम्ही बसायचो. कोणतीही फी नाही. स्वत: बोरूच्या लेखण्या त्यांनी तयार केल्या होत्या. वळणदार अक्षर काढण्यासाठी लेखणी कशी धरायची, बोरू पासून सुरुवात करून टाक व त्यानंतर पेन कसे वापरायचे हे त्यांनी आम्हाला शिकविले. आमचे यश हेच त्यांचे यश होते.
न्यू इंग्लिश स्कूलमधील आमचे वर्गशिक्षक ना. ज सोमण आमच्या वर्गाचे स्नेहसंमेलन आपल्या घरी स्वखर्चाने घ्यायचे. माझ्याकडे त्यावेळी वर्गाचा अहवाल लिहून वाचण्याचे काम असे. सोमणकाकूंनी केलेली आंब्याची वाटली डाळ व उसाचा रस असा बेत असायचा. त्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. माझे मराठी सुधारण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. माझी मुलगी सुमेधा हिच्या लग्नाच्या वेळी त्यांना अगत्याने मी सांगलीस घेऊन आलो होतो. विज्ञान शिकविणारे केळकर यांनी प्रश्नांतून जिज्ञासा निर्माण करून विज्ञानातील तत्वे समजण्यासाठी स्वत: प्रयत्न करण्याचे शिक्षण दिले. ते देखील इतर वेळी अगदी अबोल व प्रसिद्धीपराङ्मुख असत. त्यांचा मुलगा वालचंदमध्ये शिकायला आला मी कॉलेजमध्येच रहात होतो.तरी माझ्याकडे येताना त्यांना फार संकोच वाटतो हे मला जाणवले.
वि. द. घाटे यांची शाळेत वाचलेली एक कथा अजून माझ्या चांगली लक्षात आहे. त्यांचे शिक्षक आजारी असल्याने ते त्यांना भेटायला घरी जातात. अंथरुणावर पडलेले व श्वास घेण्यासही त्रास होत असताना ते शिक्षक विद्यार्थ्याला पुस्तकातील धडा वाचून दाखवायला सांगतात व त्यातील कोणता भाग महत्वाचा हे सांगून वहीत लिहायला सांगतात. त्यांची तब्बेत विचारण्याऎवजी तेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची चॊकशी करतात व स्वत: शिकवू न शकल्यामुळे खंत व्यक्त करतात.त्यांनी लिहिले आहे ’आम्ही सर्व विद्यार्थी त्यांच्या कॉटभोवती उभे राहून त्यांच्या अस्वस्थ शरिराकडे गहिवरल्या अंत:करणाने बघत होतो. तुम्ही आमची काळजी करू नका हे सांगण्याचे धॆर्यही आम्हाला झाले नाही.’
असे हे शिक्षक. यांना काय हवे असते ? पॆसा, प्रसिद्धी, मानमरातब यापेक्षा त्यांच्या विद्यार्थ्यांनी मोठे व्हावे. त्यांनी यश संपादन करावे ही त्यांची मनोमन इच्छा असते. यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यांची आठवण ठेवावी वा त्यांना मान द्यावा अशी त्यांना अपेक्षा नसते. विद्यार्थ्यांना शिक्षकांबद्दल आदर वाटतो ते याच कारणासाठी. प्रा. एच. यु. कुलकर्णी यांनी त्यांच्या अशाच एका शिक्षकाचे घर बांधून आपली कृतज्ञ्ता व्यक्त केली होती. विद्यार्थी जगात कसेही वागतील पण अशा शिक्षकापुढे ते नम्र होतात. खरे शिक्षक विद्यार्थ्यांना आपल्या मुलाप्रमाणे मानतात. विद्यार्थीही मग त्यांना आपल्या मातापित्यासारखा मान देतात.
आपले आई वडीलही असेच असतात. त्यांना मुलांचे कॊतुक व काळजी असते. नुकताच मला असा एक हृद्य अनुभव आला. आमच्या परिचयातील नव्व्दीतल्या एका वृद्ध आजोबांना भेटायला मी त्यांचे घरी गेलॊ होतो. त्यांचा मुलगा व मुलगी अमेरिकेत स्थायिक झालेले. हे एकटे आपल्या गावभागातील जुन्या घरात राहतात. ग्रीन कार्ड मिळूनही त्यांनी आपल्या घरीच राहण्याचे ठरविले आहे. मुलांना त्यांची काळजी वाटते. पाहिजे तेवढा पॆसा खर्च करून त्यांना उत्तम ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याची मुलांची इच्छा आहे. पण आपले घर सोडून हे आजोबा दुसरीकडे जायला तयार नाहीत.
मी त्यांना म्हटले आता कशाला हट्ट करता? मुलांचे म्हणण्याप्रमाणे चांगल्या ठिकाणी जा. ते मला म्हणाले आपले घर ते आपले. आणि उद्या मुले परत भारतात आली तर त्यांना रहायला हे हक्काचे घर आहे. ते मला सांभाळलेच पाहिजे. त्यांनी मला आणखी एक त्यांच्या दृष्टीने गुप्त गोष्ट सांगितली. ते म्हणाले पुढच्या महिन्यापासून मला विम्याचे आठ हजार दरमहा मिळणार आहेत, त्यातले पाच हजार मुलीच्या व तीन हजार मुलाच्या नावे बॅंकेत ठेवणार आहे. स्वत:च्या खर्चात कमालीची काटकसर करीत त्यांची इच्छा आपल्या मुलांसाठी काहीतरी देण्याची आहे. हे ऎकून मला पित्याच्या मनाची ओळख पटली. ’अहॊ, त्यांच्याकडे खूप पॆसे आहेत त्यांना तुमच्या पॆशांची गरज नाही’ असे सांगण्याचे माझ्या ओठावर आले होते पण ज्या आनंदात त्यांनी ही गोष्ट सांगितली ते ऎकून मला त्यांचा हा आनंद हिरावून घ्यावासा वाटला नाही.
माझी नाशिकची उषामावशी मुलाने आग्रह केला तरी मुलाच्या बंगल्यात न राहता चाळीत आपल्या दोन खोल्यांच्या घरात रहात आहे.
माझी पत्नी शुभांगीही हाडाची शिक्षिका होती. तिच्या निधनापूर्वी एक आठवडा आधी माझा पुतण्या अक्षय बी. ई. होऊन पुण्याला जाणार असल्याने भेटण्यास आला होता. तेव्हा तिने नाकात ऑक्सिजनच्या नळ्या असतानाही ’विसरू नको तू कधी मायबापा .. ’ अशी तिने रचलेली एक भावपूर्ण कविता वाचून दाखविली होती.
माझे पीएचडीचे आय. आय. टी. मधील गाईड डॉ. जी. डी. आगरवाल, अमेरिकेतील बर्कले युनिव्हर्सिटीत शिकून आले तरी साधे राहणारे. स्वत: ब्रह्मचारी. स्वत: स्वयंपाक करून शर्ट लॆंगा घालून आय. आय. टी.मध्ये शिकवीत. पुढे ते डायरेक्टर झाले. नंतर तेथल्या राजकारणाला कंटाळून राजीनामा देऊन सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे सचिव झाले. तेथील अनास्था पाहून राजीनामा देऊन चित्रकूट येथे आश्रमात गेले. २००९ मध्ये गंगेवरील धरणे रोखण्यासाठी उपोषण केले. आता प्रत्यक्ष संन्यास घेऊन गेले महिनाभर गंगा शुद्धीकरणासाठी आमरण उपोषण करीत आहेत.
तर असे हे शिक्षक व जुन्या पिढीतील पालक,
थोडक्यात म्हणजे जुन्या पिढीतील शिक्षकांचे ज्ञान सहजासहजी मला मिळणार नाही याची मला खात्री पटली. त्यांना विश्वासात घेऊन व माझ्या हेतूबद्दल त्यांच्या मनात असलेल्या शंका दूर होईपर्यंत मला थांबावे लागणार आहे. पण त्यामुळे जे मला मिळेल ते खरेच दुर्लभ व मॊल्यवान असणार आहे.