Thursday, January 25, 2024

शहर स्वच्छता अभियान - वेबसाईटवर वस्तुस्थितीची प्रसिद्धी आवश्यक

शहरातील मोकळ्या प्लॉट्मध्ये वाढणारी झाडे झुडपे व साठणारे कचर्याचे ढीग हे शहर स्वच्छता अभियानात  एक मोठी समस्या होऊन बसली आहे. प्लॉटच्या मालकावर स्वच्छतेचे कोणतेही कायदेशीर बंधन नसल्याने त्याच्याकडून प्लॉट स्वच्छतेबाबत टाळाटाळ केली जाते. बर्याच ठिकाणी अशा जमिनीचा मालक कोण हे कोणालाही माहीत नसते. यातील काही प्लॉट शहरविकासासाठी आरक्षित असतात त्यामुळे त्याची मालकी नगरपालिकेकडेच असते. त्यामुळे असे बेवारस प्लॉट कचरा, सांडपाणी व झाडेझुडपे यांनी व्यापलेले दिसतात.

विकसित देशात सार्वजनिक स्वच्छतेला फार महत्व दिले जाते. जुनी मोटार जरी रस्त्यावर बेवारस सापडली तरी त्याच्या मालकाला शोधून त्याला दंड केला जातो. एवढेच नव्हे तर पाळलेल्या कुत्र्याची विष्ठा देखील सार्वजनिक जागेत ( रस्ता, बाग वा क्रीडांगण) पडली तर त्याच्या मालकाला दंड होतो.

आपल्या येथे सार्वजनिक स्वच्छतेबाबत फारच उदासीनता दिसून येते. आपले घर वा प्लॉट स्वच्छ ठेवण्यात आपण कसूर करीत नाही. मात्र गोळा केलेला कचरा आपण जवळच्या सार्वजनिक जागेत वा मोकळ्या प्लॉटमध्ये बिनधास्तपणे टाकून देतो. घंटागाडी चालविणारे कर्मचारीदेखील अशा प्लॉटमधील कचरा उचलण्याची तसदी घेत नाहीत. अशा कचर्याचा उपद्रव सुरू झाला की आपण नगरपालिकेला दोष देतो.

 प्रत्येक रिकाम्या प्लॉट वा जागेची मालकी असणार्‍याचे नाव, फोन नंबर व पॅन नंबर लिहिलेली पाटी नगरपालिकेने  लावली ( वा मालकावर अशी सक्ती केली ) तर यावर काही ठोस उपाययोजना करणे शक्य होईल. अशा प्लॉटवरील झाडेझुडपे काढण्याचा खर्च प्लॉटमालकाकडून व  कचरा उचलण्याचा खर्च, असा कचरा टाकणार्‍या सभोवतालच्या प्लॉटधारकांकडून वसूल करण्यासाठी करण्यासाठी योजना आखली तर नगरपालिकेस असे प्लॉट स्वच्छ राखणे सहज शक्य होईल.  गृहनिर्माण सहकारी संस्था वा स्थानिक नगरसेवकांना याचे व्यवस्थापन व योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार दिले तर या कचरा समस्येवर कायमस्वरुपी तोडगा निघू शकेल. मोकळ्या प्लॉट वा सार्वजनिक जागांची स्वच्छता राखण्याची जबाबदारी भोवताली राहणारे लोक  आपोआपच घेतील व यामुळे आर्थिक बोजा न पडता शहर स्वच्छता  अभियान यशस्वी करणे नगपालिकेस शक्य होईल. 
स्थानिक माहिती मराठीत देणा-या वेबसाईटवर गुगलमॅपच्या माध्यमातून अशा रिकाम्या प्लॉटची नोंद शहर व महापालिकेने केली तर स्वच्छ शहर अभियानाला एक वस्तुस्थितीनिदर्शक सार्वजनिक आढावा प्रसिद्ध करता येईल. सध्या प्लॉट व फ्लॅट खरेदीविक्रीसाठी वेबसाईटवर जाहिराती केल्या जातात. मात्र शासनाने रिकामे प्लॉट, कच-याचे ढीग, रस्ते,गटारे, नदीची स्थिती, पाण्याची गळती व प्रदूषण यांची माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक केले तर शहर स्वच्छता  अभियान यशस्वी होऊ शकेल आणि स्वच्छ शहर बक्षिसासाठीची अनाठायी रंगरंगोटी बंद होईल. जनतालाही शहराची खरी स्थिती कळेल.
याच उद्देशाने ज्ञानदीप फौंडेशनने 
  • मायसांगली (https://mysangli.com), 
  • मायकोल्हापूर(https://mykolhapur.net), 
  • मायपुणे(https://mypune.net), 
  • मायसोलापूर(https://mysolapur.net), 
  • मायनाशिक(https://mynashik.net) व 
  • मायमुंबई (https://mymumbai.net)
या मराठी माध्यमातील वेबसाईट तयार केल्या आहेत.सध्या त्यात फक्त इतिहास, पर्यटनस्थळे, प्रसिद्ध व्यक्ती व संस्था यांची माहिती दिली आहे. शहर आणि जिल्ह्यातील तालुक्यांचे माहितीपूर्ण नकाशेही यात दिले जाणार आहेत. परंतु केवळ शैक्षणिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने माहिती देण्यापेक्षा पर्यावरणविषयक वस्तुस्थती अहवाल देण्याचा आमचा मनोदय आहे.

मात्र पर्यावरणविषयक माहिती नगरपरिषद वा माहापालिकेच्या अनुमतीशिवाय तेथे प्रसिद्ध करता यात नाही. त्यामुळे अशी माहिती जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. तसेच जनतेला त्यात माहिती समाविष्ट करण्यास अधिकार द्यावयास हवेत.



No comments:

Post a Comment