Wednesday, July 31, 2019

ज्ञानदीप फौंडेशनची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल



ज्ञानदीप फौंडेशनच्या सदस्यांना आवश्यक ती माहिती पुरविण्यासाठी फौंडेशनच्या सर्व वेबसाईटवरील माहिती अद्ययावत करण्यात येत असून यापुढे केवळ सदस्यांनाच या ज्ञानभांडाराचा लाभ घेता येईल असे बदल करण्यात येत आहेत. या बदलाची पार्श्वभूमी---

ज्ञानदीप फौंडेशनने २००५ पासून मराठी, संस्कृत, विज्ञान, पर्यावरण, सांगली, कोल्हापूर, साहित्यसंमेलन, ग्रीन टेक या वेबसाईटवर माहिती संकलित करून जनसामान्यांपर्यंत ती पोचविण्याचा प्रयत्न केला. मात्र या कार्यासाठी तंत्रज्ञ तसेच सर्व आर्थिक मदत ज्ञानदीप इन्फोटेक संस्थेतर्फे करण्यात येत होती. या अतिरिक्त कामामुळे त्या संस्थेसही बराच आर्थिक तोटा सोसावा लागल्याने यापुढे ज्ञानदीप फौंडेशन सदस्य वर्गणीतून ना नफा ना तोटा या तत्वावरच चालविणे भाग पडत आहे.

गेल्या वर्षी (१२ ऑगस्ट २०१९ रोजी) नवनिर्मिती आणि स्वयंउद्योजकता हे शैक्षणिक संस्थांचे ध्येय असावे या दृष्टीकोनातून ज्ञानदीप फौंडेशनने वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहकार्याने एक कार्यसत्र सांगली येथे आयोजित केले होते. तेव्हापासून अनेक प्राध्यापक, उद्योजक तसेच यशस्वी माजी विद्यार्थी यांचेबरोबर चर्चा केल्यानंतर असे ध्यानात आले की हे कार्य करण्यासाठी सुदृढ पायाभूत सुविधा, अनेक पूर्णवेळ कार्यकर्ते व भरीव अर्थसाहाय्याची आवश्यकता आहे. शिवाय सर्व शैक्षणिक संस्था आपल्या स्वीकृत कार्यात मग्न असल्याने त्यांच्याकडून हे काम होण्यासारखे नाही.

केवळ या उद्देशासाठी स्वतंत्र संस्था सुरू करणे तसेच त्यासाठी निधी मिळविणे व नियमित कार्यासाठी आर्थिक स्वयंपूर्णता आणणे केवळ मोठ्या उद्योगसंस्थेसच शक्य आहे. माजी निवृत्त प्राध्यापकांनी मांडलेल्या योजनेला उद्योजक वा धनवान फारसे महत्व देत नाहीत. निवृत्त व्यक्तींच्या सर्वसामान्य मानसिकतेची कल्पना असल्याने आदर व सन्मान स्वीकारण्यापेक्षा वेगळे ते करू शकतील असे त्यांना वाटत नाही.

मात्र सध्याच्या शैक्षणिक संस्थांची भरकटलेली दशा पाहून आपणच काहीतरी करायला पाहिजे या आंतरिक तळमळीने ज्ञानदीप फौंडेशनने एक नवे धाडस करायचे ठरविले. नवनिर्मिती वा स्वयंउद्योग करावयाची इच्छा असणा-या पण आवश्यक ते आर्थिक व अन्य पाठबळ नसणा-या अनुभवी व्यक्ती, सुशिक्षित महिला व कोठेतरी नाइलाजाने नोकरी करावी लागणारे बुद्धीमान पदवीधर यांनीच एकत्र येऊन आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते वातावरण व सामायिक सुविधा निर्माण कराव्यात व त्यासाठी आपले तन, मन, धन खर्च करून सर्वांच्या सहकार्याने आपले शिक्षण वा व्यवसाय यात प्रगती करावी व यासाठी ज्ञानदीप फौंडेशनने आपल्या संस्थात्मक दर्जा व आतापर्यंत गेल्या पंधरा वर्षात केलेल्या कार्याचा आधार द्यावा असे निश्चित केले.

सांगलीचे थोर नेते व माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावदादा पाटील यांनी सहकाराचा वृक्ष लावून गरीब शेतकरी व सर्वसामान्य जनतेला समृद्धीचा मार्ग दाखविला. तोच मार्ग नवसंशोधकांनी आणि स्वयंउद्योगाची आस असणा-या व्यक्तीनी अनुसरावा असे ज्ञानदीपला वाटते. त्यामुळेच सदस्यता वर्गणी वार्षिक ५००० रुपये एवढी भली मोठी मात्र कोणत्याही वस्तूनिर्मितीसाठी वा व्यवसायाच्या मानाने अत्यंत कमी ठेवण्यात आली आहे.

ज्यांना असे काही करावयाचे आहे त्यांनीच सदस्यत्व स्वीकारावे.तसेच त्यातील ५० टक्के रक्कम स्वतःच्या प्रकल्पासाठी खर्च करावी असे नियोजन आहे. राहिलेली ५० टक्के रक्कम पत्रव्यवहार, प्रसार, गटचर्चा वा सामायिक सुविधांसाठी तसेच कार्यविस्तारासाठी वापरण्यात येईल. या कार्यपद्धतीत पूर्ण पारदर्शकता ठेवून खर्चाचा तपशील सर्व सदस्यांना कळविला जाईल.

आजीव सदस्यता वर्गणीचा स्थायी निधी करून फक्त व्याजाची रक्कम सदस्याला आपल्या प्रकल्पासाठी वापरता येईल. जरी या योजनेत सदस्याला स्वतःच्या गुंतवणुकीचा फक्त निम्मा हिस्सा वापरावयास मिळत असला तरी सामायिक सुविधा तसेच इतरांचे सहकार्य मिळणार असल्याने सदस्याला गुंतवणुकीपेक्षा अधिक लाभ होईल.त्याचबरोबर शासकीय वा अन्य वित्तीय संस्थांकडून अनुदान वा सवलत मिळण्याची शक्यता वाढेल.

थोडक्यात म्हणजे, आतापर्यंत ज्ञानदीप फौंडेशन स्वत- वेबसाईट, मोबाईल सुविधा इत्यादी नवनिर्मिती करून लोकांना सादर करीत होते. त्याऐवजी ज्ञानदीपमधील सर्व सदस्य एकत्रितपणे वा स्वतंत्रपणे नवनिर्मितीच्या कार्यात सहभागी होतील अशी आशा आहे.

 ज्यांना या माहितीचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी ज्ञानदीप फौंडेशनचे सदस्यत्व स्वीकारावे आणि ज्ञानदीपच्या नव्या रोजगारनिर्मितीच्या कार्यात आपले योगदान द्यावे ही विनंती. अधिक माहितीसाठी तसेच सभासदत्व स्वीकारण्यासाठी संपर्क दुवा - https://www.dnyandeep.net/membership  डॉ. सु. वि. रानडे, अध्यक्ष, ज्ञानदीप फौंडेशन, सांगली

No comments:

Post a Comment