Monday, July 8, 2019

यशाची गुरूकिल्ली - ध्येयासक्ती


डोक्यावर सफरचंद पडले म्हणून न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. टबात आंघोळ करताना आर्किमिडीजला जलशास्त्रातील महत्वाचे तत्व समजले, जेम्स वॅटला चहाच्या किटलीवरील हलणा-या झाकणामुळे तर  रॉंटजेनला क्ष किरणांचा शोधही असाच एका छोट्या चुकीतून लागला अशा शास्त्रज्ञांच्या मनोरंजक  गोष्टी आपण वाचलेल्या वा ऐकलेल्या असतात. अशा गोष्टींमुळे आपल्यालाही असाच काही साक्षात्कार वा चमत्कार होऊन नवा शोध लागेल अशी आपली भाबडी समजूत होऊ शकते  पण असा शोध लागण्यासाठी कोठलेही छोटे निमित्त वा घटना कारणीभूत असली तरी नवनिर्मितीचा हा आविष्कार आधीच्या अविश्रांत प्रयत्नाचे ध्यासाचेच फलित असते हे लक्षात घेतले पाहिजे.
पूर्वीच्या साहस कथा आणि परिकथांमध्ये कथेतील नायक अनेक संकटांशी धैर्याने सामना करीत शेवटी कसा यशस्वी होतो याचे वर्णन असे. कथानायकाच्या वा परिकथेतील राजपुत्राच्या वाटेत विषारी साप, आगीचे लोळ, हिंस्त्र प्राणी वा राक्षस, खवळलेला समुद्र वा प्रबल शत्रू असे अनेक अडथळे येत व शौर्याने वा बुद्धीचातुर्याने लढून नायकाला  विजय प्राप्त करावा लागे.
आजच्या काळात मात्र परिस्थिती पार बदललेली आहे. आता अशा जीवघेण्या संकटांऐवजी माणसापुढे अनेक मोहाच्या व विनासायास सुखप्राप्तीच्या संधींसुविधांनी गर्दी केलेली असते. गप्पा, खेळ, टीव्ही सीरीयल्स, सिनेमा करमणुकीचे व खाण्यापिण्याचे कार्यक्रम, मोबाईलवरील चॅटींग, विनोद, फेसबुक व्हाट्सअप, गाणी सहली क्लबमिटींग्ज, पार्टीज या गोष्टी दिवसातील सारा रिकामा वेळ खाऊन टाकतातच शिवाय  मन आणि बुद्धीलाही ग्रासून राहतात.   या सर्व मोहमयी गोष्टींना  निग्रहाने बाजूला सारून आपल्या ध्येयप्राप्तीसाठी कठोर परिश्रम करणा-यालाच इप्सित यशाचा लाभ होऊ शकतो.
मला या दृष्टीने ससा - कासवाची गोष्ट फार उद्बोधक वाटते. जलद धावण्याची क्षमता असूनही ससा हिरवे गवत खाऊन वाटेतच झोप घेतो तर कासव अतिमंद गतीने चालू शकत असले तरी जिद्दीच्या जोरावर आणि अथक् प्रयत्नाने शर्यत जिंकते व य़शासाठी क्षमतेपेक्षा सहजसुखांचा त्याग करून केलेल्या प्रयत्नांची व ध्येयासक्तीची गरज असते हे सिद्ध करते.
नवनिर्मिती करताना इतर मोहमयी गोष्टीचा त्याग करावा लागला तरी ध्येयासक्ती असेल तर ही एक सहज व आपोआप घडणारी गोष्ट असते. एवढेच नव्हे तर नवनिर्मितीत मिळणारा आनंद अधिक उच्च प्रतीचा आल्हाददायक व चिरस्थायी आहे याची प्रचिती येते. शिवाय अशा एकाग्रतेने संशोधन करीत असताना एक वेगळाच आनंद मिळत राहतो.
नवनिर्मितीप्रमाणेच स्वयंउद्योग सुरू करणा-यालाही आपला वेळ, पैसा खर्च करावा लागला व सतत काम करावे लागले तरी एक उसळता उत्साह त्याला प्रोत्साहित करीत असतो आणि अपयशही त्याला नाउमेद न करता अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देते. अशातूनच एके दिवशी त्याला यश गवसते. यश मिळेपर्यंत त्याच्या प्रयत्नांकडे दुर्लक्षित करणारा समाज या यशाला अचानक झालेला लाभ समजतो. त्याचे अभिनंदन करतो.

यशप्राप्तीचा आनंद कार्यसमाप्तीऐवजी नव्या अधिक उंच ध्येयाकडे वाटचाल करण्यास प्रवृत्त करतो. अशा या निरंतर वाटचालीतच माणसाला चिरस्थायी समाधान मिळत राहते. 

मग कवी कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे

 अनंत अमुचि ध्येयासक्ती
 अनंत अन् आशा
 किनारा तुला पामराला

असा आत्मविश्वास त्याला कार्यमग्न ठेवतो. ---डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

No comments:

Post a Comment