Wednesday, July 10, 2019

वालचंद कॉलेजच्या प्रशासनाची वाटचाल ग्लोबल व्हिजननुसारच




वालचंद क़ॉलेजच्या प्रशासनाची वाटचाल संस्थापक कै. धोंडुमामा साठे यांच्या ग्लोबल व्हिजननुसारच चालू आहे. कॉलेज आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे यासाठी स्वायत्तता मिळवून कॉलेजच्या अभ्यासक्रमात तसेच शैक्षणिक कार्यपद्धतीत आमुलाग्र बदल करून प्रशासनाने केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान मिळविले आहे. त्यामुळेच भारतातील अग्रगण्य संस्था वालचंदच्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी प्रथम पसंती देत आहेत.

अनेक शैक्षणिक संस्था वारेमाप जाहिराती करीत विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असल्या तरी सर्व प्रवेशेच्छु विद्यार्थ्यांची प्रथम पसंती वालचंद कॉलेजच आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. याचे कारणही उघड आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात सगळीकडे बेरोजगारी असली तरी वालचंदचे माजी विद्यार्थी जागतिक दर्जाच्या सोठ्या अभियांत्रिकी संस्थात मानाची पदे भूषवीत असल्याने आणि त्यांना वालचंदविषयी आपलेपणा व अभिमान वाटत असल्याने वालचंदच्या विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेत आणण्यासाठी त्यांच्यातच स्पर्धा असते व त्यामुळे नवपदवीधरांनाही चांगल्या पगाराची नोकरी मिळविण्यात अडचण येत नाही.

ए.आय.सी.टी.ई. व भारत सरकारच्या गुणवत्ता प्रोत्साहन योजनेतर्फे कॉलेजला भरीव अर्थसाहाय्य मिळू लागले आहे आणि अद्ययावत सुविधा आणि उपकरणे खरेदी करणे, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना संशोधनप्रकल्प आणि प्रशिक्षणासाठी, परदेशी प्रवासासाठी व अभ्यास कार्यसत्रे आयोजित करण्यासाठी दिवसेंदिवस अधिकाधिक प्रमाणात अर्थसाहाय्य मिळविण्यात प्रशासन यशस्वी झाले आहे. अनेक कंपन्यांनी कॉलेजशी परस्पर सहकार्य करार करून कॉलेजच्या संशोधन व विकास प्रकल्पासाठी आपली सुविधा केंद्रे देऊ केली आहेत.

हे सर्व खरे असले तरी वालचंद कॉलेजने आपले ध्येय स्वयंउद्योजक निर्माण करण्याकडे करावे असे ज्ञानदीप फौंडेशनला वाटते. कारण वालचंदच्या माजी विद्यार्थ्यांनी गेल्या पन्नास वर्षात अनेक य़शस्वी उद्योजक व व्यावसायिक तयार केले आहेत व भारताला आज अशा स्वदेशी उद्योगांच्या निर्मितीची नितांत गरज आहे.आणि वालचंदच्या विद्यार्थ्यांत ती धमक परंपरेनेच आली आहे.

 याच दृष्टीकोनातून ज्ञानदीप फौंडेशनने गेल्या वर्षी कॉलेजमध्ये नवनिर्माण व उद्योजकताविषयक एक कार्यसत्र आयोजित केले होते व अनेक यशस्वी माजी विद्यार्थ्यानी तसेच उपक्रमशील माजी प्राध्यापकांनी  याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. जगभर पसरलेल्या वालचंदच्या माजी विद्यार्थ्यांना नेटद्वारे एकत्र आणून वालचंदच्या सध्याच्या शिक्षणप्रक्रियेत सक्रीय सहभागी  होऊन त्यांनी कॉलेजच्या प्रगतीस सर्वतोपरी हातभार लावावा यासाठी ज्ञानदीप फौंडेशन प्रयत्नशील राहणार आहे.

वालचंदचा गौरवशाली इतिहास संकलित करण्याचे काम ज्ञानदीपने गेल्या वर्षीच सुरू केले आहे. सुदैवाने मी अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीत  कायमचा रहाणार असल्याने व तेथे वालचंदचे अनेक माजी विद्यार्थी असल्याने या कामात लवकर गती मिळू शकेल असे वाटते. मात्र त्यासाठी वालचंदच्या माजी विद्यार्थी संघटनेचे कार्य अधिक गतीने होण्याची गरज आहे. ज्ञानदीप फौंडेशन यासाठी लागेल ते योगदान देण्यास कटीबद्ध आहे.

वालचंदच्या प्रशासनाने   आणि माजी विद्यार्थी संघटनेने ज्ञानदीपला अशी संधी द्यावी ही अपेक्षा. – डॉ. सु, वि. रानडे, ज्ञानदीप फौंडेशन, सांगली

No comments:

Post a Comment