Wednesday, July 17, 2019

दान आणि धर्म


ब-याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा मिरज जलशुद्धीकरण केंद्र दाखविण्यासाठी विद्यार्थ्यांना घेऊन गेलो होतो. प्लँट दाखवून झाल्यावर तेथील कर्मचा-यांशी अनौपचारिक गप्पा मारताना बहुतेकांनी अपुरा पगार व कामाबद्दल तक्रारीचा सूर लावला, तेथे असलेल्या एका काळसर पोक्त व्यक्तीने काहीच भाष्य केले नाही. तो सर्वांमध्ये बोलायला लाजत असेल या समजुतीने मी त्याला बाजूला घेऊन त्याला बोलते केले.
बोर्जेस नावाच्या त्या गृहस्थाने आपण या नोकरीत अतिशय सुखी आहे इतरांना माझे पटणार नाही म्हणून मी बोलत नाही असे सांगितले. मी विचारले 'तुला पगार कमी मिळतो असे वाटत नाही का' तो म्हणाला, 'माझ्या शिक्षणाच्या मानाने पगार योग्यच आहे आणि पाणी शुद्ध करण्याचे भाग्य मला लाभले ही ईश्वराची कृपा आहे.' मी म्हटले, 'तुमचे या पगारात भागते का?' तो म्हणाला, 'पगार हातात पडला की मी त्यातली दहा टक्के रक्कम दानधर्मात खर्च करतो. ज्यांना काहीच मिळत नाही त्यांना पैसे दिल्यावर त्यांना झालेला आनंद पाहून जे समाधान मिळते ते मला महिनाभर पुरते. नव्वद टक्के पगारातच घरखर्च भागवायचा अशी आमच्या धर्माची शिकवण आहे.'
मी निस्तब्ध झालो. धर्मावर अटळ श्रद्धा असणा-या व्यक्तीच्या महानतेपुढे मी नतमस्तक झालो. अजूनही कोणी गरीब हात पसरून केविलवाण्या चेह-याने माझ्यासमोर आला की मला त्या बोर्जेसची आठवण येते. मग चटकन् हात पाकिटात जातो.

 एकदा असेच झाले. आमची रिक्षा सिग्नलला थांबली होती. एक मुलगी आपल्या लहान भावाला घेऊन माझ्याकडे आशाळभूत होऊन पाहू लागली. मला तिची दया आली पाकिटातून पन्नासाची नोट काढल्यावर ती म्हणाली मोड नसली तर राहू दे मला नमस्कार करून ती दुस-याकडे वळली. मी तिला हाक मारून पन्नासची नोट दिल्यावर तिला वाटलेले आश्चर्य आणि झालेला आनंद मला अजूनही एक वेगळेच समाधान देतो.


No comments:

Post a Comment