Wednesday, July 3, 2019

झाडांबरोबर संवेदनाही रुजवा -

पाऊस सुरू झाला आणि पाण्यासाठी आसुसलेल्या जमिनीने सुगंधी निश्वास टाकला. ग्रीष्मातील तप्त वातावरणही एकदम शांत व आल्हाददायक झाले. तरी उन्हाळ्यात पाण्याच्या दुर्भिक्षामुळे शेतक-यांचे आणि पिण्याच्या पाण्यासाठी सा-या जनतेचे जे हाल झाले त्या वेदना अजूनही ताज्या आहेत.

जमिनीतील पाणी आटल्याने माणूस अंतर्मुख झाला आणि पाणी धरून ठेवणा-या वनराईकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे त्याच्या लक्षात आले. मग वृक्षारोपणासाठी झाडे लावा झाडे जगवा ही स्वागतार्ह चळवळ सुरू झाली आणि लहान, थोर, गरीब, श्रीमंत, स्त्री,पुरुष सर्वांनीच या कार्यात पुढाकार घेतला आहे ही समाधानाची बाब आहे.

मानवाच्या प्रगतीबरोबर पर्यावरणाचे होत असलेले नुकसान मानवाच्या भविष्यातील अस्तित्वालाच धोका पोहोचवत आहे याची जाणीव आता समाज व राज्यकर्ते दोघांनाही झाली आहे. दिवसेंदिवस जमिनीतील पाणी आटत चालले आहे हे पाहून सर्वजण चिंतित झाले आहेत.

मानवाच्या आधुनिक प्रगतीने पाण्याप्रमाणेच माणसाच्या संवेदनाही आटत चालल्या आहेत आणि हे भीषण वास्तव माणसाच्या माणुसकीलाच नष्ट करत चालले आहे असे मला वाटते.
प्रसार माध्यमातील  बलात्कार, हत्या, आत्महत्या तसेच  गरिबांचे व माता भगिनींचे हाल  वर्णन करणा-या मालिका पाहून डोळे पाणावले किंवा या अन्यायाबद्दल चीड आली तरी दारात वा रस्त्यात भिकारी, लहान मूल  वा दुर्दैवी स्त्री मदतीसाठी आशेने हात पसरत असली तरी त्याकडे दुर्लक्ष करताना आपल्याला काही वाटत नाही. सरकारने भिकारी व बेघर लोकांचा बंदोबस्त करावा असा आपला आग्रह असतो.

आपल्या आलिशान बिल्डिंगसभोवती असणारी अनअधिकृत झोपडपट्टी आपल्याला धोकादायक वाटते. तेथील अस्वच्छता, गरीबी, रोगराई, व्यसनाधिनता आणि गुंडगिरी यामुळे आपण कायम असुरक्षित असतो.  ती हटवून दूरवर त्यांना सरकारने घरे बांधून द्यावीत असे आपले प्रामाणिक मत असते. तेथेही आपल्यासारखीच माणसे रहातात व त्यांनाही आपल्यापेक्षा जास्त असुरक्षितता व रोगराईचा सामना करावा लागतो हे आपण विसरतो.

मी १९७३ ते १९७६ मध्ये पीएचडीसाठी आयआयटी कानपूर मध्ये रहात असताना एका फ्लॅटमध्ये दोन विद्यार्थ्याची कुटुंबे दोनदोन खोल्यात आपला संसार मांडीत असत. मी संघाच्या विचाराचा तर माझा पार्टनर पक्का डावा कम्युनिस्ट होता. दोघेही मिळून मिसळून रहात असलो तरी आमचे नेहमी तात्विक वाद चालायचे. तो गरिबांच्या शोषणाबद्दल नेहमी सरकारला दोषी मानत असे. एकदा एका गरीब रिक्षावाल्याशी पैशासाठी घासाघीस करताना मी त्याला पाहिले.  मला आश्चर्य वाटले याबाबत त्याला विचारल्यावर तो  म्हणाला हा माझा दोष नाही. सारी व्यवस्थाच याला कारणीभूत आहे. क्रांती करून ही व्यवस्था नष्ट करणे हाच यावर उपाय आहे. व्यवस्थेला दोष देऊन माणूस आपल्या वागण्याचे कसे समर्थन करतो हे माझ्या लक्षात आले.

नव्या यंत्रयुगामुळे आणि आंतरराष्ट्रीय बलाढ्य व्यावसायिक संस्थांमुळे माणसाकडे केवळ संवेदनशील यंत्र वा ग्राहक या दृष्टी कोनातून पहाण्याचे नवे व्यवस्थापन शास्त्र उदयास आले आहे.

पैसा व आवश्यक त्या सुखसोयी पुरविल्या की माणसे अधिक उत्पादन वा सेवा देऊ शकतात. त्यांना बाकी समाजापासून वेगळे केले की त्यांची कार्यक्षमता वाढते हे दिसून आल्याने वागणुकीचे नियम, परस्पर संवादांचे नियमितीकरण, मनाच्या चंचलतेला वा संवेदनशीलतेला कृत्रिम खाद्य पुरविण्यासाठी प्रसारमाध्यमे, मोबाईल, व्हर्च्युअल रिअलिटी उपकरणे, निसर्ग सहली, जादूचे आभासी विश्व इत्यादी सुविधांची निर्मिती करण्यात आली. दुकानात वा हॉटेलमध्ये जायला लागू नये म्हणून घरपोच सेवा, घरातले सर्व काम करण्यासाठी यंत्रे इत्यादी उपायांनी श्रीमंत व बुद्धीचे काम करणा-यांना इतर समाजापासून वेगळे करण्यात या बहुराष्ट्रीय कंपन्यांना बरेच यश आले आहे.

हे असेच चालू राहिले तर संवेदनाशून्य मानवयंत्रे बाकी इतर सर्वसामान्य जनतेलाही माणुसकी विसरायला भाग पाडतील आणि त्याचा परिणाम सर्वनाशात होईल.

म्हणून माणसाचे माणूसपण टिकण्यासाठी झाडांबरोबर संवेदनाही रुजविण्याची नितांत आवश्यकता आहे. आपल्या आईवडिलांचा व गुरुजनांचा आदर करणे. पूर्वजांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता बाळगणे, दीन दलितांनाही आपल्याप्रमाणेच आशाआकांक्षा आहेत ते आपल्याकडे मदतीच्या आशेने पहात आदेत.  त्या पु-या करणे, त्यांची दुखे दूर करणे आपल्याच  निरामय व सुखी जीवनासाठी व पुढील पिढ्यांच्या उज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

सर्वे   भवन्तु   सुखिन:   सर्वे   सन्तु निरामया: ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दु:ख भाग्भवेत् ॥
डॉ. सु. वि. रानडे,ज्ञानदीप, सांगली

No comments:

Post a Comment