अमेरिकेत कोठेही जा गडबड नाही, गोंधळ नाही सारे कसे शिस्तीत चाललेले
असते. भारतातून सुट्टीसाठी आपल्या मुलांकडे गेलेल्या मंडळींना हे थोडेसे अवघड
जाते. पण मुलांनी दबक्या आवाजात हळू बोलायचा इशारा दिला की त्यांना आपली चूक कळते.
मग हळूहळू त्यांच्या ते अंगवळणी पडते.लहान मुलांचे तसे नसते. कोणालाही न जुमानता
त्यांचे रडणे, ओरडणे चालू असते. तोंडावर बोट ठेवून शांत बसण्यास खुणावले तरी ती ऐकत
नाहीत. काही प्रतिष्ठित हॉटेलमध्ये मुलांना याच कारणसाठी आणायची बंदी असते. अर्थात
आईवडिलांच्या दडपणाखाली अशी मुलेही चुपचाप बसायला शिकतात. पु. ल देशपांडे यांनी
लंडनच्या प्रवासातली अशीच एक आठवण सांगितली होती. सहप्रवासी गप्प बसले असल्याचे
पाहून राजघराण्यात तर काही बरेवाईट तर झाले नाही ना अशी शंका त्यांना येते ते आपल्या
पत्नीला हळूच बोलून दाखवितात. केवढा मोठा
आवाज झाला या भावनेने इतर प्रवासी त्यांचेकडे बघतात.
ऑफिसमध्ये, मॉलमध्ये, हॉस्पिटलमध्ये एवढेच नव्हे तर बागेतही अशीच शांतता भरून असते.
आपल्याकडे गाडीला हॉर्न ही आवश्यक गोष्ट असते व हॉर्न वाजविला नाही हा
गुन्हा ठरू शकतो. तिकडे हॉर्न अगदी क्वचित प्रसंगी वापरला जातो. हॉर्न वाजविणे हे
तेथे असभ्यपणाचे मानले जाते.
कारखान्यामध्येही सर्व यंत्रे विनाकुरकुरत शांतपणे आपले काम करीत असतात.
आवाज कमीतकमी होईल अशी त्यांची रचना व देखभालही काटेकोरपणे केली जाते. तेथील
कर्मचारीही तोंडातून शब्द न काढता यांत्रिकपणे आपले काम चोख करीत असतात.
माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर विज्ञान तंत्रज्ञानात मोठी क्रांती
केली. आपली सर्व कामे विनासायास व अधिक क्षमतेने करण्यासाठी यंत्रांची निर्मिती
केली. माशाप्रमाणे पाण्यातून, पक्ष्याप्रमाणे आकाशातून आणि जमिनीवरूनही हरणापेक्षा
जलद गतीने धावणारी वाहने त्याने बनवली. वाढत्या लोकसंख्येच्या व शहरीकरणाच्या
समस्यांवर तोड काढण्यासाठी शेती, उद्योग व व्यापार तसेच रस्ते, इमारती, कारखाने व
इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्यातही तो यशस्वी झाला.
कौटुंबिक सहजीवनापासून मोठ्या समाजव्यवस्थेतील सहजीवन सुरळीत चालावे
यासाठी स्थानिक ते जागतिक पातळीवर शासनव्यवस्था, कायदे आणि लोकसहभाग या
क्षेत्रातही त्याने लक्षणीय प्रगती केली. माणसानेच निर्माण केलेल्या अति बलाढ्य
आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक आणि व्यापारी संस्थांनी अतिशय कार्यक्षम व कार्यकुशल
व्यवस्थापनासाठी कर्मचा-यांसाठी वागणुकीचे कठोर नियम केले असून त्यात माणसाला
यंत्रासारखे वागण्याचे शिक्षण दिले जात आहे.
त्याहीपुढे जाऊन यंत्रमानवाची निर्मिती करून या संस्थांनी कर्मचा-यांपुढे
यंत्रमानवाशी स्पर्धा करण्याचे आव्हान उभे केले आहे. मात्र कर्मचारीही शेवटी
माणसेच असल्याने ती या स्पर्धेतही य़शस्वी होत असल्याचे अमेरिकेसारख्या प्रगत देशात
प्रत्ययास येत आहे. आपल्या भारतातही सोठ्या शहरातील आंतरराष्ट्रीय कंपन्यात काम
करणा-या लोकांनी अशी कार्यकुशलता व कार्यपद्धत आत्मसात केली आहे. सर्वत्र शांततेत
य़ांत्रिक पद्धतीने काम सुरू झाले आहे.
अशा शांततेत जीवन व्यतीत करणा-या लोकांची ऐकण्याची क्षमता जास्त
आवाजापेक्षा कमी आवाजामुळे कमी होत जाईल की काय असे वाटणे स्वाभाविक आहे. पण ती
काळजी करण्याची गरज नाही. जवळजवळ प्रत्येकजण कानाला वायर लावून मोबाईलवर गाणे वा
पॉडकास्ट ऐकण्यात मग्न असतो. शिवाय टेलिव्हिजनवर व सिनेमागृहात स्टार वार्स सारखे
चित्रपट वा व्हिडीओ किंवा कन्सर्ट आवाजांच्या वैविध्यावर व चढउतारावर लोकांची
ऐकण्याची भूक भागवीत असतात.
मला भीती वाटते ती शांततेची नाही तर एकटेपणाची. माणूस हळुहळू
स्वमग्नतेकडे वाटचाल करू लागला आहे. आणि हे कौटुंबिक व समाजव्यवस्थेला छेद देणारे
आहे..
माणसाची यंत्रमानवाकडून मानवयंत्रे तयार करण्याकडे प्रगती चालू आहे ती
मात्र भयावह आहे. कर्मचा-यांच्या ओळखीसाठी व उपस्थिती नोंदण्यासाठी कॅमेरा व थंब
इंप्रेशन पद्धत सुरू झाली. आता जर्मनीत एका कंपनीने आपल्या कर्मचा-यांच्या हातात
एक मायक्रोचिप बसविली आहे. त्यामुळे कर्मचा-यांची ओळखच काय पण इतर सर्व कामे
स्वयंचलित होऊ लागली आहेत. शिवाय कर्मचा-यांवर २४ तास गुप्त नजर ठेवणेही कंपनीसा
शक्य झाले आहे. मला आश्चर्य य़ाचे वाटले की कर्मचा-यांनी याला विरोध न करता त्याचे
स्वागत केले.
आपण आत्ताच बरेचसे यंत्रांवर
अवलंबून आहोत. यंत्रमानवाच्या देखरेखीखाली मानवयंत्रे काम करू लागतील बाह्य जीवनातही ही मानवयंत्रे आपले माणूसपण
विसरतील. नातीगोती, देव, धर्म, रूढी, चालीरिती
लयाला जातील,
संवेदना, प्रेम, भावना यांची भूक भागविण्यासाठी हॅरी पॉटरसारख्या जादूवर
आधारलेल्या वा परिकथेतील काल्पनिक कथा, संघर्ष प्रसार माध्यमांतून दाखविले जातील.
प्रत्यक्ष अनुभवासाठी वा डिस्नेलॅंडसारखे प्रकल्प उभारले जातील.सारे जगच
अमेरिकेप्रमाणे अतिप्रगत, सुखावह पण आत्मकेंद्रीत बनेल. – डॉ.
सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली
No comments:
Post a Comment