Saturday, June 22, 2019

शाळेची घंटा झाली आणि मराठी जागी झाली

आज शनिवार. लहानपणी शनिवारी सकाळी थंडीत कुडकुडत शाळेत जाताना एक अनामिक उत्साह वाटत असे. कारण शनिवार सकाळ म्हणजे पाढ्यांचा वार. शाळेची घंटा झाली की प्रार्थना होईपर्यंत पाढे म्हणायला मुले अधीर झालेली असायची. गुरुजीनी सुरुवात केली की सर्व मुले एकसुरात व एका तालात बेपासून ते तीसपर्यंत मोठ्याने पाढे म्हणायची. पहिलीत बेचे पाढे, दुसरीत बे आणि अकराचे पाढे, तिसरीत बेपासून तीसपर्यंत तर चौथीत दीडकी, सवायकी,अडीचकी असा चढत्या क्रमाने पाढे म्हणण्याचा कार्यक्रम सर्वांना हवाहवासा वाटायचा. घरात शुभं करोती व आरत्या म्हणताना असणा-या उत्साहाला शाळेत सर्वांमुळे अधिकच उधाण येई. सुरुवातीला काही जणांनाच पाढे येत असले तरी अशा सामुहिक पाढे म्हणण्याच्या शिरस्त्यामुळे सर्वांचेच पाढे विनासायास तोंडपाठ होत असत.

मूल आधी बोलायला शिकते ते इतरांचे अनुकरण करूनच. त्यावेळी जोडाक्षरांचा बागुलबुवा भीती घालत नाही. उच्चारातला सोपेपणा, लय व गेयता यांनाच महत्व असते. त्यामुळे अक्षरओळख नसली तरी मुले आरत्या व स्तोत्रे पाठ करू शकतात. पाढे याचप्रप्कारे मुलांना सहज पाठ होत. पाढे लिहिण्यास शिकण्याचे काम पुढे सावकाश होत रहायचे.

नव्या शिक्षणपद्धतीत घोकंपट्टीला केवळ गौण स्थानच नव्हे तर निषिद्ध मानले गेले. तर्कशुद्ध पद्धतीत आधी एक अंकी संख्या लिहिणे व मग बेरीज, वजाबाकी. त्यानंतर बेरजेपासून गुणाकाराची उत्पत्ती आणि नंतर पाढे तयार करणे या क्रमाने गणित शिक्षण सुरू झाले. माझ्या नातवंडांना हे शिकताना होत असलेला त्रास पाहून मी जुन्या पाढेपद्धतीचा वापर करून व स्वत: पाढे म्हणून एक अॅंड्रॉईड अॅप तयार केले. (https://play.google.com/store/apps/details?id=com.dnyandeep.padhe&hl=en)

माझ्यासारख्या आजोबा आजींना ते खूप आवडले व बघताबघता दीड लाखावर ते डाऊन लोड झाले.

अर्थात त्यावर काही शिक्षणतज्ज्ञांनी निरुपयोगी कालबाह्य पद्धत असा शेरा मारला.

या अशा उच्च शिक्षाचिभुषित मान्यवरांनी ही जुनाट पद्धत समूळ नष्ट करण्यासाठी शालेय अभ्यासक्रमातच पहिलीपासून इंग्लिशच्या धर्तीवर शास्त्रशुद्ध पद्धतीने गणित शिकविण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला.

नवी पुस्तके बाजारात आली. जुन्या शिक्षकांच्या हातात पडली आणि शाळेच्या ह्या  नवा घंटानादाने सारा मराठी समाज खडबडून जागा झाला. जणु मराठी भाषादेवीलाच जाग आली.

आता काय होईल ते काळच ठरवेल, मात्र जुने पाढे आता अधिक भक्तिभावाने घरोघरी म्हटले जातील व मराठी माध्यमातील मुले गणितात अव्वल बनतील यात शंका नाही.

नव्या शिक्षणपद्धतीचा आग्रह धरणा-यांचे हे योगदान मराठीसाठी नवसंजीवनी ठरणार आहे हे निश्चित. - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

No comments:

Post a Comment