वालचंद कॉलेजमध्ये १९६६ मध्ये शिक्षक म्दणून रुजू झाल्यानंतर पहिल्यांदा मला सर्व्हे प्रॅक्टिकल घ्यावी लागत. तेव्हा वर्गाबाहेर विद्यार्यांच्यात मिसळायला मला मिळत असे. शिकवितानाच त्यांच्या व्यक्तिमत्वाची तसेच घरच्या परिस्थितीची ओळख होई. मग विद्यार्थ्यापेक्षा मित्र वा थोरला भाऊ या नात्याने मी त्यांच्याशी वागत असे. माझे गुरू डॉ. सुब्बाराव यांच्याबरोबर पर्यावरण क्षेत्रात काम करीत असतांना प्रत्येक संशोधन वा कन्सल्टेशन प्रोजेक्टमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतल्यामुळे माझा दृष्टीकोन विद्यार्थ्यांबद्दल नेहमीच आपलेपणाचा राहिला. सुब्बाराव आणि विद्यार्थी यांच्यातला दुवा म्हणून मी काम करीत असल्याने विद्यार्थी हक्काच्या मैत्रीच्या नात्याने माझ्याकडे आपले मनोगत वा अडचणी व्यक्त करू लागले.
आमच्या सिव्हील डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांच्या संघटनेचा (CESA) बराच काळ मी मार्गदर्शक होतो. त्यावेळी म्हणजे १९८० ते २००० या काळात आम्ही कॉलेजमधीत फायनल इयरच्या सर्व ब्रॅंचेसमधील विद्यार्थ्यांचे पत्ते सेसा संघटनेमार्फत लिंक नावाच्या छोट्या पुस्तकरुपात प्रसिद्ध करीत असू.
वालचंद कॉलेज माजी विद्यार्थी संघटनेची घटना व नाव बदलून खर्या अर्थाने संघटनेचे काम १९९८ मध्ये सुरू झाले. इ. स. २००० पासुन मी त्याच्या ऑपिस व्यवस्थापनाच्या कामात सहभागी झालो. प्रा. जे. जी. कुलकर्णी, प्रा. ए. जी इनामदार, प्रा. पाटणकर यांचे बरोबर काम करण्याची संधी मिळाली. नंतर माजी विद्यार्थी संघटनेची वेबसाईट बनवण्याचे काम ज्ञानदीपने हाती घेतले.
कॉलेजमधील जनरेटर रूमच्या शेजारी एसलेल्या रूममध्ये आम्ही संघटनेचा संसार मांडला. माझ्या काही विद्यार्थ्यांना हाताशी धरून माजी विद्यार्थ्यांचा डाटाबेस करून पहिले डिजिटायझेशन आम्ही त्यावेळी केले. कॉलेज चे जुने फोटो मिळवणे, संस्थेची घटना, स्व. धोंडुमामा साठ्ये यांचे मनोगत, माजी विद्यार्थ्यांची माहिती संकलित करणे याकामी शर्विल शहा या विद्यार्थ्याने मला फार मदत केली ( आज तो अमेरिकात मोठ्या पदावर कार्यरत आहे) नॉन टेक्निकल संघटनेने आमच्या ऑफिसच्या जागेबद्दल विरोध केला. कऑलेज प्रशासनासही संघटनेची पाटी खोलीवर लावणे आवडले नाही. शेवटी पाटी काढून टाकली पण नेटाने तेथेच काम सुरू केले. इलेक्ट्रिकल डिपार्चमेटने त्यांची वेगळी संघटना सुरू केली.
पूण्याला प्रा. अभ्यंकरांनी पुणे चॅप्टर या नावाने संघटनेचे कार्य सुरू केले.
२००३ ते २००८ पर्यंत श्री अरविंद देशपांडे व नंतर २००८ ते २०१३ पर्यंत प्रा. अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली असणा-या संचालक मंडळात मी सहसचिव म्हणून काम केले. त्यावेळी सभेच्या नोटिसा काढणे, ठराव लिहिणे, विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घेणे ही कामे आम्ही उत्साहाने घरच्या कार्यासारखी केली.
२०१३ ते २०१८ पर्यंतच्या काळात माझा समावेश संचालक मंडळात मार्गदर्शक म्हणून करण्यात आला. श्री कोटीभास्कर आमि के. के. शहा यांनी संघटनेच्या ऑफिसचा स्वखर्चाने कायापालट केला. रंग लावला, नवे फर्निचर आणले. नव्या आधुनिक थाटात संघटनेचे काम सुरू झाले.
माझ्या पत्नीच्या आजारपणामुळे मला संघटनेच्या कामात पूर्वीएवढे लक्ष घालता येईना. संचालक मंडळातील सर्व व्यावसायिक असल्याने नियमितपणे एकत्र येणे व ऑफिस सतत उघडे ठेवणे यात खंड पडला. मी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा आजीव सदस्य झाल्याने माझ्याबद्दलही प्रशासन आणि संचालक मंडळ यांच्या मनात संशय निर्माण झाला.
खरे तर म. टे. ए. सोसायटीत सभासद होण्याची माझी फार पूर्वीपासून इच्छा होती. अनेक वेळा अर्ज करूनही मी कॉलेजमध्ये नोकरी करीत आहे या कारणास्तव मला सभासदत्व मिळाले नव्हते. कऑलेजातील सर्व माजी शिक्षकांनी सोसायटीत सभासदत्व घ्यावे व सोसायटीच्या माध्यमातून पुण्यातही आपल्या कॉलेजची शाखा काढावी असे मला वाटे. पण सारे विपरीत घडले. कॉलेज, सोसायटी व प्रशासन यात मतभेदांच्या भिंती फभ्या राहिल्या. संघटनेची या सर्व गदारोळात गळचेपी झाली.
आज पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची संधी आली आहे व आवश्यकताही आहे असे मला वाटते. सर्वांनी ठरविले व माजी विद्यार्थी संघटनेला कोणत्याही बाह्य दडपणापासून मुक्त केले तर चमत्कार घडेल.कल्पनाही करता येणार नाही एवढे सामर्थ्य आणि धनशक्ती गोळा करण्याची पात्रता या संघटनेत आहे. कॉलेजचा एक उपविभाग म्हणून नव्हे तर कॉलेजला सशक्त व समर्थ आधार देणारी संस्था म्हणून कॉलेज पूर्ववत एकसंध व स्वायत्त ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावण्याचे सामर्थ्य तिला प्राप्त होईल.
वालचंद कॉलेज हे माझे आईवडिलांइतकेच श्रद्धास्थान आहे. माजी विद्यार्थी संघटना हे कॉलेजच्या संजीवनाचे मुख्य साधन आहे अशी माझी धारणा आहे. त्यामुळेच माजी विद्यार्थी संघटनेबद्दल मला इतकी आत्मियता वाटते.
वालचंदची गौरवशाली शिक्षणपरंपरा अबाधित रहावी यासाठी माजी विद्यार्थी व माजी प्राध्यापक संघटनांच्या माध्यमातून आपण सर्वांनी आपले योगदान द्यावे. ज्ञानदीप याबाबतीत सर्वतोपरी सहकार्य करेल अशी मी ग्वाही देतो. - डॉ. सु वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.
No comments:
Post a Comment