शनिवार व रविवार यादिवशी शैक्षणिक संस्थांनी एक प्रयोगशाळा आणि एक वर्गखोली उपलब्ध करून दिली तर नव्या शिक्षणपद्धतीतील कोणत्याही उपक्रमात बदल न करता नवनिर्मिती प्रकल्प सुरू करणे शक्य आहे.
मी कॉलेजवर प्राध्यापक म्हणून काम करीत असताना आम्हाला शिकविण्याच्या पद्धतीत खूप स्वातंत्र्य होते. तरीही शनिवार, रविवार आमच्या दृष्टीने पूर्ण कॉलेजबाह्य कामाचे असत. चर्चासत्र, शैक्षणिक सहल,कन्सल्टेशनसाठी बाहेरगावी प्रवास ही कामे विद्यार्थी आणि शिक्षक यांचे संयुक्त गट शनिवार, रविवारी करत असत. माझे मराठी विज्ञान प्रबोधिनीचे कार्यक्रम, विद्यार्थी संघटना तसेच रोटरॅक्ट, नाट्य, संभाषण वर्ग, इतर सामाजिक उपक्रमातील सहभाग यामुळे शनिवार रविवारची सुट्टी आम्हाला एक नियमित पर्वणी होती.
आजही अनेक प्राध्यापक सुटीच्या काळात अशा कामात व्यग्र असतात. आमच्या कॉलेजमधील प्रा, सुनील कुलकर्णी तर सहा जिल्ह्यातील संघशाखांना भेटी देण्यासाठी गेली कित्येक वर्षे प्रत्येक शनिवार रविवारचा उपयोग करीत आहेत. सांगलीतील पक्षीमित्र श्री. शरद आपटे गेली वीस वर्षे सातत्याने शनिवार रविवारी पक्षी निरिक्षणासाठी विविध ठिकाणी जात आहेत. अशी अनेक उदाहरणे गावागावात आढळून येतात. कोणावरही सक्ती न करता स्वेच्छेने असे काम करण्यास तयार असणा-यांना एकत्र आणले तर नवनिर्मिती प्रकल्प सहज सुरू करता येईल.
नवनिर्मिती प्रकल्पात मी आतापर्यंत केवळ निवृत्त शिक्षक आणि माजी विद्यार्थी यानाच गृहीत धरले होते. मात्र सध्या शिकत असलेले विद्यार्थी आणि या प्रकल्पात काम करू इच्छिणारे शिक्षक, प्राध्यापक वा अन्य नागरीक यांचाही समावेश करणे आवश्यक आहे.
समान पातळीवर एकत्र चर्चा करणे, उद्योगांना व प्रकल्पांना भेटी देणे, संशोधन करणे वा एखादे उपकरण बनवणे अशी कामे या अवधीत करता येतील. शैक्षणिक संस्थांनी यासाठी जागा व इतर आवस्यक सोयी उपसब्ध करून दिल्या तर ज्ञानदीप फौंडेशन असे नवनिर्मिती प्रेरणा कार्यक्रम सुरू करेल. मग केवळ वालचंद कॉलेजच नव्हे तर इतर शैक्षणिक संस्थातही असे कार्य सुरू करता येईल.
या सर्व गटांच्या कार्याची माहिती, सभासद नोंदणी व कार्यक्रम आखणी ही कामे ज्ञानदीपतर्फे केली जातील. एक परस्पर सहयोग करार करून असा प्रकल्प सुरू करता य़ेईल. – डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली
No comments:
Post a Comment