Wednesday, June 26, 2019

वालचंद कॉलेज आणि मी ---


मी फारच भावनाप्रधान होत चाललो आहे हे मला जाणवू लागले आहे. कॉलेजबद्दल एवढा प्रेमाचा उमाळा येणे बरोबर नाही. कॉलेजच्या सद्यस्थितीकडे  त्रयस्थ दृष्टीने पहायला शिकणे हे इतरांना सहज जमलेले कौशल्य मला आता मिळवणे अशक्य झाले आहे.

माझी आई अशीच होती. माहेर आणि सासर असा भेद तिच्याकडे नव्हता. स्वतपेक्षा नातेवाईकांच्या  काळजीतच ती सतत व्यग्र असायची. माझे वडील त्यामानाने विचारी व व्यवहारी होते. ते म्हणायचे कशाता काळजी करतेस. त्यांची काळजी घ्यायला ते समर्थ आहेत आणि त्यांनी मागितली तर आपण काहीही मदत देऊच की. उगाच काळजी करत बसू नकोस. पण ते आईला उमगायचे नाही. कदाचित आपण हतबल वा परावलंबी आहोत असे तिला वाटत असेल.
माझी पत्नी आपल्या आईबद्दल अशीच हळवी होती. तिच्या आईने ज्या काबाडकष्टांतून दिवस काढले व स्वतच्या श्रमांची वा गरिबीची पर्वा न करता जिद्दीने पाच जणांचा संसार पैरतिरी यशस्वीपणे ओढून नेला याबद्दल शुभांगीला तिच्याबद्दल नितांत आदर होता. त्यामुळेच असेल कदाचित. आई गेल्यावर  तिला आईच्या कवी मनातील प्रतिभेचा लाभ झाला आणि एकामागोमाग एक अशा अनेक कविता तिला स्फुरल्या आणि काव्यदीप, सांगावा आणि सय या तीन कविता पुस्तकांच्या रुपात प्रसिद्धही झाल्या. तिच्या पहिल्या काव्यदीप पुस्तकात तिने म्हटले आहे की

आम्हाला जरी सोडून गेलीस
काव्यधना परि देऊन गेलिस
सकलांना ते वाटुन देण्या
 कधी न विस्मरणार
माउली सदा तुला स्मरणार

सौ. शुभांगी गेल्यानंतर असेच काहीसे माझे झाले आहे.मला तिच्याइतकी प्रतिभा नाही मात्र माझ्या आईकडून मिळालेल्या संवेदनशील मनाला शुभांगीच्या काव्यधनाचा लाभ जाला आहे.

ज्या कॉलेजमध्ये मी शिकलो. ज्या कॉलेज परिसरात  माझे सारे जीवन व्यतीत झाले त्या कॉलेजच्या भवितव्याबद्दल मला फार काळजी वाटू लागली आहे. आपण काहीतरी नव्हे तर काहीही करून कॉलेजला पुन्हा पूर्वीच्या वैभवशाली व स्वायत्त गुरुकुल स्थितीला नेण्याची प्रबळ इच्छा  मनात निर्माण झाली आहे. माझ्या आईसारखी हतबलतेची जाणीव अजून तरी मला नाउमेद करत नाही.

आज ना उद्या माझ्या प्रयत्नांना यश येणार याची मला खात्री आहे. तोपर्यंत
शुभांगीच्या चाल एकला या कवितेत दिलेला संदेश आणि इतरांचे साहाय्य मिळण्याची आशा मला कार्यरत ठेवणार आहे.

 आता माझे ठरले आहे. कॉलेजची माजी विद्यार्थी संघटना आणि महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी या  कॉलेजच्या भल्यासाठी झटणा-या संघटनांना समर्थ व सशक्त करून कॉलेजच्या शैक्षणिक स्वायत्ततेचे रक्षण करणे. इतरांनी मदत करावी असे वाटते पण नाही केली तरी कोणतेही वैषम्य न बाळगता जणु मला एकट्यालाच याचे श्रेय मिळवून देण्याची त्यांची इच्छा आहे असे मानून मी संघर्ष चालू ठेवणार आहे.     – डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

No comments:

Post a Comment