Tuesday, June 18, 2019

जगायचे कसे ?


 जगायचे कशासाठी हा लेख लिहिल्यानंतर सहज मनात विचार आला, जगायचेच तर कसे जगायचे याबद्दल आपले विचार मांडावेत. आजपर्यंत विविध धर्मातील अनेक साधुसंतांनी कसे जगावे याविषयी उपदेश केला आहे तोही कोणी फारसे मनावर घेत नाही तर माझ्या विचारांना कोण विचारणार ?

तरीही शिक्षकी पेशामुळे सांगितल्याविना राहवत नाही म्हणून हा प्रपंच.

प्रत्येक माणसाचे शरीर, बुद्धी व मन  त्याचे स्वत:चे असते. त्याचे आयुष्यही त्यालाच भोगायचे वा उपभोगायचे असते. त्यामुळे त्याने काय खावे, काय व कसे काम करावे, आपले आरोग्य कसे राखावे, इतरांशी कसे वागावे हे तोच ठरवत असतो. त्याचे चांगले वाईट परिणामही त्यालाच भोगावे लागतात.

लहानपणी मी, माझे असा बालसुलभ हट्ट असतो. . वडिलधार्यांचे वा गुरुजनांचे संस्कार व शिस्त यामुळे त्यात बदल होऊन इतरांशी सहकार्य करणे कसे फायद्याचे असते हे उमजते. शिक्षणामुळे मनाच्या जाणिवा विस्तारून इतराँबद्दल व सजीव सृष्टीविषयी ते संवेदनशील बनते. बुद्धीच्या विकासाने योग्य सकारात्मक विचार करून निर्णय  घेण्याची क्षमता प्राप्त होते. चांगल्या झाडांपेक्षा तण तगेच रुजते व वाढते त्याप्रमाणे कामक्रोधादि षडरिपु नकळत मनाचा व बुद्धीचा ताबा घेऊ शकतात. त्यकडे दुर्लक्ष केले की ते आपली मुळे पसरवून शिरजोर होतात. मग इतरांनी  कितीही व  काहीही सांगितले तरी घट्ट मूळ धरून बसलेल्या वाईट सवयी आणि स्वभावातील विकृती यांचाच प्रभाव सा-या जीवनाला व्यापून टाकतात. नंतर अशी स्थिती येते की माणूस कळत असूनही हतबल होतो.  

माझी एक जुनी आठवण अजूनही मला उद्विग्न करते. अतिशय बुद्धीमान व तत्वचिंतक असा माझा एक अगदी जवळचा नातेवाईक दारूच्या व्यसनामुळे आपले आयुष्य गमावून बसलाच पण सार्या कुटुंबाला त्याच्या या सवयीने उध्वस्त केले. आहार विहारात दुर्लक्ष केले आळस व आवड यांच्या आहारी गेले की शरीर व मानसिक स्वास्थ्य बिघडते. आजही सभोवती अशी माणसे पाहिली की मला त्यांना उपदेश करायचा मोह होतो. पण त्याचा फारसा परिणाम होणार नाही हे कळून मन खिन्न होते.

जी गोष्ट व्यसनाची तीच रागाची वा लोभाची. त्याचे दुष्परिणाम केव्हा प्रकट होतील हे सांगता येत नाही. आपण कोणावर रागावलो तर त्याचा आपल्यालाही तेवढाच त्रास होत असतो. नाती तुटतात, मित्रसंबंध दुरावतात, ज्याच्यावर रागावलो तोही प्रतिशोधाची संधी शोधू लागतो. लोभाच्या मोहाने भ्रष्टाचार केल्यास संपत्ती वाढू शकते पण आपण कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी भविष्यात ते उघडकीस येऊ शकते शिवाय ते मागे जाऊन पुसूनही टाकता येत नाही. ते भुतासारखे मन व बुद्धीला कायम घाबरवत राहते. आपले जीवन सुखी होण्यासाठी केवळ पैशाची घरज नसून उत्तम आरोग्य व चिंता मुक्ततेची नितांत आवश्यकता आहे.

सत्तेची नशाही माणसाची सारासार विचार करण्याची क्षमता व सहानभूती वा संवेदना नष्ट करते. त्यातून घडणारे शोषण वा अत्याचार आपल्या जीवनाला कायमचे कलंकित करतात.

 या सर्वांचा विचार करता आपल्या आयुष्याचा कर्ता करविता बव्हंशी आपण स्वतच असतो.

आपले शरीर, बुद्धी व मन, ज्यावर केवळ आपलीच मालकी आहे  व जीवनातील यश अपयश ठरविण्यासाठी वा जीवनसंघर्षात विजयी होण्यासाठी,  आपल्या हातात तेवढीच आयुधे ईश्वराने दिली आहेत  हे लक्षात घेतले पाहिजे. समाज, शासन व निसर्ग यांची बाह्य बंधने आपल्या  जीवनावर परिणाम करतातच. पण जे आपल्या हातात आहे ते तरी आपल्याला अनुकूल राहील याची दक्षता आपण घेतली पाहिजे. अर्थात हे माझे व्यक्तीगत विचार आहेत. शेवटी आपले जीवन कसे जगायचे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे आहे.

आजचे युग व्यक्तीस्वातंत्र्याचे आहे. प्रत्येकाला आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचे व मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे.  'ऐकावे जनाचे , करावे मनाचे' हा सुखकारक सोपा मार्ग सर्व  कटाक्षाने अनुसरतात. त्यामुळे त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याची बूज राखून मी आपली मते त्यांच्या विचारार्थ मांडली  आहेत.

 - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

No comments:

Post a Comment