Tuesday, July 28, 2020

माजी विद्यार्थी संघटना - उद्दिष्टे आणि कार्य

 शाळा व कॉलेजमध्ये शिकून विद्यार्थी बाहेर पडले तरी त्यांना या शिक्षणसंस्थांबद्दल आपलेपणा व प्रेम असते. संस्कारमय वयात या शाळा कॉलेजात बराच काळ घालविल्यामुळे तेथील शिक्षकवर्ग, एकंदरित वातावरण, मित्रपरिवार आणि अनेक कार्यक्रमातील सहभाग यामुळे या स्मृती सर्वांनाच जिव्हाळ्याच्या व आनंददायी वाटतात.

शाळा सोडून कॉलेजमध्ये गेल्यावर किंवा कॉलेजमधून बाहेरच्या जगात नोकरी वा व्यवसायानिमित्त बाहेर पडल्यावर या मित्रपरिवाराची ताटातूट होते. तरीदेखील केव्हाही आपल्या शाळेतील वा कॉलेजातील कोणीही भेटले तरी आपल्याला त्यांचा अभिमान व आपलेपणा वाटतो. माजी विद्यार्थी म्हणून आपले एक नवे नाते तयार होते. या नात्यातूनच एकमेकांना मदत करण्याची प्रेरणा मिळते. माजी विद्यार्थी संघटनेचे कार्य असे नाते वृद्धींगत करणे हे असते. याचा फायदा शिक्षणसंस्थेला निश्चितच होतो. पण यासाठी माजी विद्यार्थ्यांच्या हितासाठी असे संघटन माजी विद्यार्थ्यांनीच चालविले तर ते अधिक प्रभावी आणि सर्वांनाच लाभदायी ठरते.

शाळा कॉलेजला नदीची उपमा दिली तर माजी विद्यार्थी संघटनेला जीवनसागरातील  या नदीचा विखुरलेला पण एकमेकांना आधार देणारा प्रवाह समजता येईल. माजी विद्यार्थ्यांना जीवनात अनेक समस्यांना एकाकीपणे तोंड द्यावे लागते. त्यांच्या मदतीसाठी अशी सशक्त व सक्रीय संघटना असली तर त्यांना त्याचा फायदा होईल.

शाळाकॉलेजातून बाहेर पडणा-या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या समस्या सोडविणे, त्यांचे यश सुनिश्चित करणे ही कामे अशी संघटनेतर्फे झाली तर सर्व माजी विद्यार्थी आपणहून अशा संस्थेचे सदस्य बनतील आणि संस्थेसाठी आपलेपणाने कार्य करतील. शिक्षणसंस्थेला आपल्या सर्व माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यासाठी, संस्थेच्या प्रगतीची माहिती व मदतीची अपेक्षा वा विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी विनासायास एक स्रोत तयार होईल.

 शिक्षणसंस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेस स्वायत्तता असेल तरच या सर्व गोष्टी घडू शकतील. अन्यथा केवळ मदत मागण्यासाठी शिक्षणसंस्थेने माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधला तर फारसा प्रतिसाद मिळत नाही. यासाठी माजी विद्यार्थ्यांचे हित सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे हे शिक्षणसंस्थेने मानले पाहिजे व अशी वेगळी संस्था करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. अशी संस्था माजी शिक्षक, माजी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचेच हित सांभाळेल व  शिक्षण संस्थेच्या उन्नतीसाठी कार्यरत राहील.

ज्ञानदीप फौंडेशनने याच दृष्टीकोनातून वालचंद कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेचे कार्य आपल्या हाती घेतले आहे. कॉलेजला आपल्या अशा संस्थेकडून जे कार्य करणे शक्य होणार नाही ते सर्व कार्य करण्याचे स्वातंत्र्य वालचंद हेरिटेज प्रकल्पात माजी विद्यार्थ्यांना मिळणार असून त्याचा फायदा वालचंद कॉलेजलाच होणार आहे.

No comments:

Post a Comment