कोरोनाच्या जगावरील अचानक आक्रमणामुळे सर्व देशांची अर्थव्यवस्था मोडकळीस आली. भारतातही लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. याचा जबर फटका इतर क्षेत्रांप्रमाणे शिक्षणक्षेत्रालाही बसला. ऑनलाईन शिक्षण व परिक्षा हाच पर्याय राहिल्याने सर्व शिक्षणसंस्थांची मोठी अडचण झाली. गुगल हॅंगआऊट, स्काईपसारख्या सुविधा वापरण्यात मर्यादा येत होत्या. अशावेळी झूम या चिनी कंपनीच्या सुविधेचा वापर करण्यवाचून भारत व अमेरिकेलाही गत्यंतर उरले नाही.
गुगलने झूमपेक्षाही सरस आणि अनेक सुविधा असलेले गुगल मीट सुरू केले आणि आपल्याला हायसे वाटले. गुगलने क्लासरूम, जामबोर्ड, स्लाईड शेअर व अशाच अनेक ऑनलाईन सुविधांचा वापर गुगल मीटमध्ये करण्याची सोय केली आहे व त्याचा वापर कसा करायचा याचे व्हिडिओ यूट्यूबवर प्रसिद्ध केले आहेत. .
भारतात फार मोठी गंतवणूक करून सध्याच्या पारंपरिक शिक्षण पद्धतीला एक सशक्त ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय गुगलने सर्वांना देऊ केला आहे खरे पण गुगलच्या हातात शिक्षणाची सारी सूत्रे जाणार आहेत. याचा परिणाम काय होईल हे अभ्यासले पाहिजे. येथील शिक्षणसंस्थांना आपल्या भवितव्याविषयी गांभिर्याने विचार करण्यास भाग पाडले आहे.
गुगलची ही प्रेमाची भेट म्हणजे सा-या शिक्षणव्यवस्थेलाच बसणारी मगरमिठी ठरू शकेल. गुगलप्रमाणेच मायक्रोसॉफ्ट, अडोब, इंटेल, आयबीएम आणि इतर अनेक बलाढ्य आयटी कंपन्या भारतातील विद्यार्थ्यांची बाजारपेठ काबीज करण्यासाठी पुढे सरसावल्या असून थोड्याच काळात आपले विद्यार्थी परदेशी विद्यापीठांतून व परदेशी शिक्षकांकडून शिकू लागतील.
जी स्थिती शिक्षण संस्थांची तीच स्थिती भारतातील सर्व उद्योगांची आणि व्यवसायांची होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आत्मनिर्भर भारत ही फक्त घोषणाच राहील पण वर्चस्व बहुराष्च्रीय कंपन्यांचे राहील अशी भीती वाटते.
भारताने आयटी क्षेत्राकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. आयटी क्षेत्रातील लोकांनी परदेशी कंपन्यांना मोठे केले पण भारतातील जनतेला अज्ञानाच्या अंधकारात ठेवले. अजूनही कोणत्याही मोठ्या शहराची देखील स्थानिक भाषेत संपूर्ण माहिती देणारी वेबसाईट नाही. छोटी गावे आणि खेडेगावांची तर बातच सोडा. गेली वीस वर्षे भारतीय भाषांचा आग्रह धरणा-या ज्ञानदीपची स्थिती शाळा किंवा रेल्वेच्या प्लॅटफॉर्म सारखी राहिली व विद्यार्थी शिकून परदेशात वा बहुराष्ट्रीय कंपन्यांत जात राहिले.
ज्ञानदीपचा स्थानिक भाषेचा आग्रह यासाठीच आहे. आपल्याला आपल्या भाषेबद्दलच कमीपणाची भावना आहे. त्यामुळे आमच्या वेबसाईट वा सॉफ्टवेअरच्या कामाकडे केवळ कुतुहल व होस या दृष्टीकोनातून पाहिले गेले. इंग्रजी हीच आपली भाग्यविधाता भाषा राहिली. आता ही स्थानिक भाषाच आपल्याला नवे बळ देऊ शकेल कारण ती वापरण्यात आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्यापेक्षा पुढे जाऊ शकत नाहीत. चीन कोरिया, रशिया यांनी शिक्षणात आपली भाषा सक्तीची करून बहुराष्ट्रीय कंपन्यांना अटकाव केला आहे. तीच रणनीती आपण आखली पाहिजे.
No comments:
Post a Comment